Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

क्रीडा

सेरेना, दिमेंतीएवा, फेडरर यांची आगेकूच
दुहेरीत भूपती विजयी

विम्बल्डन, २६ जून/पीटीआय

द्वितीय मानांकित सेरेना विल्यम्स, चौथी मानांकित एलिना दिमेंतीएवा आणि रॉबिन सॉडर्लिग या मानांकित खेळाडूंनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत आज तिसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. द्वितीय मानांकित खेळाडू रॉजर फेडरर याने पुरुष एकेरीत तिसऱ्या फेरीकडे आगेकूच केली. तर भारताच्या महेश भूपती याने पुरुषांच्या दुहेरीत आपले आव्हान राखले. महिला गटात सातत्यपूर्ण खेळ करणाऱ्या सेरेना हिने रॉबर्टा व्हिन्सी हिची घोडदौड ६-३, ६-४ अशी संपुष्टात आणली. सेरेना हिने बेसलाईनवरून परतीच्या खणखणीत फटक्यांचा उपयोग केला.

पराभवाच्या कटू स्मृती पुसून टाकण्याचा प्रयत्न राहील- धोनी
किंगस्टन, २६ जून, वृत्तसंस्था
दोन वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाच्या कटू स्मृती अजून आमच्या मनात आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धची चार एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकून दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाच्या कटू स्मृती पुसून टाकण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने म्हटले आहे. धोनी म्हणाला की, दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाच्या आठवणी मनातून काढणे अवघड आहे याची मला कल्पना आहे. त्या आठवणी मनात न आणता आम्हाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच सामन्यात भारतीय संघ बांगला देशसारख्या संघाकडून पराभूत झाला.

भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करेल- श्रीनाथ
नवी दिल्ली, २६ जून, वृत्तसंस्था

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चार एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवून ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेत झालेली नामुष्की भरुन काढण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत पुनरागमन करेल, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ याने व्यक्त केले आहे.

अ‍ॅशेसपूर्वी ´पीटरसन फिट
लंडन, २६ जून/ वृत्तसंस्था
अ‍ॅशेस सारखी क्रिकेट जगतातील मानाच्या मालिकेला ८ जुलैपासून सुरूवात होत असून त्यासाठी प्रत्येक क्रिकेटपटू जीवाचे रान करून संघाला जिंकविण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि याला इंग्लंडचा स्फोटक फलंदाज केव्हिन पीटरसनही अपवाद नाही. ट्वेन्टी-२० विश्वचषकादरम्यान दुखापतग्रस्त झालेला पीटरसनने अ‍ॅशेस मालिका खेळण्यासाठी उपचारांवर भर दिला होता आणि त्याचे फळ त्याला मिळाले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अ‍ॅशेस मालिकेत पीटरसनच्या खेळाचा आनंद रसिकांना लूटता येईल. यापूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या अ‍ॅशेस मालिकेत मायकेल वॉनच्या नेतृत्वाखाली यजमानांनी जेतेपद पटकाविले होते आणि यामध्ये पीटरसनचा मोलाचा वाटा होता.

फ्लिन्टॉफ फॉर्मात
लंडन, २६ जून, वृत्तसंस्था

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ अ‍ॅशेस मालिकेपूर्वी फॉर्मात आलेला आहे. इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमधील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत त्याने फक्त ४१ चेंडून ९६ धावांची वादळी खेळी साकारली. २००५ च्या अ‍ॅशेस मालिकेमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रलियाला पराभूत केले होते. यावेळी फलंदाजी आणि गोंलंदाजीमध्ये फ्लिन्टॉफने चमकदार कामगिरी केली होती. त्यावेळी कर्णधार असलेल्या मायकेल वॉनने विजयाचे श्रेय फ्लिन्टॉफला दिले होते.त्यावेळी ऑस्ट्रेलियानेही त्याचा चांगलाच धसका घेतलेला होता. त्यामुळे यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेतही ऑस्ट्रेलियाच्या रडारवर फ्लिन्टॉफ असेल यात शंकाच नाही.

पाकिस्तानच्या वाटय़ाचे सामने अन्य देशात होणार नाहीत
मुंबई, २६ जून / क्री. प्र.

२०११ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे पाकिस्तानच्या वाटय़ाला आलेले सामने अन्यत्र (तटस्थ) ठिकाणी हलविण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पूर्णपणे फेटाळून लावली आहे. पाकिस्तानमध्ये होणारे एकूण १४ सामने भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या सहयजमान देशांमध्ये विभागण्यात येतील असे आयसीसीने लंडन येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यापुढे २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान असणार नाही,

१९ वर्षांखालील विश्वचषकाचे यजमानपद न्यूझीलंडला
लंडन, २६ जून/ पीटीआय

फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकाचे यजमानपद केनियाकडून न्यूझीलंडला देण्याचा निर्णय आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे. केनिया विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठी सज्ज नसल्याचे पाहून आयसीसीने हा निर्णय घेतल्याचे समजते. आठ महिन्यांनी विश्वचषक स्पर्धा होणार असून त्यासंदर्भात केनियामध्ये कोणतीही तयारी आम्हाला दिसलेली नाही. त्यामुळे केनियामध्ये विश्वचषकाचे आयोजन करता येईल असे आम्हाला वाटत नाही. त्यामुळे विश्वचषकाचे आयोजन न्यूझीलंमध्ये करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरून लॉरगट यांनी सांगितले.

