Leading International Marathi News Daily
रविवार, २८ जून २००९

पुस्तकचे पान
।। तेलिया नव्हे, तेलयोद्धा ।।

‘ते ल नावाचा इतिहास’ लिहिणाऱ्या पत्रकार गिरीश कुबेर यांनी, याच इतिहासातल्या मुख्य तेलयोद्धय़ाची, शेख अहमद झाकी यामानींची ‘सौदी अरेबियन’ सुरस तरीही सत्य कथा सादर केली आहे, ‘एका तेलियाने.’ तसा पहिला तेलिया होता इराणच्या साधनसंपत्तीसाठी लढणारा महंमद मोसा देघ. सौदी अरेबिया तर जणू तेलाच्याच समुद्रावर तरंगणारा देश! सौदी अरेबियाच्याच नव्हे तर एकूणच जगाच्या तेलाच्या गरजेसाठी लढणाऱ्या, तेल असलेल्या- त्याहूनही तेल नसलेल्या देशांच्या हितांचं रक्षण करणं, ही जबाबदारी
 

आयुष्यभर जपत, चलाख परकीय अन् अज्ञानी स्वकियांच्या विरोधात तेलाचं युद्ध लढणाऱ्या योद्धय़ाची ही कहाणी. कोणत्याही देशात सर्वसत्ताधीशाला मोडता घालायचा तर, मोठी छाती अन् शुभ्र चारित्र्य लागतं.. ते सोपं नसतं. सौदीसारख्या देशात तर नाहीच नाही!
वाळवंटात उंटांच्या काफिल्यावर मोलमजुरी करताना अफाट स्वप्न पाहणाऱ्या ‘अब्दुल अझीझ इख्न सौद’ या मुलाने, वयाच्या विशीतच १९०२ साली ‘रियाध’वर चाल करून ते वाळवंट आपल्या अमलाखाली आणलं. १९२४-२५ मध्ये पवित्र ‘मक्का-मदिने’वर ताबा मिळवून, ‘काळं सोनं’ देणारी संपन्न भूमी ‘अक्षरश:’ आपल्या नावावर केली. ‘सौदी अरेबिया.’ त्याचे २१,०० वंशज आज या भूमीवर नांदत आहेत. प्रत्येकाच्या १५-२० बायका, प्रत्येकीला १५-२० अपत्ये! केवळ ‘अब्दुल अझीझ इब्न सौद’चीच मुलं ‘शेख’ असण्याच्या नियमाला अपवाद होता, ‘शेख’ अहमद झाकी यामानीचा. ३० जून १९३० रोजी मक्केतल्या कुराणकुलोत्पन्न कुटुंबात जन्मलेला हा सामान्य मुलगा, अल्लाला मानणारा. शाळेत असताना राजपुत्र फैझल याच्याकडून त्यानं बक्षीस स्वीकारताना, भविष्यात दोघे मिळून तेलाच्या अर्थकारणात उलथापालथ करणार आहेत, याची कल्पना तेव्हा कशी असणार! प्रथम ‘कैरो’ आणि नंतर ‘हॉर्वर्ड’ विद्यापीठांतून पदव्या प्राप्त करून १९५६ साली यामानी सौदीच्या तेलखात्यात रुजू झाला, अन् लवकरच राजपुत्र फैझलचा ‘कायदेशीर सल्लागार’ झाला!
त्यावेळी सौदीची अर्थव्यवस्था कशी होती? येता-जाता गावकऱ्यांवर नोटांची पुडकी उधळणारे राजे इब्न सौद, राजवाडय़ातल्या बेहिशेबी सोन्याच्या बिस्किटांच्या पोत्यांकडे बोट दाखवून म्हणत, ‘ही माझी अर्थव्यवस्था!’ आयुष्याच्या अखेरीस डोळ्यादेखत इस्रायलची निर्मिती झाली, तेव्हा यहुद्यांना मदत करणार नाही या अमेरिकेने दिलेल्या वचनभंगाचं दु:ख घेऊन, ते ९ नोव्हेंबर १९५३ ला पैगंबरवासी झाले. तत्पूर्वी, २२ मार्च १९५२ ला राजे फैझल यांनी राज्यकारभार हाती घेतला, तेव्हा तिजोरीत खडखडाट होता! अशा वेळेस ‘महंमद बीन अवद बीन लादेन’ हा बांधकाम कंत्राटदार पाठीशी उभा राहिला. तेव्हा कृतज्ञता म्हणून सौदीतल्या सर्व मशिदींचं बांधकाम त्याच्या कंपनीला मिळण्याची व्यवस्था केली गेली. आज लादेन कुटुंब अब्जाधीश आहे. त्याच्या १० व्या बायकोपासून झालेला, ५४ मुलांतला १७ वा मुलगा, ‘ओसामा बीन लादेन!’
