Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

ग्रंथविश्व

बुद्धिजीवींची शोकांतिका :
समाजाची शोकांतिका

‘मुंबई : डी-इंटलेक्चुअलाइज्ड : राइज अँड डिक्लाइन ऑफ अ कल्चर ऑफ थिंकिंग’, असे मोठे नाव असलेले, डॉ. अरुण टिकेकर यांचे नवे पुस्तक प्रत्येक मुंबईकराला विचाराला प्रवृत्त करावे अशा पोडतिडिकेनेच लिहिलेले असावे. ते छापण्यास व प्रकाशित करण्यास प्रकाशक उद्युक्त व्हावा म्हणजे आशा करण्यास जागा आहे का? माहीत नाही. कारण आजूबाजूला जे दिसते त्यामुळे टिकेकरांच्या लिखाणाची सत्यता मनाला पटत जाते व एक प्रकारचे उदासपण मनाला घेरून टाकते. ते झटकणे अवघडच नाही, तर अशक्य वाटते. मॅथ्यू अरनॉल्डचे वचन त्यांनी उद्धृत केले आहे, ‘दोन जगांमध्ये मी हिंदोळत आहे, एक मृत झालेय, तर दुसऱ्यात जन्म घेण्याची ताकदच नाही.’ ते अगदी तंतोतंत पटते.

 


