Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

आचारसंहितेपूर्वी कामे सुरू करा..
‘जिल्हा नियोजन’च्या बैठकीवर विधानसभेची छाया
नगर, २६ जून/प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत पालकमंत्री दिलीप वळसे यांनी सन २००८-०९च्या वार्षिक खर्चाचा आढावा घेतला. बैठकीवर विधानसभेच्या येत्या निवडणुकीची छाया होतीच, पण उपस्थित अधिकाऱ्यांना ‘निवडणुकीचे वर्ष आहे. आचारसंहितेपूर्वीच निविदा व अन्य प्रक्रिया उरकून कामे तातडीने सुरू करा’, असा आदेश देत वळसे यांनी ही छाया आणखी गडद केली.

स्मिता अष्टेकरसह तिघांविरुद्ध १ कोटीचा दावा - शेंडगे
अब्रुनुकसानीप्रकरणी न्यायालयाच्या नोटिसा
नगर, २६ जून/प्रतिनिधी
नगर तालुका पंचायत समितीच्या सभापती नंदा शेंडगे यांनी शिवसेना महिला आघाडीच्या संघटक स्मिता अष्टेकर, कार्यकर्ता रावजी नांगरे व आशा निंबाळकर यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा १ कोटीचा दावा दाखल केला आहे. न्यायालयाने या तिघांना नोटिसा दिल्या असून, पुढील सुनावणी १६ जुलैस आहे. श्रीमती शेंडगे यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली.

राहाता तालुक्याची आज दशकपूर्ती!
सीताराम चांडे
राहाता, २६ जून

सहकार, संस्कृती आणि अध्यात्माबरोबरच राजकीय, सामाजिक वारसा लाभलेला राहाता तालुका आता विकासाचे नवे ‘मॉडेल’ घेऊन पुढे येत आहे. या तालुक्याच्या निर्मितीला उद्या (शनिवारी) दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या १० वर्षांत तालुक्यात अनेक नव्या गोष्टींना चालना मिळाली. मात्र, दीर्घकाळ प्रलंबित असलेले अनेक प्रश्न आजही कायम आहेत.

पिंपळगाव जोग्याचे पाणी पारनेरला देण्याचे आश्वासन
वळसेंना शिष्टमंडळ भेटले
निघोज, २६ जून/वार्ताहर
पिंपळगाव जोगे धरणाचे पाणी पारनेर तालुक्याला मिळण्यासाठी निधी वर्ग करून महिनाभरात काम पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दिलीप वळसे यांनी दिल्याची माहिती धरण कृती समितीचे प्रमुख विश्वनाथ कोरडे यांनी दिली. कोरडे यांच्या नेतृत्वाखाली शंभर शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आज नगर येथे वळसे यांना भेटले.

नगर अर्बन बँकेच्या कोपरगाव शाखेचे आज उद्घाटन
हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती
कोपरगाव, २६ जून/वार्ताहर
नगर अर्बन बँकेच्या ३४व्या कोपरगाव शाखा कार्यालयाचे उद्घाटन उद्या (शनिवारी) संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व खासदार दिलीप गांधी यांनी दिली. शहरातील मुख्य रस्त्यावर समता पतसंस्थेच्या भायभंग सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार बाळासाहेब विखे असतील.

‘ताळेबंद चुकीचा असेल तर राजीनामे देऊ’
कडलग यांनी सभासदांची माफी मागावी - कचरे
नगर, २६ जून/प्रतिनिधी
माध्यमिक शिक्षक सोसायटीने तयार केलेला ताळेबंद सभासदांनी कोणत्याही लेखापरीक्षकास दाखवून सत्यता पडताळून पाहावी. ताळेबंद चुकीचा असेल, तर आम्ही तत्काळ राजीनामे देऊ; मात्र ताळेबंद बरोबर असेल तर संस्थेची बदनामी करणारे संचालक सुभाष कडलग यांनी सभासदांची माफी मागावी, असे प्रतिआव्हान सत्ताधारी पुरोगामी मंडळाचे नेते भाऊसाहेब कचरे यांनी दिले. संस्थेची सर्वसाधारण सभा रविवारी होत आहे. या पाश्र्वभूमीवर कडलग यांनी ताळेबंद चुकीचा असल्याचा आरोप केला होता.

