Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

प्रादेशिक

रिलायन्स-टाटाच्या भांडणाचे चटके ग्राहकांना
मुंबई, २६ जून / प्रतिनिधी

मुंबईला विजेचा पुरवठा करणाऱ्या रिलायन्स आणि टाटा या दोन प्रमुख कंपन्यांमध्ये सध्या जुंपली आहे. टाटा कंपनीने आश्वासन दिलेले असतानाही तितकी वीज ते आमच्या कंपनीला देत नसल्यानेच विजेचे दर वाढले असल्याचा दावा रिलायन्स कंपनीने केला आहे. तर सार्वजनिक हित डोळ्यापुढे ठेवून रिलायन्सला ३१ मार्च २०१० र्प्यतच विजेचा पुरवठा केला जाईल, त्यापुढील सोय त्या कंपनीने करावयाची आहे, असे टाटा कंपनीने स्पष्ट केले आहे.

नवी वीज दरवाढ शिवसेनेला मंजूर नाही-देसाई
मुंबई, २६ जून / प्रतिनिधी

मुंबईला विजेचा पुरवठा करणाऱ्या बेस्ट आणि रिलायन्स कंपनीच्या दरवाढीला राज्य विद्युत नियामक आयोगाने दिलेली मंजुरी आणि त्यामुळे विजेची झालेली नवी दरवाढ शिवसेनेला नामंजूर असल्याचे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर देसाई यांनी ग्राहकांना बिले न भरण्याचे आवाहन केले असून कंपन्यांची माणसे वीजजोडणी कापण्यासाठी आल्यास त्यांना शिवसैनिकांच्या मदतीने रोखावे, असेही स्पष्ट केले आहे.

महापालिकेत पत्रकारांची मुस्कटदाबी!
मुंबई, २६ जून / प्रतिनिधी

प्रत्येक पत्रकाराने एका वेळी एखाद-दुसराच प्रश्न विचारावा, एका अधिकाऱ्यास दुसऱ्या विभागाबाबत टीका करण्यास प्रवृत्त करणारे खोडसाळपणाने विचारलेले प्रश्न नाकारण्यात येतील, परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वे ज्यांना मान्य आहेत, त्यांनीच पत्रकार परिषदेस उपस्थित राहावे, बेशिस्त पत्रकारांना पत्रकार परिषदेतून बाहेर जाण्यास सांगावे लागेल किंवा त्या पत्रकाराला पुढील एक किंवा दोन पत्रकार परिषदेसाठी बंदी घालावी लागेल.

राष्ट्रपतींच्या हस्ते विधान भवनात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
मुंबई, २६ जून / प्रतिनिधी

विधान भवनाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे. राष्ट्रपतींच्या तीन दिवसांच्या मुंबई भेटीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यची मागणी अनेक वर्षे करण्यात येत होती. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता.

पहिल्याच पावसाने उडाली मुंबईकरांची दाणादाण!
मुंबई, २६ जून / प्रतिनिधी

मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतर आज झालेल्या पहिल्याच जोरदार पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि वाहतूकीच्या झालेल्या कोंडीमुळे मुंबईकरांच्या त्रासातआणखी भर पडली. एकीकडे हवा असलेला पाऊस भरभरून पडल्याचा आनंद तर दुसरीकडे पहिल्याच पावसाने उडालेली दाणादाण, अशा कात्रीत मुंबईकर सापडले. नेहमीप्रमाणे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महापालिका यांनी एकमेकांवर प्रत्यारोप करून आपली सुटका करून घेतली.

सव्‍‌र्हर सक्षम, दोष सॉफ्टवेअरचा..
अकरावी ऑनलाइन प्रवेश
तुषार खरात
मुंबई, २६ जून

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेल्या सव्‍‌र्हरवर भार वाढल्याने तसेच नवीन सव्‍‌र्हर जोडण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया तात्पुरती थांबविण्यात आल्याने अर्ज सादरीकरणात अडचणी आल्याची कारणे सांगितली जात आहेत. मात्र असे असले तरी संगणक क्षेत्रांतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘एमकेसीएल’ने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये तसेच संकेतस्थळामध्येच दोष असल्याने हा प्रकार घडला आहे.

मदतीसाठी ‘स्नेहांकित’चे आवाहन
मुंबई, २६ जून/ प्रतिनिधी

‘स्नेहांकित’ या अंधांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेने हेलन केलर दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वत: रचलेल्या कवितांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम आज केला, आणि या निमित्ताने संस्थेच्या जागेसाठी निधी उभारणीकरता मदतीचे आवाहन केले. संस्थेचे वाढते कार्य व लिखाण-वाचन यासारख्या उपक्रमांना अधिक वाव देण्यासाठी सुमारे ५०० चौरस फूट जागेची गरज आहे. अंधांना इतरांसारखेच आयुष्य जगता यावे, विविध प्रकारचे गुण जोपासता यावे यासाठी स्नेहांकितने ‘प्रोजेक्ट व्हिजन’ हा प्रकल्प सुरु केला आहे. संस्थेच्या अध्यक्ष परिमला भट सध्या घरुनच अंध विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहेत. अंधांना वाचनाची मदत करण्यासाठी तसेच परिक्षेत मदतनीस म्हणून काम करण्यासाठी कार्यकर्ते या संस्थेत आहेतच, पण अभ्यासाबरोबरच अंध व्यक्तींच्या व्यक्तीमत्त्व विकासाला हातभार लागेल यासाठी देखील वर्षभर कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येते. गरजू मुलांना स्नेहांकिततर्फे शिष्यवृत्तीही दिली जाते. नेत्रदानाचा कार्यक्रम हाती घेण्याचाही या संस्थेचा मानस आहे. स्नेहांकितला मदत करु इच्छिणाऱ्यांनी परिमला भट (९८२१ ७७० २२५) किंवा सुब्रता सामंत (९८६९० ४१५ २६) या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रधान समितीच्या अहवालाची माहिती अखेर राज्यपालांना दिली
मुंबई, २६ जून / खास प्रतिनिधी

