Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

कापूस गाठी भरलेला ट्रक पेटला
चिखली, २६ जून / वार्ताहर

वेल्डिंगचे काम करताना ट्रकमधील कापूस गाठीवर ठिणगी पडताच संपूर्ण ट्रकने पेट घेतला. आग विझवणे शक्य न झाल्याने अग्निशामक दलाचे बंब येईपर्यंत लक्षावधी रुपयांच्या गाठी व ट्रक जळून खाक झाला. गुरुवारी रात्री नऊ वाजेदरम्यान शहराजवळील भागातच हा अपघात झाला असला तरी सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. येथील औद्योगिक परिसरातील जिनिंग व प्रेसिंगमध्ये तयार झालेल्या कापसाच्या शंभर गाठी ट्रकने राजकोट (गुजरात) येथे विक्रीसाठी पाठवण्यात येतात. ट्रकच्या एका भागावर वेल्डिंग करून पुढील प्रवासाला निघण्यासाठी ट्रकचालक कमाल खान याने खामगाव नाक्याजवळील वेल्डिंग केंद्रासमोर ट्रक उभा केला. वेल्डिंग सुरू असताना एक ठिणगी उडून कापूस गाठीवर पडल्याने कापसाने पेट घेतला. कुणाच्या लक्षात येण्यापूर्वी आगीने रौद्ररूप धारण केले. उपस्थित नागरिकांचे आग विझवण्याचे सर्व प्रयत्न वाया गेले. नगरपालिकेच्या टँकरने आग विझवण्यात आली. तोपर्यंत लक्षावधी रुपये किमतीच्या गाठी मात्र जळून खाक झाल्या होत्या.

२१७५ कोटींच्या विकास कामांचा झंझावात
सुरेश बोरकर

पाच वर्षात २१७५ कोटींची कामे, अनेक योजनांचा निपटारा, शेतक ऱ्यांना पूरक ठरणाऱ्या उपसा सिंचनाचे दूरदष्टीने नियोजन, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न, बेरोजगारांना काम आणि मतदारसंघातील प्रत्येक घराच्या मदतीला धावून येणारा निष्पक्ष लोकप्रतिनिधी.. अजातशत्रू नेत्याची सारी लक्षणे ठासून भरलेल्या आमदार राजेंद्र मुळक यांच्या पहिल्याच टर्ममधील लोकोपयोगी कामांची ही न संपणारी यादी..

पालिकांतील भाजप-काँग्रेस युतीने राजकीय वादळ
पालिकांतील भाजप-काँग्रेस युतीने जिल्हय़ाच्या राजकारणात मोठे वादळ उठले आहे. जे सोनिया गांधी व लालकृष्ण अडवाणींना जमले नाही ते येथील राजकीय नेत्यांनी करून दाखवले, अशी टीका या युतीवरून सुरू झाली आहे. याचे पडसाद दोन्ही पक्षात अगदी खोलवर उमटले आहेत. येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका असल्याने या युतीचा परिणाम मतदारांवर पडू नये म्हणून सध्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी धडपड चालवली आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे अतिक्रमणे हटवली
बुलढाणा, २६ जून / प्रतिनिधी
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या १७ जुलैच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. नगरपालिका प्रशासन अतिक्रमण तोडेल या भीतीने टपरीधारक स्वयंस्फूर्तीने आपल्या टपऱ्या हटवीत आहेत. तर न्यायालयाच्या परिसराची साफसफाई करण्यात येत आहे. जिल्हा न्यायालयाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्दी सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

चंद्रपुरात बचत गट महिलांचा मेळावा
चंद्रपूर, २६ जून / प्रतिनिधी

स्त्री ही समाजाची रक्तवाहिनी आहे. स्त्रीशिवाय पुरुषाला अर्थ नसतो आणि सुजाण स्त्रीमुळे समाजात आदर्श व्यक्ती निर्माण झाल्यात. त्यामुळे स्त्रियांनी न्युनगंडाची भावना कमी करून समीकरणासाठी लढा उभारण्याचे आवाहन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे केले.

प्रश्नथमिक शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश
गोंदिया, २६ जून / वार्ताहर

जिल्हा परिषद प्रश्नथमिक शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश पंचायत समित्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे वेतन केव्हा लागू होतो ही प्रतीक्षा संपली आहे. जून महिन्यातच वेतन लागू होणार, असे स्पष्ट झाले आहे.

