Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

पावसाळ्यात गाडी चालवताना सांभाळून..
ठाणे/प्रतिनिधी- थंड हवा, ढगाळ आकाश, धुक्याचे डोंगर आणि मातीचा सुगंध या साऱ्यांबरोबर पहिल्या पावसाचा आनंद द्विगुणीत होतो. मात्र अशा वातावरणात गाडी चालवताना थोडे हळू जा, असा सल्ला वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

पु. भा. भावेंचे स्मारक तीर्थक्षेत्र झाले पाहिजे - शं. ना. नवरे
डोंबिवली/प्रतिनिधी - पु. भा. भावे यांचे डोंबिवलीतील स्मारक म्हणजे तीर्थक्षेत्र झाले पाहिजे. कोणीही पाहुणा डोंबिवलीत आला तरी त्याची भावेंचे स्मारक पाहण्याची इच्छा झाली पाहिजे, अशा देखण्या पद्धतीने ही वास्तू उभारण्याची गरज आहे, असे प्रसिद्ध साहित्यिक शं. ना. नवरे यांनी गुरुवारी येथे एका बैठकीत सांगितले.

ठेकेदारांना मालमत्ता देताना अटीशर्तीमध्ये विसंगती; लेखा परीक्षकांचे ताशेरे
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाने पालिकेच्या कल्याणमधील संत सावळा भाजी मंडई व डोंबिवलीतील उर्सेकरवाडीतील भाजीमंडईच्या जागा ठेकेदारांना भाडय़ाने देताना अटीशर्तीमध्ये परस्पर विसंगत अटी टाकल्या आहेत व या अटी निविदेमध्ये दिसून येत नाहीत, असे ताशेरे पालिकेच्या लेखा परीक्षकांनी जानेवारी २००८ च्या अहवालात मारले आहेत.

सनदी लेखापालांच्या संस्थेचा आज हीरक महोत्सव
ठाणे/प्रतिनिधी - इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागीय मंडळाच्या ठाणे शाखेतर्फे इन्स्टिटय़ूटचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे केले जात असून यानिमित्ताने शनिवार, २७ जून रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय समितीच्या सदस्या भावना दोषी या अध्यक्षस्थान भूषविणार असून, विभागीय मंडळाचे अध्यक्ष जैन हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

दहावीच्या परीक्षेत विनायक कडू व केदार पाटील शहापूर तालुक्यात प्रथम!
शहापूर/वार्ताहर - दहावीच्या परीक्षेत वासिंदच्या जी. के. गुरुकुल विद्यालयाचा विनायक रमेश कडू व शहापूरच्या जनकल्याण विद्यालयाचा केदार नरेश पाटील या दोघांनी प्रत्येकी ९२.६१ टक्के गुण मिळवून शहापूर तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तालुक्यातून परीक्षेस बसलेल्या तीन हजार ५९३ विद्यार्थ्यांपैकी दोन हजार ६९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा ७४.९० टक्के निकाल लागला आहे. तालुक्यात द्वितीय येण्याचा मान खाडे विद्यालयाचा ओमप्रकाश शिर्के याने ९२.३० टक्के गुण प्रश्नप्त करून मिळविला आहे. वासिंदच्या सरस्वती विद्यालयाची स्नेहल सीताराम चासकर हिने ९२.१५ टक्के गुण मिळवून तालुक्यात तिसरी आली आहे.

वाडा तालुक्यात अश्विनी डवलेकर सर्वप्रथम
वाडा/वार्ताहर - मार्च २००९ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाची अश्विनी दीपक डवलेकर ही विद्यार्थिनी ९२.१५ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली. नॅशनल इंग्लिश स्कूल चिंचघरची नीलम सिंग ९२ टक्के गुण मिळवून दुसरी, तर प्रणाली उल्हास भानुशाली ही विद्यार्थिनी तिसरी आली. तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा नांदणी गायगोठा या एकमेव शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. शालांत परीक्षेस वाडा तालुक्यातील ३१ माध्यमिक शाळांमधून २२१९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यामध्ये १४७२ विद्यार्थी पास झाले.

बाल विद्यामंदिर शाळेचा ९१ टक्के निकाल
ठाणे/ प्रतिनिधी

येथील आदर्श विकास मंडळ संचालित बाल विद्यामंदिर शाळेचा दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के निकाल लागला. वागळे इस्टेट परिसरात गेली २५ वर्षे ही शाळा कार्यरत आहे. मयुरा माणिकराव गायकवाड या विद्यार्थिनीने ९४.१५ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला. शाम दिलीप भोर या विद्यार्थ्यांने ९४ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला. शाळेतील आठ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मि़ळाले आहेत. ६६ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. मोरे यांच्या हस्ते शाळेतून पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापिका विमल गोळे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

शहापुरात बंदुकीच्या हजारो बेवारस पुंगळ्या
शहापूर/वार्ताहर

शहापूरपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरोली गावजवळ एका मोरीलगत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बंदुकीच्या हजारो पुंगळ्या मिळाल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली.
शहापूर पोलिसांना आलेल्या एका निनावी दूरध्वनीद्वारे वनश्री रोडवरील एका मोरीलगत प्लास्टिकच्या पिशवीत बंदुकीच्या पुंगळ्या असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी तातडीने धाव घेतली असता त्या पिशवीत एके ४७ च्या ६५ निकामी राऊंड, इतर प्रकारच्या ६२० पुंगळ्या, तसेच ४५ निकामी राऊंड अशा एकूण १७१० पुंगळ्या दबलेल्या अवस्थेत आढळल्या. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शिगवण, कॉन्स्टेबल गोरे, देसले, कांबळे अधिक तपास करीत आहेत. आठ वर्षांपूर्वी माहुली किल्ल्यावर अतिरेक्यांचे गोळीबाराचे प्रशिक्षण केंद्र असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. भिवंडी तालुक्यातील बोरिवली येथील साकीब नाचण याचा त्या केंद्राशी संबंध होता, अशी चर्चा होती आणि माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी हजारो निकामी पुंगळ्या आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

वर्तकनगर शाळेचा ९५ टक्के निकाल
ठाणे/ प्रतिनिधी

ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या येथील वर्तकनगर माध्यमिक विद्यालयाचा यंदा दहावीत ९५.९६ टक्के निकाल लागला. रोहिणी कल्याण धावारे ही विद्यार्थिनी ९३.५३ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली. शुभदा विलास प्रसादे आणि मोनिका दुंदू भोईर ९३.०७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर सपना रमेश परदेशी ९२.७६ टक्के गुण मिळवून शाळेत तिसरी आली. ६० विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी तर ८५ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मि़ळाली आहे. शाळेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.