Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

इटलीतील उद्योग उभारणीबाबत उस्मानाबादमध्ये उद्योजकांशी चर्चा
इटलीचे शासकीय शिष्टमंडळ उस्मानाबादमध्ये
उस्मानाबाद, २६ जून/वार्ताहर

कौडगाव येथील येथील औद्योगिक वसाहतीत १० हजार कोटींची गुंतवणूक करणाऱ्या इटलीच्या

 

शासकीय शिष्टमंडळाने राज्यातील उद्योजकांशी आज उस्मानाबादमध्ये चर्चा केली.
इटलीतील कंपन्यांशी भागीदारी करून महाराष्ट्रातील उद्योजक कौडगाव वसाहतीत उद्योजकांची उभारणी करणार आहेत. इटलीचे तंत्रज्ञान आणि तेथील उत्पादनांची माहिती घेण्यासाठी राज्यातील उद्योजकांचे एक शिष्टमंडळ येत्या ११ ते १९ जुलैदरम्यान इटली दौऱ्यावर जाणार आहे, अशी माहिती उद्योग खात्याचे राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
इटलीतील मार्के रिजनच्या एका शिष्टमंडळाने कौडगाव येथील नव्या औद्योगिक वसाहतीची तीन महिन्यांपूर्वी पाहणी केली होती. ‘सीआरएस ग्लोबल’चे कार्यकारी संचालक रॉनी सायमन, अ‍ॅडेलिना निकोलाजी, पोलॉ पार्टा, व्हिटो टारडेई यांनी आज उस्मानाबादमधील जिल्हाधिकारी कार्यालयात भागीदारी उद्योगासंदर्भात राज्यातील उद्योजकांशी चर्चा करून इटलीच्या भेटीचे निमंत्रण दिले. श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषीप्रक्रिया, सौर ऊर्जा, अभियांत्रिकीची उत्पादने, औषध निर्मिती, रोजगार प्रशिक्षण केंद्र आदी विषयांवर इटली, उस्मानाबाद, औरंगाबाद, पुणे, मुंबई, सोलापूर येथील उद्योजकांनी आपापसात चर्चा केली.
उस्मानाबादमधील गुंतवणुकीसंदर्भात येत्या ३ जुलैला सह्य़ाद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात राज्यातील अन्य उद्योजकांशीही चर्चा केली जाणार असल्याचे उद्योगमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. इटलीतील सीआरएस ग्लोबल कंपनीचे कार्यकारी संचालक रॉनी सायमन यांनी, आपण पुन्हा उस्मानाबादमध्ये येऊ शकलो आणि भागीदारीसंदर्भात येथील उद्योजकांनी सहकार्याचे अभिवचन दिल्याने आपण आनंदित झाल्याचे वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना सांगितले.
कौडगाव वसाहतीतील उद्योगांच्या उभारणीत प्रदूषणविरहीत उत्पादनावर अधिक भर दिला जाणार आहे. स्थापन होणाऱ्या उद्योग समूहाला ‘टेरा’ असे नाव देण्यात आल्याचेही श्री. सायमन म्हणाले.