सहज, सोप्या इंग्रजीतून टिकेकरांनी आपल्यासमोर त्यांचे म्हणणे मांडले आहे. सुरुवातीलाच त्यांनी म्हटल्याप्रमाणे गरिबी आणि भौतिक सुखांचा अभाव पाहून एक भारतीय म्हणून आपण हताश होत नाही, तर वैचारिक श्रीमंतीचा अभाव आपले नैराश्य गडद करते. वैचारिकतेचा हा अभाव अधोरेखित करण्यासाठी म्हणून त्यांनी दोन प्रकरणांत १९ व्या शतकातील मुंबईचे बुद्धिजीवी व त्यांचे पुढारी यावर प्रकाश टाकला आहे; परंतु त्याआधी त्यांनी बुद्धिजीवींची केलेली व्याख्या लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
बुद्धिजीवी बनण्याच्या प्रवासात आपण कारणमीमांसा, तर्कनिष्ठता, प्रागतिक कल्पना आत्मसात करतो. निसर्गाच्या आविष्कारांमागची वैज्ञानिक कारणे जाणून घ्यायच्या प्रयासाकडे मनाचा कल तयार होतो. म्हणजेच चमत्कारांवर, भाकडकथांवर आपला (समाजाचा) विश्वास बसत नाही. परंपरेला तर्काच्या कसोटय़ा लावून मगच तिला स्वीकारण्याची या बुद्धिजीवी वर्गाची तयारी असते व वेळप्रसंगी लोकप्रिय लाटांच्या विरोधात जाऊन संघर्ष करण्याचीही तयारी असते. हे बुद्धिजीवी एक समूह म्हणून समाजाचे सांस्कृतिक पुढारी असतात. वागणुकीच्या त्यांनी ठेवलेल्या आदर्शाचे अनुकरण समाज करीत असतो. ‘विचारांच्या ताकदीपुढे कुठलीही ताकद थिटी पडते’ यावर त्यांचा अढळ विश्वास असतो. म्हणूनच त्यांचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी ते संस्थांची उभारणी करतात व आपल्या आजूबाजूचा समाजही वैचारिकदृष्टय़ा समृद्ध बनेल यासाठी प्रयत्न करतात. शंका हे सर्व प्रगतीचे मूळ आहे व एडवर्ड सईदच्या मते खरा बुद्धिजीवी, सुलभ समीकरणे, तयार उत्तरे अथवा सत्तेत असणाऱ्यांच्या वागण्याचे, विचारांचे, गोडीगुलाबीचे समर्थन, यापासून फटकून असतो. याच्याशी तो निष्क्रियतेने असंमत नसतो तर त्यांची असंमती जाहीर कृतीने दाखवून देण्याची त्याची तयारी असते.
या कसोटय़ांवर पारखून पाहिल्यास आपल्या समाजाचा बुद्धिजीवी वर्ग- विद्यापीठातील शिक्षक, वर्तमानपत्रांचे संपादक, लेखक व सांस्कृतिक नेते (अ‍ॅकेडेमिया, मीडिया, लिटरेचर व कल्चर) या कसोटय़ांवर पास होतो आहे का? की समाजाचे नेतृत्व करायचे सोडून हे सर्वच स्वत्व हरवलेले, कणाहीन झालेले आहेत? तसे ते झाले आहेत असे टिकेकरांचे मत आहे व त्यांच्या मते ही फक्त या वर्गाची शोकांतिका नसून सर्व समाजाची शोकांतिका आहे. त्यांच्याशी सहमत होण्यावाचून आपल्याकडे पर्यायही नाही. कारण आपल्या म्हणण्याच्या पुष्टय़र्थ त्यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत.
पहिल्या दोन प्रकरणांतील माहिती पाश्र्वभूमी म्हणून महत्त्वाची आहे व माहितीपरही आहे. ती वाचायला हवीच. नंतरच्या प्रकरणात त्यांनी आजच्या परिस्थितीचे ते विश्लेषण केले आहे ते अस्वस्थ करणारे आहेच; परंतु आपल्या समाजाच्या भविष्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत. तेव्हा त्यावर विस्ताराने चर्चा झाली पाहिजे. यापैकी पहिले प्रकरण म्हणजे - बुद्धिजीवी वर्ग अनावश्यक झाला आहे का? समाजात आज बुद्धिजीवी वर्गाला पूर्वीसारखी प्रतिष्ठा नाही असे टिकेकर वारंवार सांगतात. सर्वसामान्य माणसाला हा वर्ग ‘शत्रू’ वाटतो असेही टोकाचे विधान ते करतात. परंतु इतक्या टोकाच्या विधानाशी सहमत होणे कठीणच आहे. समाजात सर्व तऱ्हेचे लोक असतात; परंतु सर्वसाधारणपणे अजूनही या वर्गाविषयी बऱ्यापैकी आदर आहे. कदाचित खडबडून जागे करण्यासाठी त्यांनी हे विधान केले असावे. कारण पुढील प्रकरणात त्यांनी विद्यापीठ, वर्तमानपत्र अथवा प्रसारमाध्यमे, लेखक व संस्कृतीचे नेते यांच्या व्यवसायाची जी चिरफाड केली आहे ती वास्तवाला धरून आहे. टिकेकरांना उत्तमरीत्या परिचित असणारी विद्यापीठे व प्रसारमाध्यमे यांच्यावरची टीका तर जास्त सखोल आहे.
