Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

अ‍ॅशेसपूर्वी ´पीटरसन फिट
लंडन, २६ जून/ वृत्तसंस्था

 

अ‍ॅशेस सारखी क्रिकेट जगतातील मानाच्या मालिकेला ८ जुलैपासून सुरूवात होत असून त्यासाठी प्रत्येक क्रिकेटपटू जीवाचे रान करून संघाला जिंकविण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि याला इंग्लंडचा स्फोटक फलंदाज केव्हिन पीटरसनही अपवाद नाही. ट्वेन्टी-२० विश्वचषकादरम्यान दुखापतग्रस्त झालेला पीटरसनने अ‍ॅशेस मालिका खेळण्यासाठी उपचारांवर भर दिला होता आणि त्याचे फळ त्याला मिळाले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अ‍ॅशेस मालिकेत पीटरसनच्या खेळाचा आनंद रसिकांना लूटता येईल.
यापूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या अ‍ॅशेस मालिकेत मायकेल वॉनच्या नेतृत्वाखाली यजमानांनी जेतेपद पटकाविले होते आणि यामध्ये पीटरसनचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे पीटरसन फिट नसल्याचे वृत्त पसरताच ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्नने पीटरसनशिवाय इंग्लंड जिंकूच शकत नाही, असे भाष्य केले होते.
काल एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना पीटरसन म्हणाला की, दुखापतीचे प्रमाण गंभीर होते. पण त्यावर मला योग्य ते उपचार देण्यात आले. त्याचबरोबर दुखापत लवकर बरी कशी होईल याकडे मी लक्ष दिले होते. प्रत्येक दिवशी मी फक्त दुखापतीवर लक्ष ठेऊन होतो. गेल्या दोन आठवडय़ांपासून माझ्या दुखापतीमध्ये लक्षणीय सुधारणा पाहायला मिळाली आहे. अ‍ॅशेस मालिकेला अजुन बरेच दिवस असून तो पर्यंत मी पूर्णपणे फिट होईन, असा विश्वास पीटरसनने व्यक्त केला आहे.
आगामी अ‍ॅशेस मालिकेबद्दल पीटरसन म्हणाला की, अ‍ॅशेस ही क्रिकेट जगतातील मानाची मालिका असल्याने खेळ चांगलाच करावा लागेल. पण यावेळी प्रतिस्पर्धी संघाचा बदला घेण्याचा कोणताही विचार माझ्या मनात नाही. मैदानावर उरतल्यावर चांगली कामगिरी करून संघाला जिंकून देण्यासाठी मी प्रयत्नशील असेन. त्याचाबरोबर प्रेक्षकांना खेळाचा जास्तीत जास्त आनंद कसा लूटता येईल यासाठी आमचा संघ प्रयत्नशील असेल. वेस्ट इंडिजविरूद्ध काहि दिवसांपूर्वी झालेल्या कसाटी मालिकेत इंग्लंडने २-० असा सहज विजय नोंदवला होता. त्यामुळे कसोटीमध्ये इंग्लंडचा संघ चांगलाच फॉर्मात आहे आणि त्यामुळेच त्यांचे मनोधैर्य चांगलेच उंचावलेले आहे. याबद्दल पीटरसन म्हणाला की, वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेमुळे संघात उत्साहाचे वातावरण आहे. या मालिकेत फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारला होता. तर गोलंदाजांनीही विकेट्स घेऊन संघाच्या विजयात हातभार लावला होता. तर क्षेत्ररक्षणामध्येही आमची कामगिरी चांगली झाली होती. त्यामुळे तिन्हीही आघाडय़ांवर आमची कामगिरी चांगली झालेली असून त्याचा अ‍ॅशेस मालिकेसाठी नक्कीच फायदा होईल. अ‍ॅशेल मालिकेमध्ये कोणाचे पारडे जड असेल असे विचारल्यावर पीटरसन म्हणाला की, मी फक्त एवढेच सांगेन की यावेळची मालिका चांगलीच रंगतदार ठरेल. ही मालिका कोण जिंकेल किंवा कोण पराभूत होईल याबद्दल मला भाष्य करायचे नाही. पण जो संघ मालिके दरम्यान चांगला खेळ करेल तोच विजयी ठरेल.