Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

‘एकला चलो रे’ची विलासरावांची भाषा बदलली
नागपूर, २६ जून / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका मांडणारे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची भाषा काँग्रेसश्रेष्ठीच आघाडीचा निर्णय घेणार असल्यामुळे बदलली आहे, असा टोला लगावतानाच विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबतच राहण्याची आमची मनापासून तयारी आहे, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आज स्पष्ट केले. प्रफुल्ल पटेल यांचे तीन दिवसांच्या भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आज नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आमगन झाल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. विलासराव देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढावे, असे विधान केले होते.

शाळेचा पहिला ठोका.. एकसाथ नमऽऽऽस्ते!
नागपूर, २६ जून / प्रतिनिधी

गेले दोन महिने कुठे गेले ते कळलेच नाही. भर उन्हात क्रिकेट खेळण्यात, आंबे खाण्यात, मामाच्या गावाला जाऊन विहिरीत डुंबण्यात आणि मॉलमध्ये जाऊन मजा करण्यात हे दिवस भुर्र उडाले. कालपर्यंत सकाळचे चांगले ९ वाजेपर्यंत पांघरूणात गुडूप झालेल्या मुलांना आज पहाटेपासूनचे त्यांच्या आईने ‘उठ.. उठ..’ चा गजर करत उठवले. पेंगाळलेले डोळे ताडकन् उठून फ्रेश झाले आणि समोरच दिसला नवा कोरा गणवेष.

विदर्भात पुस्तकांचे मोफत वाटप
नागपूर, २६ जून / प्रतिनिधी

शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच ठोक्याला आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत वाटण्याचा प्रयोग विदर्भातील अकराही जिल्ह्य़ात धडाक्यात पार पडला. अनेक शाळांमध्ये शाळा उघडण्याच्या दोन चार दिवस अगोदरच विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून पुस्तके वाटण्यात आली. ‘पुस्तकेच मिळाली नाही,’ ‘पुस्तकात चुका आहेत,’ ‘डिसेंबर महिन्यात पुस्तके वाटली’ अशा तक्रारी गेल्या वर्षी आल्या होत्या, त्या लक्षात घेता यंदा शिक्षण विभागाने तीन महिन्यांपासून काळजी घेऊन पुस्तकांचा पुरवठा सर्व जिल्हा परिषदांना एक महिना अगोदर केला.

जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्ध सभापतींचे बंड
कामात ढवळाढवळ
श्रेय लाटण्याचा प्रयत्न
गडकरींकडे तक्रार करणार
नागपूर, २६ जून / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या सभापतींनी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. समाजकल्याण, आरोग्य आणि कृषी विभागांच्या कामात अध्यक्ष ढवळाढवळ करीत असून आतापर्यंत झालेल्या चांगल्या कामाचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप उपाध्यक्ष व आरोग्य विभागाचे सभापती तापेश्वर वैद्य, समाजकल्याण विभागाचे सभापती हर्षवर्धन निकोसे आणि कृषी विभागाचे सभापती महेश ब्रम्हनोटे यांनी केला आहे.

माजी सैनिकांचा मेळावा सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात
अनिस अहमदवर रोष
मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन
१ कोटीची उधळपट्टी केल्याचा आरोप
नागपूर, २६ जून / प्रतिनिधी
सैनिक कल्याण विभागामार्फत उद्या, नागपुरातील चिटणीस पार्कवर होणाऱ्या माजी सैनिकांचा राज्यस्तरीय मेळावा सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला असून माजी सैनिक कल्याण मंत्री अनिस अहमद यांना शक्तिप्रदर्शन घडवण्यासाठी मेळाव्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता काय, असा प्रश्न चर्चिला जात आहे.

