Leading International Marathi News Daily
रविवार, २८ जून २००९

मराठी हॉलीवूडकर
‘पायरेटस् ऑफ द कॅरेबियन’ (तिसरा भाग), ‘शुअरली द स्क्वीरल्स’, ‘नटी प्रोफेसर’(२००८) अशा हॉलीवूडच्या अनेक अ‍ॅनिमेशनपटांमध्ये एका भारतीयाचे- तेही एका मराठमोळ्या व्यक्तीचे कौशल्य पणाला लागले आहे. हॉलीवूडमधील अ‍ॅनिमेशनची पंढरी समजल्या जाणाऱ्या स्टुडियोंमध्ये कार्यरत असलेल्या राहुल दाभोळकर या मराठी तरुणाचा ‘यशस्वी अ‍ॅनिमेटर’ बनण्यापर्यंतचा प्रवास त्याच्याच शब्दांत..
जेव्हा मी डिस्नेचा ‘जंगलबुक’, पिक्सारचा ‘टॉय स्टोरी’सारखे चित्रपट पाहिले; तेव्हा मला खऱ्या अर्थाने जाणवले की, माझ्यातील चित्रकला आणि अभिनय कला यांची एकत्रित सांगड घालून मला अ‍ॅनिमेशनच्या जगात प्रवेश करता येईल.
 

अ‍ॅनिमेशनकडे वळण्याचा निर्णय घेण्याकरिता या दोन चित्रपटांनी मला स्फूर्ती दिली. त्यानंतर पाहिलेला ‘आयएलएम’ स्टुडियोच्या ‘ज्युरासिक पार्क’ चित्रपटाने तर अ‍ॅनिमेशन जगतात जाण्याचा माझा निर्णय पक्का केला. या उद्देशांच्या पूर्तीकरीता ‘सर जे. जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाईड आर्टस्’मध्ये प्रवेश मिळवला. जे. जे.मध्ये माझ्या पदवी परीक्षेकरिता मी स्पेशलायझेशनचा विषय निवडला होता ‘इलस्ट्रेशन्स’ आणि या विषयात सर्वाधिक मार्क मिळाल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचा पुरस्कारही मिळवला. जे. जे.च्या शेवटच्या वर्षीचा प्रोजेक्ट मी ‘मॅड इन इंडिया’ या विषयावर सादर केला होता आणि मला त्याकरिता हिंदुस्थान थॉमन्सचा ‘बिग आयडिया’ पुरस्कार मिळाला . जे.जे.च्या शेवटच्या वर्षांला असतानाच ‘२ डी’ अ‍ॅनिमेशन करणाऱ्या कंपनीत मला नोकरी मिळाली. पण दुर्दैवाने १९९९ च्या सुमाराला २ डी अ‍ॅनिमेशनची सद्दी संपली आणि ‘३ डी अ‍ॅनिमेशन’चा जमाना सुरू झाला. त्यामुळे २ डी अ‍ॅनिमेशनची मागणीही कमी होऊ लागली. ज्युरॅसिक पार्क, टॉय स्टोरी, अँटस् , बग्ज लाईफ या चित्रपटांनी जगभरच्या तिकिटबारींवर मोठी कमाई करून दाखविली होती. त्यातील ३ डी अ‍ॅनिमेशन तंत्राने मी पार अचंबित झालो. मग मला जाणवलं माझ्याजवळच्या २ डी अ‍ॅनिमेशन तंत्राला आता ३ डी अ‍ॅनिमेशन तंत्रात बदलावं लागणार. त्यासाठी कॅनडाच्या ‘व्हॅन आर्टस्’ स्टुडियोच्या कॉम्प्युटर अ‍ॅनिमेशनला मी प्रवेश घेतला. नवा देश, नवं जग पण इर्षां मात्र या क्षेत्रातच पाय रोवण्याची होती. आश्चर्य म्हणजे मला ‘व्हॅन आर्टस्’च्या पदवीपूर्वी ३ डी अ‍ॅनिमेशनमधली नोकरी मिळाली. उत्साह.. इर्षां.. द्विगुणित झाली. त्यानंतर एका नोकरीतून दुसरी.. दुसऱ्यातून तिसरी असं करता करता सर जॉर्ज लुकस यांच्या ‘आयएलएम’ स्टुडियोपर्यंत कसा येऊन पोहोचलो हेच कळलं नाही. सर जॉर्ज लुकस माझ्या स्वप्नांचा बादशहा आणि त्यांचा ‘आयएलएम’ स्टुडियो माझ्या चारधामांपैकी एक बनला.