Leading International Marathi News Daily
रविवार, २८ जून २००९

टिकलीएवढे देश
पंधरा वर्षांचं राष्ट्र
ही कहाणी आहे आणखी एका टिकलीएवढय़ा देशाची.. हा देश पॅसिफिक महासागरातला.. त्या देशाचं नाव पलाऊ.. कहाणीतलं गाव त्याच देशातलं.. खाऊनपिऊन सुखी असलेलं एक ज्येष्ठ जोडपं त्या गावात रहात होतं.. एक दिवस नवऱ्याला घरीच ठेवून त्या घरातली स्त्री कंदमुळं गोळा करण्यासाठी जंगलात गेली.. संध्याकाळ होताच घरीही आली, पण नवरा घरी नसल्याचं तिच्या लक्षात आलं.. तिनं शोधाशोध सुरू केली, पण थांगपत्ता लागेना.. नवऱ्याच्या नावानं तिनं हाका मारायला सुरूवात केली, पण व्यर्थ.. मग एकेका झाडाचं नाव घेऊन तिनं नवऱ्याला संबोधायला सुरूवात केली.. सगळी सगळी नावं घेऊन झाली, पण प्रतिसाद मिळेना..
थकूनभागून तिनं बसकण मारली आणि तिच्या लक्षात आलं, आपण बेलफळाचं नाव घ्यायला विसरलोय.. तिनं त्याही नावानं हाका मारायला सुरूवात केली, आणि काय आश्चर्य.. तिच्या त्या किंकाळीवजा आवाजानं त्या बेलवृक्षाची एक फांदी चक्क
 

वाकली.. पण ती फांदी इतकी वाकली, की त्या फांदीतून लाल रक्त ठिपकायला लागलं.. नवऱ्याचं नेमकं काय झालं असावं हे तिच्या लक्षात आलं.. त्या बेलवृक्षात परिवर्तित झालेल्या नवऱ्याच्या सोबतीनं मग तिनं एकाकी जगणं सुरू केलं.. एके दिवशी आपलं पोट दुखतंय, नव्हे आपल्याला दिवस गेले असावेत, असं तिला वाटायला लागलं.. तिची भीती खरी ठरली.. काही दिवसांनी तिनं एका मुलीला जन्म दिला.. हळूहळू मुलगी मोठी होत गेली, तिनं आपल्या वडिलांविषयीची विचारणा सुरू केली.. काय उत्तर द्यावं असा प्रश्न पडलेल्या त्या स्त्रीनं खूप वर्षांपूर्वीच वडिलांचं निधन झालं असल्याचं मुलीला सांगितलं.. त्यांची आठवण काढून उपयोगाचं नाही, अशी तिनं मुलीची समजूतही काढायचा प्रयत्न केला..
पण समाधान होणं शक्य नव्हतंच.. मुलगी शिस्तीची असल्यानं तिनं विचारणा करणं सोडून दिलं.. पण आईनं बेलफळाचं फळ खाऊ नकोस, असं आपल्याला का सांगितलं असावं याचं कोडं काही तिला उलगडत नव्हतं.. दिवस जात होते, तसतशी त्या मुलीची बेलाच्या झाडाविषयीची उत्कंठा वाढतच चालली होती.. एक दिवस आई कंदमुळं गोळा करायला गेली असताना तिनं फळ तोडलं, अन् ते फोडून खायचा विचारही सुरू केला.. हा विचार सुरू असतानाच आईचं तिथे येणं झालं.. आपलं बिंग फुटेल अशी भीती तिच्या मनात होतीच, पण आपण आईची एवढीही आज्ञा पाळलेली नाही, याचं विलक्षण दु:खही तिला होत होतं.. त्याच आवेगात फळाचे तुकडे तोंडात धरून तिनं समुद्राकडे धाव घेतली..
आपण काय केलं हे आईला कळणार नाही, असं तिला वाटत होतं.. पण आईचंच हृदय ते, काय झालं असावं हे तिनं ओळखलं आणि तीही मुलीच्या मागे धावत सुटली.. काहीही कर पण ते फळाचे तुकडे गिळू नकोस, असं आई सांगत असतानाच नकळत त्या मुलीनं समुद्रात प्रवेश केला.. आणि काय आश्चर्य.. एकाएकी तिचं रुपांतर समुद्रगायीत (Seacow) झालं आणि ती दिसेनाशीही झाली.. आजही आपण समुद्रगाय (Seacow) पाहतो तेव्हा तिच्या जबडय़ातले फुगवटे आपल्याला त्या मुलीच्या तोंडातल्या त्या बेलफळाच्या तुकडय़ांचीच आठवण करून देतात..