१९६२ साली, वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी, अहमद झाकी यामानी जगातील सर्वात मोठय़ा तेलसंपन्न आणि.. ज्वालाग्रही देशाचा लेतमंत्री झाला. अन् लवकरच ‘जेदाह’ येथे तेल उद्योगाचं प्रशिक्षण देणारं, University of Petroleum & Minerals उभं राहिलं. सुरुवातीला दहाच विद्यार्थी असणाऱ्या या विद्यापीठातून आज दरवर्षी, आसपासच्या वाळवंटातले ५००० विद्यार्थी बाहेर पडतात! यामानींनी जेव्हा रुमानियाशी ‘तेलाच्या बदल्यात धान्याचा’ करार केला तेव्हा, अमेरिकन गोटातल्या देशाचा रशियाशी करार हा अमेरिकेला धक्का होता. नंतर जेव्हा, ‘ज्या देशातून तेल काढलं जातं, त्या देशाला तेल व्यवसायात सहभागाची संधी हवी’, ही मागणी त्यांनी बैरुत येथील अमेरिकन विद्यापीठातल्या व्याख्यानात उच्चारली, तेव्हा बाँब फुटावा तसा तेल उद्योगाला हादरा बसला. अन्यथा, ‘तेल कंपन्यांचं संभाव्य राष्ट्रीयीकरण’ ही टांगती तलवार होतीच. यामानी म्हणत, ‘माझ्या सभ्यपणाला अमेरिका दुबळं मानते!’ नंतर मुल्लामौलवींना हाताशी धरून उकअ च्या साहाय्याने, सद्दाम हुसेन, ओसामा लादेन, आयातुल्ला खोमेनी या बाळांना अमेरिकेनेच मोठं करून, घातक खेळांत तेल ओतलं!
तत्पूर्वी १९५९-६० च्या सुमारास स्थापन झालेल्या,'OPEC' अर्थात् 'Organisation of Petroleum Exporting Countries च्या केंद्रस्थानी होता सौदी अरेबिया आणि तेव्हाचे तेलमंत्री अब्दुल्ला तारिकी. त्यांच्या जागी नंतर आले यामानी. त्या सुमारास जगाची दोन गटांत विभागणी झाली होती.
अमेरिका आणि रशिया हे दोन विश्वगुंड त्यांचे म्होरके! १९६७च्या इस्रायलने केलेल्या अरबांच्या पराभवाची जखम नेहमीच ठुसठुसत असते. १९७२च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये इस्रायली फुटबॉल संघाचं, ‘ब्लॅक सप्टेंबर’ या पॅलेस्टिनी संघटनेनं केलेलं शिरकाण आणि नंतर इस्रायलच्या ‘मोसाद’ या गुप्तहेर संघटनेने त्या प्रत्येक दहशतवाद्याला वेचून ठार मारणं, हा नंतरचा सूडाचा प्रवास. ६ ऑक्टोबर १९७३ ही इस्रायलवरील हल्ल्याची तारीख अरबांनी ठरविली. अमेरिका उघडपणे इस्रायलच्या बाजूने युद्धात उतरल्यावर, रशियाने अरबांना दरवाजे उघडले. या तेलसंपन्न भागात रशियाची घुसखोरी अमेरिकेला नको होती. या युद्धासाठी दोन्ही देशांनी ‘अणुयुद्धसामग्री’ जमविली होती, हे नंतर जेव्हा उघडकीस आलं तेव्हा जग हादरलं. युद्ध १६ दिवसांत संपलं.. नव्हे तिसरं भीषण महायुद्ध टळलं!
