Leading International Marathi News Daily
रविवार, २८ जून २००९

शब्द-चित्रांची वारी
आषाढ शुद्ध एकादशीची पंढरीची वारी तब्बल २२ दिवसांची असते.२५० मैलांचं अंतर कापणारी. या वारीला जाणारे भाविक लाखोंच्या संख्येत. वर्षांनुवर्षे अशी वारी करणाऱ्यांची संख्याही कितीतरी मोठी. हा प्रवास अनुभवण्याचा, लेख वा पुस्तकरूपानं शब्दबद्ध करण्याचा, कॅमेऱ्यात चित्रित करण्याचा प्रयास अनेकांनी केला.
‘वारी : पाथ टू द डिव्हाइन’
ही शिरीष शेटे यांची फोटोबायोग्राफी हा त्यातलाच
एक ताजा प्रयास..
पंढरपूर..
सोलापूर जिल्ह्यातलं कुर्डुवाडी गावापासून बत्तीस मैल अंतरावर असलेलं एक ऐतिहासिक शहर..
दक्षिण भारतातलं एक प्राचीन तीर्थस्थळ..
 

महाराष्ट्राच्या भक्ती संप्रदायातलं एक आद्य पीठ..
मराठी आणि कन्नड संस्कृतींच्या सामंजस्याचा मोठा दुवा..
एका अर्थानं प्रादेशिक संस्कृतींच्या समन्वयाचं क्षेत्र..
संतजनांनी या शहराचं वर्णन केलं आहे, ते भूवैकुंठ असं किंवा भारताची दक्षिणकाशी असं..
पंढरपूर क्षेत्राचं माहात्म्य सांगणारा पंढरीमाहात्म्य नावाचा एक ग्रंथ स्कंदपुराणात आहे..
पांडुरंग हे या दक्षिणकाशीचं म्हणजेच पंढरीचं दैवत..
या दैवताला पूजायला आषाढी, कार्तिकी, माघी किंवा चैत्री शुद्ध एकादशीला गळ्यात तुळशीची माळ घालून जो पंढरपूरला जातो, तो असतो पंढरपूरचा वारकरी..
आणि त्या वारकऱ्याच्या उपासनेचा जो पंथ, तो वारकरी पंथ..
या पंथाला खऱ्या अर्थानं तत्वज्ञानाचं अधिष्ठान दिलं ते ज्ञानदेवांनी..
पूर्वापार चालत आलेल्या या भक्तिपंथात ज्ञानदेवांनी नवीन आशय ओतला, तो अधिक सखोल आणि व्यापक केला..
तेराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि चौदाव्या शतकाचा पूर्वार्ध हा ज्ञानदेवांचा कालखंड..
पण ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे आषाढी-कार्तिकी वारीला पंढरपुरी गेल्याचा उल्लेख थेट नामदेवांनीच केला आहे..
नामदेव हा ज्ञानदेवांचा जिवलग सखा..
त्यानं कीर्तनभक्ती करून महाराष्ट्रात विठ्ठलभक्तीचा खूप प्रसार केलाच..
पण प्रस्तुत पंथाची दारं आबालवृद्धांना, स्त्री-पुरूषांना आणि सर्व जमातींना खुली असल्याचा उद्घोषच करून टाकला..
पंढरपूर हे त्यामुळं सार्वजनिक क्षेत्र बनलं..
विठ्ठलाची किंवा पांडुरंगाची प्रसिद्धी खरं तर सहाव्या शतकातच झालेली होती..
म्हणजे देवस्थानाचं अस्तित्व तर त्याहीआधी दोनतीनशे वर्षांपासूनचं होतं..
एकनाथ त्यानंतरचे..
ज्ञानेश्वरांपासून अस्तित्वात असलेल्या देवधर्म संप्रदायाच्या संघटनेला आलेलं शैथिल्य एकनाथांच्या शिकवणुकीनं नाहीसं झालं..
नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा झेंडा उत्तर भारतात उभारला तर एकनाथांनी तो काशीक्षेत्री नेला..
तुकाराम महाराज एकनाथांच्या निर्वाणानंतर नऊ वर्षांनी जन्मलेले..
त्यांनी परमार्थाची शिकवण चोखपणे दिलीच, पण व्यवहारधर्मही सांगितला..
त्यानंतरच्या चारशे वर्षांत नाव घेण्याजोगे संतपुरूष निळोबाच..
वारकरी संप्रदायात आषाढी आणि कार्तिकी अशा दोन वाऱ्या चालतात.. त्यातली आळंदीची वारी कार्तिक वद्य एकादशीची..
तर पंढरीची वारी आषाढ शुद्ध एकादशीची..
ज्येष्ठ वद्य सप्तमीला आळंदीहून सुरू होणारी आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला समाप्त होणारी..
