Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्रवेशपत्र न मिळाल्याने उमेदवारांचा थयथयाट!
औरंगाबाद, २६ जून/प्रतिनिधी

अवघ्या २१७ रिक्त जागांसाठी ४३ हजार ५०० पेक्षा अधिक अर्जाची छाननी व त्या उमेदवारांचे

 

परीक्षा प्रवेशपत्र वेळेच्या आत तयार न करू शकणाऱ्या जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज हजारो उमेदवारांच्या उद्रेकाचा सामना करावा लागला. प्रवेशपत्र न मिळाल्याने उमेदवारांनी आवारात जोरजोरात प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. सुमारे ३ तासांनंतर लेखी आश्वासनानंतर परिस्थिती निवळली.
जिल्हा परिषदेच्या शिपाई, कंत्राटी ग्रामसेवक, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक या पदांसाठी सरळसेवा भरतीप्रक्रिया सुरू आहे. २४ जून ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. २१७ जागांसाठी औरंगाबादसह जालना, परभणी, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, अकोला, अमरावती अशा अनेक जिल्ह्य़ांतून हजारो अर्ज आले.
५ जुलैपासून होणाऱ्या भरती परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न चालविले होते खरे, मात्र हजारो अर्जामुळे त्याची छाननी व त्या त्या उमेदवाराचे प्रवेश पत्र तयार करण्याचे काम वेळेत होऊ शकले नाही.
दरम्यान, जिल्ह्य़ातूनच नव्हे तर बाहेरच्या जिल्ह्य़ातून शिदोरी घेऊन आलेले शेकडो उमेदवार जिल्हा परिषदेच्या आवारात सकाळी ७ पासूनच जमू लागले. सकाळचे साडेदहा-अकरा वाजून गेल्यावरही परीक्षा प्रवेश पत्रवाटप किती वाजता सुरू होईल, हे उमेदवारांना सांगण्यात आले नाही. उमेदवारांमध्ये तासन् तास बसून कुजबुज सुरू झाली. प्रशासनाचे अधिकारी- कर्मचारी काहीच बोलायला व योग्य माहिती द्यायला तयार होईना त्यामुळे उमेदवाराची बेचैनी वाढली.
जी जाहिरात प्रशासनाने काढली त्यात आजपासून अर्थात २६ जूनपासून प्रवेशपत्र वाटपाचा उल्लेख होता. मात्र बेजबाबदार वागणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी गलथानपणाची साखळी कायम ठेवली. उमेदवारांचा उद्रेक वाढला व बाराच्या सुमारास सामान्य प्रशासनासमोर मोठमोठय़ा आवाजात घोषणाबाजी सुरू झाली.
उमेदवारांच्या घोषणाबाजी व मोठी संख्या लक्षात घेता अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. गोंधळ व तोडफोडीच्या भीतीने तात्काळ पोलिासंना पाचारण करण्यात आले.
एकीकडे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचा गोंधळ सुरू असताना अध्यक्ष व इतर पदाधिकारी जिल्हा परिषदेत नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सध्याचे सेना गटनेते डॉ. अण्णासाहेब शिंदे, सदस्य सुरेंद्र साळुंके यांनी उमेदवारांना शांत करण्याचे प्रयत्न केले. डॉ. शिंदे यांनी सामंजस्याने हा प्रश्न सोडविण्याचे आवाहन प्रशासनाला केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी उमेदवारांचा उद्रेक थोपवीत प्रवेशपत्र घरपोच वेळेच्या आत मिळेल, असे लेखी आश्वासन दिले.
जवळपास तीन तासांपेक्षा अधिक चाललेला गोंधळ प्रशसानाच्या आश्वासनाने थांबला. ज्या उमेदवारांना परीक्षेच्या दोन दिवस आधी प्रवेश पत्र मिळणार नाही त्यांनी जिल्हा परिषदेत येऊन पत्र घ्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.