Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

जळगाव : पाणीटंचाईचे संकट गहिरे
वार्ताहर / जळगाव

पावसाळ्याची दोन नक्षत्रे तसेच जून महिना संपत आली असताना देखील जिल्ह्य़ातील ४९५ गावात पाणी टंचाईचे संकट वाढत असून तीन तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. दरम्यान तीन धरणे वगळता अन्य धरणांतील पाणीसाठा सुद्धा जेमतेम आहे. परिणामी लवकरच दमदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईचे स्वरुप आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद होणाऱ्या जळगाव जिल्ह्य़ात दरवर्षी पाणी टंचाईचे संकट ठरलेलेच असते. गेल्यावर्षी अपुऱ्या पावसामुळे हतनूर, गिरणा आणि वाघूर धरण वगळता अन्य धरणातील पाणीसाठा तसा समाधानकारक नव्हताच. त्यात वाढत्या तापमानाने विहिरी व जलाशयांसह जमिनीच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणी टंचाईचे संकट मार्च पासूनच जाणवायला लागले असून जसजसे तापमान वाढत जाते तस तसे हे संकट तीव्र होत आहे.

जानवे गावाची पाणीटंचाई दूर होणार
साहेबराव पाटलांचा पाणीटंचाई निवारणातही पुढाकार

अमळनेर / वार्ताहर

तालुक्यात दरवर्षी पाण्याची भीषण टंचाई जाणवते. प्रशासनही उन्हाळ्यातील टंचाई निवारण करता करता हतबल ठरते. विहिरींची पातळी खालावते. पाण्याचे स्त्रोत आटतात. पाण्याच्या टँकरवर काही गावांना अवलंबून रहावे लागते. तालुक्यातील जानवे हे मोठय़ा लोकसंख्येचे गावही यास अपवाद नाही. या गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

मोफत शिक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा
वार्ताहर / धुळे

अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेतर्फे वयाच्या १८ वर्षापर्यंत मुला-मुलींना सर्व स्तरावर समान आणि मोफत शिक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येथे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सकाळी दहा वाजता येथील नारायणबुवा समाधीपासून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व जे. यु. ठाकरे यांनी केले.

ठेवीदारांच्या रेटय़ामुळे तापी पतपेढीचे विशेष लेखापरीक्षण
वार्ताहर / जळगाव

खान्देश ठेवीदार कृती समितीच्या मागणीवरून येथील तापी सहकारी पतपेढीचे २००५ ते २००९ पर्यंतचे विशेष लेखापरीक्षण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान हे लेखापरीक्षण प्रश्नमाणिकपणे आणि निर्भिडपणे करण्यात यावे, अशी मागणीही समितीकडून करण्यात आली आहे. तसेच याव्दारे ७६ कोटी रूपयांच्या थकबाकीचे तथ्य समोर यावे व यापूर्वी लेखापरीक्षण करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे समितीने म्हटले आहे.

सुलवाडे प्रकल्पातील पाणी जामफळ धरणात आणण्यासाठी ५०६ कोटी खर्च अपेक्षित
वार्ताहर / धुळे

सुलवाडे प्रकल्पातून पंपिंगव्दारे पाणी उचलून ते जामफळ-कनोली धरणात टाकले तर सिंचन आणि जिल्ह्य़ातील बहुतेक गावातला पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल, पण त्यासाठी ५०६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती नाशिक पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता ना. लो. साळवे यांनी दिली.

पतसंस्था टिकविण्यासाठी एवढे करावे..
महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील पतसंस्था चळवळ अग्रगण्य आहे. २९ हजार पतसंस्थांचे विशाल जाळे, गोरगरीबांना मदतीच्या वेळी हात देणारी, सामान्यांची पत वाढविणारी, सावकारी व्यवसायाला आळा घालणारी, लाखो लोकांना रोजगार देणारी, सरकारी कोणतीही गुंतवणूक नसणारी, मात्र ठेवीदार व सभासदांच्या गुंतवणुकीवर सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचे भाग भांडवल व ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेली ही संस्था ‘चळवळ’ आहे. काही भ्रष्ट प्रवृत्तींनी सहकार खाते व लेखा परीक्षकांच्या संगनमताने या चळवळीच्या नरडय़ालाच नख लावण्याच्या प्रकाराने पुरत्या चळवळीला सुरूंग लागल्याचे चित्र उभे केले जात असून शुद्धीकरणाच्या नावाखाली चळवळीची अंत्ययात्रा सुरू करण्याचा प्रकार सुरू झाला आहे.

जगदेव आखरे यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश
पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरण
चाळीसगाव / वार्ताहर
येथील आर्थिक दिवाळखोरीत गेलेल्या बहुचर्चित पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेतील सुमारे २० कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात पोलीस निरीक्षक जगदेव आखरे यांच्या खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश अपर पोलीस अधीक्षकांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. तपासकामात दिरंगाई केल्याच्या आरोपावरून पोलीस निरीक्षक जगदेव आखरे यांच्याकडून या तपासाचे काम काढून घेण्यात आल्याचे कळते.

चाळीसगावच्या जागेवर शिवसेनेचा दावा
चाळीसगांव / वार्ताहर

आतापर्यंत भाजपला पालखीत बसवून आम्ही भोईचे काम केले, आता याउलट झाले पाहिजे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ आता सर्वसाधारण झाल्याने शिवसेना त्यावर नक्कीच दावा करणार, असे शिवसेना उपनेते व जळगावचे संपर्कप्रमुख विलास अवचट यांनी स्पष्ट केले आहे.

