Leading International Marathi News Daily
रविवार, २८ जून २००९

वारीच्या वाटेवरी..
पंढरपूरची वारी हा जागतिक कुतूहलाचा विषय आहे. वारीचा मार्ग ठरलेला असतो. वारी, वारकरी आणि त्यांची भक्ती याविषयी खूप लिहिले जाते. परंतु वारीमुळे तिच्या मार्गातील गावांमध्ये घडून आलेल्या बदलांबद्दल मात्र फारसे लिहिले गेलेले नाही. अभ्यासाच्या निमित्ताने एका संशोधिकेचे मात्र या विषयाकडे लक्ष गेले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखीचे दिवस जवळ येऊ लागले आणि डोळ्यांपुढे दोन वर्षांपूर्वीचे चित्र उभे राहिले. मार्च २००७ च्या पहिल्या आठवडय़ात माझा प्रबंध पूर्ण झाला होता.प्रबंधाचा विषय होता, ‘आळंदी ते पंढरपूर पालखी आणि तिच्या मार्गावरील विविध गावे, रस्ते, चौक यांच्यात होणारे स्थानिक बदल’. थोडक्यात सांगायचे तर सार्वजनिक परिसर आणि धार्मिक उत्सव यांचा एकमेकांशी येणारा संबंध आणि त्यातून वास्तुरचना किंवा नगररचनेवर होणारे परिणाम.
ऑस्ट्रेलियातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स’ या विद्यापीठात २००५ साली मी वास्तुकलेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम रीसर्च पद्धतीवर आधारित आहे. ज्यातून पुढे डॉक्टरेट पदवी पण मिळवता
 

येते. आता आपल्याकडे वास्तुकलेतील विविध विषय जसे इंटिरिअर डिझाईन, लॅण्डस्केप, कॉन्झर्वेशन, नगररचना इत्यादी कोर्सेसमध्ये डिझाईन किंवा रचना यांना खूपच महत्त्व दिले जाते. परदेशात याचबरोबर त्या रचनेसाठी लागणारी पाश्र्वभूमी (थिअरी) आणि त्याचा सातत्याने केला जाणारा अभ्यास याला तितकेच किंबहुना जास्तच महत्त्व आहे. मला या प्रकारच्या अभ्यासक्रमात रस होता. तेव्हा अ‍ॅडमिशन घेण्याच्या दृष्टीने मी एक ‘रीसर्च प्रपोजल’ तयार केले. म्हणजे एक आराखडा ज्यात माझा विषय हा आधी सांगितल्याप्रमाणे धार्मिक उत्सव आणि नगररचना असा होता. या विषयाच्या आधारे मला अ‍ॅडमिशन मिळाली खरी. पण माझ्या शिक्षकांना त्याचा विस्तार खूप व्यापक वाटला. त्या प्रपोजलमधील आळंदी-पंढरपूर पालखीचा भाग त्यांना आवडला व त्यांनी मला त्यावरच माझा रीसर्च केंद्रित करायला सांगितले.
लहानपणापासून पालखीशी अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे संबंध आला असल्याने आळंदी ते पंढरपूर जाणाऱ्या ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा किंवा वारीचा विषय पक्का केला. अप्रत्यक्षपणे म्हणजे दरवर्षी आजीबरोबर पालखीच्या दर्शनासाठी गेल्याची आठवण सतत बरोबर होती. ज्ञान प्रबोधिनीत शिकत असताना ओळीने चार-पाच वर्षे पालखीबरोबर केलेली वाटचाल, त्या दरम्यान घेतलेल्या वारकऱ्यांच्या मुलाखती आणि निवडुंग्या विठोबाच्या पालखी निवासात केलेली छोटी छोटी कामे हे सर्व अनुभव मनात खोलवर रुजलेले होते. थोडक्यात म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पालखीशी एक नाते कळत-नकळतपणे जडले होते जे या अभ्यासाच्या निमित्ताने ते दृढ झाले.