तब्बल २२ दिवसांची ही वारी.. २५० मैलांचं अंतर कापणारी..
त्या वारीला जाणारे भाविक लाखोंच्या संख्येत.. वर्षांनुवर्षे अशी वारी करणाऱ्यांची संख्याही कितीतरी मोठी..
ठराविक मार्ग.. ठराविक ठिकाणी मुक्काम.. ठराविक दिवशी ठराविक गावी ठराविक कार्यक्रम व्हायचाच..
वाटेनं जाताना मुक्कामाला जागा मिळेलच असं नाही, जेवणखाण वेळच्यावेळी होईलच याचीही शाश्वती नाही..
पण रोज ठराविक अंतर कापायचं, ठरलेल्या दिवशी पंढरपूरला पोचायचं हे वर्षांनुवर्षांपासून ठरून गेलेलं..
देहू, आळंदी, पुणे, दिवेघाट, अकलूज, वेळापूर, बाजीरावाची विहीर, पंढरपूर असा हा प्रवास..
हा प्रवास अनुभवण्याचा, लेख वा पुस्तकरुपानं शब्दबद्ध करण्याचा, कॅमेऱ्यात चित्रीत करण्याचा प्रयास अनेकांनी केला..
वारी : पाथ टू द डिव्हाइनह्ण ही शिरीष शेटे यांची फोटोबायोग्राफी हाही त्यातलाच एक ताजा प्रयास..
२०००-२००१ साली कार्तिकी एकादशीला शेटे आळंदीत होते, पण निमित्त वेगळंच होतं..
त्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त करायचं होतं ते तमाशा फडांना.. त्यातल्या कलावंतांना, खास करून लावणी नृत्यांगनांना..
पंढरपुराहून परतलेले वारकरी आळंदीत परतण्याचा तो काळ होता..
प्रथेप्रमाणं गावाबाहेर तमाशा फडांचे तंबू पडलेले होतेच..
शेटेंनी योजलेल्या विषयाचे फोटो काढलेच, पण वारीतल्या वारकऱ्यांनाही कॅमेऱ्यात बंदिस्त केलं..
डिसेंबर २००७ मध्ये डान्सिंग मेडन्स नावानं संदेश भंडारेंची ही फोटोबायोग्राफी प्रसिद्ध झाली, आणि मग शेटेंनी वारीच्या फोटोंकडे लक्ष वळवलं..
२००१ सालापासून सलग सात र्वष वारीचे फोटो काढलेले होतेच,
कधी त्यासाठी त्यांनी विमानानं प्रवास केला होता, तर कधी थेट वारकऱ्यांशी संपर्क साधता यावा म्हणून लाल पिवळ्या बसचाही आधार घेतला होता..
१२-१२ तासांचा घाम गाळणारा तो जीवघेण्या उकाडय़ातला प्रवास करताना १२०० वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी व त्यांच्या भावंडांनी ती अंतरं कशी पायी तुडवली असतील,
या कल्पनेनंही त्यांना घाम फुटला होता..
शेटे तसे विज्ञानाचे पदवीधर, पण त्यांनी नोकरी केली ती अनेक वृत्तपत्रांमध्ये फोटोजर्नालिस्ट म्हणून..
इंडियन एक्स्प्रेस, मिड-डे आणि दलाल स्ट्रीट जर्नल या दैनिकांमध्ये काम केल्यानंतर शेटे यांनी डेबोनेर आणि टाइम्सच्या पोर्टफोलिओमध्येही अनुभव घेतला..
गेली १० वर्षे ते प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियामध्ये असून सध्या तर चीफ फोटोग्राफर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत..
भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बरोबर युरोपचा दौरा करण्याची संधी त्यांना लाभली..
पण त्याखेरीज दोहामध्ये भरलेले २००६ सालचे आशियाई सामने, पहिला आयपीएल मोसम, २००८ चे कॉमनवेल्थ युथ गेम्स, २६/११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला अशा अनेक घटनांना प्रत्यक्ष साधी राहण्याची व त्यांचे छायाचित्रण करण्याची संधी शेटेंना लाभली..
या काळामध्ये केलेल्या छायाचित्रणाची अनेक एकल व समूह प्रदर्शनेही त्यांनी भरवली..
त्यातल्या वारी ते बारी या प्रदर्शनाचं कौतुक अनेकांकडून झालं..
डान्सिंग मेडन्स हे त्यातल्या बारीविषयक फोटोंवर आधारलेलं पुस्तक तर आता वारी - पाथ टू द डिव्हाइन हे वारीविषयक फोटोंवर आधारलेलं पुस्तक..
शेटे तसे मध्यमवर्गीय कुटुंबातले, त्यांची आई स्नेहलता ज्ञानेश्वरीचं नियमित पारायण करणारी..
