Leading International Marathi News Daily
रविवार, २८ जून २००९

हवामान खात्यानं पावसाबाबत वर्तवलेले सर्व अंदाज चुकले तेव्हा बादशहा भयानक संतापला. हवामान खात्याच्या प्रमुखाची त्यानं हजेरी घेतली. शेकडो वर्षांपूर्वी एक गाढव आपले कान हलवून पावसाचा अचूक अंदाज व्यक्त करत असे, असं बादशहानं कुठंतरी वाचलं होतं. ‘त्या गाढवाच्या वंशजाला हजर करा आणि हवामान खात्याचा प्रमुख करा’ असं फर्मान बादशहानं काढलं. सगळं प्रशासन त्यासाठी कामाला लागलं. परंतु असं गाढव शोधणार कुठं आणि तो त्याच हुशार गाढवाचा वंशज आहे हे सिद्ध करणार तरी कसं? अर्थातच मुख्य प्रशासकीय अधिकारी बिरबलाला शरण गेला. बिरबल म्हणाला, ‘आठवडाभर तुमचा शोध जारी ठेवा आणि मग कुठल्याही गाढवाला बादशहासमोर हजर करा, पुढं काय करायच ते
 

मी सांगेन.’ अधिकारी शांत मनाने घरी गेला. बादशहाला दाखविण्यासाठी म्हणून आठवडाभर हुशार गाढवाच्या वंशजाचा शोध सुरू होता. आठवडा संपत आला तेव्हा तो अधिकारी पुन्हा बिरबलाकडे आला. बिरबलानं त्याला सगळी योजना समजावून सांगितली. ती ऐकून अधिकारी एकाच वेळी हवालदिल झाला आणि त्याला आनंदही झाला. दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यानं एका गाढवाला आणि त्याच्या मालकाला बादशहाच्या पुढय़ात हजर केलं. बादशहा मालकाला म्हणाला, ‘काय रे, याला पावसाचा अचूक अंदाज येतो का?’’ ‘‘होय खाविंद, त्यानं जोरजोरानं कान हलवले की, हमखास पाऊस पडतो. आपणास त्याचा प्रत्यय घेता येईलच.’’ बादशहानं लगेच पुढचा प्रश्न विचारला, ‘‘पण हा त्या हुशार गाढवाचाच वंशज आहे, याचा पुरावा काय?’’ यावर सगळे मान खाली घालून उभे राहिले. बादशहा म्हणाला, ‘‘मला उत्तर हवंय.’’ अखेर बिरबल पुढं झाला आणि म्हणाला, ‘‘ हुजूर, या माणसाला गाढवाची भाषा कळते. तुमच्या प्रश्नाचं उत्तरही गाढवानं याला सांगितलेलं आहे. परंतु तुम्हाला ते सांगायला तो घाबरत आहे.’’
बादशहा म्हणाला, ‘‘जे काही उत्तर असेल ते सांग मला. मी तुला अभय देतो. तुझ्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.’’
बिरबलानंही गाढवाच्या मालकाच्या खांद्यावर हात ठेवून दिलासा दिला. मालकानं आवंढा गिळला आणि म्हणाला, ‘‘हुजूर हे गाढव मला म्हणालं की, आमच्यामध्ये कोणतेही अधिकार वंशपरंपरेनं मिळत नाहीत. ज्याची कुवत आणि लायकी असेल त्यालाच ते मिळतात.’’
वंश परंपरेनं सत्तेवर बसलेला बादशहा या उत्तरानं चपापला पण क्षणभरातच सावरला. गाढवासह परत जाण्याची आज्ञा त्यानं मालकाला दिली. निश्चिंत मनानं प्रशासकीय अधिकारी रवाना झाला. बिरबलही निघाला, तेव्हा बादशहा त्याला म्हणाला, ‘‘गाढवाच्या तोंडी एवढं सुंदर उत्तर घालणाऱ्या हुशार व्यक्तीसोबत भोजन घेण्याचा योग आहे का आमच्या नशिबात?’’ आणि आपले उपरणे सावरत सुहास्य चेहऱ्यानं बिरबल थांबला.

पाऊस नेमका पावसाळ्यातच का पडतो?
- मेघना वाळिंबे, कोथरूड.