अभ्यासाची सुरुवात करताना मी तीर्थयात्रा, त्याचे अर्थ आणि त्याची विविध धर्मामधील रूपे समजून घेण्याचा प्रयत्न केला. एखाद्या धार्मिक स्थळाकडे अथवा तीर्थक्षेत्राकडे केलेला प्रवास अशा मूळ व्याख्येपासून ते अध्यात्मिक वाटचाल, तीर्थयात्रेला जाण्याची कारणे, ते साध्य करण्याच्या पद्धती या सगळय़ा घटकांचा अभ्यास केल्यावर एक लक्षात आले की काही बारकावे सोडले तर या विविध तीर्थयात्रांमध्ये साधम्र्य आढळते. अनेक भक्तांनी एकत्रित येऊन केलेल्या यात्रेत जे सामाजिक लागेबांधे जुळतात किंवा सहवासातून जे सौहार्द निर्माण होते ते नक्कीच ठळकपणे सांगण्यासारखा एक समान दुवा आहे. त्यानंतर मी हिंदू धर्मातील तीर्थयात्रेचे महत्त्व आणि त्यामागील अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. सुरिंदर भारद्वाज हे या विषयातील एक महत्त्वपूर्ण संशोधक मानले जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार तीर्थयात्रेचा उगम किंवा या प्रक्रियेचा पहिला उल्लेख ऋग्वेदात सापडतो. त्यातून साध्य होणाऱ्या पुण्याचे महत्त्व त्यात दिसून येते. भारद्वाजांनी आणि इतर अनेक संशोधकांनी तीर्थक्षेत्र, त्यांना काळानुरूप लाभलेले माहात्म्य याच्यावरही खूप अभ्यास केला आहे.
पालखीचे स्वरूप आणि त्याचे निरनिराळे पैलू यावरील संशोधन अनेक श्रेष्ठ अभ्यासकांनी आतापर्यंत मांडले आहे. प्रा. सोनोपंत दांडेकर यांचे ‘वारकरी पंथाचा इतिहास’ (१९२७) आणि फ्रेंच फादर डेलरी यांचे ‘द कल्ट ऑफ विठोबा’ (१९६०) या पुस्तकांमधून त्यांच्या अभ्यासाची व्याप्ती दिसून येते. त्याबरोबरच इरावती कव्र्याचा पालखीवरील लेख (१९६२) आणि दि. बा. मोकाशींचे ‘पालखी’ नावाचे पुस्तक यातील अनुभवांचे सुरस कथन निश्चितच एक वास्तव दर्शन देऊन जातात. आश्चर्य म्हणजे ही सर्व पुस्तके अथवा लेख मला सिडनीतील विद्यापीठात सहजगत्या मिळाले. त्यानंतर वारीवरील अभ्यासात भरपूर भर पडली आह.े केवळ मराठी किंवा भारतीय संशोधकांपुरते मर्यादित न राहता त्याबद्दलचे कुतूहल जगात सर्वत्र आहे, हे अनेक ठिकाणी चाललेल्या अभ्यासावरून सिद्ध होते. परंतु वारीमुळे त्या मार्गातील गावांवर होणारे परिणाम आणि गावातील परिस्थितीचा वारीवर पडणारा प्रभाव हा कुठल्याही अभ्यासात दिसून येत नाही. नगररचना, वास्तुकला, समाजशास्त्र धार्मिक विषय हे एकमेकांशी निगडित असले तरी त्यांचा अभ्यास हा अत्यंत अलिप्तपणे केला जातो. प्रत्येक क्षेत्राचे वैशिष्टय़ टिकवण्याचा ध्यास (स्पेशलायझेशन) यामुळे हे वर्गीकरण अधिकच दृढ बनत चालले आहे. त्यामुळे दोन वेगळय़ाच क्षेत्रांची सरमिसळ ही संशोधनात क्वचितच आढळते आणि करणे अवघडही जाते. माझ्या अभ्यासात वास्तुकला, नगररचना आणि वारीचा धार्मिक आणि सार्वजनिक उत्सव या विषयांचा मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे.