वर्षांनुर्वष त्या ओव्या कानांवर पडत होत्याच.. त्यामुळेच लावणी कलावंतांना कॅमेराबद्ध करायला गेल्यानंतरही समाधीपुढे जाऊन मनोभावे दर्शन घेतल्याखेरीज शेटे परतले नव्हते..
ते दर्शन घेत असतानाच खरं तर ही फोटोबायोग्राफीची कल्पना त्यांना सुचली होती..
गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या फोटोबायोग्राफीचं प्रकाशन झालं आणि शेटेंना भरून पावल्यासारखं झालं..
१६० पृष्ठांचं डबल डेमी आकाराचं हे पुस्तक एकेका मुक्कामाचं शब्दचित्रण करणारं..
त्या-त्या ठिकाणच्या घटनांचं मोजक्याच शब्दात वर्णन करणारं..
तब्बल १६० पानं आणि १८७ लहानमोठी चित्रं.. आणि अखेरीस असणारं पसायदान..
वारीह्णला प्रस्तावना डॉ. सदानंद मोरे आणि डॉ. रामचंद्र देखणे यांची..तर संदेश मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पर्यटनमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची..
मुंबई विद्यापीठाचे रीडर डॉ. प्रकाश खांडगे हे माळकरीही आणि तमाशा अभ्यासकही.. त्यांचे चार शब्द मोलाची भर घालणारे..
वारी पंढरीशी, पांडुरंगाशी नातं जोडणारी, तसंच जातीयतेच्या भिंतींचं समूळ उन्मूलनही करणारी..
वारीच्या प्रवासातल्या काही ठिकाणांचं शेटेंनी केलेलं चित्रण रोमांच उभं करणारं..
वारकरी संप्रदाय म्हणजे भागवत धर्माचं भूषण.. त्याचा इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा गेल्या साताठशे वर्षांचा अत्यंत धमर्ंप्रवण असा इतिहास..
वारी करी तो वारकरी असा या शब्दाचा विग्रह.. वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, एकनाथांचं एकनाथी भागवत आणि तुकारामांची गाथा यांना प्रस्थानत्रयी म्हणून मान्यता आहे..
या संप्रदायानं ग्वाही दिली ती मानवतेच्या धर्माची.. दया, क्षमा, शांती आणि समता, ममता, एकता या उदात्त तत्वांचा आग्रह धरतो तो खरा धर्म हे या संप्रदायानं बिंबवलं..
या संप्रदायानं कर्मठपणाचं बंड मोडलं, पण कर्मप्रवृत्तीचा नाश होऊ दिला नाही.. त्यांनी पढिकतेचा निषेध केला, पण डोळसपणाचा आग्रह सोडला नाही..
उच्चनीच भाव नाकारला, परंपरागत रूढीवाद तोडला, भक्ती आणि नीतीची जोडी कधी फुटू दिली नाही.. वारकरी ही संज्ञा औदार्याची, मांगल्याची, श्रद्धेची आणि सेवेची परमपवित्र अशी खूण बनली ती त्यातून..
वारकरी हे व्रत बनलं, वारकरी ही वृत्ती बनली ती असा वारसा लाभण्यामुळे..
ज्ञानदेवांची आळंदी, नाथांचं पैठण आणि तुकोबांचं देहू हे वारकऱ्यांना परमप्रिय असणारं.. या तीनही श्रद्धास्थानांचा सचित्र परिचय ग्रंथात आहेच..
नाथांच्या स्वप्नात ज्ञानदेव आले, त्यांनी त्यांना समाधीस्थानाची दुर्दशा झाली असल्याचं सागितलं आणि तिच्या उर्जितावस्थेसाठी प्रोत्साहितही केलं..
स्वाभाविकपणेच एकनाथ आळंदीत आले, तिथेच राहिले.. आळंदी, देहू आणि पंढरपूर ही महाराष्ट्राची सार्वजनिक त्रिस्थळी यात्रा बनली ती त्यामुळे..
अजून चारच दिवसांनी येणाऱ्या २ जुलैला वाखरीला रिंगण धरलं जाईल.. आणि ३ जुलैला देवशयनी एकादशीला त्या त्रिस्थळीतल्या पंढरीत यात्रेचा आनंदकल्लोळ उठेल..
त्या कल्लोळात सहभागी व्हायचं, चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठलभक्तीचा केशरमळा फुलवायचा, आणि रंगलेल्या वारकरी फडात उतरून एकात्मतेच्या भक्तीगंगेचा स्वानुभव घ्यायचा हा विलक्षण आनंदसोहळा..
त्यासाठी हा ग्रंथपरिचयरुपी लेखनप्रपंच..
सुधीर जोगळेकर
sumajo51@gmail.com