Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

पाकिस्तानच्या वाटय़ाचे सामने अन्य देशात होणार नाहीत
मुंबई, २६ जून / क्री. प्र.

 

२०११ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे पाकिस्तानच्या वाटय़ाला आलेले सामने अन्यत्र (तटस्थ) ठिकाणी हलविण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पूर्णपणे फेटाळून लावली आहे. पाकिस्तानमध्ये होणारे एकूण १४ सामने भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या सहयजमान देशांमध्ये विभागण्यात येतील असे आयसीसीने लंडन येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यापुढे २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान असणार नाही, त्यांना तसे संबोधण्यात येणार नसून, लाहोर येथील विश्वचषक स्पर्धेचे प्रशासकीय मुख्यालय हलविण्याच्या निर्णयावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले. आयसीसीच्या विपणन मंडळाला (आयडीआय) सदर निर्णय कळविण्यात आल्याची माहिती आयसीसीचे अधिकारी डेव्हीड मॉर्गन यांनी दिली.
आयडीआयने पाकिस्तानच्या वाटय़ाला आधी आलेले १४ सामने आयोजित करण्यासाठी पाचव्या देशाची निवड करण्याची शक्यताही फेटाळून लावली. याआधी पाकिस्तानसह, भारत, श्रीलंका व बांगलादेश हे चार यजमान देश २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार होते.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाबरोबरच्या कायदेशीर लढाईबाबत, मॉर्गन यांनी सांगितले, की या समस्येवर सामंजस्यपूर्ण मार्ग काढण्यासाठी आयसीसी कठोर प्रयत्न करीत आहे. आयसीसीने पाकिस्तानी क्रिकेट पूर्णपणे अलिप्त राहू नये वेगळे पडू नये यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.