Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

राज्य

कोकणात सध्या मासळीला सोन्याचा भाव
जितेंद्र पराडकर
संगमेश्वर, २६ जून

मांसाहारामध्ये मटण व चिकनबरोबरच मच्छी हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. किंबहुना, काही लज्जतदार मासळीला मटन- चिकनपेक्षा अधिक पसंती दिली जाते. कोकण आणि मासे यांचे नाते तर खूप जवळचे आहे. श्रावण महिना वगळता मांसाहारी मंडळींना या पदार्थापासून वंचित राहणे खूपच कठीण जाते. मात्र पावसाळ्यामध्ये कोकणच्या समुद्रातील मच्छिमारी तीन महिने बंद राहात असल्याने खाडी व नदीमध्ये स्थानिक मच्छिमारांकडून केल्या जाणाऱ्या मच्छिमारीचे महत्त्व वाढून त्यांच्याकडील मासळीला या हंगामात सोन्याचा भाव मिळत असतो.

‘दिवा-सावंतवाडी पॅसेंजर’, ‘कोकणकन्या’ प्रवाशांना वाली कोण?
ठाणे, २६ जून/प्रतिनिधी
कोकणी माणसाच्या मागणीला प्रा. मधु दंडवतेंनी आकार दिला. रेल्वेचे स्वप्न साकार होणार, या कल्पनेने महाराष्ट्राने आपला खर्चाचा सर्वाधिक वाटा दिला, शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या; मात्र गोवा, केरळ राज्यांनी आपला आर्थिक भार देतानाच आपल्या वाटय़ाच्या गाडय़ांव्यतिरिक्तही अधिक जादा गाडय़ा पदरात पाडून घेतल्या, परंतु महाराष्ट्राने कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या ‘दादर-रत्नागिरी’ गाडीव्यतिरिक्त एकही गाडी मागून घेतली नाही. दिवा-सावंतवाडी गाडी महाराष्ट्रात सावंतवाडी येथे टर्मिनल नसल्यामुळे मडगावात न्यावी लागते.

देवळ्यात डाळिंब बागांना पुन्हा तेल्या रोगाचा फटका
देवळा, २६ जून / वार्ताहर

तालुक्यातील मकरंदवाडी-भिलवाड शिवारात ऐन बहरातील डाळिंब बागा तेल्या रोगाच्या भक्षस्थानी पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्यात पुन्हा एकदा तेल्या रोगाने डोके वर काढल्याने डाळिंब उत्पादक धास्तावले असून या पाश्र्वभूमीवर, कृषी विभागाने तेल्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. या परिसरात गणेश पूरकर, सुरेखा मुरलीधर पूरकर आदिंच्या डाळिंब बागा आहेत.

कोईमतूर-कुर्ला एक्स्प्रेसवर दरोडय़ाचा प्रयत्न
सोलापूर, २६ जून/प्रतिनिधी
सोलापूर-गुलबर्गा लोहमार्गावर दुधनी रेल्वे स्थानकावर कोईमतूर-कुर्ला एक्स्प्रेसवर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या संशयित दरोडेखोरांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकावर दगडफेक केली. त्यावेळी प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात एक संशयित दरोडेखोर जखमी झाला. त्याच्यासह तिघाजणांना अटक करण्यात आली. मात्र त्यांचे अन्य दोघे साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले. शुक्रवारी पहाटे ४.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. सोलापूर जिल्ह्य़ात दुधनी, कुर्डूवाडी, जिंती, पारेवाडी आदी भागात थांबलेल्या रेल्वेगाडय़ांवर दरोडे टाकण्याचे प्रकार अलीकडे वाढत असताना त्याला आळा घालण्यासाठी रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने संयुक्तपणे कोम्बिंग ऑपरेशनची मोहीम हाती घेतली आहे.

