Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

‘कंबख्त इश्क’ विरोधात पोलीस ठाण्यात निवेदन
पनवेल/प्रतिनिधी - ३ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘कंबख्त इश्क’ या चित्रपटामध्ये हिंदू देवतांचा अवमान तसेच पवित्र मंत्रांचे विडंबन केल्याप्रकरणी या चित्रपटाच्या निर्माता- दिग्दर्शकांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

बेकायदा शस्त्रे विकणाऱ्या दोघांना अटक
बेकायदा शस्त्रे विकू पाहणाऱ्या दोघा तरुणांना गुन्हा अन्वेषण पथकाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी संध्याकाळी अटक केली. बादल जमनादास सोनी (२३, हडपसर, पुणे) आणि विकास उत्तम मोरे (२५, पुणे) अशी या तरुणांची नावे आहेत. पनवेल- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेडुंग फाटा येथे दोन तरुण पिस्तुल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष धनवटे, पोलीस उपनिरीक्षक बागवान, मोरे, मानकुंबरे, कांबळे, शिंदे, पाटील यांच्या पथकाने शेडुंग फाटा येथे सापळा रचला. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास रायगड पेट्रोलपंपाच्या परिसरात दोन तरुण संशयास्पद हालचाली करताना त्यांना आढळले. या तरुणांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्तुले आणि पाच गोळ्या आढळून आल्या. त्यांना अटक करण्यात आली असून शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या दोन पिस्तुलांची किंमत अंदाजे ५९ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तोतया पोलिसांनी लाखाचे दागिने चोरले
बेलापूर - पोलीस असल्याचे सांगून तीन महिलांची फसवणूक करून चोरटय़ांनी त्यांच्याकडील एक लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. शिरोमणी कलवीलकर या घणसोली बस थांब्याजवळून पायी जात असताना दोन अनोळखी इसमांनी रस्त्यात पुढे भांडण चालू असल्याने त्यांना दागिने पिशवीत काढून ठेवण्यास सांगितले. नंतर हातचलाखीने २० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. दुसऱ्या एका घटनेत नेरुळ येथे राहणाऱ्या कमल देशपांडे घरासमोरील पदपथाने सकाळी पायी जात होत्या. त्यावेळी दोघांनी आपण पोलीस असल्याचे सांगून देशपांडे यांची नजर चुकवून त्यांच्या गळ्यातील ४३ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. तसेच घणसोली सेक्टर-५ येथील रस्त्याने पायी जाणाऱ्या संगीता निरकसराव यांच्या गळ्यातील ४२ हजार रुपये किमतीचे दागिने चोरटय़ांनी चोरून नेले. दरम्यान, वाढत्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमुळे नवी मुंबईकर पुरते त्रस्त झाले आहेत, मात्र सुस्त पोलीस दल या भुरटय़ा चोरांच्या टोळ्यांचे कंबरडे मोडण्यास अयशस्वी ठरत आहेत.

महापे येथे तृतीयपंथीयांनी लुटले
बेलापूर - महापे येथे बसथांब्यावर बसची वाट पाहात उभे असणाऱ्या एकास चार तृतीयपंथीयांनी लुटल्याची घटना नुकतीच घडली. फिर्यादी दत्तात्रेय भोसले हे रात्री ११ वाजता बसची वाट पाहात उभे होते. त्यावेळी तेथे आलेल्या चार तृतीयपंथीयांनी भोसले यांना जबर मारहाण करून त्यांच्याकडील १० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरून नेली. या प्रकरणी भोसले यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

औषध दुकानात चोरी
कोपरखैरणे - बंद औषधांच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी आतील रोख रक्कम व औषधे असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी कोपरखैरणे येथे उघडकीस आली. या प्रकरणी औषध दुकानाचे मालक महंमद शकील आझमी यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आझमी हे नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री ११ नंतर दुकान बंद करून घरी गेले असता चोरटय़ांनी दुकानाचे शटर व कुलूप तोडून आतील औषधे व रोख रक्कम चोरून पोबारा केला.

पत्रकारास लुटले
बेलापूर - वृत्तपत्राचे काम आटोपून रात्रपाळीहून घरी परतणाऱ्या पत्रकारास लुटल्याची घटना गुरुवारी घडली. हेमंत जुवेकर हे रात्री १२.३० वाजता ठाण्याला जाणाऱ्या बसची वाट पाहात सीबीडी उड्डाणपुलाखाली उभे होते. यावेळी लाल रंगाच्या एका गाडीतून आलेल्या दोघांनी त्यांना लिफ्ट देत असल्याचा बहाणा करून कारमध्ये घेतले व नेरुळ उड्डाणपुलाच्या मधोमध आल्यावर कार थांबवून जुवेकर यांना चाकूचा धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्याकडील ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व भ्रमणध्वनी काढून घेतला. नंतर या चोरटय़ांनी त्यांना एनआरआय कॉम्प्लेक्ससमोरील खाडीजवळ सोडून दिले. गुन्हा कोणत्या हद्दीत घडला याबाबत टोलवाटोलवी करीत सीबीडी, नेरुळ व एनआरआय पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. अखेर उपायुक्तांनी तंबी दिल्यावर तब्बल दोन तासांनंतर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.