नंतर अमेरिकेला नामोहरम करण्यासाठी उगारलेल्या तेलास्राचे परिणामदेखील भीषणच होते. युद्धापूर्वी बॅरलला तीन डॉलरचा भाव युद्धानंतर बारा डॉलर्सवर पोहोचला. जपानला तेल अमेरिकेच्या आधारे मिळायचं. त्यांच्या अर्थव्यवस्थेला जबर दणका बसला. साधे उद्योगधंदे बंद पडले. टॉयलेट पेपरचंदेखील रेशनिंग झालं! फ्रान्स, इंग्लंड, जर्मनीने ‘सूट’ मिळण्यासाठी यामानींना सन्मानाने त्यांच्या देशात बोलावलं, तसं जपाननेदेखील यामानींना टोकियोत खास आमंत्रण दिलं. अन् त्यांच्या स्वागतासाठी साऱ्या परंपरा झुगारून देऊन जपानचे सम्राट सामोरे आले! मुळात यामानीच या तेलास्राला अनुकूल नव्हते. कारण सामान्य माणूस इतर विचार न करता अरब देशांवर राग व्यक्त करेल अन् अरब व जगातील दरी आणखी वाढेल, ती त्यांना नको होती. तरीही दुर्दैवाने अमेरिकाधार्जिण्या देशांत यामानी नेहमीच खलनायक ठरले, अन् अरब राष्ट्रांत ते अमेरिकाधार्जिणे मानले गेले. कडव्या मुसलमानांना तर यामानी सतत सलत असत. जेव्हा २५ मार्च १९७५ रोजी, ‘जाणता राजा’ फैझल यांची त्यांच्याच महालात हत्या झाली, तेव्हा यामानींचं कवचच गेलं!
२१ डिसेंबर १९७५च्या OPEC च्या बैठकीतून दहशतवादी ‘कार्लोस द जॅकल्’ने चाळीसेक प्रतिनिधींचं विमानाने अल्जियर्स येथे अपहरण केलं. तेथूनही मृत्यूला हुलकावणी देऊन यामानी जेव्हा ‘जेद्दाह’ विमानतळावर उतरले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी ‘रत्नजडित रोल्स रॉईस’ घेऊन राजे खालिद हजर होते! नंतर तेलाच्या अर्थकारणावरचा राजकारणाचा तवंग दूर झाला, अन् सौदीसारखे देश पैशाच्या प्रवाहात गुदमरायला लागले. विमाने, शस्त्रास्त्र खरेदीचा नवश्रीमंतांचा तो काळ. ‘बोफोर्स’मध्ये बदनाम झालेल्या ‘अदनान खशोगी’सारखे दलाल याच काळातले. अमेरिकेत तर शस्त्रास्त्र उद्योजकांची प्रभावी लॉबी नेहमीच कार्यरत असते, राजकारणाची दिशा ठरविते. मात्र तेलाच्या बदल्यात ‘अव्ॉक्स’ युद्धविमानांसाठी राजे फहाद यांनी अमेरिकेशी करार केला तेव्हा, यामानींनी सौदी तेलमंत्रालयातून आवराआवरीला सुरुवात केली.. एका कडव्या वास्तवात त्यांची मुत्सद्देगिरी जळून खाक होणार होती! २२ ऑक्टोबर १९८६ रोजी टीव्ही बातम्यांतून त्यांना तेलमंत्रीपदावरून काढल्याचं कळलं, तेव्हा ते शांत होते, मात्र.. न्यूयॉर्कचा शेअर बाजार गडगडला, जपानी येनचं अवमूल्यन झालं. नंतर ‘टाईम’ मासिकानं कव्हर स्टोरी कली. `A Good bye to Mr. Oil!' स्वत:च्या विमानातून फिरणाऱ्या, सम्राटाप्रमाणे राहणाऱ्या ‘कुबेर’ यामानींवर आता ‘कुराण-अध्ययनांतून आलेली अध्यात्मिकतेची साय पसरली आहे!’