पलाऊची ही लोककथा ग्रामीण हस्तकलेचा एक अविभाज्य भाग बनून गेली आहे.. पलाऊच्या अशा असंख्य लोककथा तिथल्या कारागिरांनी चित्रकथांच्या रुपानं लाकडावर केलेल्या कोरीव कामांमध्ये कोरून ठेवल्या आहेत.. परदेशी पर्यटक पलाऊमध्ये येतात, तिथल्या कारागिरांनी बनवलेले हस्तकलेचे नमुने विकत घेतात, तेव्हा त्यांना या अशाच लोककथा लाकडांवर कोरलेल्या अवस्थेत मिळतात..

पलाऊ हा ३०० द्वीपांचा समूह.. पण त्यातल्या नऊ द्वीपांवरच मानवी वस्ती आहे.. तसा तो वसला आहे फिलिपिन्सपासून पूर्वेस ५०० मैल अंतरावर आणि जपानपासून दक्षिणेस २००० मैल अंतरावर.. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विश्वस्तपदातून मुक्त झाल्यानंतर पलाऊला स्वातंत्र्य मिळालं ते १९९४ साली.. त्यामुळे त्याची गणना होते ती जगाच्या पाठीवरील सर्वात तरूण आणि सर्वात लहान देशांमध्ये. पलाऊ आकारानं ४५९ चौरस किलोमीटरचा.. लोकसंख्या अवघी २१ हजार.. मोठं शहर कोरोर, राजधानी मात्र मेलेकिओक.. पलाऊची दोनतृतीयांश लोकसंख्या राहते कोरोरमध्ये.. पलाऊ विभागला गेला आहे १६ छोटय़ाछोटय़ा राज्यांमध्ये.. त्यातलं सर्वात मोठं राज्य ऐमेलिक, आकार अवघा ५२ चौरस किलोमीटर.. आणि सर्वात छोटी राज्यं तीन.. प्रत्येकी तीन चौरस किलोमीटर क्षेत्रफळाची.. त्यातल्या हॅटोहोबाईची लोकसंख्या अवघी ४४..
इंग्रजी आणि पलाऊन या पलाऊच्या अधिकृत भाषा.. पण याखेरीज तिथली सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे जॅपनीज.. त्याशिवाय अंगौर, सॉन्सॉरोलिज, टोबियन, कॅरोलिनियन, फिलिपिनो आणि चायनीज या भाषांनाही प्रादेशिक भाषा म्हणून मान्यता आहेच. पलाऊ अलीकडे चर्चेत आहे तो सव्‍‌र्हायव्हर या चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे.. मरीन बायॉलॉजिस्ट्समध्ये आणि स्कूबा डायव्हर्समध्ये पलाऊ विशेष लोकप्रिय आहे.. पलाऊला जाता येतं ते गुआम, तैपेई, टेकियो आणि मनिला येथून थेट विमानानं.. कॉन्टिनेन्टल, फार इस्टर्न आणि जपान एअर लाइन्सची विमानं तिथं जाण्यासाठी थेट उपलब्ध आहेत.. त्यातलं फार इस्टर्न सर्वात स्वस्त.. पलाऊचं हवामान वर्षभर आल्हाददायक असतं.. दिवसा आणि रात्रीही त्यात फारसा फकर पडत नाहीच, पण महिनोन्महिनेही ते तसंच राहतं.. अपवाद फक्त ऑगस्टचा.