बोगस विमा पॉलिसींबाबत प्राथ. शिक्षक बँकेची चौकशी
‘इब्टा’चे धरणे आंदोलन मागे
नगर, २६ जून/प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक बँकेत झालेल्या बोगस विमा पॉलिसी प्रकरणाबाबत बँकेची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशनला (इब्टा) दिले.‘इब्टा’च्या संघर्षांचा हा विजय असल्याचे संघटनेचे सचिव अशोक नवले यांनी सांगितले. संचालक मंडळाने मागील वर्षी शिक्षकांचा विमा उतरवण्याची योजना आणली. त्यासाठी शिक्षकांना कर्ज दिले. तसेच १० हजार रुपयांच्यापुढे विमाहप्ता भरणाऱ्या सभासदांसाठी सोडत योजनेचे आमिष दाखवले.

पाऊस लांबल्याने शेतकरी सैरभैर
शेवगाव, २६ जून/वार्ताहर
पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगामाच्या संदर्भात मागील वर्षांची पुनरावृत्ती होणार काय याची धास्ती शेतकऱ्यांना आहे.यंदा ६ जून रोजी मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने पर्जन्यमान चांगले राहील, या आशेने शेतकरीवर्गात आनंद व्यक्त होत होता. त्यानंतर १७ जून व मागील सप्ताहात तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला. या पावसामुळे खरिपासाठी जमिनीच्या मशागती मात्र चांगल्या प्रकारे झाल्या. मात्र, हा पाऊस पेरणीयोग्य नव्हता. एक-दोन जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. सुरुवातीला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशी, बाजरी आदी पिकांचे बियाणे व खते मोठय़ा प्रमाणावर खरेदी केली. मात्र, मोठय़ा पावसाशिवाय पेरण्या व कपाशीची लागवड करण्यास शेतकरी धजावणार नाहीत. तालुक्याच्या पूर्व भागातील ३० ते ३५ गावे हलक्या व बरड जमिनींची असल्याने या जमिनीतील ओल लगेचच कमी होते. खरीप हंगामात पाऊस चांगला झाला, तरच विहिरींना नवीन पाणी येणार आहे. त्यावरच पुढील रब्बी हंगामातील पिकांचे भवितव्य अवलंबून आहे. मागील वर्षीही पाऊस दोन महिने उशिरा पडला होता. परिणामी जुलैअखेर खरिपातील कपाशीची लागवड झाल्याने त्याचा उत्पन्नावर अनिष्ट परिणाम झाला. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात बेचैनीचे वातावरण आहे. या परिस्थितीचा परिणाम शेवगावच्या बाजारपेठेवर होत असल्याची प्रतिक्रिया व्यापारी संघटनेचे प्रमुख तखत मेहेर यांनी व्यक्त केली.

विजेचा शॉक बसून तरुणाचा मृत्यू
राहाता, २६ जून/वार्ताहर
खासगी इलेक्ट्रिकचे काम करणाऱ्या व्यावसायिक तरुणाचा विजेचा शॉक बसून जागेवर मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपळवाडी येथे घडली.
विनायक बाबूराव तुरकणे (वय ३८) असे मृत तरुणाचे नाव आहे. घराचे बांधकाम चालू असल्याने यावर पाणी मारण्यासाठी छोटी इलेक्ट्रिक मोटार चालू करण्यासाठी विनायक गेले होते. त्यांना विजेचा शॉक बसल्याने त्यांचा जागेवर मृत्यू झाला. त्यांचे शिर्डीत इलेक्ट्रिक व्यवसायाचे दुकान आहे. त्यांच्या पार्थिवावर पिंपळवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

