Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

घंटागाडी व आयुक्तांच्या नावे पालिका सभेत ठणाणा
तीन वर्षापासून आयुक्त विलास ठाकूर हे महापालिकेचा कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली असेल तर त्याला आयुक्तच जबाबदार असतील, असा आरोप महापौरांनी सर्वसाधारण सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केला. दुसरीकडे महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचा दावा करण्यासही ते विसरले नाहीत. सभेच्या आदल्या दिवशी पालिका आयुक्तांनी महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याबाबत वक्तव्य केले होते. त्याविषयी बोलताना पांडे यांनी उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याला असे बोलणे शोभत नसल्याचे सांगितले. पालिकेची स्थिती खराब असेल तर आयुक्तांनी आपल्या कार्यकाळात काय काम केले, असा सवाल पांडे यांनी केला.

अतिक्रमणांविरोधात सराफ असोसिएशनतर्फे निदर्शने
प्रतिनिधी / नाशिक

मध्यवस्तीतील सराफ बाजाराला लागून असलेल्या रस्त्यांचा परिसर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून जाहीर करावा, या भागातील अनधिकृत टपऱ्यांचे उच्चाटन करून नवीन टपऱ्यांना कायमस्वरूपी बंदी घालावी, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी नाशिक सराफ असोसिएशनच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शहराच्या मध्यवस्तीतील सराफ बाजाराला गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. फेरीवाले, भाजीवाले, अनधिकृत टपऱ्या यामुळे सराफ बाजारात ग्राहकांना येणे अवघड झाले असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.

वाटपातील नियोजनाअभावी भूखंडांचा गैरवापर
प्रतिनिधी / नाशिक

अंबड, सातपूर व सिन्नर औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या कारणांनी पडून असणारे भूखंड जर नवीन उद्योजकांना देण्यात आले तर लघु उद्योगांचा विकास चांगला होऊ शकतो. तथापि, राजकीय नेत्यांनी व काही प्रभावशाली मंडळींनी बळकाविलेले भूखंड, दलालांचा सुळसुळाट आणि उभयतांना औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा लाभलेला आशीर्वाद यामुळे विकासाची प्रक्रिया ठप्प झाल्याचे चित्र आहे.

टंचाईच्या सावटाखाली..
पेठ तालुक्यात डोंगरदऱ्यांमध्ये वेढलेले कोहोर गाव. पावसाळ्यात या गावचा फेरफटका मारल्यास पाण्याची आबादीआबाद असल्याचे दृश्य दिसेल. परंतु उन्हाळ्यात गेल्यास पाण्याच्या एकेका थेंबाचे महत्व काय असते, ते कळून येईल. अक्षरश: थेंब थेंब पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना संघर्ष करावा लागतो प्रशासनाशी व निसर्गाशी. एरवी हा संघर्ष जूनच्या मध्यास संपुष्टात येतो. यंदा मात्र जून संपत आला तरी पाऊस नसल्याने जगण्याची लढाई अधिकच तीव्र झाली आहे. गावाजवळ असलेल्या डोंगरापल्याडचा झरा सध्या तहान भागविण्याचे काम करीत आहे. एकाच झऱ्यावर संपूर्ण गाव अवलंबून आहे. पहाटे दोन वाजेपासून अंधारातच महिलांची पावले डोईवर हंडा घेऊन झऱ्याची वाट चालू लागतात. अशा कष्टप्रद स्थितीत पाणी मिळवावे लागत असल्याने ‘पाणी हेच जीवन’ हा धडा शहरी माणसांपेक्षा ‘प्रॅक्टिकल’सह या माणसांनी चांगलाच आत्मसात केला आहे. त्यामुळेच पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या ग्लासभर पाण्यातील एक थेंबही फेकून देण्याची वेळ येत असेल तर त्यांचा जीव कासावीस होतो.

सात मिनिटांच्या पुस्तिकेतून मांडली विकासगाथा
नाशिक / प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमिवर तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांच्या मोर्चेबांधणीने वेग घेतला असतानाच काँग्रेसच्या आमदारांनी ज्या नाशिक मध्य मतदारसंघात रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली, त्याच मतदारसंघात या पक्षातील एका प्रमुख युवा पदाधिकाऱ्याने ‘उद्याच्या नाशिककरिता’ पुस्तिकांचे वाटप करीत जणूकाही प्रचाराचे रणशिंगच फुंकल्याने पक्षाच्या आमदारांना खुले आव्हान देण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू आहे. ‘सुजाण नाशिककरहो, आपली हवीत फक्त सात मिनिटे’ अशी साद घालत या पदाधिकाऱ्याने निवडणुकीचा थेट संदर्भ टाळण्याची दक्षता घेतली खरी, मात्र त्यांचा अंतस्थ हेतू लपून राहिला नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

विज्ञान संवादकासाठी प्रशिक्षण कार्यक्रम
नाशिक / प्रतिनिधी

भाषा कोणतीही असली तरी वैज्ञानिकाची भाषा सामान्य माणसाला समजत नाही आणि वैज्ञानिकाला सामान्य माणसाची भाषा समजत नाही, म्हणूनच सहज समजेल अशा विज्ञान संवादाची गरज आहे. त्यासाठीच राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संवाद परिषदेच्या वतीने विज्ञान संवादक निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती परिषदेचे संचालक व वैज्ञानिक डॉ. मनोज पटारिया यांनी येथे दिली.

नंदकिशोर साखला यांची निवड
नाशिक / प्रतिनिधी

येथील साखलाज् मॉलचे कार्यकारी संचालक नंदकिशोर साखला यांची दिल्लीच्या अखिल भारतवर्षीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स या शिखर संस्थेच्या युवा शाखेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने ही संधी नाशिकला प्रथमच मिळाली आहे. महाराष्ट्र प्रश्नंत अध्यक्ष अनिल कटारिया व प्रेमचंद कोटेचा यांनी साखला यांची नियुक्ती जाहीर केली आहे. साखला हे शांतीलाल मुथ्थाप्रणीत भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष, जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असून दि नाशिक मर्चन्ट को-ऑप बँकेचे माजी उपाध्यक्ष आहेत.

‘राष्ट्रभाषेचा सन्मान राखणे अगत्याचे’
नाशिक / प्रतिनिधी

भारतवर्षामधील सर्व प्रमुख भाषांमधील साहित्याचे व महत्वाच्या विचारांचे आदानप्रदान होणे गरजेचे आहे. मात्र हिन्दी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. त्याकडे सातत्याने लक्ष देणे अगत्याचे आहे, असे प्रतिपादन प्रश्न. डॉ. भास्कर गिरिधारी यांनी केले. ‘अखिल हिन्दी साहित्य सभा’ या संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. हिन्दी भाषेच्या प्रचार कार्याबद्दल संजीव अहिरे यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. जयश्री साठे, चित्रा दैवज्ञ, एकनाथ वाघ, वल्लरी पाध्ये आदींनी कविता वाचन केले. सूत्रसंचालन शीला डोंगरे यांनी केले.