Leading International Marathi News Daily
रविवार, २८ जून २००९

सुरेल संवाद स्वरलतेशी
‘आत्मचरित्र लिहावं असं मला कधीच वाटलं नाही. कारण ते लिहायचं तर तुमच्यात कमालीचा प्रामाणिकपणा हवा. आणि तो दाखवला तर अनेक लोक दुखावण्याची शक्यता असते. लोकांना दुखवून मला काय मिळणार? माझं आयुष्य, माझे अनुभव ही माझी खासगी बाब आहे. ती मी कशासाठी उघड करावी? जे माझं आहे, ते जगाला उघड करून सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही..’
आत्मचरित्र न लिहिण्यामागची ही भूमिका आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची! त्यांनी ती उघड केलीय एका प्रदीर्घ मुलाखतीतून. लता मंगेशकरांचं आत्मचरित्र कधीच येणार नाही, याची खंत असणाऱ्या त्यांच्या असंख्य चाहत्यांना दिलासा देणारी बाब म्हणजे त्यांच्या आत्मचरित्राच्या जवळपास जाऊ शकेल असं, केवळ त्यांच्या मुलाखतीवर आधारीत ‘लता इन् हर ओन व्हॉइस’ हे इंग्रजी पुस्तक नुकतंच आलंय. ‘लतादीदी’ या
 

नावानं सर्वपरिचित असणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू या पुस्तकाद्वारे प्रथमच एवढय़ा विस्तारानं समोर आले आहेत. लतादीदींशी थेट संवाद साधून हे सगळं उभं करण्याची किमया साधलीय नसरीन मुन्नी कबीर यांनी!
नसरीन मुन्नी कबीर या लंडनमध्ये स्थायिक झालेल्या लेखिका व लघुपट निर्मात्या. इंग्लंडच्या ‘चॅनेल फोर टीव्ही’साठी त्यांनी अनेक डॉक्युमेंटरीज् बनविल्या आहेत. हिंदी सिनेमाशी संबंधित विषयांवर त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली असून, गुरुदत्तवरचं त्यांचं पुस्तक लक्षवेधी ठरलं आहे. १९९१ मध्ये नसरीन यांनी ‘चॅनेल फोर’साठी लतादीदींवर सहा भागांची डॉक्युमेंटरी बनवली होती. हा ग्रंथ त्याच डॉक्युमेंटरीवर आधारीत आहे. त्यावेळी घेतलेल्या मुलाखतींबरोबरच गेल्या वर्ष- दीड वर्षांत लेखिकेनं लतादीदींच्या घेतलेल्या मुलाखतींमधून हे पुस्तक साकारलेलं आहे.
‘जिवंत दंतकथा’ होण्याचं भाग्य लाभलेल्या व्यक्तींच्या बाबतीत बऱ्या-वाईट अशा दोन्ही प्रकारच्या समजुती आणि प्रवाद समाजात प्रचलित असतात. लता मंगेशकरही त्याला अपवाद नाहीत. अर्थात त्यांच्या बाबतीत टीकाकारांपेक्षा चाहत्यांची संख्या कितीतरी पटीनं अधिक आहे, हे निर्विवाद! चाहते असोत वा टीकाकार; सर्वानाच या ‘लीजंड’विषयी अधिकाधिक जाणून घ्यायला आवडतं. अशा सर्व वाचकांचं कुतूहल शमविण्याबरोबरच लता मंगेशकर या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाविषयी काही अतिपरिचित, तर काही अगदी नवे संदर्भ हे पुस्तक देऊन जातं.
लतादीदींवर आजवर अनेक पुस्तकं निघाली आहेत. पण या ग्रंथाचं वेगळेपण असं की, लतादीदींच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय थेट त्यांच्याशी साधलेल्या संवादातूनच घडत जातो. भरपूर छायाचित्रांसह अडीचशेहून अधिक पृष्ठे व्यापणाऱ्या या ग्रंथाची दोनशे पानं केवळ मुलाखतीची आहेत, एवढं सांगितलं तरी पुरे! नसरीन कबीर हिंदी चित्रपटांची भोक्ती आहेच, पण सेलिब्रिटीच्या अंतरंगात डोकावताना त्या कलावंताच्या जीवनाचा सखोल अभ्यास करण्याचा तिचा गुण इथं दृष्टीस येतो. लता मंगेशकर यांनी तिच्या प्रश्नांना कोणताही आडपडदा न ठेवता, प्रसंगी आत्मस्तुती टाळत, तर कधी ढोंगबाजी उघड करीत मोकळेपणानं उत्तरं दिलीत. म्हणूनच प्रश्नकर्तीची थेट भिडणारी शैली आणि लतादीदींची अनौपचारिक संभाषणशैली यांच्या मिलाफातून रंगणाऱ्या या ‘संवाद पर्वा’त आपण दंग होऊन जातो.
