Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पावसाळ्यात गाडी चालवताना सांभाळून..
ठाणे/प्रतिनिधी- थंड हवा, ढगाळ आकाश, धुक्याचे डोंगर आणि मातीचा सुगंध या साऱ्यांबरोबर

 

पहिल्या पावसाचा आनंद द्विगुणीत होतो. मात्र अशा वातावरणात गाडी चालवताना थोडे हळू जा, असा सल्ला वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
पावसाळ्याचे तीन महिने हे रस्त्यावरील अपघातात वाढ होणारे आहेत. जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात अपघातात वाढ होते. मागील वर्षी २००८ साली या तीन महिन्यात तब्बल एक हजार ९४५ अपघातांची नोंद झाली होती. या अपघातांपैकी ८१ अपघातात अपघातग्रस्ताचा मृत्यू झाला तर, १५९ अपघातांत व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. मागील वर्षीच्या अपघातात पावसाळ्याच्या तीन महिन्यात ३४६ जणांचा अपघाती मृत्यू झाला, तर एक हजार ४८१ जण जखमी झाले.
गतवर्षीची आकडेवारी तपासली असता जून २००८ मध्ये १६५ अपघातांची नोंद झाली त्यात १७२ जण मृत /जखमी झाले. जुलै २००८ मध्ये १६३ अपघात झाले, त्यात १३५ जण मृत वा जखमी झाले, तर ऑगस्ट महिन्यात झालेल्या १२३ अपघातांमध्ये ११२ मृत वा जखमी झाले.
नाशिक महामार्ग, अहमदाबाद हायवे, मुंब्रा-पनवेल महामार्ग, शीळ फाटा-डोंबिवली रस्ता, घोडबंदर रोड असे मोठे महामार्ग शहरातून जात असल्याने पावसाळ्यात या रस्त्यांवरून वाहने चालवताना खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. वाहनांचे ब्रेक, चाकांमधील हवा तसेच ब्रेक लायनर्स तपासून घेणे, गाडीला वायपर बसवून घेणे, गाडीचे हेडलाईट, ब्रेक लाईट, टेल लाईट तपासून घेणे, शक्य असल्यास फॉग लाईटस् गाडीला बसवून घेणे, गाडय़ांचा वेग ४० किमी पेक्षा जास्त ठेवू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे, अचानक ब्रेक लावल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी दोन गाडय़ांमध्ये नेहमीपेक्षा जास्त सुरक्षित अंतर ठेवणे, रस्त्यावर पाणी साचले असल्यास त्यातून गाडी चालवावी लागल्यास शक्यतो पहिल्या आणि आवश्यकता भासली तर दुसऱ्या गीअरवर गाडी चालवावी, गाडी पाण्यातून जात असताना गीअर बदलू नये, अॅक्सिलेटरवर गाडी चालवावी.