टेबल टेनिस : शुभंकर रानडे, देविका भिडे अंतिम फेरीत
पुणे, २६ जून / प्रतिनिधी

जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सब ज्युनियर गटाच्या उपांत्य फेरीत शुभंकर रानडे, रोहन कुलकर्णी , देविका भिडे यांनी आपआपल्या प्रतिस्पध्र्याना नमवित अंतिम फेरी गाठली.
रानडे याने सुरेख खेळ करत वरुण शास्त्री याचा ११-५, ११-२, ११-८, ११-१ असा धुव्वा उडवला. अन्य सामन्यात रोहन कुलकर्णीने अद्वैत ब्रrोवर ११-७, ११-९, ५-११, ११-९, ११-८ असा विजय मिळवला. मुलींच्या सामन्यात देविका भिडे हिने नेहा गोडसे हिला १०-१२, १३-११, ११-३, ११-६,११-५ असे नमविले. दुसऱ्या सामन्यात फौजिया मेहेर अली हिने मानसी पुंजचा ९-११, ११-६, ८-११, ११-७, ११-३, ११-८ असा पराभव केला.

टेबल टेनिस: नेव्हल डॉकयार्ड विजयी
मुंबई, २६ जून/ क्री. प्र.
आंतरकार्यालयीन वार्षिक टेबल टेनिस स्पर्धेच्या उपान्तपूर्व फेरीत नेव्हल डॉकयार्डने न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सचा ३-० असा सहज पराभव करून उपान्त्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात समीर लेलेने एस. जेजारीचा ११-९, १३-११, १२-१० असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात एम. चौधरीने मेस्त्रीवर ११-८, ७-११, ११-४, ११-६ असा विजय संपादन केला. तिसऱ्या सामन्यात कुमारने एम. पुजारीचा ११-६, १२-१०, ११-०९ असा पराभव केला.

सायनासह भारताचेही आव्हान संपुष्टात
मलेशियन ओपन ग्रां.प्रि. बॅडमिंटन
जोहर बाहरू, २६ जून/ पीटीआय

इंडोनेशियन खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्या नंतर मलेशियन ग्रां. प्रि.खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याची भारताच्या दुसऱ्या मानांकित सायना नेहवालची इच्छा मात्र अपुरी राहिली. मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत सायनावर चीनच्या झिंग वॉंगने २६ मिनीटांमध्ये २१-१४, २१-१० असा विजय संपादन केला. सायना पराभूत झाल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. यापूर्वी झालेल्या मिश्र दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीतही भारताच्या पदरी निराशाच आली. भारताच्या अव्वल मानांकित व्ही. दिजू आणि ज्वाला गुट्टाला इंडोनेशियाच्या हेंद्रा गुनवान आणि व्हीटा मारिसा जोडीने ८-२१, २११४, २१-१६ असे पराभूत केले.

पुण्याच्या राहुल आवारेची भारतीय संघात निवड
आशियाई कुस्ती स्पर्धा
हिस्सार, २६ जून/पीटीआय

मनिला (फिलीपाईन्स) येथे ९ ते १२ जुलै दरम्यान होणाऱ्या कनिष्ठ गटाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात पुण्याच्या राहुल आवारे याची निवड झाली आहे. राहुल हा गोकुळ वस्ताद तालमीत रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.भारतीय कुस्ती महासंघाने ही निवड जाहीर केली. भारतीय संघ-फ्रीस्टाईल- ५० किलो- सुरिंदर, ५५ किलो- राहुल आवारे. ६० किलो- राहुल मान, ६६ किलो- अरुणकमार. ७४ किलो-दीपककुमार. ८४ किलो- अनिलकुमार. ९६ किलो- मनसुख खत्री. १२० किलो- जोगिंदर कुमार. ग्रीको रोमन- ५० किलो- मनजित कुमार, ५५ किलो- मनोज, ६० किलो- सुरेश यादव, ६६ किलो-महंमद रफीक होली, ७४ किलो- सिकंदर अंतील, ८४ किलो-राजेश यादव, ९६ किलो- रुपेंदर पुनिया, १२० किलो- राकेश.महिला- ४४ किलो- कविता, ४८ किलो- प्रियांका सिंग, ५१ किलो- अंजू चौधरी, ५५ किलो- गार्गी यादव, ५९ किलो- साक्षी मलिक, ६३ किलो- प्रमिला, ६७ किलो- नवज्योत कौर, ७२ किलो- अनमोलाकुमारी.