नगररचनेत ‘पब्लिक स्पेसेस’ किंवा सार्वजनिक जागा उदा., रस्ते, फुटपाथ, चौक, पार्क, नदीकिनारा इत्यादी यांच्या रचनेवर खूप भर दिला जातो. गणेशोत्सव किंवा पालखी यांसारख्या सांस्कृतिक आणि सार्वजनिक उत्सवात या जागांचा वापर सर्वाधिक आढळतो. अशा उत्सवांनीच गावांची किंवा शहरांची शान वाढते. किंबहुना एक स्वतंत्र ओळख होते. आज अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या नवप्रगत देशांत असे मोठमोठे उत्सव आणि कार्यक्रम खासकरून राबविण्यात येतात आणि त्यासाठी योग्य जागा निर्माण केल्या जातात. (इव्हेंट स्पेसेस).
२००५च्या ज्ञानेश्वरमहाराज पालखीबरोबर मी वाटचाल केली, अनुभव घेतले, वारकऱ्यांबरोबर वावरले, गप्पा मारल्या, वेळ घालवला आणि वाटेवरच्या मुक्कामांचा अभ्यास केला. राज्य सरकारचे पालखीमार्गातील सुधारणा प्रयोजन, अनेक स्वयंसेवी संस्थांची आणि कार्यकर्त्यांची मदत, एवढेच काय, पण गावातील घराघरांतून होणारे आदरातिथ्य हे सर्व मनाला भिडले. माझ्या अभ्यासासाठी मी पालखीमार्गावरील लोणंद या गावाची निवड केली. लोणंदची रचना, त्यातील लक्ष्मी चौक, तानाजी चौक, पालखीतळ, छोटेछोटे बोळ आणि इतर सार्वजनिक जागांचा अभ्यास केला. त्या दरम्यान ओसरी, अंगण, व्हरांडा अशा खासगी जागांचे पण सार्वजनिक उपयोगांमध्ये सहजगत्या होणारे रूपांतर बघायला मिळाले. हे सर्व मुद्दे आणि वेळेनुसार होणारे बदल हे त्या जागांच्या नकाशांवर मी मांडले आणि विश्लेषण केले. या सोहळय़ात प्रकर्षांने जाणवले ते म्हणजे भक्तिमय वातावरण, पालखीच्या दर्शनाची आणि विठोबाची ओढ आणि वारकऱ्यांसाठी करण्यात येणारा प्रेममय पाहुणचार, कीर्तन, प्रवचन, भजने, अभंग, रिंगण अशा सर्व पद्धती आणि सामुदायिक कार्यक्रमांमुळे सामाजिक ऐक्य आणि आत्मीयता वाढते. त्याचबरोबर बाजार, छोटे छोटे उद्योग, दुकाने, स्टॉल्स, फेरीवाले यांनी सर्व चौक, रस्ते गजबजून जातात. साहजिकच गावाला एखाद्या जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.
आता या गावांच्या विकासयोजनेमध्ये पालखी किंवा अशा कायमस्वरूपी नसलेल्या उत्सवांचे स्थान का विचारात घेऊ नये? आणि विचारात घेऊन नेमके काय काय केले पाहिजे, अमलात आणले पाहिजे, या प्रश्नांना मी या अभ्यासातून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या अभ्यासक्रमाचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर याच विषयावरील माझा पेपर टास्मानियातील एका जागतिक परिषदेत वाचण्याची संधी लाभली. दुसऱ्या वर्षीच्या संशोधनकार्यासाठी मला माझ्या विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती आणि पुरस्कारदेखील मिळाला. गेल्याच वर्षी एका जर्मन प्रकाशनाने या प्रबंधाची निवड केली आणि त्याचे पुस्तकदेखील प्रकाशित केले(Experiential shaping of public space during pilgrimage- The Alandi-Pandhapur Palkhi). पालखीशी वाटणाऱ्या आपुलकीचे अभ्यासात झालेले रूपांतर सर्वत्र पोचविण्याची संधी मला मिळाली, याचा मला अतिशय आनंद वाटतो. आपल्यापैकी कुणालाही या विषयात रस वाटल्यास मला ई-मेलद्वारे संपर्क साधावा, त्यातून या अभ्यासाला अधिक चालना मिळेल.
प्राजक्ता साने
prajoo_24@yahoo.com