आमच्या आजोबांच्या पूर्वीपासून ही प्रथा असल्याचे घरात बोलले जाते.

महाराष्ट्राच्या स्थापनेला ५० वष्रे होत आहेत. तुम्हाला काय वाटते?
- अरविंद सोनवणे, धुळे.
मलाही तेच वाटते.

महिलांना कितपत स्वातंत्र्य असावे?
- अंजली पेठे, दादर.
त्यांना घरातल्या घरात मोकळेपणाने फिरता आले पाहिजे.

२०२०चा महाराष्ट्र कसा असेल?
- अप्पा नाईक, कळंबोली.
सर्व डोंगरांचे खडीत रुपांतर झालेले असेल.

आजच्या युगात महिलांच्या दृष्टीने साक्षरतेचे महत्त्व किती?
- अंजली सातपुते, नगर.
पोस्टमन अथवा कुरिअरने आलेले पत्र आपलेच आहे की शेजाऱ्याचे हे समजणे शिक्षणाशिवाय अशक्य आहे.

उत्तर-दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळले तर काय होईल?
- व. मा. वानखेडे, नागपूर.
पाणी पुरवठय़ाचा बिकट प्रश्न सुटेल.

अर्थमंत्रीपदाबाबत तुम्हाला विचारणा झाली तर?
- प्रा. दत्ता वाघ, नाशिक.
अर्थसंकल्पात तूट आली तर मी ती खिशातून भरणार नाही. आणि मला मूड असेल त्या दिवशीच मी अर्थसंकल्प सादर करीन. या अटी मान्य केल्या तर माझी हरकत नाही.

उशिरा आलेल्या पावसाबद्दल तुम्हाला काय वाटते?
- उत्तम जगताप, पंढरपूर.
आमच्या युनियनमार्फत जूनमधील थकबाकी वसूल करण्याबाबत न्यायालयात लढा देऊ.

उत्तर देताना तुम्ही जरा ‘अती’च करता, असं तुम्हाला वाटत नाही का?
- प्रेम सोनार, कुळगाव, बदलापूर.
आमच्या बागेतल्या कुंडय़ांना माती कमी पडते.

तुमची आवडती गझल कुठली?
- स्निग्धा चिपळुणकर, रत्नागिरी.
‘आज गाने की जिद ना करो.’

