Leading International Marathi News Daily
रविवार, २८ जून २००९

स्मरणरंजन
अपनी कहो, कुछ मेरी सुनो..
मेंडोलिनच्या सुरेख सुरावटींवर गुंफलेल्या तलत- लताच्या मधाळ द्वंद्वगीताचा हा मुखडा शीर्षक म्हणून देताना सोबतच्या फोटोत शांतारामबापू आणि संध्या कसे नाहीत, हा रास्त सवाल तुमच्या मनात यायलाच हवा. शिवाय ज्या चित्रपटातलं हे गाणं आहे, त्या ‘परछाई’शी या दोघींचा कसला तरी संबंध आहे का, असा उपप्रश्नही तुम्हाला पडू शकतो. अर्थात् काही जाणकार रसिकांना मात्र सी. रामचंद्रनी या द्वंद्वगीतातले मेंडोलिनचे सगळे तुकडे ‘होने लगा है मुझपे जवानी का अब असर’ (लता- ‘नास्तिक’) या अप्रतिम सोलोत काडीचाही बदल न करता पुन्हा कसे वापरले, याची नव्याने आठवण होईल.
दरवेळी शीर्षकाला अनुसरून परफेक्ट मॅच होणारा फोटो दिसला पाहिजे, यात शंकाच नाही. पण कधी कधी मनसोक्त
 

भटकंती करताना नेहमीच्या वाटेने न जाता वेगळ्या मार्गाने भरकटत जाण्यातही वेगळीच मौज असते. चला तर मग या खेपेस थोडं भरकटून जाऊ या!
शाळेत असताना आमचे मराठीचे उपाध्येमास्तर ‘काळ’कर्ते प्रा. शि. म. परांजपे यांचा कुठलातरी धडा शिकवत असताना त्यात ‘बादरायण संबंध’ असा शब्दप्रयोग आला. आणि त्यांनी खडय़ा आवाजात ‘‘बादरायण संबंध’ म्हणजे काय रे?’ असा प्रश्न विचारला. उत्तर देता आलं नाही. परिणामी सणसणीत थोबाडीत बसून डोळ्यांपुढे काजवे चमकले. अभिनयसम्राज्ञी मीनाकुमारी आणि नृत्यनिपुण तारका वैजयंतीमाला या दोघींचा एकत्र फोटो पाहिल्यावर ती अविस्मरणीय घटना जणू काल-परवासारखी डोळ्यांसमोर तरळून गेली.
खरं तर या दोघींची चित्रपट कारकीर्द तशी समांतरच म्हणायला हवी. पण त्या कधीही एकत्रपणे कुठल्याच सिनेमात दिसल्या नाहीत. १९५६ सालातल्या मार्च महिन्यात मात्र चमत्कार झाला. निर्माता हरनामसिंग रवेल ऊर्फ एच. एस. रवेल म्हणजे राजेंद्रकुमार-साधनाच्या ‘मेरे मेहबूब’चा दिग्दर्शक. त्याने या दोघींना घेऊन दोन वेगवेगळे सिनेमे एकदम सेटवर नेले. मीनाकुमारीचा ‘चालबाज’ आणि वैजयंतीमालाचा ‘बाजीगर’. महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओत दोन्ही चित्रपटांचं शूटिंग सुरू झालं. मीनाकुमारीने भरजरी शालू परिधान करून चित्रणात भाग घेतला आणि वैजयंतीमालाची कुठल्यातरी मुजरा नृत्यावर पावलं थिरकू लागली. मधल्या वेळेत थोडी फुरसद मिळाली आणि वैजयंतीने मीनाकुमारीची सदिच्छा भेट घेतली. नेमका तोच हा प्रसंग!
पण हे दोन्ही चित्रपट निर्मिती अवस्थेतच बंद पडले. आणि त्यातले नायक कोण, संगीतकार कोण, हे प्रश्न अनुत्तरितच राहिले. मात्र, पुढच्या दोन-तीन वर्षांतच ‘चालबाज’ (१९५८) आणि ‘बाजीगर’ (१९५९) पाठोपाठ प्रदर्शित झाले. पहिला स्टंटपट आणि दुसरा वेशभूषाप्रधान एवढा एकमेव फरक वगळता दोन्हीतील साम्यस्थळं चक्रावून टाकणारी होती. दोन्हीकडे नायक-नायिका म्हणून जयराज- निरुपा रॉयची वर्णी लागली. दिग्दर्शक नानाभाई भट्ट, संगीतकार चित्रगुप्त आणि दोन्ही सिनेमांत टायगर नावाचा कुत्रा. यातल्या ‘चालबाज’मध्ये संगीतकार चित्रगुप्तने रफी आणि गीता दत्तचं मस्तपैकी फडकतं द्वंद्वगीत दिलं होतं- ‘हो चट मंगनी तो पट शादी, ना दिल को तोडोजी..’ जिज्ञासूंनी ते आवर्जून ऐकावंच!
शीर्षकातील गीताचा मुखडा वैजयंतीमालाचे फोटोतील भाव पाहून देण्यात आलाय. त्याचा संगीतकार सी. रामचंद्र. त्यांनी संगीतबद्ध केलेला ‘आझाद’ मीनाकुमारीच्या अदाकारीने गाजला होताच. आणि अब्दुल रशीद कारदारचा ‘यास्मीन’ पडला तरी याच संगीतकाराने दिलेली त्यातली लताची गाणी पडद्यावर वैजयंतीमालाने केवढय़ा उत्कटतेने पेश केली होती. आता एवढं भरकटून झाल्यावर ‘बादरायण संबंध’ म्हणजे काय, याचा उलगडा होण्यास हरकत नसावी.
विजय शिंगोर्णीकर