संगमेश्वरजवळ अपघातात आठ जखमी
संगमेश्वर, २६ जून/वार्ताहर

येथील ‘रामकुंड’ वळणावर रस्त्यातच कोसळलेल्या कंटेनरवर आज पहाटे भरधाव वेगाने येणारी एस. टी. बस आदळल्याने बसमधील आठ प्रवासी जखमी झाले. बोरिवलीहून रत्नागिरीकडे जाणारी बस चालक योगेश पटवर्धन (३०, रा. रत्नागिरी) हे घेऊन येत असताना रस्त्यात कोसळलेला कंटेनर त्यांना दिसला नाही. यामुळे बस या कंटेनरवर आदळली. या अपघातात एस.टी.तील सचिन वनकर (३०, देवरुख), राजन शिर्के (५२, कार्ले), संकेत सावंत (१७, कोसुंब), यशवंत मोहिते (५७, चिखली), रूपेश राबाडे (१८, वेतोशी), रमाकांत चव्हाण (४९, गणेशगुळे), स्वप्नील गांधी (४९, गावडेआंबेरे), स्वप्नील शिर्के (कोर्ले) हे जखमी झाले. त्यांच्यावर संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

काष्ठशिल्पकार शिवाजी सावंत यांचे निधन
खोपोली, २६ जून/वार्ताहर

प्रसिद्धीपासून दूर राहणारे, पण काष्ठशिल्पकार म्हणून परिचित असलेले शिवाजी गंगाराम सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सावंत हे मूळचे सावंतवाडीचे. खोपोलीतील सायमाळस्थित टाटा पॉवर कंपनीत त्यांनी ३९ वर्षे नोकरी केली. शालेय जीवनापासून ते नोकरीच्या अखेपर्यंत उंचउडीपटू व व्हॉलीबॉलपटू म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांना लहानपणापासून दगड व लाकडातील नैसर्गिक कलाकृती शोधण्याचा व त्याचा संग्रह करण्याचा छंद होता. आयुष्यभर त्यांनी हा छंद मनस्वी जोपासला होता. जंगलभ्रमंती करून नैसर्गिक विविध आकारातील लाकडांचा तसेच दगडांचा संग्रह करणारे शिवाजी सावंत, त्या लाकडाला- दगडाला अत्यंत कुशलतेने आकार देत असत. वन्य पशूपक्षींची हुबेहूब प्रतिमा साकारणारी असंख्य काष्ठशिल्पे त्यांनी तयार केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

‘सिंधुदुर्गचे सौंदर्य न बिघडण्याची काळजी घेऊ’
सावंतवाडी, २६ जून/वार्ताहर

सिंधुदुर्गचे निसर्गसौंदर्य बिघडणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ, असे जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी सांगितले. औष्णिकऐवजी गॅसवर आधारित वीज प्रकल्प उभारण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. अजित पवार व अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे एकत्रित उपस्थित होते. दोन्ही खात्यांनी पाणी व समुद्रातून वीजनिर्मिती करण्यावर भर दिला आहे, मग औष्णिक प्रकल्प कशासाठी, असे विचारले असता द्वयींनी लोकांच्या मागणीची पूर्तता त्यातून होणार नसल्याचे सांगितले. प्रदूषणकारी प्रकल्प सिंधुदुर्गात नको असतील तर त्याला पाठिंबा दिला जाणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