घरमालक- या! या! पण आपण कोण?
सेल्समन- मी सेल्समन!
घरमालक- म्हणजे घरोघर जाऊन किराणा मालाचे सामान विकणारे?
सेल्समन- आम्ही किराणा माल विकत नाही!
घरमालक- मग काय विकता?
सेल्समन- साबण!
घरमालक- म्हणजे किराणा मालच! आमच्या किराणा मालाच्या यादीत साबण असतोच! असो.
सेल्समन- हा साबण! आमचा हा साबण एकदम चांगला. हा कपडे धुण्याचा साबण आहे. यामुळे कपडे एकदम पांढरेशुभ्र निघतात.
घरमालक- नक्की का? नंतर बदलू नका! कपडे एकदम पांढरेशुभ्र निघतात?
सेल्समन- शंभर टक्के! कपडे पांढरेशुभ्र निघतात!
घरमालक- ठीक आहे! म्हणजे माझा निळा शर्ट पांढराशुभ्र होईल!
सेल्समन- निळा शर्ट कसा पांढराशुभ्र होईल?
घरमालक- तुम्हीच आता म्हणालात ना? की कपडे..
सेल्समन- अहो पांढरे कपडे पांढरेशुभ्र होतील.
घरमालक- आणि निळा शर्ट?
सेल्समन- निळाशुभ्र होईल! काळे कपडे काळेशुभ्र होतील!
घरमालक- हां! आता क्लिअर झालं!
सेल्समन- मग किती साबण देऊ?
घरमालक- अजून एक प्रश्न विचारायचा आहे! रागावू नका!
सेल्समन- मुळीच नाही. आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला न रागवायचं ट्रेनिंग देतात. आमचा अपमान करतात, शिव्या देतात, धक्के मारतात तरी आम्ही हसतच असतो तेव्हा रागावण्याचा प्रश्नच येत नाही, विचारा.
घरमालक- समजा एखाद्या दिवशी आमच्या घरातील भांडी धुण्याचा साबण संपला तर हा साबण वापरता येईल का?
सेल्समन- अहो, पण हा कपडय़ाचा साबण आहे.
घरमालक- ते मला आणि तुम्हाला माहिती आहे. पण एखाद्या दिवशी भांडय़ाचा साबण संपला. दुकानांचा संप आहे किंवा घरात पैसेच नाहीत. अशा वेळेस हा तुमचा धुण्याचा साबण वापरला तर चालेल?
सेल्समन- चालेल की! पण एकच दिवस! रोज नाही वापरता येणार?
घरमालक- का?
सेल्समन- अहो, मग कपडे कशाने धुणार? तेव्हा एखाद्या दिवशी वापरा.
घरमालक- बरं, पण यामुळे भांडीशुभ्र होतील का?
सेल्समन- भांडीशुभ्र होतील म्हणजे आता शुभ्र नाही म्हणता येणार! भांडी स्वच्छ होतील.
घरमालक- एकदम चकचकीत! पण काय हो! मग भांडी दोरीवर तर वाळत नाही ना ठेवावी लागणार?
सेल्समन- नाही! नाही!! तुम्ही असं करा भांडी धुऊन झाल्यावर भांडी फरशीवर ठेवा आणि शेजारी एक दोरी पसरून ठेवा. म्हणजे प्रश्न मिटला.
घरमालक- हे बरं झालं तुम्ही सांगितलं! नाही तर भांडी खाली आणि दोरी वरच!
सेल्समन- मग किती साबण देऊ?
घरमालक- आता तुमच्या साबणाचा एवढा उपयोग होतो म्हटल्यावर साबण घ्यावाच लागेल. मग काय हो? माझ्या मनात अजून एक शंका आहे! विचारू? राग तर येणार नाही ना?
सेल्समन- खुशाल विचारा! अंगावर हात न टाकता काहीही बोललात तरी राग येणार नाही?
घरमालक- खरंच की! तुमचं ट्रेनिंग झालंय नाही का?
सेल्समन- विचारा!
घरमालक- तुमचा हा साबण कपडे धुण्याच्या आधी आणि भांडी घासायच्याही आधी आंघोळीसाठी वापरला तर चालेल का?
सेल्समन- म्हणजे एखाद्या दिवशीच ना? दुकानं बंद असतील, खिशात पैसे नसतील तेव्हाच ना-
घरमालक- बरोबर ओळखलंत! तर मग हा साबण आंघोळीसाठी वापरला तर चालेल?
सेल्समन- चालेल की! चालेल! पण दोन अटी आहेत!
घरमालक- कोणत्या?
सेल्समन- या साबणाने आंघोळ केल्यावर अंग पिळायचं नाही कपडय़ासारखं! काय?
घरमालक- हो! हो! आणि दुसरी अट?
सेल्समन- अंग विसळायचं नाही, भांडय़ासारखं! बस मग वापरा हा साबण आंघोळीसाठी, किती देऊ?
घरमालक- पण या साबणाला सुवास नसणार!
सेल्समन- नाहीच! याला सुगंध नाही.
घरमालक- पण यावर एक उपाय आहे. या साबणासोबत एक उदबत्ती द्यायची. म्हणजे बाथरूममध्ये उदबत्ती लावायची आणि या साबणाने आंघोळ करायची.
सेल्समन- ही घ्या उदबत्ती! आता बोला- किती साबण आणि किती उदबत्त्या देऊ?
मधुकर देशपांडे


