Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

सेरेना, दिमेंतीएवा, फेडरर यांची आगेकूच
दुहेरीत भूपती विजयी
विम्बल्डन, २६ जून/पीटीआय

 

द्वितीय मानांकित सेरेना विल्यम्स, चौथी मानांकित एलिना दिमेंतीएवा आणि रॉबिन सॉडर्लिग या मानांकित खेळाडूंनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत आज तिसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. द्वितीय मानांकित खेळाडू रॉजर फेडरर याने पुरुष एकेरीत तिसऱ्या फेरीकडे आगेकूच केली. तर भारताच्या महेश भूपती याने पुरुषांच्या दुहेरीत आपले आव्हान राखले.
महिला गटात सातत्यपूर्ण खेळ करणाऱ्या सेरेना हिने रॉबर्टा व्हिन्सी हिची घोडदौड ६-३, ६-४ अशी संपुष्टात आणली. सेरेना हिने बेसलाईनवरून परतीच्या खणखणीत फटक्यांचा उपयोग केला. दोन्ही सेटमध्ये तिने रॉबर्टाची सव्‍‌र्हिस तोडण्यात यश मिळविले. तिने नेटजवळूनही सुरेख खेळ केला. चौथ्या मानांकित दिमेंतीएवाने रेगिना कुलिकोवा हिचा ६-१, ६-२ असा दणदणीत पराभव केला. तिने क्रॉसकोर्ट फटक्यांचा कल्पकतेने उपयोग केला, तसेच अचूक सव्‍‌र्हिसचाही उपयोग केला. रेगिनास स्वत:च्या सव्‍‌र्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही.
डॅनिएला हांचुकोवा हिनेही अपराजित्व कायम राखले. तिने दुसऱ्या फेरीतील सरळ लढतीत जपानच्या एई सुगियामावर ६४, ६-३ असा विजय मिळविला. तिने परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. पुरुष गटात स्वीडनच्या रॉबिन सॉडर्लिग याने आव्हान राखताना स्पेनच्या निकोलस अ‍ॅल्माग्रो याला चुरशीच्या लढतीत पराभूत केले. त्याने हा सामना ७-६(९-७), ६-४, ६-४ असा जिंकला. फ्रेंच खुल्या स्पर्धेत अनेक बलाढय़ खेळाडूंना गारद करणाऱ्या सॉडर्लिग याने फोरहँडच्या खणखणीत फटक्यांचा अप्रतिम खेळ केला. दुहेरीत भारताच्या महेश भूपती याने अपराजित्व राखले. त्याने बहामाचा खेळाडू मार्क नोवेल्स याच्या साथीत फिलीप पेट्झश्नेर (जर्मनी) व अ‍ॅलेक्झांडर पेया (ऑस्ट्रिया) यांचा पराभव केला. अटीतटीने झालेला हा सामना त्यांनी ६३, ७-५, ६-७, ६-३ असा जिंकला. द्वितीय मानांकित खेळाडू रॉजर फेडरर याने पुरुष एकेरीत तिसऱ्या फेरीकडे आगेकूच केली. त्याने जर्मनीच्या फिलीप कोहेलश्रेबर याचे आव्हान संपुष्टात आणले. त्याने हा सामना ६-३, ६-२, ६-७, ६-१ असा जिंकला.
तिसऱ्या सेटमध्ये सुरुवातीच्या पिछाडीवरून फिलीपने फेडररची सव्‍‌र्हिस छेदून हा सेट टायब्रेकपर्यंत नेला. हा सेटही त्याने घेत सामन्यात काहीशी उत्सुकता निर्माण केली होती.तथापि चौथ्या सेटमध्ये फेडरर याने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवले. त्याने दोन वेळा प्रतिस्पध्र्याची सव्‍‌र्हिस छेदली व हा सेट सहज घेत सामना जिंकला.