आरंभ लतादीदींच्या बालपणीच्या काळापासून होतो. मा. दीनानाथ या तेजस्वी गायक नटाच्या पोटी झालेला जन्म आणि त्यांच्या पश्चात पाच भावंडांना करावा लागलेला संघर्ष ही कहाणी सर्वपरिचितच आहे. पण इथं ती बारीकसारीक तपशिलांसह समोर येते. दीनानाथांच्या पहिल्या पत्नीचं नाव होतं- नर्मदा. तिलाही ‘माई’ असं संबोधलं जाई. तिला झालेल्या मुलीचं नावही ‘लता’ होतं. ही पत्नी बाळंतपणात वारली आणि पाठोपाठ ती मुलगीही गेली. त्यानंतर दीनानाथांनी नर्मदेची धाकटी बहीण शुद्धमती हिच्याशी विवाह केला. तिलाही ‘माई’ असंच संबोधलं गेलं. या पत्नीला झालेली मुलं म्हणजेच मंगेशकर भावंडं.
धाकटी लता गाते, हे दीनानाथांना कसं कळलं आणि त्यांनी तिला शास्त्रीय संगीत शिकवण्याचा ध्यास कसा घेतला, सोलापुरात वडिलांसमवेत तिचा पहिला जलसा कसा झाला, काळाच्या ओघात दीनानाथांची नाटक व चित्रपट कंपनी बुडून ते कसे ओढगस्तीला लागले, हेही यात वाचायला मिळतं. दीनानाथांचा अकाली मृत्यू आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची झालेली परवड लतादीदींनी कुठलाही आक्रोश वगैरे न करता अतिशय संयतपणे समोर ठेवलाय. बाबा गेले त्या दिवसाची आठवण सांगताना त्यांनी म्हटलंय, ‘माई हॉस्पिटलमधून आली आणि तिनं मला बाबा गेल्याचं सांगितलं. पहिल्यांदा मी काय केलं असेन तर उषा आणि हृदयनाथ या दोघांना स्वयंपाकघरात नेऊन कोंडलं. कारण ही दोघं खूपच लहान होती. शिवाय हृदयनाथ आजारी होता. मी थोडीशी रडले, पण लगेच शांत झाले. तासाभरानं मी आईला विचारलं, ‘आता आपल्याला कुठं काम मिळेल? घर तर चालवायला हवं ना!’ खरं तर बाबांच्या शेवटच्या आजारपणातच मला कळलं होतं की, कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडणार आहे.’
बालपणीचे सवंगडी आणि भावंडांसमवेत खेळण्यात घालवलेला काळही दीदींनी रंजकपणे उभा केलाय. लहानपणी ती के. एल. सैगलची प्रचंड फॅन होती. ‘मोठेपणी मी सैगलशी लग्न करणार,’ या तिच्या अजब हट्टावर दीनानाथांची प्रतिक्रिया : ‘अगं, तू मोठी होशील तोवर सैगल म्हातारे होतील ना!’
मुलांना सिनेमातली गाणी ऐकायला, सिनेमे बघायला मनाई करणारे दीनानाथ सैगलची गाणी ऐकायला आणि न्यू थिएटर्स व भालजी पेंढारकरांचे चित्रपट बघायला आनंदानं परवानगी द्यायचे.
दीनानाथांच्या पश्चात मास्टर विनायक यांनी दिलेला आधार, त्यांच्या चित्रपटांमध्ये केलेल्या भूमिका यासंबंधीच्या आठवणी सांगताना- ‘अभिनयात माझं मन मुळीच रमलं नाही’, हेही त्या स्पष्टपणे सांगतात. पहिल्यांदा मेकअप करताना भुवया आणि कपाळावरच्या बटा कापून टाकण्याचा अनुभव मुळीच सुखावह नव्हता, असं सांगून त्यांनी म्हटलंय, ‘स्टुडिओतले प्रखर दिवे, घोकून घोकून म्हणावे लागणारे संवाद यांचा मला कमालीचा तिटकारा होता. पाश्र्वगायनाची दारं खुली झाल्यानंतर त्या सर्वातून सुटल्याची माझी भावना झाली..’
