Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करेल- श्रीनाथ
नवी दिल्ली, २६ जून, वृत्तसंस्था

 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चार एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवून ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेत झालेली नामुष्की भरुन काढण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत पुनरागमन करेल, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ याने व्यक्त केले आहे. ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीतही पोहोचू न शकल्याने महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघालाप्रसारमाध्यमांच्या मोठय़ा टीकेला आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेनंतर लगेचच भारतीय संघ वेस्ट इंडिजला रवाना झाला.
श्रीनाथ म्हणाला की,ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेतील पराभवानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला हे एका अर्थाने बरेच झाले. या मालिकेत विजय मिळवून आपल्यावर झालेली टीका धुवून काढण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे.ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेतील पराभवानंतर भारतीय संघावर प्रसारमाध्यमांतून प्रखर टीका झाली.प्रसारमाध्यमांनी भारतीय संघाच्या क्षमतेबाबतच प्रश्र्नचिन्ह उपस्थित केले होते. एवढी टीका करण्याएवढा भारतीय संघ मुळीच वाईट नाही. खरे तर अलीकडच्या काळातील हा सर्वोत्तम भारतीय संघ आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.गेल्या वर्षां दोन वर्षांत या संघाने एकही एकदिवसीय मालिका गमावलेली नाही, असेही तो म्हणाला. ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेत धोनीच्या संघाची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही हे मान्य आहे. पण या पराभवाचा एवढा बाऊ करण्याची मुळीच गरज नाही. या संघातील खेळाडूंची क्षमता निर्विवाद मोठी आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत हा संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही श्रीनाथने व्यक्त केला. त्याने पुढे सांगितले की, इशांत शर्मा याला आपल्या गोलंदाजीतील दोष दूर करण्यासाठी वेस्ट इंडिज दौरा उपयोगी पडेल.झहीर खानच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजीचा भार इशांतलाच वाहावा लागणार आहे.एकदिवसीय सामन्यात फलंदाजाबरोबरच गोलंदाजालाही आपल्या चुका सुधारता येतात. कारण त्याला १० षटके टाकता येतात.
वेस्ट इंडिज संघाला वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्ड्स याची अनुपस्थिती चांगलीच जाणवेल, असेही तो म्हणाला.