Leading International Marathi News Daily
रविवार, २८ जून २००९

दोन फुल एक हाफ
आणखी अकरा वर्षांनी- म्हणजे २०२० साली महाराष्ट्र कसा असेल, याची काळजी वाटून ‘स्टार माझा’ या वाहिनीनं एक परिसंवाद घडवून आणला. हा परिसंवाद झाल्यावर संगणकतज्ज्ञ विजय भटकर घरी गेले आणि त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या एका खास संगणकाला ‘२०२०- मराठी वृत्तपत्रे’ असा कळीचा शब्द विचारला. लगेचच संगणकाने २०२० सालच्या मराठी वृत्तपत्रांमधील महत्त्वाच्या बातम्यांची कात्रणं प्रिंटरला पाठविली. या बातम्यांमधून २०२० च्या महाराष्ट्राचं घडलेलं (प्र)दर्शन इथं मांडत आहोत-
कृषीमंत्री- पंतप्रधान भेट
केंद्रीय कृषीमंत्री सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे २० मिनिटे चर्चा केली.
 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत काल पंतप्रधान राहुल गांधी यांनी जाहीरपणे कृषी खात्याला जबाबदार धरले होते. त्याच संदर्भात कृषीमंत्र्यांनी ही भेट घेतली असल्याची चर्चा राजधानीत होती. परंतु सुप्रिया सुळे यांनी ‘आपली भेट पूर्वनियोजित होती’, असा खुलासा केला आहे. या भेटीनंतर पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; परंतु बगलेत फाईल धरून त्या लगबगीने निघून गेल्या.
देशमुख-राणे वादात श्रेष्ठींची मध्यस्थी?
अमित देशमुख आणि नीलेश राणे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे काँग्रेसमधील भांडणे पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली आहेत. ‘कोकण विकासाची स्वप्ने दाखविणाऱ्यांनी केवळ स्वत:चा विकास करून घेतला,’ अशी टीका सोमवारी अमित देशमुख यांनी नीलेश राणे यांचे नाव न घेता केली होती. या टीकेला उत्तर देताना नीलेश राणे यांनी, ‘मराठवाडय़ाच्या विकासासाठीचा निधी कुठे गेला, याची सर्व माहिती आपल्याकडे असून, योग्य वेळी ती आपण जाहीर करू,’ अशी धमकी अमित देशमुख यांचे नाव न घेता दिली आहे. अमित देशमुख यांचे वडील आणि काँग्रेसचे वयोवृद्ध नेते विलासराव देशमुख यांचा उल्लेख राणे यांच्या वृत्तपत्रात ‘पाजी मुख्यमंत्री’ असा छापून आला तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली. मुद्रणदोषामुळे ‘माजी’ या शब्दाऐवजी ‘पाजी’ असे छापून आल्याचा खुलासा नीलेश राणे यांनी केला होता. परंतु त्याने अमित देशमुख यांचे समाधान झाले नाही. आता या वादात श्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
राजकारण माझ्या रक्तातच- आदित्य ठाकरे
‘मी जरी कविता करीत असलो तरी माझा खरा पिंड आहे तो राजकारणाचा. कला आणि राजकारण दोन्ही माझ्या रक्तातच आहे,’ असे उद्गार आदित्य ठाकरे यांनी आज येथे काढले. ‘महाराष्ट्रा- माय फर्स्ट लव्ह’ या त्यांच्या इंग्रजी कवितासंग्रहाचे प्रकाशन आज येथे झाले तेव्हा ते बोलत होते. या कवितासंग्रहामधील ‘ओह! अंकल’ या कवितेच्या काही ओळी त्यांनी यावेळी वाचून दाखविल्या-
ओह! अंकल, यू आर द वन
हू डिव्हायडेड महाराष्ट्रा
द लाईन इज इन्व्हिजिबल
बट आय कॅन सी इट
लेट मी बी इरेजर
अ‍ॅण्ड लाईन विल डिसअ‍ॅपिअर.. ओह! अंकल!
या ओळींना उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.

साहित्य संमेलन अध्यक्षपद लॉटरीने?
साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा निर्णय ‘म्हाडा’च्या धर्तीवर लॉटरी पद्धतीने घेता येईल काय, याबाबत सध्या विचार सुरू असल्याचे कळते. सर्व जातींना समान संधी मिळावी म्हणून यापुढे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड साहित्याच्या फुटकळ निकषांवर (किंवा फुटकळ साहित्याच्या निकषावर) न करता जातींचाही विचार केला पाहिजे, असा एक प्रगत विचार पुढे आला आहे. या निकषामुळे अध्यक्षपदासाठी हजारो अर्ज येतील व निवडणूक कठीण होईल, त्यामुळे निवडणुकीऐवजी ‘लॉटरी पद्धत’ अधिक सोयीची ठरेल, असे म्हटले जात आहे. दरम्यान, साहित्य संमेलनात नृत्यस्पर्धा, गाण्यांच्या भेंडय़ा, वेशभूषा स्पर्धा, समूहगान स्पर्धा आयोजित करून संमेलनाचा ‘सॅनहोजे पॅटर्न’ भारतातही राबविला जावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
‘ढिसाळ क्षेत्ररक्षण ही काळजीची बाब’
‘भारतीय खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे; परंतु क्षेत्ररक्षणात आपण खूप मागे पडतो,’ अशी खंत ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आज येथे व्यक्त केली. सुनील गावसकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. ‘टेन-१० वर्ल्ड कप’पाठोपाठ पाच-५ षटकांच्या स्पर्धा आता सुरू होत आहेत आणि चीन, अमेरिका, जपान, फ्रान्स, रशिया या देशांनी ‘फाइव्ह-५’ क्रिकेटमध्ये नवे आव्हान उभे केले आहे, तेव्हा भारताने कसून तयारी केली पाहिजे, असे ते म्हणाले.
‘लालबागच्या राजा’साठी सरकता रस्ता
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. रांगेतील लोकांना दोन वेळचे जेवण पुरविणे, सकाळी दात घासण्यासाठी मंजन पुरविणे, या प्रकारच्या सोयी यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. परंतु या वर्षी गणेशभक्तांसाठी आणखी एक ‘खास सोय’ करण्यात येणार आहे. लालबाग गणेश मंडळ आणि एम. एम. आर. डी. ए. यांनी एकत्रितरीत्या गेट-वे ऑफ इंडिया ते लालबाग असा सरकता रस्ता बांधायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशभक्तांचे चालण्याचे कष्ट वाचतील. गणेशभक्तांनी या नव्या योजनेचे स्वागत केले आहे.

भावी पंतप्रधानांचा जन्म
पंतप्रधान राहुल गांधी यांच्या पत्नीने काल सकाळी आठच्या सुमारास भावी पंतप्रधानांना जन्म दिला. महाराष्ट्र काँग्रेस समितीने यासंबंधी आज एक ठराव केला आणि काँग्रेसपुढील महत्त्वाच्या समस्येचे निराकरण केल्याबद्दल पंतप्रधान राहुल गांधी यांचे आभार मानले.