फुटपाथ दुकानदारांच्या समस्या सोडवण्याची मागणी
भंडारा, २६ जून / वार्ताहर

फेरीवाले, फुटपाथ दुकानदार यांना उदरनिर्वाहासाठी त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. फुटपाथ दुकानदार, फेरीवाले, रिक्षेवाले यांच्यासाठी शासनाने टास्कफोर्सने व सुप्रिम कोर्टाने काही धोरण निश्चित केले आहेत. भाकपने या आशयाचे निवेदन नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या निवेदनात फुटपाथ, दुकानदार, फेरीवाले, रिक्षेवाले या व्यावसायिकांची नोंद करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे, फेरीवाल्यांना हटवण्याऐवजी नगर रचनेसंबंधीच्या कायद्यात दुरुस्त्या करून या व्यावसायिकांना पेन्शन, विमा इत्यादी सामाजिक सुरक्षा देण्यात याव्या व सुलभ व्याजदराने कर्ज मिळावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
खत विक्री थांबवली
चिखली, २६ जून / वार्ताहर

डीएपी या रासायनिक खताची जादा दराने बेकायदेशीर विक्री करण्याच्या आरोपाखाली विनायका सीड्सची तपासणी करून खताची विक्री कृषी विभागाने थांबवली आहे. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते हसन देशमुख हे या प्रतिष्ठानाचे संचालक आहेत. विनायका सीड्स येथे डीएपी खताची जादा दराने विक्री होत असल्याची तक्रार पी.पी. इंगळे यांनी केली होती. ४८५ रुपये किंमत असलेल्या या खताची थैली ५३० रुपयांत विकत असल्याच्या तक्रारीवरून कृषी विभागाने तपासणी करून डीएपीची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. शेतकरी संघटनेच्या नेत्याच्या प्रतिष्ठानात बेकायदेशीर खत विक्रीच्या आरोपावरून केलेली कारवाई शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

पवनीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व
भंडारा, २६ जून / वार्ताहर

पवनी पालिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी सदस्य बिनविरोध निवडून आले.
अध्यक्षपदी सुनंदा पेंदाम तर उपाध्यक्षपदी भास्कर भाजीपाले यांची बिनविरोध निवड झाली. अनुसूचित जमाती महिला वर्गाकरिता अध्यक्षपद आरक्षित असल्याने सुनंदा पेंदाम यांची निवड झाली. काँग्रेसचे धर्मेद्र नंदरधने यांनी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादीचे भास्कर भाजीपाले उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले.

कारंजा-नागरा बससेवा सुरू
गोंदिया, २६ जून / वार्ताहर

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे कारंजा नागरा बसफेरीचा शुभारंभ कारंजा येथे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. आमदार अग्रवाल यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या बसफेरीमुळे शिवमंदिर येथे जाणाऱ्या-येणाऱ्या भाविकांना सोयीचे होणार आहे. यावेळी आगार प्रमुख ठाकरे, बोदले, रवी ठाकूर, पृथ्वीपालसिंह गुलाटी, नगरपालिका अध्यक्ष माया जायस्वाल, माजी अध्यक्ष रजनी नागपुरे, विराजवंती नागपुरे, गोपाल एच. अग्रवाल, व्यंकट पाथरू, शकील मंसूरी, सन्नी शेंद्रे, राकेश ठाकूर, मनीष गुप्ता, संदीप ठाकूर, प्रकाश रहमतकर, अशोक लिचडे, चमन बिसेन, राजेश नागरीकर आदी उपस्थित होते.ही बस कारंजा आयटीआय, फूलचुरपेठ, ग्रामपंचायत, आशीर्वाद कॉलनी, फूलचुर नाका, निर्मल टॉकीज, जयस्तंभ चौक, नेहरू चौक, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, बसस्थानक, गांधी राईस मिल,कटंगी, मार्गे नागरापर्यंत धावत आहे.

‘प्रबोधन’ची स्वाती अव्वल
दर्यापूर, २६ जून / वार्ताहर

प्रबोधन विद्यालयाची स्वाती दिगांबर जामनिक ही विद्यार्थिनी मागास वर्गात विदर्भातून प्रथम तर अमरावती विभागात तिसरी आली आहे. तिला ९६.४६ टक्के गुण आहेत. ती आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक मावंदे, डोले, विनायक तायडे यांना देते. आई-वडिलांचे मार्गदर्शन व अभ्यासात घेतलेली मेहनत आपले मुख्य यशाचे गमक आहे, असे ती म्हणाली. तिने १२वी नंतर अभियांत्रिकीकडे जाण्याचा मनोदय व्यक्त केला. आई कमलाताई रामचंद्र जामनिक व दिगांबर जामनिक वडील हे दोघेही शिक्षक आहेत.

