Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे वन्यजीव हैराण!
अभयारण्यांमधील म्हातारे वाघ आणि हत्ती तर पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे पुरते बेजार झाले आहेत. वयोमानामुळे त्यांना मूळ वसतीस्थान सोडणे अशक्य आहे. याचाच फटका त्यांना अधिक बसत आहे. नव्याने सत्ता हाती घेतलेल्या नवीन पटनायक यांच्या सरकारमधील मंत्र्यांच्या खांद्यावर येत्या काळात पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर कायमस्वरूपी तोडगा काढून वन्यजीवांसह राज्यातील जनताजनार्दनालाही दिलासा देण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.

राजकारणापायी खेळाच्या विकासाचा त्रिफळा!
ठाण्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय श्रेय घेण्याचा किंवा आरोप-प्रत्यारोपाचा फड रंगल्याशिवाय राहत नाही. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात राजकारण केल्याशिवाय न झोपणारे राजकारणी, खेळातही हुतूतू घातल्याशिवाय कसे स्वस्थ बसतील? बहुचर्चित नियोजित क्रिकेट अ‍ॅकेडमीवरूनही गेली चार वर्षे असाच राजकीय खेळ सुरू आहे. मात्र राजकारणाच्या या खेळात उदयोन्मुख खेळाडूंचा बळी जात आहे.

चळवळ देशभर विस्तारली
१९७० चे दशक हे समांतर सिनेमा आणि फिल्म सोसायटीचे दशक म्हणून ओळखले जाते. नवे नवे दिग्दर्शक फॉम्र्युल्या बाहेरचा समांतर सिनेमा निर्माण करीत होते आणि हे सर्व दिग्दर्शक फिल्म सोसायटी चळवळीशी संबंधित होते.
व्यावसायिक चित्रपटात काम करणारे बासू भट्टाचार्य, हृषीकेश मुखर्जी, गुलजार, गुरुदत्त, बिमल रॉय, यांनाही फॉम्र्युला प्रधान चित्रपटांची पोलादी चौकट जाचत होती; पण त्यांनी आपली प्रयोगशीलता या चौकटीत राहूनच दाखविणे पसंत केले. खलनायक, फाइटस, पाचकळ विनोद या बांडगुळांना त्यांनी फाटा दिला पण गाणी काढून टाकणे त्यांना जमले नाही. गाण्यांचा त्यांनी चांगला उपयोग करून आपल्याला सांगायचे ते सांगितले. गुरूदत्तांचा ‘प्यासा’, बासू भट्टाचार्याचा ‘तिसरी कसम’ बिमल रॉयचा ‘बंदिनी’ हृषिकेश मुखर्जीचा ‘अनुराधा’ ही त्याची उदाहरणे आहेत. व्यावसायिक चित्रपट निर्मितीत गुंतलेल्या नवनिर्मितीक्षम अभिजात दिग्दर्शकांना फिल्म सोसायटी चळवळ जागरूक प्रेक्षक निर्माण करीत आहे याचे कौतुक होते आणि या दृष्टीने चळवळीतून आलेल्या दिग्दर्शकांचे चित्रपट ते कुतूहलाने पाहत होते. प्रसंगी या दिग्दर्शकांना मदतही करीत होते. १९७० ते १९८० या दशकात कुतूहल, कौतुक आणि चर्चा होती ती फिल्म सोसायटी चळवळीची आणि समांतर सिनेमाची. त्याच्या विरोधात किंवा बाजूने बोलणारे गट होते. वृत्तपत्रेही या चर्चेत सामील व्हायची.
हिंदीतला समांतर सिनेमा मृणाल सेनच्या ‘भुवनशोम’ने (१९६९) आरंभ झाला असला तरी हिंदीच्या सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत समांतर सिनेमा नेण्याचे श्रेय श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ला (१९७३) जाते. शबाना आझमीचा हा पहिला चित्रपट; अस्ताला जाणाऱ्या सरंजामशाहीचे दर्शन घडविणारा होता. केरळमध्ये अदूर गोपाल कृष्णनचा ‘स्वयंवरम्’ (१९७२) आणि कन्नडमध्ये गिरीश कर्नाडलिखित ‘संस्कार’ (१९७०) प्रकाशित झाला. कर्नाटकात त्यामुळे जोरदार वैचारिक वादळ निर्माण झाले. एम. एस. सत्थू दिग्दर्शित ‘गर्म हवा’ (१९७३) या चित्रपटाने फाळणीनंतरच्या मुस्लीम मानसिकतेचे वास्तव दर्शन घडविले. विजय तेंडुलकरलिखित ‘सामना’ने (१९७४) हे वारे मराठीत आणले. निर्माते रामदास फुटाणे व दिग्दर्शक जब्बार जब्बार पटेल यांचा हा पहिला चित्रपट. १९६० नंतर महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या सहकारी साखर कारखान्याचे चित्रण ‘सामना’त आले होते. तोपर्यंत मराठी साहित्यातही साखर सम्राटांचे चित्रण झालेले नव्हते.
विविध भाषांत निर्माण झालेल्या या समांतर चित्रपटांनी फिल्म सोसायटी चळवळीला अधिक बळ दिले. या सिनेमांना प्रेक्षक-प्रतिसादही बऱ्यापैकी मिळाला.
थोडक्यात ७० चे दशक हे समांतर सिनेमाचे दशक म्हणून भारतीय सिनेमा इतिहासात ओळखले जाते. नवी कथानके, नवे कलावंत, नवे दिग्दर्शक, नवे प्रयोग याद्वारा समांतर सिनेमाने आपली मोहोर उमटविली. प्रादेशिक भाषात होणारे सिनेमातले प्रयोग देशभर सर्वत्र पोहोचावेत यासाठी भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पॅनोरमा’ हा विभाग १९७८ साली मद्रासला भरलेल्या महोत्सवात सुरू करण्यात आला. याच दशकात फिल्म सोसायटी चळवळ काश्मीर, आसाम अशा दूरच्या प्रांतापर्यंत पोहोचली.
सुधीर नांदगांवकर,
फेडरेशन केंद्रिय सचिव
cinesudhir@gmail.com