Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

अकरावीला जिल्हय़ात जागांचा तुटवडा जाणवणार?
क्रीडानैपुण्याचे वाढीव गुणच ग्राहय़ धरणार
पुणे, २६ जून/खास प्रतिनिधी
पुणे जिल्ह्य़ामध्ये अकरावीला प्रवेश घेण्यास पात्र ठरलेले सुमारे ८५ हजार विद्यार्थी असल्याचे दहावीच्या निकालानंतर स्पष्ट झाले असून, केंद्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागांचा कोटा ठेवल्यास राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे १० हजार जागांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, प्रवेश समितीने आवाहन करूनही अकरावीचे अर्ज घेण्यास पहिल्याच दिवशी गर्दी उसळून सुमारे ३० हजार अर्ज विकण्यात आले.

प्रतिज्ञापत्रावर मतदार यादीत नाव नोंदविता येणार
पुणे, २६ जून/खास प्रतिनिधी

निवासस्थानाचा कोणताही पुरावा नसला तरी आता मतदार यादीत नाव नोंदविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रतिज्ञापत्रावर संबंधित व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदविण्यास निवडणूक आयोगाने संमती दिल्याने केवळ निवासाचा पुरावा नसल्याने मतदानाला मुकणाऱ्यांना मतदानाचा हक्क मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाने पुणे, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर व नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली. लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या पाच ठिकाणी अल्प मतदान झाले.

मला भावलेले डीएसके बिंदुमाधव जोशी
दीपक कुलकर्णी आणि बिंदुमाधव जोशी म्हणजे पुण्यातील ‘अस्सल कसबेवाले’ हे आम्हा दोघांचे खरे वर्णन आहे. ‘दया तिचे नाव, भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे’ हा संत तुकारामांचा अभंग आपण जगून दाखविला पाहिजे आणि यासाठी तुकोबांनी सांगितलेले वर्तनशास्त्र आयुष्यात आचरले पाहिजे. ते शास्त्र म्हणजे, ‘एका बीजा केला नाश। मग उगवे कणिस’ हे दोन्ही अभंग जो जगून दाखवतो आहे त्याचे नाव आहे डीएसके.आम्हा दोघांचे जीवनमार्ग वेगळे आहेत, पण त्या-त्या मार्गावरील वाटचालीची मूल्ये मात्र समान आहेत. आम्ही दोघेही पूजनीय गोळवलकर गुरुजींच्या काळातील संघ स्वयंसेवक. स्वातंत्र्यवीर सावरकर हे दोघांचे जीवनदैवत.

विद्यार्थ्यांसाठी मोफत बसप्रवासयोजना ३१ जुलैपासून राबवणार
पुणे, २६ जून/ खास प्रतिनिधी

माध्यमिक शाळेतील मुलांसाठी जाहीर करण्यात आलेल्या मोफत बस प्रवास योजनेची अंमलबजावणी येत्या ३१ जुलैपासून केली जाणार आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय मान्यताप्राप्त शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी या सुविधेचा लाभ मिळणार आहे. पीएमपीएलच्या सध्याच्या मार्गावरच सकाळी साडेसहा ते सायंकाळी साडेसात या वेळेत ही योजना राबविण्यात येणार आहे.

सात अल्पवयीन मुलींची कुंटणखान्यातून सुटका
पुणे, २६ जून / प्रतिनिधी
‘चांगले काम लावून देतो’ असे सांगून सात अल्पवयीन मुलींची कुंटणखान्यातून सुटका करून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या कुंटणखान्याच्या मालकिणीसह तिघांना सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली.या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अनिल कुं भारे, सहायक आयुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भामरे, पोलीस उपनिरीक्षक विमल बडवे, पोलीस हवालदार अरविंद कळसकर, पोलीस नाईक हरिदास बांडे, पोलीस नाईक तुकाराम माने, पोलीस नाईक तानाजी निकम, कृष्णा माचरे, यांनी ही कामगिरी केली. मोहम्मद निजाम निसारुद्दीन फकीर (वय ३०, रा. जि. वर्धमान, पश्चिम बंगाल), आशादुल मोहंम्मद नियाज शेख (वय २४, रा. बांगलादेश) याच्यासह शहनाज अब्दुल्ला शेख (वय ३०, रा. बुधवार पेठ,) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