(मूळ लावणी- ‘हाऽऽ नाचू किती, नाचू किती कंबर लचकली!’)
हाऽऽ हासू किती नाचू किती सासू गचकली
अहोऽऽ पाय घसरला जाता जाता तिथंच आटपली! ।।धृ।।
कोरस- कोमेजून गेली होती लाडकी सासूच्या जाचात
आज टळे पीडा, घेई श्वास मोकळा सासरच्या हो घरात!
मी कामचुकार, करी सोंग आजारीऽऽ तिनं हेरलं
पडता काम हो फार, मी पळे माहेरीऽऽ तिनं हेरलं
ओऽऽ ती हो रुसली, केली चुगली मज नवऱ्यानं सडकली! ।।१।।
होते चोरून घेत, धार तुपाचीऽऽ तिनं धरलं
होते चोरून खात, साय दुधाचीऽऽ तिनं धरलं
ओऽऽ रोज पकडे चोरी, डोळे वटारी बाई मी हडकली! ।।२।।
माझं नटणं हसणंऽऽ नाय पटलं
नवऱ्यासंगं- गुलुगुलु बोलणंऽऽ नाय पटलं
ओऽऽ आम्ही दोघं धुंद, खोलीत बंद बाहेर खाकरली! ।।३।।
- जयंत जाधव, आटपाडी, जि. सांगली.

फिटे अंधाराचे जाळे..
फिटे अंधाराचे जाळे वाढले बिलाचे आकार
जगी लुटण्याचे किती प्रकार, प्रकार
मीटर चांगला होता पण बदलला कारण
पळ पळत रहावा वारंवार, वारंवार
आता निघालिया म्हणे लाईट सोलरची की काय
बुडत्याला काडीचा जसा आधार, आधार
दिवसा देतो तू आम्हास तुझा फुकटचा प्रकाश
सुर्योबा तुझे किती थोर उपकार, उपकार
मन:शांती जाहली झाले वीज मंडळ बरखास्त
आता आला जो कुणी लावून सुरीस रे धार
जाऊ द्या दाभोळ खड्डय़ात नको भार नियंत्रण
परदेशातूनीच आता सरळ घ्यावीया तार
फिटे अंधाराचे जाळे वाढले बिलाचे आकार
जगी लुटण्याचे किती प्रकार, प्रकार
शब्बीर अहमद दाऊद पुणे

छत्रीचे गाणे
स्वत:च्या खांद्यावर
छत्रीचे ओझे, छत्रीचे ओझे ।।

दारी येता पावसाळा
छत्री ‘माळ्यावर’ शोधा
दुरुस्त करुनी सर्व काडय़ा
वाहू रोज ओझे ।।

मुसळधार पाऊस येता
वाऱ्याचीही साथ मिळता
छत्री तेव्हा ‘उलटी’ होता
आम्ही दीनवाणे ।।

पावसाची ‘झिम्मड’ येता
विनवी ‘कुणी’ छत्रीकरिता
छत्री तेव्हा ‘जाम’ होता
होई ओशाळवाणे ।।

ओझे वाहू चार महिने,
नेऊ आणू नित्यनेमे
छत्रीने कधी दगा देताम्
चिंब भिजू आनंदाने ।।
मधुकर भिडे पुणे

एका विक्रेत्याने एका गृहिणीच्या घरात सतरंजीवर केरकचरा पिशवीतून आणून टाकला. ‘बाईसाहेब, हे यंत्र वापरून मी हे सर्व लगेच स्वच्छ करीन तसे झाले नाही तर मी हे सर्व खाऊन दाखवीन’.
गृहिणी- ‘त्यासाठी तुम्हाला चटणी हवी की केचअप? कारण आमच्या घरात वीज नाही’.
- चंद्रकांत पाटकर, ठाणे.

टॅक्सीतून प्रवास करीत असताना प्रवाशाने सहज ड्रायव्हरच्या पाठीवर थाप मारली, त्याबरोबर ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला आणि टॅक्सी अस्ताव्यस्त धावू लागली, कसोशीने ड्रायव्हरने त्यावर ताबा मिळविला. प्रवाशाकडे वळून तो म्हणाला, कृपाकरून पुन्हा असे करू नका. प्रवाशाने ड्रायव्हरची माफी मागितली आणि चकित होऊन विचारले, ‘अरे एका हलक्याशा थापेने तू एवढा घाबरशील याची मला कल्पना नव्हती.’ ओशाळून ड्रायव्हर उत्तरला, ‘साहेब, त्यात तुमची काही चूक नाही. कारण टॅक्सी चालविण्याचा हा माझा पहिलाच दिवस आहे, गेली २५ वर्षे मी शववाहिनी चालवीत होतो.’