‘आयएलएम’ मध्ये काम मिळालं, त्याचक्षणी जाणवलं याचंसाठी केला होता अट्टाहास! ‘आयएलएम’ ची निर्मिती असलेल्या अ‍ॅकॅडमी अवॉर्ड प्राप्त ‘पायरेटस् ऑफ द करेबियन भाग-३’ च्या निर्मितीमध्ये माझा सहभाग सुरू झाला आणि जाणवलं माझ्या आजुबाजूचे सहकारी म्हणजे हॉलिवूडला ज्युरॅसिक पार्क, स्टार वॉर, मम्मी वगैरे अनेक सुपर-डुपर हिट चित्रपट देणारे अ‍ॅनिमेटर्स आहेत. छाती दडपून गेली; पण मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी हेही जाणवलं. आपण या सर्व महान अ‍ॅनिमेटरच्या शेजारी बसतोय खरं पण आता खरी परीक्षा आहे, आपल्या अस्तित्वाची.
‘आयएलएम’ च्या दिवसात सर्व महान अ‍ॅनिमेटर्सबरोबर काम करीत असताना जाणवलं की, अ‍ॅनिमेशन हे तंत्र आत्मसात करण्याकरीता तुम्हाला कायम विद्यार्थी राहावं लागतं. नवीन शिकण्याची आस मनात सतत जागृत ठेवावी लागते. कारण या तंत्रात मानवी मनोविकार तुम्हाला निर्जिव कॉम्प्युटर निर्मित पात्रांमध्ये घालावे लागतात. जेणेकरून, ही निर्जीव पात्र सजीव वाटतील. त्यासाठी आपल्या आजूबाजूचे प्रसिद्ध कलाकार कसं काय काम करतात ते शिकावे लागते. त्यांची कार्यपद्धती पाहून त्यांना सतत प्रश्न विचारत आपली चौकस बुद्धी सतत शाबूत ठेवावी लागते. आपल्या आजुबाजूची जिवंत आणि अ‍ॅनिमेटेड पात्र काय करतात, कशी वागतात याचा अभ्यास सतत करावा लागतो. एखादी क्रिया आणि त्यावरील अनेक प्रतिक्रिया यांचं निरीक्षण करावे लागते. माणसंच काय पण पक्षा-प्राण्यांच्या हालचाली त्यांच्या क्रिया व प्रतिक्रिया याचं अवलोकन करावे लागते.
एखादी गोष्ट घडली तर त्यावरील विविध प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून गृहित धरल्या जातात. पण अ‍ॅनिमेटर्सकरिता प्रत्येक क्रिया व त्यावरील प्रतिक्रिया हा अभ्यासाचा विषय बनतो.
मी मान्यताप्राप्त अभिनेत्यांच्या फिल्म्स मिळवून शॉट- बाय- शॉट अभिनयाचा अभ्यास केला. अभिनय करताना ते त्या त्या पात्रांमध्ये अशी काही छोटीशी गोष्ट घालतात जेणेकरून ते पात्र आपल्याला खरंखुर वाटतं आणि त्या अभिनेत्याला इतर सामान्य कलाकारांपासून वेगळं असामान्यत्व प्राप्त करता येतं. हा अभ्यास मला महत्त्वाचा अशासाठी वाटतो. कारण, अ‍ॅनिमेटर स्वत: एक अभिनेता असावा लागतो असं मी मानतो. प्रत्येक मोठय़ा स्टुडियोतील अ‍ॅनिमेटर्स प्रथम चित्रित करायचे प्रसंग स्वत: अभिनीत करून ते व्हिडीयोवर चित्रित करून घेतात आणि त्या व्हिडीओवर रेकॉर्ड केलेल्या प्रसंगानुरुप आपल्याकडे दिलेले प्रसंग अ‍ॅनिमेट करतात. त्यामुळे अ‍ॅनिमेटर हा कॉम्प्युटर मागील कलाकारच असतो हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे ‘ऑस्कर’विजेता अभिनेता/ अभिनेत्री आपल्या भूमिका साकारण्यासाठी जेवढय़ा ताकदीनिशी उतरतो तीच ताकद अ‍ॅनिमेटर्सला स्वत:मध्ये बाणवावी लागते.