‘वेदना कमी करण्यास जलोपचार उपयुक्त’
पुणे, २६ जून/प्रतिनिधी
शारीरिक वेदना कमी करण्यासाठी योग आणि जलोपचार उपयुक्त असल्याचे मत डॉ. माधुरी लोकापूर यांनी व्यक्त केले. इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखेच्या वतीने, तसेच लोकापूर पेन व फिजिओथेरपी क्लिनिक आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. लोकापूर म्हणाल्या की, योग्य औषधोपचाराने कर्करोगाचे रोगीसुद्धा वेदनामुक्त होऊन सुखी जीवन जगू शकला.
या कार्यशाळेत डॉ. पी. एन. जैन, बी.डी. बांडे व डॉ. अभय नेने यांनी पाठीच्या मणक्यातील शस्त्रक्रिया व खेळांमुळे होणाऱ्या वेदना व इतर समस्या सोडविण्याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. शरद हर्डीकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. पराग संचेती, डॉ. नितीन भगली, डॉ. सुशील अरोरा, डॉ. दिलीप सारडा आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
पुणे, २६ जून/प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे २८ जून ते २ ऑगस्ट दरम्यान राज्यभर विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अकाली काही गोष्टी कार्यकर्त्यांवर लादल्या गेल्यामुळे पक्षाचा पराभव झाला. विधानसभेत मात्र या चुका होऊ नये, या दृष्टीने राज्याच्या सातही विभागात विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

रेशनच्या धान्यासाठी नवीन गोदाम बांधणार- रमेश बंग
पुणे, २६ जून / प्रतिनिधी
रेशनवर गरजूंना मिळणाऱ्या धान्याचा तुटवडा पडू नये, यासाठी राज्य सरकार धान्य साठवणुकीसाठी गोदामे बांधणार असून त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री रमेशचंद्र बंग यांनी आज येथे दिली.ऑल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब देशमुख होते.

मोदी गणपती मंदिरात प्रवचन महोत्सव
पुणे, २६ जून/प्रतिनिधी
सिद्धिविनायक मोदी गणपती मंदिर येथे ‘क्रांतिकारकांचे पुण्यस्मरण’ म्हणून कीर्तन व प्रवचन महोत्सव आयोजित करण्यात आला असून नुकतीच या महोत्सवाला सुरुवात झाली. प्र. ल. गावडे, कृ.पं.देशपांडे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.या महोत्सवात भारताच्या स्वातंत्र्याकरिता प्राणार्पण करणाऱ्या क्रांतिकारकांवर ८० कीर्तने तसेच ३४ प्रवचने होणार असून हा महोत्सव १६ ऑक्टोबपर्यंत रोज सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत मोदी गणपती नारायण पेठ येथे होणार आहे.

गरीब पार्टीच्या वतीने एक जुलैला मोर्चा
पुणे, २६ जून/प्रतिनिधी
गरीब नागरिकांना मोफत घरे, रेशन कार्डवर रॉकेल व अन्नधान्य मिळावे, तसेच मतदानाचे ओळखपत्र मिळावे आदी मागण्यांसाठी भारतीय गरीब पार्टीच्या वतीने १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय गरीब पार्टीचे प्रदेश अध्यक्ष नाना क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या मोर्चामध्ये सुमारे पाच हजार महिला सहभागी होणार आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढविण्याचा पार्टीचा विचार असून, मित्र पक्षांना तसेच गरिबांसाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

