Leading International Marathi News Daily
रविवार, २८ जून २००९

वाद-चर्चा
‘दुर्मिळ’ की ‘दुर्मीळ’?
‘लोकरंग’ पुरवणीतील (१७ मे) ‘वादचर्चा’ सदरातील ‘दुर्मिळ’ शब्दाबद्दलचा अरुण फडके यांचा प्रतिवाद वाचला. या संदर्भात मी पुढीलप्रमाणे खुलासा करू इच्छिते-
१) मराठीत अ-कारान्तापूर्वीचा (म्हणजे उपान्त्य) ‘इ कार’ दीर्घ असतो व उपान्त्यपूर्व उकार ऱ्हस्व असतो, हा नियम सरसकट लागू केल्यास, ‘दुर्गुण’ किंवा ‘मंदिर’ हे शब्दही ‘दुर्गूण’, ‘मंदीर’ असे लिहावे लागतील. म्हणून प्रत्येक शब्दाची जडणघडण व व्याकरण लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांचे वर्णलेखन (२स्र्ी’’्रल्लॠ) ठरवावे लागते.
 

२) ‘दुर्मिळ’ (किंवा दुर्मीळ) या शब्दाची ‘दुर्बीण’, ‘ठरावीक’, ‘लवचीक’ इ. शब्दांशी तुलना करणे अयोग्य आहे. कारण त्या सर्वाचीच जातकुळी वेगवेगळी आहे. ‘दुर्बीण’ हा शब्द ‘दूरबीन’ (दूरचे पाहणारा) या फारशी शब्दाचे अपभ्रष्ट रूप आहे. ‘ठरावीक’ (ठराववाईक), ‘लवचीक’ हे शब्द ‘वाईक/ ईक’ प्रत्ययान्त साधित विशेषणे असून ते सामासिक शब्द नाहीत. त्यामुळे ‘दुर्मिळ’ शब्दाशी त्यांची तुलना करणे अप्रस्तुत ठरते, ३) मुख्य प्रश्न हा आहे की, ‘मिळणे’ या क्रियापदातील मूळ धातू कोणता? यासंबंधी, व्याकरणकारांतच मतमतांतरे आहेत. मो. स. मोने यांच्या ‘मराठी साहित्य व व्याकरण’ या पुस्तकातील ‘क्रियापदे’ (पृ. ३२) प्रकरणात ‘धातु’ची व्याख्या पुढीलप्रमाणे दिली आहे-
‘‘ज्या क्रियावाचक शब्दास काही प्रत्यय लागून क्रियापद बनते त्यास ‘धातु’ म्हणतात. उदा. वाच (णे), बस(णे), इ. याप्रमाणे, आज्ञार्थी, द्वितीय पुरुषी, एकवचनी जे रूप असते ते रूप क्रियापदातील ‘धातु’ असतो.’’ या व्याख्येनुसार ‘मिळणे’मधील मूळ धातु ‘मीळ’ (दीर्घादी) हाच ठरतो. (उदा. तू शत्रूला जाऊन मीळ.) मो. के. दामले यांच्या ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ या ग्रंथात अध्याय ६- ‘क्रियापदे’ या प्रकरणात ‘धातु’ या संज्ञेची स्पष्ट व्याख्या दिलेली नाही, पण त्यांनीही वरील व्याख्याच गृहीत धरली असावी असे त्यांच्या उदाहरणावरून दिसते. (पृ. ४२०-४२१- पी (धातु)- पिणे (क्रियापद), नीघ-निघणे, शीर-शिरणे, मीळ- मिळणे, झीज- झिजणे इ.) येथवरचे विवेचन अरुण फडके यांच्या पक्षाला अनुकूल असेच आहे.
४) तथापि, हेच मो. के. दामले दुसऱ्या ठिकाणी वेगळेच सांगतात. ‘अध्याय- ४- प्रत्ययघटित साधित शब्द- उपविषय : निव्वळ मराठी कृदन्ते अथवा धातुसाधिते’ या प्रकरणात (पृ. ४९८-४९९) ते म्हणतात-
‘‘(अ) असे क्रियावाचक नाम साधताना मूळ धातूतील उपान्त्य ‘इ’ व ‘उ’ हे दीर्घ होतात. उदा. फुट (णे)- फूट, लुट(णे)-लूट, भुल (णे)- भूल इ. (आ) काही ठिकाणी उपान्त्य ऱ्हस्व ‘इ’ला व ‘उ’ला गुण झालेला आढळतो. जसे मिळ (णे)- मेळ, फिर(णे)- फेर, झुक(णे)- झोक इ.’’
वरील विवेचनात, मो. के. दामले यांनी मूळ धातु ऱ्हस्वादी (फुट, लुट, मिळ, इ.) असल्याचे गृहीत धरले आहे हे उघड आहे, म्हणून मो. के. दामले यांच्या परस्परविसंगत विधानांपैकी जे अधिक सयुक्तिक ते स्वीकारणे भाग आहे. माझ्या मते, ‘मिळणे, निघणे, शिरणे इ.सारख्या क्रियापदांची जवळजवळ सर्व रूपे ऱ्हस्वादी असून, फक्त द्वि. पु. ए. व. - ‘मीळ, नीघ, शीर’ हीच रूपे तेवढी अपवादाने दीर्घादी असल्याने, त्यातील मूळ धातूदेखील ऱ्हस्वादी मानणे योग्य ठरते. अरुण फडके यांचे म्हणणे ग्राह्य़ मानल्यास, ‘दुर्मीळ’ हा सामासिक शब्द ‘मीळण्यास कठिण’ असा सोडवावा लागेल. प्रत्यक्षात ‘मिळण्यास कठिण’ असा त्या समासाचा विग्रह केला जातो, म्हणून ‘दुर्मिळ’ हेच वर्णलेखन ग्राह्य़ मानावे लागेल असे वाटते. ५) मूळ संस्कृतच्या परंपरेचा मागोवा घ्यायचा झाला तर, ‘मिल्’ या धातूचा १. एकत्र येणे २. प्राप्त होणे असा अर्थ आहे, तर ‘मील’ या धातूला ‘मिटणे’ असा अर्थ आहे.
- सत्त्वशीला सामंत, पुणे
(हा वाद आम्ही इथेच संपवत आहोत.)

कार्यकारणभावाशिवाय कथा कणाहीन
‘लोकरंग’ (१४ जून) ‘झालं मनासारखं’ ही अरुण नासिककरांची कथा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कथेत पती-पत्नी विभक्त होण्याचा निर्णय घेतात. एकमेकांपासून दूर जाण्याच्या वेळचे त्या दोघांच्या मन:स्थितीचे यथायोग्य चित्रण लेखकाने केले आहे. परंतु या निर्णयामागचे कारण अज्ञातच राहते. कार्यकारणभावाशिवाय घटनांचे नीट आकलन होत नाही. यामुळे ही कथा पोकळ, कणाहीन ठरते.
पी. बी. गुरव, सातारा.