Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

पराभवाच्या कटू स्मृती पुसून टाकण्याचा प्रयत्न राहील- धोनी
किंगस्टन, २६ जून, वृत्तसंस्था

 

दोन वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाच्या कटू स्मृती अजून आमच्या मनात आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धची चार एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकून दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाच्या कटू स्मृती पुसून टाकण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने म्हटले आहे. धोनी म्हणाला की, दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाच्या आठवणी मनातून काढणे अवघड आहे याची मला कल्पना आहे. त्या आठवणी मनात न आणता आम्हाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच सामन्यात भारतीय संघ बांगला देशसारख्या संघाकडून पराभूत झाला. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला श्रीलंकेविरुद्ध विजय मिळविणे आवश्यक होते. मात्र राहुल द्रविडच्या नेतृत्तवाखालील संघाला तेही जमले नाही. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत उपविजेता असलेला भारतीय संघ २००७ च्या स्पर्धेत प्राथमिक फेरीतच गारद झाला. या पराभवाच्या वर्षभर अगोदर २००६ मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यात भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत ४-१ असा पराभव वाटणीला आला होता. सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेले अनेक खेळाडू या दोनही दौऱ्यात खेळले होते. आता भारतीय संघ इंग्लंडमध्ये झालेल्या ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेत पराभव पत्करुन विंडीज दौऱ्यावर आला आहे.
ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेत खेळलेले काही भारतीय खेळाडू पूर्ण फिट नव्हते, असा अहवाल भारतीय संघाच्या फिजिओंनी दिला होता. या घडामोडींमुळे भारतीय संघ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. धोनी म्हणाला की, आपल्या संघातील प्रमुख खेळाडूंना दुखापत होऊ नये असेच प्रत्येक कर्णधाराला वाटत असते. प्रमुख खेळाडू दुर्दैवाने दुखापतग्रस्त झाल्यास दुसऱ्या फळीतील खेळाडूंना संधी मिळते. भारतात अनेक गुणवान खेळाडू आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर तुमच्याकडे नुसती गुणवत्ता असून चालत नाही. या पातळीवर येणारे दडपण आणि वेगवेगळ्या परिस्थितीला तुम्ही कसे तोंड देता यावर तुमचे यश अवलंबून असते. मला या दौऱ्यात नव्या दमाच्या खेळाडूंना आजमावण्याची संधी मिळणार आहे, असेही धोनी म्हणाला.
आमचा संघ दमलाय- गेल
गेल्या काही महिन्यांत सतत खेळल्यामुळे आमचे खेळाडू दमले आहेत, अशी कबुली वेस्ट इंडिजचा कर्णधार ख्रिस गेल व व्यवस्थापक जॉन डायसन यांनी दिली आहे. डायसन यांनी सांगितले की, गेले काही महिने आमचा संघ सतत खेळत आहे. एकापाठोपाठच्या मालिका आणि स्पर्धा खेळत असताना आमच्या संघाला आवश्यक असणारी विश्रांती मिळालीच नाही. भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका संपली की बांगला देश दौरा, चॅम्पियन चषक त्यानंतर वर्षअखेरीस ऑस्ट्रेलिया दौरा असा आमचा कार्यक्रम आहे. कर्णधार गेल याने खेळाडू दमले असल्याच्या डायसन यांच्या मताशी सहमती दर्शविली. दमलो असलो तरी आम्ही चांगली कामगिरी कण्यास सक्षम आहोत, अशी पुस्ती त्याने जोडली.गेल म्हणाला की, पाठोपाठच्या दौऱ्यांमुळे आम्हाला थकवा आला आहे. मात्र भारताविरुद्धच्या मालिकेत आम्ही पूर्ण क्षमतेने उतरणार आहोत. सेहवाग, झहीर खान यासारखे खेळाडू या संघात नसले तरी या संघाला हलके लेखण्याची चूक आम्ही कदापिही करणार नाही. कारण भारतीय संघ हा नेहमीच तगडा प्रतिस्पर्धी असतो. या संघाविरुद्ध चांगली कामगिरी करणे हे मोठे आव्हानच असते.