न्यायालयात सापडलेली रोकड वकिलाकडून पोलिसांच्या स्वाधीन
पिंपरी, २६ जून / प्रतिनिधी
पिंपरी न्यायालयाच्या आवारात सापडलेली अकरा हजार रुपयांची रोख रक्कम अ‍ॅड.नमिता गोवर्धन बनसोडे या वकील महिलेने प्रामाणिकपणे पोलिसांकडे सुपूर्द केली. अ‍ॅड. बनसोडे यांचा आज पोलीस निरीक्षक शरद सुर्वे व सहायक निरीक्षक नंदकुमार पिंजण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अ‍ॅड. बनसोडे यांना गुरुवारी दुपारी न्यायालयाच्या आवारात अकरा हजार ४०० रुपयांची रोकड सापडली.त्यांनी त्याबाबत पोलिसांना संपर्क साधला.कोणाचे पैसे हरवले असतील म्हणून त्यांनी विचारपूसही केली.कोणी वाली नाही म्हटल्यावर त्यांनी ती रक्कम सरळ पोलिसांकडे सुपूर्द केली.या प्रामाणिकपणाबद्दल आज सकाळी अ‍ॅड.बनसोडे यांचा गौरव करण्यात आला.या प्रसंगी पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मेंगडे, अ‍ॅड. सुशील मंचरकर, अ‍ॅड. नीलम शिंदे, अ‍ॅड. रमेश जाधव, अ‍ॅड. शशिकांत गावडे, अ‍ॅड. सतीश जाधव आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील आयडिया मोबाइल सेवा ठप्प
पिंपरी, २६ जून / प्रतिनिधी
आज सकाळी दहा वाजल्यापासून पिंपरी-चिंचवड शहरातील आयडिया मोबाइल सेवा तांत्रिक बिघाडामुळे बंद राहिल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली. सकाळी दहा वाजल्यापासून अचानक ही सेवा बंद पडली. महत्त्वाच्या कामासाठी अन्य मोबाइल अथवा ‘बीएसएनएल’ चा आधार घ्यावा लागला. अनेकदा आयडिया कस्टमर केअरशी संपर्क साधूनही नेमके काय झाले आहे व सेवा कधी सुरळीत होईल हे कोणीही सांगत नव्हते. दुपारी अडीचनंतर काही भागात सेवा पूर्ववत झाली. मात्र उर्वरित भागात ती टप्याटप्याने चालू होईल, असे आयडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बाबत अधिक माहिती देताना, यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सेवा विस्कळीत झाली होती, असे सायंकाळी सांगण्यात आले. या गैरसोयीचा फटका प्रामुख्याने पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, विश्रांतवाडी, कळस, खडकी, औंध या भागातील ग्राहकांना बसला.

सुमोच्या धडकेने पादचारी बालकाचा मृत्यू
पिंपरी, २६ जून / प्रतिनिधी
भोसरी सद्गुरुनगर येथे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सुमो गाडीची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या मुलाचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम कुंडलीक गव्हाणे (वय ८, रा. सद्गुरुनगर, भोसरी) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. परशुराम बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पायी जात असताना भरधाव जाणाऱ्या (एमएच १४ एबी १४५५) या सुमो गाडीची जोरात धडक बसली. त्यात परशुराम गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले असता त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी सुमो गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

नगराज मेहता यांचे निधन
पुणे, २६ जून / प्रतिनिधी
जैन समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते व पुण्यातील मे. एन. मेहता टायर्स ग्रुपचे संस्थापक मालक नगराज पुखराज मेहता (वय ६४) यांचे नुकतेच निधन झाले. नगराज मेहता जैन समाजातील मुत्सद्दी सल्लागार म्हणून परिचित होते.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

दत्तात्रेय बोरकर यांचे निधन
पुणे, २६ जून / प्रतिनिधी

लोणीकाळभोर येथील प्रगतशील शेतकरी व कुंजीरवाडी जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक दत्तात्रेय बोरकर (वय ८१) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे.