Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पु. भा. भावेंचे स्मारक तीर्थक्षेत्र झाले पाहिजे - शं. ना. नवरे
डोंबिवली/प्रतिनिधी - पु. भा. भावे यांचे डोंबिवलीतील स्मारक म्हणजे तीर्थक्षेत्र झाले पाहिजे.

 

कोणीही पाहुणा डोंबिवलीत आला तरी त्याची भावेंचे स्मारक पाहण्याची इच्छा झाली पाहिजे, अशा देखण्या पद्धतीने ही वास्तू उभारण्याची गरज आहे, असे प्रसिद्ध साहित्यिक शं. ना. नवरे यांनी गुरुवारी येथे एका बैठकीत सांगितले.
‘लोकसत्ता’ने पु. भा. भावे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डोंबिवलीतील भावेंची वास्तू सुशोभित करावी, तेथील अडगळ बाहेर काढावी म्हणून गेल्या दहा दिवसापासून मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची दखल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी व शहरातील इतर साहित्यिक, सामाजिक संस्थांनी घेतली आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेच्या डोंबिवली कार्यालयात भावेंच्या वास्तूविषयी विचारविनिमय करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी प्रसिद्ध साहित्यिक शं. ना. नवरे, ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब पटवारी, ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर, महापौर रमेश जाधव, आयुक्त गोविंद राठोड, काव्य रसिक मंडळाच्या प्रश्नची गडकरी, डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे सुधीर बडे, सोमण, चौधरी, अच्युत कोऱ्हाळकर, प्रतिमा फिल्मचे डॉ. सुनील पुणतांबेकर, सभापती वामन म्हात्रे, सदानंद थरवळ, शरद गंभीरराव, अभियंता अशोक बैले, प्रभाग अधिकारी डी. पी. कांबळे उपस्थित होते.
शं. ना. नवरे म्हणाले, भावेंच्या महात्मा गांधी रोडवरील वास्तूविषयी पेपरमध्ये (लोकसत्ता)सारखे वाचतोय म्हणून मी या वास्तूला भेट देऊन आलोय, तर तेथे बाहेरची घाण दिसू नये म्हणून गोणपाटं टांगलेली आहेत. एकूणच त्या वास्तूची पडझड पाहिली तर ती भावेंची वास्तू म्हणून मन मानायला तयार होत नाही. अगदीच सरकारी ढाच्याची इमारत म्हणून हा सांगडा उभा करून ठेवण्यात आला आहे. भावे हे डोंबिवलीचे वैभव होते, त्यांच्या नावाची शहरातील वास्तू पण त्यांच्यासारखीच देखणी, आकर्षक होणे आवश्यक आहे.
त्यांच्या चालू असलेल्या जन्मशताब्दी वर्षात ही वास्तू चांगल्या पद्धतीने उभी केली तर त्याला अधिक महत्त्व असणार आहे. ही इमारत आता अशा देखण्या पद्धतीने सजविली पाहिजे की या इमारतीचा ‘नायक’ कोण, हे इमारतीवरून कळले पाहिजे. या इमारतीची डागडुजी झाल्यानंतर या वास्तूत भावेंचे समग्र साहित्य, त्यांचे पुरस्कार, छायाचित्र, त्यांच्या घरातील काही दुर्मिळ वस्तू येथे ठेवता येतील का, म्हणून त्यांच्या कुटुंबियांबरोबर चर्चा करून निर्णय घेता येईल. काहीतरी बांधायचे आहे म्हणून ठोकळा छाप पद्धतीने या इमारतीची डागडुजी होऊ नये. ते भावेंचे स्मारक वाटले पाहिजे आणि तीर्थक्षेत्र म्हणून नागरिकांनी त्याला भेटी दिल्या पाहिजेत, असे शन्ना म्हणाले.
सुधीर जोगळेकर म्हणाले, विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीमधील डोंबिवली ग्रंथसंग्रहालय भावेंच्या वास्तूत पहिल्या माळ्यावर स्थलांतरित करावे, म्हणजे ग्रंथसंग्रहालयाला आपल्या कार्यक्रमांसाठी या वास्तूमधील सभागृहाचाही वापर करता येईल. इतर
साहित्यिक संस्थांचे कार्यक्रम या वास्तूत होतील. भावेंचे समग्र साहित्य, त्यांचे पुरस्कार, छायाचित्र या इमारतीत ठेवले व याच वास्तूत तळमजल्याला भावेंचे एक स्मारक बांधले तर, या वास्तूचे साहित्यिक मूल्य वाढणार आहे. या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. या वास्तूतील तलाठी कार्यालय तातडीने हलविणे गरजेचे आहे.
आबासाहेब पटवारी म्हणाले, भावेंची वास्तू शहराचे भूषण झाले पाहिजे, अशा पद्धतीने उभारणे आवश्यक आहे. महाराष्ट्रभर भावेप्रेमी आहेत. त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेता येईल याचाही विचार करू. जिल्हाधिकारी जर या इमारतीवर आता आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी शासनाने कोणताही निधी दिलेला नाही. फक्त नगरपालिकेच्या राजवटीत सर्व शासकीय भूखंड पालिकेकडे वर्ग झाले आहेत. ही जागा तलाठी कार्यालयाला कायमस्वरूपी देण्याचा कोणताही ठराव झालेला नाही. या वास्तूचे काम दिवाळीपयर्ंत पूर्ण झाले तर उत्तम, असे ते म्हणाले.
सदानंद थरवळ यांनी शहरातील ज्येष्ठ नागरिकांची समिती या बांधकामावर पूर्ण नियंत्रण ठेवील असे सांगितले. वामन म्हात्रे यांनी, राजीव तायशेटे या वास्तूचे आराखडे फुकट व तळमळीने करून देतील. या वास्तूच्या डागडुजीसाठी व जन्मशताब्दी वर्ष साजरी करण्यासाठी जो निधी लागेल तो पालिका कमी पडू देणार नाही, असे सांगितले. महापौर जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले. आयुक्तांनी सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.