नाशिकमध्ये 'प्लास्टिकमुक्त कुंड’ मोहीम
नाशिक, २६ जून / प्रतिनिधी
शहराच्या पांडवलेणी परिसरातील चार कुंडे पाणी संपल्यामुळे उघडी पडली आहेत. यातील काही कुंडांचे पाणी आटत असले तरी प्लास्टिक कचऱ्याची त्यात भर पडत असून पाण्यातील जलचरांचा जीव वाचावा यासाठी ‘प्लास्टिकमुक्त कुंड’ मोहीम २८ जून रोजी सकाळी सहा वाजता सुरू करण्यात येणार आहे.या मोहिमेत आटलेल्या कुंडांमध्ये पाणी टाकणे, काही कुंडांमधील प्लास्टिक कचरा बाहेर काढणे, निसर्गाशी नाते जोडणे आणि इतर कार्यक्रम या मोहिमेतंर्गत घेण्यात येणार आहेत. प्रदूषण मुक्त नाशिक होण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी या उपक्रमात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सम्राट धाडणकर ९९७०१६८३२५ आणि शिल्पा मेंदडकर ९८५०२३४०९६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जळगाव रेल्वेस्थानक सल्लागार समितीची स्थापना
जळगाव, २६ जून / वार्ताहर
शहरातील विविध क्षेत्रांमध्ये अग्रणी असलेल्यांची जळगाव रेल्वे स्थानक सल्लागार समिती गठित करण्यात आली असून येथील स्टेशन अधीक्षक कार्यालयात समितीची प्रथम बैठक नुकतीच झाली. रेल्वे स्थानकाशी तसेच प्रवाशांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होवून त्या अनुषंगाने ठरावही मांडण्यात आले. भुसावळ विभागाचे रेल्वे प्रबंधक बोरीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्याच बैठकीत जळगाव रेल्वे स्थानकातील वाहनतळ तेथील दर व तळ व्यवस्थापनाच्या वागणुकीसंदर्भात चर्चा झाली. प्रवाशांची वाढती संख्या, उपलब्ध हमाल, प्लॅटफॉर्म खिडकीची आवश्यकता, चौकशी खिडकीवरील कर्मचाऱ्यांची अरेरावी आदी विषयांवर चर्चा झाली. स्थानिक समितीचे शशी बियाणी, एन. एम. तगारे, डी. आर. संचेती, व्ही. बी. पाटील, सुशील नवाल, अंबादास माळी, मनिषा उगले, शीतल साळी, गनी मेमन, पी. डी. अच्युत यावेळी उपस्थित होते.

पालघर तालुक्यातून प्राची दवणे पहिली
पालघर, २६ जून/वार्ताहर

बोईसर मिलिटरी स्कूलची प्राची अनिल दवणे ही विद्यार्थिनी ९४.७० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. येथील आनंदाश्रम कॉन्व्हेंट स्कूलची ऋतुजा दत्तात्रय ठेंगरे ही विद्यार्थिनी ९३.४३ टक्के मिळवून दुसरी, तर रा. हि. सावे विद्यालय तारापूरचा हर्षल चाफेकर हा विद्यार्थी ९२.९२ टक्के गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. यापाठोपाठ आनंदाश्रम शाळेचे नील भरत शहा व अंकिता राजन माळी या दोघांनी (९२.७६) समान गुण मिळविले. मनोरच्या रवीप्रताप संतराज यादव या विद्यार्थ्यांने ९२.६० टक्के गुण संपादन केले.

संगमेश्वर पंचायत समितीची आज आमसभा
देवरुख, २६ जून/वार्ताहर
संगमेश्वर पंचायत समितीची आमसभा शनिवार, २७ जून रोजी देवरुखातील पंत जोशी मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता होणार असून, सभेचे अध्यक्षपद आमदार सुभाष बने भूषविणार आहेत. २००८-०९ या वर्षांत तालुकाभरात पंचायत समिती व अन्य शासकीय कार्यालयांमार्फत झालेल्या विकास कामांचा आढावा सभेत होणार आहे. तालुका विकास, लोककल्याणकारी योजना, सार्वजनिक व वैयक्तिक त्रासाच्या अडचणी याबाबत आमसभेपूर्वी गटविकास अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी आपली भूमिका लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शरद कृषी भवनाचे राणे यांच्या हस्ते उद्घाटन
सावंतवाडी, २६ जून/वार्ताहर
सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे शरद कृषी भवनाचे उद्घाटन उद्योग तथा पालकमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. पर्यटनदृष्टय़ा हे भवन उपयुक्त आहे, असे ते म्हणाले. यावेळी राज्याचे अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री अजित पवार, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस आम. गुरुनाथ कुलकर्णी, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संदेश पारकर, वसंत केसरकर, माजी नगराध्यक्ष दीपक केसरकर, शिवाजी कुबल आदी उपस्थित होते. राज्याचे अर्थमंत्री या भवनाला मदत करतील, त्यातही काही कमी पडल्यास मी सहकार्य करीन, असे राणे यांनी सांगितले. या भवनाच्या भूमिपूजनाचा मान जलसंपदा मंत्र्यांनी राणे यांना दिला.