पुन्हा दुसरा मायकेल जॅक्सन होणे नाही निधनाने संगीतप्रेमींना धक्का
नागपूर, २६ जून / प्रतिनिधी
जगप्रसिद्ध पॉपगायक मायकेल जॅक्सन यांच्या अकस्मिक निधनामुळे त्यांच्या संगीतप्रेमींना धक्का बसला असून दुसरा ‘मायकेल जॅक्शन होणे’ नाही, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.
संगीतकार आणि गायक पिंकू जोसेफ म्हणाले, मायकेल जॅक्सन यांनी जगभरात पाश्चात्य संगीताचा प्रचार आणि प्रसार करून युवकांमध्ये संगीताची गोडी निर्माण केली होती.

दहावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या
नागपूर, २६ जून / प्रतिनिधी

दहावीत अनुत्तीर्ण झाल्याने एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विजया पुरुषोत्तम उबाळे (१५) असे तिचे नाव असून ती हिंगण्यातील विठ्ठलवाडी येथील रहिवासी होती.
काल सकाळी ११ वाजता दहावीचा निकाल जाहीर झाला. विजयाला दहावीत उत्तीर्ण होईल, याचा तिला विश्वास होता. तिच्या बहिणीने इंटरनेटवर निकाल बघितल्यावर त्यात ती अनुत्तीर्ण झाल्याचे दिसले. लगेच तिने ही माहिती विजयाला दिली. अनुत्तीर्ण झाल्याचे कळताच ती निराश झाली. दिवसभर तणावात असलेल्या विजयाने सायंकाळी ६.३० वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. थोडय़ा वेळाने तिच्या घराच्यांच्या हा प्रश्नकर लक्षात आला. लगेच तिला मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे.

विविध संवर्गातील पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याच्या तारखेत बदल
नागपूर, २६ जून / प्रतिनिधी

नागपूर जिल्हा परिषदेत विविध संवर्गातर्गत भरण्यात येत असलेल्या पदांबाबत येथील वृत्तपत्रात १३ व १५ जूनला जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये पात्र उमेदवारांची यादी २६ जूनला प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र, अर्जाची संख्या जास्त असल्यामुळे यादी प्रसिद्धीच्या तारखेत पदानुसार खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता, स्थापत्य/विद्युत, विस्तार अधिकारी (शिक्षण श्रेणी-२, वर्ग-३ औषधी निर्माता, वरिष्ठ सहाय्यक लेखा, आरोग्य सेवक (महिला), विस्तार अधिकारी (पंचायत)पदाची जाहिरात २७ जूनला, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), कंत्राटी ग्रामसेवक ३० जूनला, वरिष्ठ सहाय्यक लिपिक १ जुलैला तर, परिचर पदासाठी २ जुलैला यादी जाहीर होणार आहे. संबंधित उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भरकाडे यांनी केले आहे.

कन्हानमध्ये योग शिक्षक शिबीर
नागपूर, २६ जून / प्रतिनिधी

स्वामी रामदेव बाबा यांच्या ‘चलो गांव की और’ मोहिमेतंर्गत पतंजली योग समिती नागपूर जिल्ह्य़ातर्फे कन्हान येथील नारायण महाविद्यालयाच्या पटांगणात तीन दिवसाचे योग शिक्षक शिबीर नुकतेच पार पडले. पारशिवनी तालुका प्रमुख टिकाराम कडूकर यांनी आयोजित केलेल्या या शिबिरात खेरडी, बोरडा, कांद्री, कन्हान, टेकाडी, निमखेडा येथील २४ व्यक्तींनी भाग घेतला. योग समितीचे जिल्हाध्यक्ष आणि भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हा संयोजक अॅड. नामदेवराव फटिंग यांनी दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले. जिल्ह्य़ाच्या प्रत्येक गावात एक योग शिक्षक व योग वर्ग सुरू करून संपूर्ण जिल्ह्य़ाला योगमय करण्याचे आवाहन अॅड. फटिंग यांनी यावेळी केले. याप्रसंगी प्रदीप काटेकर, छाजूराम शर्मा, गुलाबराव उमाठे, संजय खोंडे, दत्तू चौधरी, निहार बॅनर्जी प्रश्नमुख्याने उपस्थित होते.

