Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शेकापबरोबरच काँग्रेसलाही फुटीचा शाप
किशोर कुलकर्णी, तुळजापूर, २६ जून

ऐक्य व मजबूत संघटनेच्या जोरावर शहर व तालुक्यातील अनेक खेडय़ातील गेल्या ४०-४५

 

वर्षापासून प्रभाव कायम ठेवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे संघटन दिवसेंदिवस दुर्बळ व काहीसे प्रभावहीन होत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षामध्ये तत्त्व, निष्ठा व मूल्याधिष्ठित राजकारण थोडे दूर ठेवून सोयीनुरूप राजकारण करण्याचे पक्षीय नेतेमंडळींनी ठरविल्याने पक्षसंघटना विकलांग होत आहे. पक्षाची सद्दी संपल्याचेच अलीकडे झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीद्वारे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
दिवंगत खासदार नरसिंगराव देशमुख (काटीकर), उद्धवराव पाटील, मनोहरराव भोसले, बाबासाहेब देशमुख, तुकारामदादा कदम, हरिश्चंद्रराव सूर्यवंशी, रावजी भोसले आदी एकनिष्ठ व नि:स्वार्थी नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे, पाठबळामुळे तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष वाढत होता. (कै.) माणिकराव खपले यांनी प्रकाशराव देशमुख (तुळजापूर), देशमुख (काटी), गायकवाड (नळदुर्ग) यांच्यासारख्या सहकारी मंडळींच्या सहकार्याने पक्षाचा केवळ जनाधारच वाढविला नाही, तर दोनदा विधानसभेत प्रतिनिधित्व मिळवून दिले. तुळजाभवानीचा तालुका शे.का.प.चा बालेकिल्ला असल्याचे (कै.) खपले यांनी दाखवून होते.
पण शे.का.प.च्या मुशीत तयार झालेल्याच काही मंडळींनी नेतृत्व करण्याचा ध्यास व सत्तेच्या हव्यासापोटी बंडखोरी करण्याची भूमिका घेतल्यामुळे पक्षाचे पतन सुरू झाले. देवानंद रोचकरी यांनी ७-८ वर्षापूर्वी बंडाचे निशाण उभारले. काँग्रेसशी लढत देणाऱ्या शे.का.प.च्या नेत्यांनी राजकारणातील बदलत्या समीकरणांची नोंद घेऊन अखेर फुटीर प्रवृत्तींना शह देण्याच्या हेतूने काँग्रेसशी जवळीक करावी लागली. गेल्या नगरपालिका निवडणुकीत शे.का.प.ने काँग्रेसशी युती केली. सत्ताप्रश्नप्तीसाठी एका मताचे अधिक्यही प्रश्नप्त केले. पण सत्तेच्या उंबरठय़ावर असलेल्या या युतीस रोचकरी यांनी धक्का दिला. शे.का.प.मधील फुटीमुळेच रोचकरींना हे सुलभ झाले. काकासाहेब क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळपात धाव घेतल्याने अडीच वर्षापूर्वी प्रस्थापित शे.का.प.ला सत्तेपासून वंचित होण्याची वेळ आली होती. पक्षातील फुटीचा शापच शे.का.प.ला बाधक ठरला.
गेल्या आठवडय़ात झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती झाली. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने अल्पमतात असताना शे.का.प.ला सुरुंग लावून पालिकेची सत्ता काबीज केली होती. या वेळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य एकत्र होते असेच दिसले. नगराध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व, तसेच काँग्रेस-शे.का.प. युतीचे सदस्य एकत्र वावरत होते. तत्पूर्वी आघाडीने प्रशासन चालविण्याचे ठरविल्याने नगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात नव्हता. त्यामुळे कारभार निरंकुश चालत होता. ८-९ महिने सारे काही आलबेल होते. नगराध्यक्षपदाची निवड तोंडावर आल्यावर मात्र काँग्रेस-शे.का.प. युती व राष्ट्रवादी काँग्रेसमधील सदस्यांचे मनोमीलन बेगडी असल्याचा प्रत्यय आला.
सरकारकडून पालिकेला येणारा मोठा निधी, विविध योजनांखाली होऊ घातलेल्या कामांवर होणारी लाखो रुपयांची उलाढाल, त्याचप्रमाणे सत्ता व प्रतिष्ठा आदी बाबींवर लक्ष ठेवून महत्त्वाकांक्षी मंडळींनी सत्तेच्या सारीपाटावरील प्याद्यांनाच शह देण्याचा पवित्रा घेतला. अडीच वर्षापूर्वी शे.का.प.ला सुरुंग लावण्यात अग्रेसर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुन्हा शे.का.प.सह काँग्रेसच्या नेत्यांना हादरा दिला. शे.का.प.-काँग्रेस युतीतील ३ सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ सदस्य परागंदा झाले. त्यांच्या अनुपस्थितीत काँग्रेस- शे.का.प.सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलीप गंगणे (शे.का.प.) यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली. या पक्षाच्या नेतेमंडळींनी अखेरच्या टप्प्यात पक्षादेशही काढला. जाहिरातीच्या माध्यमाने विविध वृत्तपत्रात त्यास प्रसिद्धी दिली अन् सवंग प्रसिद्धी मिळविण्याचा खटाटोप केला.
बंडखोरांवर याचा काही एक परिणाम झाला नाही. लोकशाहीत संख्येच्या अधिक्यावर नेता ठरतो हे बंडखोरांनी दिग्गज नेत्यांना दाखवून दिले. थोडक्यात तुळजापुरात सत्तेसाठी काहीही घडू शकते याचा अनुभव राजकारणात सातत्याने येत आहे. शे.का.प.बरोबरच आता काँग्रेसही फुटीच्या रोगाने बाधित झाल्याचे दिसून येते. फुटीच्या या लाटेवर स्वार होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आपले वर्चस्व कायम राखत असल्याचे दिसून येते. घडून आलेल्या सत्तांतराच्या पाश्र्वभूमीवर आता कायद्याची लढाई सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र पाणी, वीज, स्वच्छता या सारख्या मूलभूत सोयसुविधा पुरविण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे, किमान याचा विसर तरी नगरसेवकांनी पडू देऊ नये हीच नगरवासीयांची अपेक्षा आहे.