कॉम्प्युटर अ‍ॅनिमेशन करताना कॉम्प्युटरची मदत ही केवळ तांत्रिक असते. पण आपल्या पात्रांमध्ये जिवंतपणा किंवा प्राण ओतायचं काम हे अ‍ॅनिमेटर्सच असतं आणि तुमची पात्र तुम्ही कितपत जिवंत करू शकता यावरच अ‍ॅनिमेटर्सचा कस पणाला लागतो. ‘ऑस्कर’विजेते, अ‍ॅनिमेटर्स या कसावर १००% उतरतात म्हणूनच ते महान ठरतात.
माझ्या छोटय़ाशा प्रवासात मला खूप मोठय़ा कलाकृतीवर काम करण्याची संधी मिळाली आयएलएमचा ‘पायरेटस् ऑफ द करेबियन’ पिक्सार किंवा डिझ्नेचा अनुभव असलेल्या लेखक दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली शुअरली द स्क्वीरल्स’साठी समाविष्ट करण्यात आलं होतं. फ्रेम स्टोर या या लंडनस्थित स्टुडिओच्या ‘म्टेल्स ऑफ डेस्परेस्क्यू’मध्ये माझा सहभाग होता. गेल्या वर्षीच्या ‘नटी प्रोफेसर’ आणि ‘एव्हरीवन्स हिरो’ या चित्रपटांमध्ये मी अ‍ॅनिमेशन केलं. गेल्याच वर्षी मी सोनी पिक्चर्स या स्टुडियोमध्ये दाखल झालो आहे. हॉलिवूडमधील या स्टुडियोच्या नावाचा खूप दबदबा आहे. आमच्या ‘क्लाऊडी विथ द चान्स ऑफ मीटबॉल्स’चं काम पूर्ण झालेले आहे. जगप्रसिद्ध दिग्दर्शक ‘टिम बर्टन’ यांच्या ‘अ‍ॅलिस इन वंडरलँड’ चे काम मी सध्या करीत आहे. आणखीही बरेच प्रोजेक्ट सध्या माझ्याजवळ आहेत.
मला जेव्हा जेव्हा दिग्दर्शक एखादा शॉट अ‍ॅनिमेट करण्यासाठी देतात तेव्हा तेव्हा मी प्रथम माझ्यासाठी एक प्रश्नावली तयार करतो व त्या प्रश्नावलीनुरुप या शॉटमधील प्रत्येक पात्रांची पाश्र्वभूमी काय आहे? हे पात्र कथानकात किती कमी-अधिक प्रमाणात महत्त्वाचं आहे? चित्रिकरणाचा प्रसंग काय आहे? त्या प्रसंगाकडे पात्र कोणत्या नजरेने पाहात आहेत? वगैरे .. एकदा या प्रश्नांची उत्तरं तयार झाली की, स्वत:वर ते प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित करून घेतो. कल्पनाशक्ती हा या प्रवाहातला महत्त्वाचा भाग. तुम्ही कल्पनाशक्तीचे पंख किती पसरवू शकता यावर अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील तुमची भरारी मापता येते. प्रेक्षक चित्रपटातील पात्र ही मुळात निर्जीव आहेत हे विसरून त्या पात्रांच्या भावभावनांशी एकरुप होतात तेव्हा ती पात्र जेव्हा खऱ्या अर्थाने जिवंत होतात आणि तेव्हाच अ‍ॅनिमेटर्स यशस्वी होतो असे मला वाटतं.
rahuldab@hotmail.com