गिरीश कुबेर यांची ‘ही’ भाषा शुद्ध तेलाप्रमाणेच प्रवाही आहे, ज्यामुळे इतर कथानकांचे उपप्रवाह सहज मिसळून जातात. तरीदेखील अधनंमधनं, ‘इब्नसौदला पटवायचं असेल तर आधी शंकराच्या नंदीला, फिल्बीला गटवायला हवं,’ ‘यामानीचे वडील सर्वमान्य पंडित, तर घरात सर्व सरस्वतीपूजक’, ‘यहुद्यांना रामप्रहरीच यवनांच्या हल्ल्याला तोंड द्यावं लागलं’- अशी प्रदूषित वाक्यरचना ओलांडून पुढे जावं लागतं, हा किरकोळ दोष, मानला तर. एरवी मात्र तेलियाचे हे ‘इंधन’ भरल्याशिवाय वाचकाला गती नाही! एकच वाटतं, एका कोळियाने (पु. ल. देशपांडे), एका खेळियाने (दिलीप प्रभावळकर) टाईप ‘एका तेलियाने हे शीर्षक साधम्र्य कशासाठी? कारण सामान्य तेलियापेक्षा यामानी हा तेलाच्या इतिहासातला लढवय्या ‘तेलयोद्धाच’ वाटतो!
एका तेलियाने
गिरीश कुबेर
प्रकाश : राजहंस प्रकाशन, पुणे,
पृष्ठे : २५०, मूल्य : २००रुपये
प्रभाकर बोकील

संघर्षांची कहाणी
शिक्षक व पुस्तके काय घडवू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे भालचंद्र मुणगेकर यांचं ‘असा मी घडलो’ हे आत्मचरित्र होय. अतिशय प्रांजळपणे टिपकागदाप्रमाणे सर्व घटना टिपणारं, भाषेचा डोलारा, उपमा, अलंकार याचा कृत्रिम स्प्रे नसलेला हा वास्तवाचा दस्तऐवज ज्यात मी नसून आम्ही, आमचं नसून आपलं याचंच प्रतिबिंब दिसतं. ही केवळ ‘कुलगुरू’ पदापर्यंत पोहोचल्याच्या हर्षांची कहाणी नव्हे तर संघर्षांची कहाणी आहे. कुलगुरू हा केवळ शिक्षण व्यवस्थेचा ‘बायप्रॉडक्ट’ नसून समाजव्यवस्थेने घडविलेलं शिल्पही असू शकतं याची प्रचीती येते. मूलभूत प्रेरणा समाजव्यवस्थेतूनच घडतात. सामाजिक व्यवस्थेतून आवश्यक ते खत, पोषण मिळालं तर जात दुय्यम ठरून ती यशावर, नियतीवर मात करते.
सांगण्यासारखं आशयसमृद्ध, रंगीबेरंगी, इंद्रधनू कथानक असताना सगळा सारीपाट उलगडून न दाखवता केवळ १८ वर्षांपर्यंतचा ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ चित्रपट उलगडून दाखविण्याचा संयमितपणा कौतुकास्पद आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात अनेकांच्या प्रतिभा फुलतात, पण पुढील आयुष्यात गुणात्मकरीत्या अथवा मूलभूतपणे मी नवीन काही शिकलो असे मला वाटत नाही. हा व्यवस्थेशी प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आहे. ४४ वर्षांपूर्वीच्या आठवणी व त्यातून जगण्याच्या मूलभूत प्रेरणा व पुढे त्याचा विस्तार. व्यक्ती, संस्थांमुळे निखालसपणे अधिक पक्क्या झाल्या. मी अनेकांच्या त्यागातून उभा राहिलो. उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट पुस्तके, पुस्तकातील धडे यामधून मानसिक उभारणी, प्रेमातून आत्मविश्वास निर्माण करणारं कोकणचं समृद्ध वातावरण ही शिदोरी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मी कुठेच डोकावत नाही. प्रज्ञा किंवा वरून आज्ञा असल्याशिवाय मोठी पदे मिळणे तसे दुर्मिळच, पण या अर्थतज्ज्ञाची पाळेमुळे खूप खोलवर, समाजव्यवस्थेमुळे अशी काही पोसली गेली आहेत की, वृक्ष बहरणारच. प्रत्येकाच्या आयुष्याचा गुलमोहर होणं किंवा निवडुंग होणं या समाज व्यवस्थेच्या पोषणावरच अवलंबून असावं. मराठी साहित्य, धडे, कविता, पाठांतर, दुसरीतच बालरामायण