देवळाली कॅम्पला भासते वाय. डी. पाटलांसारख्या पोलीस अधिकाऱ्याची उणीव
स्पॉट दारणा
भगूर / प्रकाश उबाळे

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक हैराण झाले असून गुंडांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न एखाद्याने करताच त्याला भर बाजारात मारहाण करण्याचा प्रकारही किकबॉक्सींग प्रशिक्षक डॅनियल आयझॉक यांच्याबाबतीत घडला आहे. गुंडांना सडतोड उत्तर देणाऱ्या आयझॉक यांच्याबद्दल नागरिक गौरवोद्गार काढत असताना दुसरीकडे पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमिवर वाय. डी. पाटील यांसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे नाव चर्चिले जात असून त्यांना पुन्हा बोलविण्याचीही मागणी होऊ लागली आहे.

भगूरमध्ये कायदा मार्गदर्शन शिबीर
भगूर / वार्ताहर
येथे नाशिक जिल्हा विधी सेवा प्रश्नधिकरण समिती आणि नाशिकरोड दिवाणी व फौजदारी न्यायालय यांच्या विद्यमाने न्या. अभिजीत नांदगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन शिबीर झाले. यावेळी व्यासपीठावर न्या. रेवती लामतुरे, न्या. प्रदीप नाईकवाडे, नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील ताजनपुरे, उपाध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश्वर डावखर, अ‍ॅड. बाळासाहेब आडके, नगराध्यक्षा भारती साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रश्नस्तविक नगरसेवक अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे यांनी केले. यावेळी माहितीचा अधिकार विषयावर अ‍ॅड. नगरकर, महिलांविषयक कायदे विषयावर अ‍ॅड. वर्षा देशमुख, धनादेशाविषयी अ‍ॅड. अशोक कटारे यांनी मार्गदर्शन केले. कायद्याचे ज्ञान सर्वसामान्यांना व्हावे यासाठी अशा प्रकारचे शिबीर घेणे ही गरज बनल्याचे न्या. नाईकवाडे यांनी सांगितले. लामतुरे यांनी मुलांना बालमजुरी करण्यास भाग पाडणे, त्यावर अत्याचार करणे हा कायद्याने गुन्हा समजला जातो. त्यामुळे एखाद्या मुलावर अत्याचार होत असेल तर त्याला कायदेशीर मदतीचा हात द्या, असे सांगितले. सूत्रसंचालन अ‍ॅड. ज्ञानेश्वर डावखर यांनी केले. आभार अ‍ॅड. अकबर सय्यद यांनी मानले.

युपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी नाशिकमध्ये मोफत प्रशिक्षण वर्ग
धुळे / वार्ताहर
संरक्षण दलातील अधिकारी पदासाठी युपीएससीमार्फत १३ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार असून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी १३ जुलै ते पाच सप्टेंबर या कालावधीत नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र शासनातर्फे मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे.
प्रशिक्षण व निवासाची सोय मोफत करण्यात येणार असली तरी भोजन १० रूपये प्रतिदिन याप्रमाणे दिले जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेशासाठी ८ ते ९ जुलै रोजी सकाळी १० वाजता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाचे आवार, नाशिकरोड, नाशिक येथे कागदपत्रांसह मुलाखतीस हजर रहावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ९५२५३ - २४५१०३२ येथे संपर्क साधावा. प्रशिक्षण वर्गाचा अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी केले आहे.

पहिलीच्या विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत
पिंपळगाव बसवंत / वार्ताहर
येथील जि. प. प्रश्नथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे सरपंच भास्कर बनकर व मुख्याध्यापकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरच गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. बनकर यांच्या हस्ते पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके व पाटी वाटप करम्यात आले. यावेळी ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून बनकर यांनी मुख्याध्यापक व प्रमुख शिक्षकांसमवेत बैठक घेतली. गणवेश, शाळेतील सर्व वर्गाना बाके, शिक्षकांना गणवेश या सुविधा लवकरच देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना ग्रामशिक्षक समिती व ग्रामस्थांच्या वतीने मोफत गणवेश देण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.

मध्य रेल्वे ईसीसी निवडणूक; नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे वर्चस्व
मनमाड / वार्ताहर
मध्य रेल्वे ई. सी. सी. सोसायटीच्या निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियन या कामगार संघटनेने वर्चस्व कायम ठेवले आहे. ई. सी. सी. सोसायटीच्या निवडणुकीत एकूण २६६ जागांपैकी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने १६५ जागांवर घवघवीत विजय मिळविला. विरोधी पॅनलला ९९ जागी यश मिळाले तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले. सोसायटीचे संचालक मंडळ तसेच अध्यक्ष ही पदे देखील एन. आर. एम. यु. कडेच राहणार आहेत. म्हणूनच ई. सी. सी. सोसायटीत एन. आर. एम. यु. चे वर्चस्व कायम असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली.
एन. आर. एम. यु. ने मुंबईत ५२, भुसावळ विभागात १५, पुणे ७, सोलापूर १४, नागपूर ७, जबलपूर १९, भोपाळ १५, झांशी २७ आणि आग्रा विभागात ९ अशा १६५ जागा जिंकल्या. या निवडणुकीत भुसावळ आणि नागपूर विभागात एन. आर. एम. यु. ची पिछेहाट झाली तरीही एकूण मंडल निकालात एन. आर. एम. यु. ला चांगले यश मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

मीना सावंत यांचे निधन
देवळा / वार्ताहर

तालुक्यातील वाखारी येथील पिंपळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका मीना विक्रम सावंत (५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. देवळा येथील नंदाई गिफ्ट कॉर्नरचे संचालक किरण सावंत यांच्या त्या मातोश्री होत्या.