एका कर्मचाऱ्याने आपल्या साहेबांच्या घरी फोन केला. साहेबांच्या पत्नीने तो घेतला. साहेबांबद्दल चौकशी केल्यावर साहेबांची पत्नी म्हणाली, ‘मला फार वाईट वाटते की तुझे साहेब गेल्या आठवडय़ात निधन पावले.’ दुसऱ्या दिवशी त्या कर्मचाऱ्याने पुन्हा फोन केला. त्यावेळी साहेबांची पत्नी म्हणाली, ‘कालच तुला मी सांगितले की, तुझे साहेब गेल्या आठवडय़ात निधन पावले.’ तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्या कर्मचाऱ्याने साहेबाच्या घरी फोन केला, त्या वेळी चिडून साहेबाची पत्नी त्या कर्मचाऱ्याला म्हणाली, ‘तुला किती वेळा सांगू की, तुझे साहेब गेल्या आठवडय़ात मृत्यू पावले.’ त्यावर हसून तो कर्मचारी म्हणाला हे वाक्य ऐकून मला फार आनंद होतो म्हणून मी वारंवार फोन करतो.

रामरावांनी वाचले की पुरुष १५ हजार शब्द रोज वापरतो, पण स्त्री ३० हजार शब्द वापरते. त्याने पत्नीला हे सांगितले. ती म्हणाली, कारण आम्ही काय बोलतो ते नेहमी आम्हाला पुन:पुन्हा तुम्हाला सांगावे लागते.
रामराव- काय?
- संजीव केंकरे, मुंबई.

कोल्हापूरचे श्यामराव पहिलवान मुंबईत आले व लोकल, बसमधून गर्दीतून भटकले. रात्री ते मित्राला म्हणाले, ‘‘लोक उगाच घाबरवतात. मी सबंध दिवस खिशांत पैसे ठेवून फिरलो पण माझे पाकीट कोणी मारले नाही.’’ जवळच उभा असलेला पाकीटमार म्हणाला, ‘‘साहेब, खऱ्या नोटा आम्ही मारतो, तुमच्याकडच्या नोटा खोटय़ा आहेत’’. श्यामराव आ वासून पाहू लागले.
- ह. शं. साळवेकर, डोंबिवली.

नवीन तरुण कर्मचाऱ्याला वरिष्ठ समजावून सांगत होते. ‘त्याला येथे काम करायचे असेल तर त्याने दोन गोष्टी शिकल्या पाहिजेत.’ ‘कोणत्या साहेब?’ कर्मचाऱ्याने विचारले. ‘तू ऑफिसमध्ये येताना बाहेरील पायपुसण्यावर पाय साफ करून आलास का?’ ‘होय साहेब’, तो तरुण म्हणाला. ‘तर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी सत्य बोलावे अशी अपेक्षा आहे; याचे कारण बाहेर पायपुसणे ठेवलेलेच नाही.’
संजीव केंकरे, मुंबई.

छापता छापता
गगनराव ठेंगणे यांजकडून,
वीजटंचाईच्या आजच्या काळात विजेची बचत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या घरातील टीव्ही म्यूट करून (आवाज बंद) बघितल्यास विजेची निम्मी बचत होते. तर पूर्णपणे बंद ठेवला असता १०० टक्के बचत होते. याचे प्रात्यक्षिक अलीकडेच इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एका कार्यक्रमात दाख्विले. मराठी विज्ञान परिषदेने या शोधाबद्दल या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केल्याचे समजते.

Chilly Question & Ans.

Girlfriend: And are you sure you love me and no one else?
Boyfriend: Dead Sure! I checked the whole list again yesterday
*********
Waiter: Would you like your coffee black?
Customer: What other colors do you have?
*********
Manager: Sorry, but I can't give u a job. I don't need much help.
Job Applicant: That's all right. In fact I'm just the right person in this case. You see, I won't be of much help anyway!!
*********
Diner: I can't eat such a rotten chicken. Call the manager!
Waiter: It's no use. He won't eat it either.
*********
Diner: You'll drive me to my grave!
Waiter: Well, you don't expect to walk there, do you?
*********
Man: Officer! There's a bomb in my garden!
Officer: Don't worry.. If no one claims it within three days, you can keep it.
*********
सानी नाईक
icehead_saanaee@yahoo.com