Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बदनापूर विकासकामांसाठी १८ कोटींचा निधी
जालना, २६ जून/वार्ताहर

विधानसभेच्या बदनापूर मतदारसंघातील जालना, बदनापूर व जाफराबाद तालुक्यांतील महत्त्वाच्या

 

रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे तसेच विविध रस्त्यांवरील पुलांच्या कामासाठी आमदार अरविंद चव्हाण यांनी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मांडण्यात आलेल्या २००९-१० च्या अर्थसंकल्पात विशेष प्रयत्नाने त्यांनी बदनापूर मतदारसंघातील रस्ते व पुलाच्या कामासाठी केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, इतर बिगर अनुशेष व सर्वसाधारण योजनेंतर्गत हा निधी मंजूर करून घेतला आहे. या कामी त्यांना माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मदत झाली.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून जालना, बदनापूर व जाफराबाद तालुक्यातील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामांसाठी ६ कोटी ६३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये शिंगाडे ते पोखारी जोड रस्त्यासाठी ३३ लाख ७५ हजार, निधोना जोड रस्त्यासाठी १ कोटी ५७ लाख ५० हजार, सोलगव्हाण जोड रस्त्यासाठी ९१ लाख ५० हजार, डांबरी घेटुळी रस्त्यासाठी १ कोटी ४ लाख २५ हजार, घोडेगाव- नसडगाव रस्त्यांसाठी ४५ लाख ५० हजार, खादगाव जोड रस्त्यासाठी १ कोटी ३ लाख ८५ हजार व कुंभारझरी रस्त्यासाठी १ कोटी १८ लाख ७० हजार आदी कामांचा समावेश आहे.
या कामांना मंजुरी मिळण्यासाठी आमदार चव्हाण यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व तत्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा केला, असे पत्रकात म्हटले आहे.