टंकलेखक पदासाठी आज लेखी परीक्षा
नागपूर, २६ जून/ प्रतिनिधी

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील लिपीक टंकलेखक पदासाठी लेखी परीक्षा उद्या, २७ जूनला सकाळी ११ वाजता शासकीय तंत्र निकेतनमध्ये घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेबाबत कार्यालयामार्फत पत्राद्वारे कळवण्यात आलेले आहे, असे निवड समिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालयाने कळवले आहे.

संस्कृती झळकणार रविवारी कलर्स वाहिनीवर
नागपूर, २६ जून/प्रतिनिधी
नीरी मॉडर्न शाळेची विद्यार्थिनी संस्कृती ढवळे ही कलर्स वाहिनीवरील ‘छोटे मिया चॅप्टर-२’ या कार्यक्रमात सहभागी झाली असून, रविवारी, रात्री ८ वाजता हा अॅपिसोड दाखवला जाणार आहे. हा एक हास्यविनोदी कार्यक्रम आहे. प्रतापनगरमधील रहिवासी शुभांगी ढवळे व लघुवेंद्र ढवळे यांची कन्या असलेली सात वष्रे वयाची संस्कृती नीरी मॉडर्न शाळेत दुसऱ्या इयत्तेत आहे. संस्कृती वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कार्यक्रम करत असून, आजपर्यंत बऱ्याच कार्यक्रमात तिला बक्षीसे मिळाली आहेत. तिला हास्यसम्राट विनोद पुरोहीत यांचे मार्गदर्शन मिळाले.

८४० वाहन चालकांवर कारवाई
नागपूर, २६ जून/ प्रतिनिधी
वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमाखाली ८४० वाहनचालकांवर कारवाई केली. तसेच मद्यप्रश्नशन करून वाहन चालवणाऱ्या ८५ वाहन चालकांवर कारवाई केली. या वाहनचालकांकडून दंड म्हणून १ लाख २६ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले. तसेच ८ तीन आसनी आटो, १० दुचाकी वाहने, ४ चारचाकी वाहने, असे एकूण २२ वाहने ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई यापुढेही राबवण्यात येणार असून वाहनचालकांनी वाहन चालवताना सर्व कागदपत्रे सोबत बाळगावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

संकेत बोध मोहप्यात प्रथम
मोहपा, २६ जून / वार्ताहर

येथील न्यू इंग्लिश हायस्कूलचा संकेत मोहन बोध दहावीच्या परीक्षेत ८९.०७ टक्के गुण घेऊन शहरातून प्रथम आला. या शाळेचा निकाल ८४ टक्के लागला. मुलींमधून पल्लवी गुणवंत राऊत ८८ टक्के गुण मिळवून प्रथम आल. कुसूमताई वानखेडे कन्या शाळेचा निकाल ६० टक्के लागला आहे.

महाविद्यालयीन प्रवेशात स्थानिकांना प्रश्नधान्य द्यावे; मनसेचे शिक्षण उपसंचालकांना निवेदन
नागपूर, २६ जून / प्रतिनिधी
महाविद्यालयात स्थानिक विद्याथ्यार्ंना प्रश्नधान्य देण्यात यावे, या मागणीकरीत महाराष््रठ नवनिर्माण सेनेच्या कार्यकत्यार्ंनी शिक्षण उपसंचालक गोविंद नांदेडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. नागपुरात केंद्रीय पद्धतीनुसार प्रवेश प्रक्रिया होणर असल्यामुळे समिती महाविद्यालयाचा विचार करून प्रवेश देते. गेल्यावर्षी प्रवेश प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात घोळ झाला होता. यावर्षी घोळ होऊ नये म्हणून प्रवेश प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक व्हावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार प्रश्नधान्यांने महाविद्यालय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन नांदेडे यांनी दिले. यावेळी श्याम पुनयानी, विजय कोटांगळे, विकास राचेलवार, अलकेश आदमने, सिद्धार्थ राऊत, दिनेश सावरकर, किरण मेश्राम, श्रीकांत खडसे, सचिन मते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.