Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आरोपी जावेदखान याच्या नार्को चाचणीसाठी पोलिसांचा अर्ज ; मानसी देशपांडे खूनप्रकरण
औरंगाबाद, २६ जून/प्रतिनिधी

मानसी देशपांडेचा खून केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या जावेदखान हबीबखान

 

उर्फ टिंगऱ्या याची नार्को चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्याची नार्को चाचणी करण्यासची परवानगी मागणारा अर्ज न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे. पुढील आठवडय़ात न्यायालयाकडून निर्णय अपेक्षित असल्याचे पोलीस निरीक्षक सोपानराव बोरसे यांनी आज सांगितले.
‘जावेद मानसीचा मारेकरी नाहीच. पोलिसांनी एका घरफोडय़ाला अटक करून प्रकरण संपविण्याचा प्रयत्न केला,’ असा आरोप पोलिसांवर होत आहे. पण जावेदच मानसीचा मारेकरी असल्याचा पोलिसांचा ठाम दावा आहे. त्यामुळेच त्याची नार्को चाचणी घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. नार्कोतून सर्व सत्य बाहेर येईल आणि पोलिसांवर होणारी टीका बंद होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
‘या प्रकरणात आता आरोपीकडून मुद्देमाल तसेच अन्य काही गोष्टी जप्त करण्यात आल्या. हे काम आता संपले आहे. त्यानंतर न्यायवैद्यक अहवालाकडे सर्वाचे आता लक्ष लागलेले आहे. हा खटला वैज्ञानिक अहवालावरच चालणार आहे. त्यामुळे त्याची नार्को चाचणी घेतल्यास सत्य बाहेर यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे श्री. बोरसे म्हणाले.
पोलिसांना आता अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर लगेच आरोपपत्राचे काम हाती घेण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीत निर्धारित वेळेत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.