खासदार गांधी, वाकचौरे यांचा उद्या राहुरीत नागरी सत्कार
राहुरी, २६ जून/वार्ताहर
नगरचे खासदार दिलीप गांधी व शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा रविवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता येथील बालाजी मंदिरात नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात नुकतीच बैठक झाली.राहुरी तालुका भारतीय जनता पक्षाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी आमदार चंद्रशेखर कदम असतील. खासदार द्वयींची राहुरी शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनाच्या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर उपाध्ये, किसान मोर्चाचे आसाराम ढूस, शहराध्यक्ष बापूसाहेब वराळे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, माजी शहराध्यक्ष प्रकाश पारख, प्रमोद सुराणा, अण्णासाहेब शेटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रावसाहेब खेवरे, उत्तर विभगाचे संभाजी पेरणे, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रम तांबे उपस्थित होते. भाजप-शिवसेनेने एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च नगरसेवक करणार
राहाता, २६ जून/वार्ताहर
राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक विजय शिंदे यांनी पाच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले. श्री. शिंदे यांनी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे श्री. विखे यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणासाठी पाच वर्षे दत्तक घेतले आहे. याचबरोबर इतरही गोरगरीब, हुशार विद्यार्थ्यांना वह्य़ा, पुस्तके, गणवेष व शालेयोपयोगी साहित्याचे वाटप केले. शहरातील एसएससी व एचएससीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही शिंदे करणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी साहित्याचे वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रघुनाथ बोठे, माजी नगराध्यक्षा संगीता निकाळे, भागवत आरणे आदी उपस्थित होते. दत्तक घेतलेल्या पाच मुलांना नगरसेवक शिंदे यांनी स्वहस्ते साहित्याचे वाटप केले.

विखे यांचा रविवारी कार्यकर्त्यांशी संवाद
राहाता, २६ जून/वार्ताहर
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे दोन दिवसांच्या नगर जिल्हा दौऱ्यावर येत असून, रविवारी (दि. २८) ते जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.तेथे ते सकाळी ९ वाजता येतील. दिवसभरात ते काँग्रेस कार्यकर्त्यांसह जिल्ह्य़ातील नागरिकांना भेटणार आहेत. जिल्ह्य़ातील ज्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना श्री. विखे यांची भेट घ्यावयाची आहे, त्यांनी सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकरी संघटनेचे आंदोलन आश्वासनानंतर मागे
श्रीरामपूर, २६ जून/प्रतिनिधी
मागील वर्षांची सोयाबीन पिकाची भरपाईची रक्कम अनुदान उपलब्ध होताच वाटप करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार शेगा मावची यांनी दिल्यानंतर शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घेतले. मागील वर्षी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. परंतु भरपाईचे वाटप करण्यात आले नव्हते. भरपाईच्या रकमेसाठी तालुकाध्यक्ष सुभाष पटारे यांनी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर उपोषण व आत्मदहनाचा इशारा दिला होता. तहसीलदार मावची यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

भिंगारमधील पानटपऱ्या फोडणाऱ्या तिघांवर कारवाई
नगर, २६ जून/प्रतिनिधी
रस्त्यावरील पानटपऱ्या फोडणाऱ्या तिघांना भिंगार पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा माल जप्त केला. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली. हे तिघेही अल्पवयीन आहेत.काल रात्री शाबीर अब्दुल हमीद शेख (वय ४०, रा. मोमीनगल्ली, भिंगार) यांची हॉटेल समाधानसमोर असलेली पानटपरी, तसेच मनोज किसन शेंडगे (रा. माळगल्ली, भिंगार) यांची पानटपरी फोडून सिगारेट, तंबाखू, पानाचे साहित्य व रोख रक्कम असा ४ हजार ४१२ रुपयांचा माल चोरून नेण्यात आला.भिंगार पोलिसांनी तातडीने हालचाल करून वाल्मिकी कॉलनी, मुकुंदनगर व भिंगार अर्बन बँकेच्या मागे राहणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा माल जप्त केला. सहायक निरीक्षक साईनाथ ठोंबरे, हवालदार एस. एन. मरकड, गवते, फुलानी, ए. एस. गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गजानन कॉलनीतील विवाहिता बेपत्ता
नगर, २६ जून/प्रतिनिधी
एमआयडीसीजवळील गजानन कॉलनीतील एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी ठाण्यात करण्यात आली. अनिता ऊर्फ जयश्री धर्मेंद्र वल्लाकट्टी (वय ३१ वर्षे, रा. गजानन कॉलनी) असे या महिलेचे नाव असून, तिचा पती धर्मेद्र याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. अनिता दि. २५ रोजी सकाळी अकराच्या सुमारास घरात कोणास काही न सांगता निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिला पाच वर्षांची मुलगी आहे. मुलीस सोडून ती निघून गेली. तपास सहायक उपनिरीक्षक क्षेत्रे करीत आहेत.