दत्ता लोनसुने यांना कृषिभूषण पुरस्कार
वाशीम, २६ जून / वार्ताहर

येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता कोंडजी लोनसुने यांना शासनाचा यावर्षीचा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार घोषित झाला आहे. येत्या १ जुलैला नागपूर येथे राज्यपालांच्या हस्ते दत्ता लोनसुने यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वाशीम येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता लोनसुने यांनी आपल्या २० एकर शेतामध्ये आंबा, अंजीर, आवळा, सीताफळ, करवंद आदी फळबाग तयार करून विदर्भातील आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या शेतकऱ्यांना फळबाग शेतीतून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग दाखवला. शासनाच्या, कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन येथील लोनसुने परिवाराने फळबाग शेतीमध्ये विक्रमी उत्पादन काढण्याचा बहुमान पटकावला आहे. राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वत: लोनसुने यांच्या फळबागेची पाहणी करून लोनसुने यांचा गौरवही केला.

दुचाकी अपघातात एक ठार
भंडारा, २६ जून / वार्ताहर

भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीने वैनगंगा नदी पुलाजवळील कठडय़ाला जबर धडक दिली. अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा जबर जखमी झाला. वीरेंद्र रामटेके आणि राजू भोयर हे दोघे दुचाकीने सालेबर्डीकडे जात असताना वैनगंगा नदीच्या पुलावर त्यांच्या दुचाकी (क्र. एम.एच.४० डी.८८२) वरून त्यांचे संतुलन सुटले. ही दुचाकी लोखंडी कठडय़ावर आदळली. यात वीरेंद्र रामटेके यांचा मृत्यू झाला तर राजू भोयर जखमी आहे.

रोजगार हमीत गैरव्यवहार ग्रामसेवक व अभियंत्यावर कारवाई
भंडारा, २६ जून / वार्ताहर

रोजगार हमी योजनेच्या दोन बोगस कामांच्या प्रकरणात ग्रामसेवक व तांत्रिक पॅनलवरील काम करणाऱ्या अभियंत्यावर कारवाई करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र पोयाम यांच्यावर अविश्वास प्रस्ताव सदस्यांनी आणला होता. लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा आणि दैतमांगली येथील पांदण रस्त्याच्या खर्चाला मंजुरी देण्याच्या विषयावरून अविश्वास प्रस्ताव घेण्यात आला, ती कामे तपासणीसाठी पाठविल्याने सदस्यांच्या म्हणण्यानुसार खर्चाला मंजुरी देणे शक्य नव्हते, असे पोयाम यांनी सांगितले. ही दोन्ही कामे बोगस असल्याचे निष्पन्न होऊन या संदर्भात सुनावणी घेण्यात आल्याचे पोयाम यांनी सांगितले. या दोन्ही कामावर प्रत्येकी अडीच लाख रुपये खर्च सांगितला असताना प्रत्यक्षात ४५ हजार रुपये खर्च झाल्याचे निदर्शनास आले. सुनावणी दरम्यान ग्रामसेवक बडवाईक यांना निलंबित करण्यात आले तर तांत्रिक पॅनलवरील काम करणारे तांत्रिक अभियंता शेंडे यांना कामावरून कमी करण्यात आल्याचे पोयाम यांनी सांगितले.

कर्जफेडीची मुदत वाढवून देण्याची मागणी
यवतमाळ, २६ जून / वार्ताहर

‘कर्जमाफी’ योजनेस पात्र असलेल्या लाभार्थीसाठी असलेली कर्ज भरण्याची मुदत ३० जून ही वाढवून ३१ ऑगस्टपर्यंत करावी, अशी मागणी होत आहे. केंद्र सरकारने अडीच हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना २० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे २० हजार रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे त्यांनी जास्तीचे कर्ज ३० जूनपूर्वी भरावे म्हणजे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी सध्या योजना आहे. या योजनेचा लाभ ५० टक्के शेतकऱ्यांनीही घेतला नाही. तो मिळावा म्हणून कर्जफेडीची मुदत ३० जून ऐवजी ३१ ऑगस्ट करावी, अशी मागणी आहे.