मुंबईवरल दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पोलिसांच्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या राम प्रधान समितीच्या अहवालाची माहिती सरकारकडून राज्यपालांनाही देण्यात आली नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी काल टीका केल्यानंतर आज लगेचच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल एस. सी. जमीर यांच्याबरोबर अहवालाबाबत चर्चा केली. सुरक्षेचे कारण पुढे करून राम प्रधान समितीचा अहवाल सादर करण्याचे सरकार टाळीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप युतीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी राज्यपालांची भेट घेतली असता प्रधान समितीचा अहवाल आपणही पाहिलेला नसल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केल्याचे कदम यांनी सांगितले होते. विरोधी पक्षाच्या आरोपबाजीनंतर मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज दुपारी राजभवनवर जाऊन राज्यपाल एस. सी. जमीर यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली.

उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचा साहित्य पुरस्कार डॉ. अनंत लाभसेटवार यांना जाहीर
मुंबई, २६ जून / प्रतिनिधी

उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे कला, संस्कृती आणि साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी डॉ. अनंत लाभसेटवार यांची निवड करण्यात आली आहे. फिलाडेल्फिया येथे येत्या २ ते ५ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या मंडळाच्या द्वैवार्षिक अधिवेशनात त्यांना तो प्रदान करण्यात येणार आहे. डॉ.लाभसेटवार यांनी आत्तापर्यत १४ पुस्तके लिहिली असून ते एक यशस्वी उद्योजकही आहेत. डॉ. लाभसेटवार यांनी आपल्या लेखनातून अमेरिकन जीवनातील चढउतार आणि वास्तव आपल्या साहित्यातून सादर केले आहे. डॉ. लाभसेटवार आणि त्यांच्या पत्नीनी एक कोटी रुपयांचे भांडवल उभेकरून डॉ. अनंत व लता लाभसेटवार हा न्यास स्थापन केला आहे. न्यासातर्फे गेली दहा वर्षे भारतातील लोकसंख्येचा जटिल प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना एक लाख रुपयांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येते. तसेच उत्कृष्ट मराठी ललित साहित्यासाठीही दरवर्षी एक लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येतो. न्यासातर्फे महाराष्ट्रातील सहा मुख्य विद्यापीठांना अनुदान देण्यात येऊन व्याख्यानमाला सुरु करण्यात आल्या आहेत.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘लोकसत्ता’चे प्रसाद मोकाशी
मुंबई, २६ जून / प्रतिनिधी

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत ‘लोकसत्ता’चे प्रसाद मोकाशी निवडून आले. त्यांनी विद्यमान अध्यक्ष कुमार कदम यांचा पराभव केला. अध्यक्षपदाखेरीज अन्य कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यासाठी आज मतदान झाले. पत्रकार संघाच्या विश्वस्तपदी सुकृत खांडेकर यांची, तर कोषाध्यक्षपदी रमेश झवर यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. आजच्या निवडणुकीत देवदास मटाले व सोमनाथ पाटील हे उपाध्यक्ष म्हणून, तर विजयकुमार बांदल हे कार्यवाहपदी निवडून आले आहेत. कार्यकारिणीच्या अन्य नऊ जागांवर सत्यवान ताठरे, दीपक परब, महेश पावसकर, घनश्याम भडेकर, सतीश खांबेटे, शशिकांत सांडभोर, संजय पुरंदरे, पां. ह. जुनगरे, चंद्रशेखर कुलकर्णी हे निवडून आले. या निवडणुकीसाठी श्रीकांत नाईक यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिले, तर विजय तारी व गोपाळराव कुलकर्णी यांनी त्यांना याकामी सहकार्य केले.

भाजयुमोतर्फे ऑनलाईन अ‍ॅडमिशनकरिता मदत केंद्रे
मुंबई, २६ जून/प्रतिनिधी

दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने बृहन्मुंबईत ६० ठिकाणी मोफत ऑनलाईन प्रवेश मदत केंद्रांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती सरचिटणीस अमित साटम यांनी दिली. दक्षिण मुंबईत १०, दक्षिण मध्य मुंबईत पाच, उत्तर मध्य मुंबईत २०, उत्तर पश्चिम मुंबईत पाच, उत्तर मुंबईत पाच, ईशान्य मुंबईत १० ठिकाणी ही केंद्र सुरू करण्यात आली आहेत. भाजप व संलग्न संघटनांच्या कार्यालयातून ही केंद्र चालविण्यात येतात. विद्यार्थ्यांनी या अद्ययावत केंद्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन साटम यांनी केले.