विद्यापीठ ही एक परीक्षा घेणारी संस्था झाली आहे किंवा तिचा स्तर घसरला आहे. यासाठी त्यांनी कुलगुरूंच्या नेमणुकीपासून ते इतर नेमणुका, त्यांना लागणारी पदकांची कागदी लायकी ते पेपर तपासण्याची रीत इत्यादी सर्वावर टीकेचा झोत टाकला आहे. विद्यापीठाशी परिचित असणाऱ्यांना त्यात नवीन काही नाही. परंतु त्यातूनही शिकविणारे आपल्या परीने विद्यार्थ्यांना मूल्ये, माहिती देत असतात व त्यांना विद्यार्थ्यांचे प्रेमही मिळते. प्रश्न, हे सर्व सुधारायचे कसे, हा आहे आणि हा अतिशय किचकट व गुंतागुंतीचा प्रश्न आहे. कशामुळे हे झाले यावरही टिकेकरांनी अचूक बोट ठेवले आहे; परंतु संपूर्ण व्यवस्था सुधारण्यासाठी समाज सुधारणे व त्याच्याकडून उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्याची मागणी येणे आवश्यक आहे. वर्गामध्ये जीव तोडून शिकवायचे आणि विद्यार्थ्यांनी कुठून तरी नोटस् खरेदी करून त्या पाठ करून पेपरवर उतरवून फर्स्ट क्लासची अपेक्षा करायची! शिक्षणाचे सार्वत्रीकरण गुणवत्तेच्या मुळावर आले आहे. समाजापासून विद्यापीठाला अथवा इतर अनेक अंगांना स्वायत्त करून चालणार नाही आणि फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रीय समाजच एवढय़ा वेगाने घसरणीला लागला आहे की त्याला सावरायचे कसे? या टिकेकरांच्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही. अशा वेळी मग सर्वसामान्य लोक ‘मसीहा’ची वाट बघतात अथवा सर्व प्रश्न चुटकीसरशी सोडवू म्हणणाऱ्या पुंगीवाल्याच्या मागे जातात.
‘द जंटल आर्ट ऑफ.. करिक्युलम विटो’ हे प्रकरण छानच आहे. स्वत:चा सी. व्ही. म्हणजे माहिती सूची कशी बनवतात त्याच्या अनेक कहाण्या आपल्याला माहीत असतात. कुलगुरूपदासाठी, साहित्याची अ‍ॅवॉर्डस् मिळावीत म्हणून किंवा इतर काही मानसन्मानांसाठी अर्ज पाठवायला लागावेत याच्याइतके मानहानिकारक काही नाही. परंतु तेच सत्य आहे व सत्तेपुढे शहाणपण व्यर्थ आहे. प्रसार माध्यमांच्या बबतीतही, त्यांचे संचालक म्हणत असतात की लोकांना हेच आवडते. परंतु त्यांना चांगले काही दिल्यास ते तिकडे वळतात. मराठी ‘सारेगमप’ हे याचे उत्तम उदाहरण आहे.
या चारही विभागांवरील डॉ. टिकेकरांची टीका रास्तच आहे. या सर्वावर त्यांच्याकडे उपाय असतील अथवा असावेत ही अपेक्षाही अवास्तव आहे. तसे त्यांनी काही उपाय सुचवले आहेत; परंतु यावर समाजात मोठय़ा प्रमाणावर चर्चा झाली व समाजातील प्रत्येकाने अंतर्मुख होऊन निदान स्वत:पुरते काही ठाम निर्णय घेतले- उदा. मी प्रवाहप्रतिताप्रमाणे वागणार नाही,-तरीही समाज बदलायला सुरुवात होईल. या पुस्तकाद्वारे टिकेकरांनी या चर्चेला सुरुवात करून दिली आहे. फक्त काही अपेक्षा - डॉ. टिकेकरांचे वाचन अफाटच आहे; परंतु सामान्य वाचकांसाठी त्यांनी काही विचार उदाहरणे देऊन स्पष्ट करायला हवेत. हे भाषणांचे संकलन आहे. भाषण करताना आपण बरेच वेळा टेक्स्टपासून दूर जाऊन उदाहरणे देतो अथवा प्रश्नोत्तरांमध्ये ते स्पष्ट करता येते; परंतु लिखाणात काही ठिकाणी स्पष्टता येण्यासाठी अशा उदाहरणांची गरज भासते.
‘कल्चर ऑफ थिंकिंग’- ‘विचार करण्याची संस्कृती’ आपल्याही समाजात रुजो, हीच इच्छा.
वासंती दामले
vasantidamle@hotmail.com
मुंबई डी-इंटलेक्चुअलाइज्ड :
राइज अँड डिक्लाइन ऑफ अ कल्चर ऑफ थिंकिंग
लेखक : डॉ. अरुण टिकेकर;
प्रकाशक : प्रोमिला अँड कं. बिब्लिओफिल साऊथ एशियासह. नवी दिल्ली व शिकागो;
पृष्ठसंख्या: १९९; किं. : २२५ रु.