पाठ होणं, वर्गात पहिला येण्याचा निश्चय करणं व अमलात आणणं, पाचव्या वर्गात असताना भाषण, १०-११ तास सतत अभ्यास ही चुणूक अडीच-तीन हजार वस्तीच्या मुणगे गावातही असू शकते. सबंध आयुष्यभर पुरेल इतका आत्मविश्वास ज्या शाळेने, शिक्षकांनी दिला त्यांचा कित्ता आजच्या व्यवस्थेने गिरवायला हवा. आहेत का अशी पाठय़पुस्तके, त्यातले धडे, कविता, ज्याने मुणगेकर घडले? याचा पाठय़पुस्तक निर्मिती व संशोधन मंडळाने विचार करावा. मुणगेकरांचं जीवन म्हणजे आजच्या पिढीसाठी श्रमसंस्कार आहे. आबा, त्यांचे सर्वस्व ज्यांनी त्यांना घडविले, अशी व्यक्तिमत्त्वे निपजण्यासाठी आबाच हवेत. समाजव्यवस्थेपासून नाळ तुटलेले रोबो नकोत.
जीवननिष्ठा पक्क्या करण्यामध्ये चैत्यभूमी, नवभारत विद्यालय व नंदादीप हे वि. स. खांडेकरांचं निवासस्थान या ठिकाणी जाऊन कृतज्ञता व्यक्त करणं हे कर्मकांड नव्हे तर कर्तव्यकांड आहे.
‘सामाजिक भावना हा विकसनशील मानवी जीवनाचा आत्मा आहे’ हे सांगणारे वि. स. खांडेकर प्रमाण मानणं, ‘क्रौंचवध’मधील विलक्षण प्रभावामुळे रिझव्‍‌र्ह बँकेची नोकरी सोडणं हे सामान्य माणसाचं काम नव्हे. वयाच्या सातव्या वर्षी शाळेत दाखल झाल्यानंतर तिसरीला काठावर पास झाल्यानंतर चौथीपासून पहिला येण्याचा निर्णय निश्चयपूर्वक अमलात आणला. आबांबरोबर नारळ व सुपाऱ्याही विकल्या, पण तर्खडकरांची तीन भाषांतरे पाठ करणे, पहिलीत सगळी मुळाक्षरे, बाराखडी, शंभपर्यंतचे आकडे वळणदार अक्षर यासाठी पोषक वातावरण, शिक्षक यामुळेच हे शक्य झाले. दुसरीतील मुलांना वर्षभर शाळा सुटल्यावर भगवतीच्या देवळात नेऊन बसवले जाई आणि त्यांना बालरामायणाची संपूर्ण गोष्ट सांगितली जाई. रामायणाची गोष्ट सांगणे हे अभ्यंकर मास्तरांचे व्रतच होते. त्यामुळे दुसरीतच संपूर्ण बालरामायण पाठ होणं हे संस्कार व्यक्तिमत्त्वाला आकार देणारेच. पहिल्या नंबरने पास होण्याचा निश्चय पुरा करण्यासाठी अनुकूल गोष्ट, देवाने पाठविलेली भेट म्हणजे पोलाजी आडकरांचे वर्गशिक्षक म्हणून लाभणे. सगळेच विषय शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. कविता चाल लावून, पेटी वाजवून शिकविणे त्यामुळे त्यांचं आयुष्यभर स्मरण राहणं, महात्मा जोतीराव फुलेंचा धडा, शिरीषकुमारवरचा धडा असे अनेक धडे लक्षात व स्मरणात राहणं, तिसरीत गणिताशी फारसं व जमणं. ‘हातचे त्रास देत’ पण चौथीपासून त्यांनी हातच्यांनाच हात दिला व पाटीवर घातलेली गणिते तोंडी सोडवून अर्थतज्ज्ञापर्यंतचा प्रवास उल्लेखनीयच. ‘आईची माया’ गोष्टीने त्यांना अस्वस्थ केले. चित्रे मास्तरांमुळे संस्कृत, आडकर मास्तरांमुळे मराठी व्याकरण, सुधारले. सततच्या पहिल्या नंबरमुळे आत्मविश्वास वाढणे व त्यामुळे ते कौतुकाचा विषय झाले. मराठी, इंग्रजी आणि संस्कृतमधील शब्दांचे उच्चार कसे करायचे हे चित्रेसरांमुळेच शक्य होणं, एकशे अकरा शतकांचे ‘मेघदूत’ हे कालिदासाचे अजरामर काव्य असल्याचे दहावीतच माहिती होणं हे श्रेय शिक्षकांचेच. सरांनी शिकविलेल्या कविता, धडे मनात अशा कायमच्या घर करून राहिल्या. एक वर्ष इंग्रजी शिकवून ठाकूरसरांनी मनात मानवी जीवनाविषयी एका व्यापक दृष्टिकोनाचा पाया घातला. असे एकेक श्रद्धास्थान होत गेले.