पुण्यात ‘खजांची’ या चित्रपटातल्या गाण्यांच्या स्पर्धेत मिळालेलं पहिलं बक्षीस, पुढे ‘खजांची’चे संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांच्यामुळे सिनेमात गायला मिळालेली संधी, या स्टुडिओतून त्या स्टुडिओत दिवसभर करावी लागणारी पायपीट हा घटनाक्रम त्यांनी फ्लॅशबॅकप्रमाणे उलगडत नेलाय. १९४७ नंतर चित्रपट संगीतानं कात टाकली. त्याचा फायदा लताबरोबरच अन्य गायकांनाही झाला. आणि १९४९ सालापासून तर ‘लता मंगेशकर’ हे नाव सर्वत्र दुमदुमू लागलं.
१९५० ते १९७० या दोन दशकांमध्ये लतादीदींनी केलेली कामगिरी आणि या कालखंडातले संगीतकार, गीतकार व गायक यांच्याशी जुळलेले स्नेहबंध, काहीजणांशी अटळपणे आलेली कटुता यांचाही धांडोळा यात आहे. सहगायकांच्या गायनशैलीची वैशिष्टय़ं सांगतानाच त्यांच्याकडून मिळालेल्या सहृदय वागणुकीचा त्या आवर्जून उल्लेख करतात. स्वत:वर विनोद करणं ही मुकेश यांची खासियत होती. एखादा वादक थोडा जरी बेसूर वाजवू लागला तर ‘माझी नक्कल इथं कोण बरं करतंय?’ असा मिस्कील प्रश्न ते करायचे. किशोरकुमारच्या गमत्या स्वभावाचे त्यांनी सांगितलेले किस्से तर बहारदारच! एक गायक आणि व्यक्ती म्हणून मोहम्मद रफी ‘देवमाणूस’ होते, हे सांगतानाच गायकांच्या रॉयल्टीच्या मुद्दय़ावरून रफीसाहेबांशी झालेल्या चार वर्षांच्या ‘भांडणा’ची पाश्र्वभूमीही त्या विशद करतात.
संगीतकारांमध्ये गुलाम हैदर यांनी पाश्र्वगायनाचे प्राथमिक धडे कसे दिले, अनिल विश्वास यांनी माईकसमोर गाताना श्वासाचं तंत्र कसं शिकवलं, नौशाद अलींच्या पहिल्या भेटीत ऑडिशन द्यायला नकार देऊनही ते किती समंजसपणे वागले, सी. रामचंद्र यांच्या संगीतात मराठी आणि हिंदी शैलीच्या मिश्रणातून आलेला गोडवा कसा असे, इत्यादी तपशील त्या सहजपणे देतात. सज्जाद हुसेन, मदनमोहन, रोशन, वसंत देसाई, खय्याम यांच्यापासून आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलालपर्यंत वेगवेगळय़ा संगीतकारांची शैली आणि व्यक्ती म्हणून त्यांचे अनुभव त्यांनी कृतज्ञतेनं नोंदवलेत.
गीताकारांमध्ये मजरुह, साहिर, शैलेंद्र, शकील, राजा मेहदी अली खान, प्रदीप, जाँनिसार अख्तर, गुलजार यांचा त्या आवर्जून उल्लेख करतात. पं. नरेंद्र शर्मा हे गीतकाराबरोबरच तत्त्वज्ञानी म्हणूनही तेवढेच भावले आणि नैराश्याच्या प्रसंगांत त्यांनी आपल्याला धीर दिला, असेही त्या सांगतात. नूरजहाँ, अमीरबाई कर्नाटकी, जोहराबाई अंबालेवाली, शमशाद बेगम या पूर्वसुरींबरोबरच गीता दत्त, आशा भोसले यांच्या गायकीची बलस्थानंही त्या स्पष्ट करतात. एस. डी. बर्मन यांच्याशी गैरसमजातून कसा दुरावा आला आणि चार-पाच वर्षांनंतर तो कुणी दूर केला, ती कहाणीही लतादीदींनी सांगितलीय. ‘संगम’मधलं ‘बुढ्ढा मिल गया’ हे गाणं गायला आपण तयार नव्हतो. राज कपूर यांनी मन वळवल्यामुळे आपण ते गायलं खरं, पण तो चित्रपट मात्र बघितला नाही, हेही त्या नमूद करतात.