आईस्क्रीम तयार करताना विजेचा धक्का बसून मृत्यू
नगर, २६ जून/प्रतिनिधी
आईस्क्रिम तयार करणाऱ्या एका व्यावसायिकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. काल दुपारी दोनच्या सुमारास ही घटना ममतागल्लीत घडली.भगवानलाल गंगालाल पुरविया (धनगर) असे मृताचे नाव आहे. ते ममतागल्लीतील एका घरात आईस्क्रिम तयार करत होते. विजेचा धक्का त्यांना बसला. रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले. तपास कोतवालीच्या ठाणे अंमलदार श्रीमती वाकचौरे करीत आहेत.

‘आम्ही असू लाडके’चे उद्या ‘आशा’मध्ये विशेष मोफत शो
नगर, २६ जून/प्रतिनिधी
अभिराम भडकमकर दिग्दर्शित ‘आम्ही असू लाडके’ चित्रपटाचे दोन विशेष शो रविवारी (दि. २८) सकाळी १० वाजता आशा स्क्वेअरमध्ये विनामूल्य आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती श्री. अतुल खिस्ती यांनी दिली.मतिमंद मुलांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचा न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये समावेश करण्यात आला होता. अमेरिका व ऑस्ट्रेलियातही या चित्रपटाचे विशेष शो झाले आहेत. पुणे फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्ड मिळाले होते. हा शो सर्वासाठी मोफत असून, भडकमकर स्वत या वेळी उपस्थित राहणार आहेत. इच्छुकांनी शोच्या मोफत प्रवेशिकेसाठी पूजा आहुजा (मोबाईल ९२७०३४११०९), चारुता शिवकुमार (९८५०६३०३७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शाहूमहाराजांची जयंती विविध संघटनांतर्फे साजरी
नगर, २६ जून/प्रतिनिधी
मराठा सेवा पतसंस्था, मराठा सेवा संघ, भगतसिंग विद्यार्थी कक्ष, इतिहास कक्ष व मराठा सहकार कक्षातर्फे छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मराठा सांस्कृतिक भवन (बारातोटी कारंजा) येथे हा कार्यक्रम पार पडला.इतिहास कक्षाचे प्रमुख बहिरनाथ वाकळे म्हणाले की, राजर्षी शाहूमहाराज हे ‘क्रांतिकारक राजा’ होते. त्यांनी बहुजन समाजातील दुर्बल घटकांना आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सोपान मुळे, उपाध्यक्ष सुभाष कराळे, मराठा पतसंस्थेचे संचालक रामकृष्ण कर्डिले, बबन खिलारी, संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष नीलेश म्हसे, भगतसिंग विद्यार्थी कक्षाचे प्रदेश सचिव सीताराम काकडे, सहकार कक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश कराळे आदी कार्यक्रमास उपस्थित होते.ल्ल

रस्त्याचे निकृष्ट बांधकाम पाडण्यास सुरुवात
नगर, २६ जून/प्रतिनिधी
मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन इंडिया या संघटनेने केलेल्या आंदोलनास यश आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने निकृष्ट रस्त्याचे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सलमान आर्मेचरवाला यांनी दिली. संघटनेने नगर-औरंगाबाद रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांनी या रस्त्याची पाहणी करून कोठला स्थानकाजवळील निकृष्ट बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे ही कारवाई सुरू झाल्याचे आर्मेचरवाला यांनी सांगितले.

सहायक कामगार आयुक्तजी. पी. आव्हाड रुजू
नगर, २६ जून/प्रतिनिधी
जिल्ह्य़ाच्या सहायक कामगार आयुक्तपदी जी. पी. आव्हाड नुकतेच रूजू झाले. एस. ए. कुंभारे यांची औरंगाबाद येथे बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. आव्हाड यांनी यापूर्वी जळगाव, औरंगाबाद व मुंबई येथे काम केले आहे. ते मूळचे पाथर्डी तालुक्यातील आहेत.

दत्तात्रेय साबळे यांचे दीर्घ आजाराने निधन
राहाता, २६ जून/वार्ताहर

तांदूळनेर येथील दत्तात्रेय खंडूजी साबळे यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, तीन भाऊ असा परिवार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर नगर जिल्हा विभागाचे माजी निरीक्षक प्राचार्य अण्णासाहेब साबळे यांचे ते धाकटे बंधू होत.