Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

औरंगाबाद जिल्ह्य़ात दुष्काळ जाहीर करा; लोकप्रतिनिधींची जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मागणी
औरंगाबाद, २६ जून/खास प्रतिनिधी

जिल्ह्य़ात पावसाची दोन नक्षत्रे कोरडी गेली आहेत. जूनचा शेवट आला असतानाही जिल्ह्य़ात

 

पाणी आणि चाऱ्याच्या टंचाईचे संकट वाढले असल्यामुळे जिल्ह्य़ात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. जिल्ह्य़ात दुष्काळसदृश परिस्थिती आहे, अशी कबुली संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
खासदार रावसाहेब दानवे व चंद्रकांत खैरे, आमदार अण्णासाहेब माने, नामदेव पवार, आर. एम. वाणी, संदिपान भुमरे यांनी जिल्ह्य़ात दुष्काळी परिस्थिती असल्याचे सांगितले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. टँकर आहेत पण त्यासाठी पाणी नसल्याचे चित्र आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि रोजगाराचा प्रश्न गंभीर होणार आहे, अशा शब्दात लोकप्रतिनिधींनी जिल्ह्य़ातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका पातळीवर जाऊन पाणीटंचाईचा आढावा घ्यावा. टँकरचे अधिकार सर्व तहसीलदारांना दिले आहेत. सामान्य माणसांची परवड होऊ देणार नाही आणि शेतकऱ्यांचे हितही जोपासले जाईल, असे औरंगाबाद जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री विखे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय दौरे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्य़ातील नऊही तालुक्यांत आजपर्यंत सरासरी १६.८६ मि.मी. इतका कमी पाऊस पडला आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील तालुकानिहाय पाऊस मि.मी.मध्ये - औरंगाबाद - २५.७०, फुलंब्री १७, पैठण ११.६९, सिल्लोड ३५.८०, सोयगाव १४, कन्नड १.९९, वैजापूर २१.८३, गंगापूर ८.४१, खुलताबाद १५.३०, एकूण पाऊस १५१.७३ मि.मी.
औरंगाबाद जिल्ह्य़ात १७६ गावे आणि ६ वाडय़ांवर १८५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. रोहिणी, मृग आणि आद्रा ही नक्षत्रे कोरडी गेली आहेत. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होत आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात एकूण टँकरसाठी १५२ आणि टँकरव्यतिरिक्त २७१ गावांमध्ये खासगी विहिर अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी संजीव जैस्वाल दिली. पैठणच्या जायकवाडी प्रकल्पात १२.५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मध्यम आणि लहान प्रकल्पांची संख्या १०३ आहे. त्यापैकी १५ प्रकल्प कोरडे आहेत. जोत्याच्या खालील पाणी असलेल्या प्रकल्पाची संख्या ७२ आहे. १६ मध्यम प्रकल्पांत १३.३८ द.ल.घ.मी. उपयुक्त साठा आहे. याची टक्केवारी ६ टक्के आहे. ८७ लहान प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ४.४५ द.ल.घ.मी. आहे. उपयुक्त साठय़ाची टक्केवारी २ टक्के आहे. मध्यम आणि लहान अशा १०३ प्रकल्पांत १७.८३ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे. याची एकूण टक्केवारी अवघी चार टक्के आहे, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर लावण्यास मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. तसेच खासगी विहिर अधिग्रहण करण्याचे अधिकारही त्यांनाच देण्यात आले आहेत.