Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सोनपेठ तहसील कार्यालयाला अतिक्रमणांचा विळखा
सोनपेठ, २६ जून/वार्ताहर

गेल्या १० वर्षापासून शहराच्या मध्यभागी असलेले तहसील कार्यालय नुकतेच शहराबाहेर

 

असलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये हलविण्यात आले आहे. पण नव्या जागेतून या कार्यालयाचा कारभार सुरळीत होण्यापूर्वीच या इमारतीला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.
सोनपेठ तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर नगर परिषदेच्या व्यापारी संकुलामध्ये तहसील कार्यालय सुरू करण्यात आले होते. सुमारे १० वर्षे याच ठिकाणी असलेले हे कार्यालय अलीकडेच शहराबाहेरील प्रशासकीय इमारतीमध्ये हलविण्यात आले आहे. पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर जुन्या इमारतींचे गळके छत, काचा नसलेल्या खिडक्या यामुळे या कार्यालयामध्ये शासकीय कागदपत्रे भिजून खराब होण्याचा मोठा धोका होता. त्यामुळे या कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र या कार्यालयाकडे सुमारे ५० हजार रुपये वीज बिल थकल्यामुळे काही महिन्यांपासून या कार्यालयाची वीज तोडण्यात आल्यामुळे हे स्थलांतर तातडीने करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रशासकीय इमारतीमध्ये तहसील कार्यालय हलविण्यात आले असले तरी या इमारतीचे बांधकाम अद्यापि पूर्ण झालेले नाही. येथील फरशीचे काम अपूर्ण असून खोल्यांना खिडक्या व दरवाजेही लावण्यात आलेले नाहीत. इमारतीतील स्वच्छतागृहांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. केवळ तहसील कार्यालयाच्या विनंतीवरून काही खोल्यांना दारे बसविण्यात आली आहेत. तात्पुरत्या स्वरूपामध्ये वीज जोडण्यात आली आहे. या कार्यालयाचे काम पूर्ण होण्यास सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी व्यक्त केली असून या इमारतीचे अधिकृत हस्तांतरणही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
सेतू सुविधा केंद्रही या इमारतीत हलविण्यात आले असल्याने या भागामध्ये वर्दळ वाढणार हे लक्षात घेऊन अनेकांनी इमारतीभोवती लाकडे रोवून दुकानांसाठी जागा धरल्या आहेत. या इमारतीपासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय अवघ्या १०० मीटरवर असतानाही या कार्यालयाकडून अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे काही दिवसांतच ही इमारत अतिक्रमणांनी वेढली जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.