१३ गावांकरिता दोन वीज कर्मचारी
भंडारा, २६ जून / वार्ताहर

वीज वितरण कंपनीने पहेला मंडळातील सावरगाव, इटगाव, वडद, पागोरा, निमगाव, जामगाव, मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, पहेला, वाकेश्वर इ. १३ गावांकरिता एक सहायक लाईनमन व एक मदतनीस ठेवला असून कामे न झाल्यामुळे विद्युत ग्राहक त्रस्त आहेत. लोकांच्या तक्रारीनुसार सहायक लाईनमन कधीच दुरुस्तीकरिता खांबावर चढत नाही. कार्यालयीन कामे तो सांभाळतो. मदतनिसाला बिघाड दुरुस्तीकरिता धावून जावे लागते. या १३ गावात पिठाच्या ६ गिरण्या, ८ राईस मिल, १ आरामशीन, ११५ वॉटरपंप असून १३ गावात बहुतेक घरोघरी वीज कनेक्शन आहे. कामाचे ओझे लक्षात घेता या ठिकाणी पाच कर्मचाऱ्यांची जागा मंजूर आहे. परंतु, कृतीशील एकच कर्मचारी असल्यामुळे बिघाड दुरुस्तीकरिता विद्युत ग्राहकांना ८-८ दिवस वाट बघावी लागते. रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी लोकांची मागणी आहे.

वादातून चौघांनी तरुणाला विहिरीत टाकले
खामगाव, २६ जून / वार्ताहर

जयपूर लांडे येथील विवाहितेच्या अपहरणप्रकरणी दोन गटातील वादाचे प्रकरण आता चांगलेच पेटले आहे. या वादातून एका तरुणास चौघांनी विहिरीत टाकले. याबाबतची पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याने या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. जयपूर लांडे येथील एका विवाहितेस पुणे येथे पळवून नेण्यात आले. याप्रकरणी मध्यंतरी परस्परांविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या. संतापाच्या भरात चौघांनी नितेश दुर्योधन तायडे (२५) याला विहिरीत ढकलले. याप्रकरणी नितेशचे मोठे वडील जानकीराम पुंजाजी तायडे यांनी रात्री शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संजय हर्षे यांना बिरसा मुंडा पुरस्कार
ब्रह्मपुरी, २६ जून / वार्ताहर

विठोबाजी आमले आदिवासी शिक्षण संस्थेतील प्रश्न. डॉ. संजय प्रभाकरराव हर्षे यांना २००९ चा क्रांतिवीर बिरसा मुंडा समता पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. समता साहित्य अकादमीच्या वतीने बहाल करण्यात आला. प्रश्न. डॉ. हर्षे हे मागील २४ वर्षापासून आदिवासी संस्थेत असून शैक्षणिक, साहित्यिक व समाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. या पुरस्कार वितरण सोहोळ्याच्या अध्यक्षस्थानी रतनलाल सोनाग्रा होते. प्रमुख पाहुणे म्हणून मेघा पाटकर आमदार बबनराव घोलप व रामदास तडस उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप शाल-श्रीफळ, राष्ट्रीय मानपत्र व गोल्डमेडल असे आहे. प्रश्न. डॉ. हर्षे यांच्या यशाबद्दल रमेश आमले, मनोहर आमले, रजनी आमले, आमदार अतुल देशकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टँकरच्या धडकेत म्हैस ठार
खामगाव, २६ जून / वार्ताहर

भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत एक म्हैस मृत्युमुखी पडल्याची घटना ऋषी संकुलजवळ गोवर्धन गोयनका यांच्या शेताजवळ घडली. नागपूरकडे निघालेल्या टँकरच्या (जीजे ६/व्हीव्ही ५८२०) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील म्हशीला जबर धडक दिली. धडकेनंतर काही अंतरावरील निंबाच्या झाडावर आदळल्यानंतर टँकर पलटी झाला. यात म्हैस जागीच ठार झाली असून इस्माईल शे. फरीद याच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चोरीचे सिलेंडर घेणाऱ्या तिघांना अटक
खामगाव, २६ जून / वार्ताहर

चोरीचे सिलेंडर विकत घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आज तिघांना अटक केली आहे. घरात शिरून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या विक्की केशव गायकीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने यापूर्वी केलेल्या सर्व चोऱ्यांची माहिती पोलिसांना दिली. त्या माहितीवरून पोलिसांनी त्याने विकलेले ४ सिलेंडर जप्त केले.