स्वत:च्या स्वभावाविषयी त्या म्हणतात, ‘मी आशावादी आहे. कधी कधी नैराश्य येतं, पण तेवढय़ापुरतं. संताप आला तरी मी बोलून प्रकट करीत नाही. गप्प बसून राहते. पूर्वीच्या काळी मी प्रीमिअर शोला जात असे. नंतर मात्र जायचं बंद केलं. लग्न न केल्याबद्दल खंत वाटते का, या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणतात, नाही, तशी खंत वाटत नाही. जन्म, मृत्यू आणि विवाह या तीन गोष्टी आपल्या हातात नसतात. सगळं काही ‘तो’ ठरवत असतो. मी लग्न केलं असतं तर कदाचित माझं आयुष्य वेगळं झालं असतं.
१९६२ च्या सुमारास लतादीदी बराच काळ आजारी होत्या. बरेच महिने रेकॉर्डिग बंद होतं. या आजाराला अन्नातून झालेली (की केलेली?) विषबाधा कारणीभूत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. ही विषबाधा करण्यामागे कुणाचा तरी हात असावा; कारण त्या घटनेनंतर घरातला स्वयंपाकी अचानक गायब झाला, ही लतादीदींनी दिलेली माहिती धक्कादायक आहे.
स्वत:विषयीचे काही प्रवाद, दंतकथा आणि अफवा यांचंही लतादीदींनी या मुलाखतीत खंडन केलंय. क्रिकेट सामन्याच्या वेळी लॉर्ड्स मैदानावर संपूर्ण गॅलरी आपल्यासाठी आरक्षित केलेली असायची, इत्यादी कहाण्या कपोलकल्पित असल्याचं त्यांनी म्हटलंय. नूरजहाँशी आपले खूप स्नेहाचे संबंध होते. फाळणीच्या वेळी ती पाकिस्तानात गेल्यानंतर दोन-तीन वर्षांनी एकदा वाघा सीमेवरील चौकीवर आपण तिची भेट घेतल्याचं त्या सांगतात. मात्र, नूरजहाँ आपली गुरू नव्हती, हेही त्या नमूद करतात. ‘मुगल-ए-आझम’मधल्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्यात एको इफेक्ट मिळावा म्हणून गायकांना स्टुडिओच्या बाथरूममध्ये उभं करून गायला लावलं होतं, ही इंटरनेटवर प्रसृत झालेली माहिती म्हणजे लोणकढी थाप असल्याचं सांगून त्यांनी या गाण्याचं रेकॉर्डिग कसं झालं, त्याचा साद्यंत तपशीलच दिलाय. ‘महल’मधल्या अनेक गाण्यांच्या आठवणी रंजक आहेत.
संपूर्ण आर्ट पेपरवरील देखणी छपाई तसच पानोपानी विखुरलेली दुर्मिळ कृष्णधवल व रंगीत छायाचित्रे हीदेखील या ग्रंथाची जमेची बाजू. दीदींच्या बालपणापासून आजवरच्या ठळक घटनांना उजाळा देणारी ही छायाचित्रं पाहताना हरखून जायला होतं. पन्नासच्या दशकात पुण्यात सायकल हाती घेतलेली तरुण लता, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलच्या भव्य वास्तूसमोर उभ्या असलेल्या दीदी या छायाचित्रांबरोबरच वेगवेगळे गायक, संगीतकार, गीतकार, त्यांच्यासमवेत केलेली ध्वनिमुद्रणं अशा छायाचित्रांची लयलूट या पुस्तकात आहे.
पुस्तकाच्या अखेरच्या भागात नौशाद, सज्जाद हुसेन, मजरूह, वहिदा रहमान, जया बच्चन, यश चोप्रा, मन्ना डे, गुलजार, खय्याम, दिलीपकुमार, तलत महमूद आदी मान्यवरांनी तसेच मंगेशकर कुटुंबातील सदस्यांनी लतादीदींविषयी व्यक्त केलेल्या भावना शब्दबद्ध केलेल्या आहेत. नसरीन मुन्नी कबीर यांची भाषा ओघवती आहे. मात्र या सर्व आठवणी मुलाखतींद्वारे शब्दबद्ध करताना त्यांची विभागवार वा काळानुसार विभागणी केलेली नाही, हाच काय तो दोष आढळतो. राग ‘भूपाली’ऐवजी ‘भोपाली’ यासारख्या तुरळक चुका वगळल्यास मुद्रणदोषही फारसे नाहीत. लतादीदींच्या चाहत्यांनी संग्रही ठेवावा असाच हा ग्रंथराज आहे.
‘लता मंगेशकर.. इन हर ओन व्हॉइस’, लेखिका : नसरीन मुन्नी कबीर, प्रकाशक : नियोगी बुक्स, नवी दिल्ली, पृष्ठे : २६८, किंमत : १५०० रुपये.
सुनील देशपांडे

sunildeshpa@yahoo.co.in