पलाऊ हे जगातलं सर्वात तरूण राष्ट्र.. त्याचा शोध लागला १५४३ मध्ये.. त्याला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळालं ते १९९४ मध्ये.. अगदी प्रारंभी पलाऊ ही स्पेनची वसाहत होती.. पुढे ती जर्मनीची झाली, कालांतरानं ती जपानची झाली, मग अमेरिकेची झाली आणि आता ती आहे संपूर्ण स्वतंत्र.. पण स्वतंत्र असली तरी संरक्षण आणि परराष्ट्र संबंध हे विषय आजही अमेरिकेच्याच आधीन आहेत. चलनही अमेरिकेचंच आहे.. पलाऊचा निसर्ग नितांतसुंदर आहे. तिथला समुद्र तर डायव्हिंग करणाऱ्यांसाठी संपूर्ण सुरक्षित आहे.. पलाऊमध्ये बहुतांश लोकसंख्या वसली आहे ती अंगौर, कोरोर, बॅबेलडॉब आणि पेपेलिऊ या बेटांवर. बॅबेलडॉब, कोरोर आणि पेपेलिऊ ही बेटं शेजारीशेजारी असली तरी अंगौर काहीसं लांब आहे.. पलाऊचा किनारा पर्यावरणदृष्टय़ा निकृष्ट नसला तरी डायनामाइट वापरून केली जाणारी मासेमारी, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत असलेल्या अडचणी, वाळू आणि प्रवाळांसाठीचं खोदकाम आणि ग्लोबल वॉर्मिगमुळे या निसर्गसुंदर किनाऱ्यालाही धोका संभवतो आहेच.. पलाऊमध्ये पिण्यायोग्य पाण्याची चणचण आहेच, पण कृषीयोग्य जमीनही कमी आहे.. या शिवाय भूकंप, ज्वालामुखी आणि मोसमी वादळं यांचीही भीती सतावत असतेच..
पलाऊची अर्थव्यवस्था बहुतांश आधारलेली आहे ती पर्यटनावर, पण त्याचबरोबर कृषी आणि मासेमारीचाही हातभार कमीअधिक प्रमामात आहेच.. पलाऊची लोकसंख्या २०-२१ हजार, पण पलाऊला प्रतिवर्षी भेट देणारे पर्यटक आहेत किमान ६० ते ६५ हजारांच्या घरात.. पलाऊत रेल्वे नाही, रस्ते आहेत सगळेमिळून ६१ किलोमीटर लांबीचे.. त्यातले निम्मेच पेव्हर सुविधांचे, बाकी कच्चे.. ड्रायव्हिंग उजव्याबाजूने, कमाल वेग ४० किलोमीटर इतकाच.. बेटाबेटांवर जायचं तर बोटीनं प्रवास करावा लागतो.. वर उल्लेख झाला सव्‍‌र्हायव्हरच्या शूटिंगचा, पण १९६८ चा, ली मार्विन आणि तोशिरो मिफूनचा दुसऱ्या जागतिक महायुद्धावरचा हेल इन द पॅसिफिक संपूर्णपणे चित्रित झाला तो पलाऊच्याच धरतीवर.. त्याशिवाय अनेक टीव्ही मालिकांसाठी पलाऊची धरती वापरली गेली आहे ती वेगळीच..
पलाऊचं दरडोई उत्पन्न आहे ५८०० डॉलर.. तिथे दारिद्रय़रेषेखाली राहणारे कुणी नाहीतच.. बेरोजगारीचा दर आहे अवघा ४.२ टक्के आणि चलनवाढ आहे ३.४ टक्के.. वीज जेवढी बनवली जाते तेवढीच वापरलीही जाते.. वीजेची आयात वा निर्यात करावी लागतच नाही.. कृषी उत्पादन प्रामुख्याने नारळ, खोबरं, टॅपिओका आणि गोड बटाटे.. निर्यात १८ दशलक्ष डॉलर्सची.. विदेशी कर्ज शून्य डॉलर.. अमेरिकेकडून अर्थसहाय्य मिळतं ते १५५.८ दशलक्ष डॉलर्सचं.. पलाऊत अध्यक्षीय राजवट आहे.. जॉन्सन टोरिबिओंग अध्यक्ष आहेत, तर केराई मारिअर उपाध्यक्ष.. संसद सदस्य आहेत १६.. पलाऊतलं मरण खूप महाग आहे.. मरणानंतरचे पुढचे सारे विधी सात दिवस चालतातच, पण मेलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला गावजेवणासाठी, दफनासाठी करावा लागणारा खर्च पुरती दमछाक उडवणारा असतो.. पलाऊ काय आणि भारतातलं ग्रामजीवन काय.. जन्म-मरणाबरोबर, लग्न-मुंजीबरोबर जोडले गेलेले अनावश्यक खर्चाचे उपचार सर्वदूर सारखेच..
sumajo51@gmail.com