`Men are not born they are made' असे म्हणणारा दिलीप त्यांचा आदर्श झाला. खांडेकरांची ‘क्रौंचवध’ आवडती कादंबरी झाली. ‘आम्ही मुणगेकरला शिकवले नाही, त्याचे वाईट वाटते’, असे काही शिक्षक म्हणत.
नाटक, सिनेमा, गाणी यांचं प्रचंड वेड त्यांना होतं. आई नसताना ‘श्यामची आई’ पाहून हेलावून जाणं, रेडिओ नसतानाही कुणाच्या तरी घराबाहेर उभं राहून गाणी ऐकणं, प्रतिकूल परिस्थितीत ही जिद्द असेल तर मात करता येते.
नवभारतमधील जीवन हे त्यांच्यासाठी मंतरलेले दिवस होते, आयुष्याला कलाटणी देणारे होते, सर्व शिक्षक आबांप्रमाणे त्यांच्या आयुष्याचे शिल्पकार होते. ‘आपल्या देशाला चांगले अर्थतज्ज्ञ हवेत’ हे निरोपसमारंभातील वाक्यच प्रमाण मानून वाटचाल केली. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण सजीव माणसांच्या गोतावळ्याबरोबर साहित्यही कसं भावविश्वाला आकारही देतं.
धडे व कवितांचा भावविश्वावर इतका परिणाम झाला की, त्या त्या स्थळांना भेटी दिल्या. मानिनी चित्रपटाचा प्रभाव, ययाति परीक्षेच्या दोन दिवस आधी वाचून संपवणे हे झपाटलेल्या व्यक्तिमत्त्वाचीच साक्ष देतं.
मुणगेकर, तुझे निबंध वाचताना ते मार्क देण्यासाठी लिहिले आहेत, असे वाटतच नाही, अशा निबंधाला काय मार्क देणार? हा शिक्षकांनाही प्रश्न पडायचा, गोविलकरबाईंनी त्यांच्यात निर्माण केलेला आत्मविश्वास, त्यांचे हिंदी शिकविणे वैशिष्टय़पूर्ण होते.
सगळे शिक्षक, धडे, कविता आठवणे व तसे स्वत:ला घडवणे हे सोपे काम नव्हे, हे पाहिल्यावर आजच्या शिक्षणपद्धतीतील पोकळपणा जाणवतो, ना तसे शिक्षक, ना तशी पाठय़पुस्तके, कविता, धडे, ना तशी सामाजिक परिस्थिती आज आहे, मग मुणगेकर निपजणार कसे?
ज्या नियतीने सुपारी विकायला लावले, त्याच नियतीला हात दाखवून तिचे नियोजन करून, नियतीलाच त्यांनी सुपारी दिली.
अतिशय प्रामाणिकपणे संगणकात फीड केल्याप्रमाणे सर्व आठवणी आपल्यासमोर येतात. सामाजिक पोषण सकस असलं की जात, दलित असणं कुठेच आड येत नाही.
या आत्मचरित्रात केवळ वेदनेचा हुंकार नाही, तर हे संस्काराचं आगार आहे. शाळा संस्कारांच्या आगार हव्यात हे पटतं. परिस्थितीवर मात केली तर जात नावाची वल्कलं कुठल्या कुठे गळून पडतात.
चव्वेचाळीस वर्षांंपूर्वीचा ‘फ्लॅशबॅक’ साकारताना कुठेही जातीमुळे, समाजामुळे ‘सेटबॅक’ मिळाला याची खंत नाही. वस्तुस्थिती म्हणून ‘दलित’ असणं हा योगायोग होता पण त्याचा वियोग न करता, त्यांचं जीवन म्हणजे व्यक्ती, साहित्य यावर पोसलेली एक ‘ललित’ कथाच आहे.
असेच आमुचे शिक्षक असती, अशीच आमुची शाळा असती, आम्हीही झालो असतो.. ही वेदना हे आत्मचरित्र वाचल्यावर सलत राहते. आयुष्यातील कोणतेही कटू प्रसंग ‘डिलिट’ न करता आपल्यासमोर ते येतात ते वस्तुस्थिती म्हणून, सहानुभूती म्हणून नाही, त्यामुळे काही पाल्हाळही काहींना वाटेल, पण आरसा सगळंच दाखवतो. पुस्तक ‘अ‍ॅब्रप्ट्ली’ संपलं असंही काहींना वाटेल, तसेच पुढील आयुष्यात, गुणात्मकरीत्या अथवा मूलभूतपणे मी ‘नवीन काही शिकलो, असे मला वाटत नाही’, हे वाक्यही काहींना खटकेल, हा प्रामाणिकपणा की नम्रता हा संभ्रम सामान्यांना वाटेल, पण जगण्याचं प्रयोजन एकदा पक्क असलं की ठरवून लिहिलं जात नाही. साहित्य म्हणून ते लिहिलं जात नाही तर जे जे लिहिलं जातं तेच साहित्य म्हणून समोर येतं.
संघर्ष करण्यासाठी ही ‘ज्ञानेश्वरी’ आहे. पारायण करावी अशी, एक तरी ओवी अनुभवावी अशी. मुखपृष्ठासहित लोकवाङ्मयगृह प्रकाशनाची ही कलाकृती अद्वितीय.
मी असा घडलो
भालचंद्र मुणगेकर
प्रकाशक : लोकवाङ्मयगृह
पृष्ठे : २३६
डॉ. अनिल कुलकर्णी

मागील पान
पुस्तकाच्या मागील पानावर पुस्तकाचा कथाविषय सांगणाऱ्या आशयाचा सारांश मांडणाऱ्या- मोजक्या ओळी असतात निर्मितीच्या प्रक्रियेत ‘मागे’ राहून ‘बोलकी’ आणि मोलाची कामगिरी करणारे हे समर्थ सारांश..
पत्रकारितेमध्ये ‘बातमीदारी’ हे एक अविभाज्य अंग आहे. ‘
बातमीदारी’ या विषयाबाबत मार्गदर्शन करणारी इंग्रजी भाषेत परिपूर्ण अशी अनेक उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध आहेत.
मात्र मराठीमध्ये अशा पुस्तकांची वानवा दिसून येते.
इंग्रजी पुस्तके उत्तम असली तरी त्यातील संदर्भ परदेशातील असतात. त्यामुळे इथल्या मातीशी-माणसांशी नाते सांगणारे,
अस्सल मराठी पत्रकारिता जोपासणारे मराठीतील हे वेगळे पुस्तक ठरावे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्यांना या पुस्तकाच्या साहाय्याने बातमीदारीतील गमभन तर शिकता येईलच, पण पत्रकारितेमध्ये अनेक वर्षे असलेल्यांना संदर्भग्रंथ म्हणूनही त्याचा उपयोग करता येईल; तसेच पत्रकारितेबाहेरील सर्वसामान्य वाचकांसाठीही हे पुस्तक मौलिक ठरेल.
बातमीदारी
सुनील माळी
राजहंस प्रकाशन,
पृष्ठे- २३८, मूल्य- ३०० रुपये