Leading International Marathi News Daily
रविवार, २८ जून २००९

समकालीन मराठी साहित्यातील एक अग्रणी कथा-कादंबरीकार म्हणून रवींद्र शोभणेंचा सर्वदूर लौकिक आहे. त्यांच्या ‘कोंडी’, ‘उत्तरायण’ आणि ‘पडघम’ या लक्षणीय कादंबऱ्यांनी शोभणेंच्या सृजनशक्तीची गुणवत्ता सिद्ध केली आहे. महाराष्ट्रातील अनेकविध वाङ्मयीन मानसन्मानानी शोभणेंच्या वाङ्मयाची महत्ता विशेषत्वाने अधोरेखित केली आहे. ऐन पन्नाशीच्या काळातच मोठे वाङ्मयीन यश गाठणारा आणि अजून मोठय़ा वाङ्मयकृतींची शक्यता असलेला एक गंभीर, आश्वासक लेखक ही रवींद्र शोभणे या लेखकाची खरी ओळख आहे.
रवींद्र शोभणे यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा आरंभ त्यांच्या लघुकथालेखनाने झाला. महाविद्यालयीन काळात नबीरा महाविद्यालयाच्या वार्षिकांकात त्यांची ‘भूक’ ही पहिली कथा प्रकाशित झाली. या आधी ‘बुवा’, ‘पैंजण’ वगैरे मासिकांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्यात. १९८४ साली जनसाहित्य संमेलन विशेषांकात त्यांची ‘डोह’ ही कथा प्रसिद्ध झाली. शोभणेंनी आपल्या कथालेखनाचा आरंभबिंदू ‘डोह’ या कथेलाच मानले आहे. पुढील दोन तपांपेक्षा अधिक काळात शोभणेंचे ‘वर्तमान’ (१९९१), ‘दाही दिशा’ (१९९४), ‘शहामृग’ (१९९८), ‘तद्भव’ (२०००) आणि ‘अदृष्टाच्या वाटा’ (२००८) असे पाच कथासंग्रह प्रसिद्ध झाले. सभोवतीचे सामाजिक-राजकीय पर्यावरण आणि मानवी मनातील विकार-वासनांचा अधोलोक ही शोभणेंच्या कथाविश्वाची दोन प्रमुख आशयसूत्रे मानली पाहिजेत. ‘पायरीचा दगड’, ‘तेथे लव्हाळे राहती’, ‘मोर्चा’, ‘महाप्रस्थान’, ‘इस शहर में हर शख्स..’ या काही प्रमुख कथांमधून सामाजिक स्थितीगतीचे दर्शन घडते. ‘तेथे लव्हाळे राहती’ या कथेत राजकारणाच्या कोलाहलात हरवलेल्या ध्येयवादाचे परखड चित्र आढळते. ‘महाप्रस्थान’ आणि ‘इस शहर में हर शख्स..’ या कथांमधून लेखकाने मानवी नातेसंबंधाची चिवट वीण कमालीच्या सूक्ष्मतेने उलगडण्याचा प्रभावी प्रयत्न केला आहे. ‘महाप्रस्थान’मध्ये श्रीधर या एका मोठय़ा लेखकाच्या मृत्यूनंतर सदानंद या त्याच्या भावाला
 

श्रीधरविषयीचे एक वेगळेच रूपवास्तव स्वीकारावे लागते. मानवी नातेसंबंधातली सापेक्षता, अस्थैर्य व उफराटेपणा ही कथा तीव्रतेने व्यक्त करते. ‘इस शहर में हर शख्स..’ या कथेत सुशीला, भाईजी आणि विभा या पात्रांच्या त्रिकोणातून नातेसंबंधातली गुंतागुंत आणि चिवट जीवनासक्तीचे उत्कट दर्शन घडते. या कथेतील सुशीला या व्यक्तिरेखेची धारदार निग्रहशीलता विशेष लक्षवेधी ठरली आहे.
शोभणेंच्या कथाविश्वात मानवी कामवासनेच्या अथांग सळसळीचे वैयर्थ शोधणाऱ्या कथांचेही एक विशेष स्थान आहे. ‘डोह’, ‘एका िशगाचा घोडा’, ‘अदृष्टाचं देणं’, ‘ओली धिप्पाड भिंत’ इ. कथा वास्तवापेक्षा अद्भुत रम्य पातळीवरच अधिक वावरतात. ‘एका शिंगाचा घोडा’ या कथेत स्त्री-पुरुष मीलनाच्या अप्राप्य ‘ख’ पुष्पामागे धावणाऱ्यांची फरफट उत्कटपणे मांडली आहे. ‘केसाळ कातडीचं श्वापद’ या कथेत निसर्गदत्त वासनेच्या दमनातून घडलेल्या हिंस्त्र, भीषण विस्फोटाचे दाहक चित्र आढळते. या कथेतील वेणू ही शिक्षिका तरुण वयातील फसवणुकीमुळे केसाळ श्वापदाच्या मानसिक भयगंडाने त्रस्त आहे. या कथेत मृदंग वाजविणारा जोगी, शेजारचा तरुण माधव आणि शाळकरी राजू ही तीन पात्रे अतृप्त-एकाकी वेणूच्या अंतर्मनात संभ्रम निर्माण करतात. एकाच वेळी लौकिक व भासमान पातळ्यांवर वावरणारी ही पात्रे वेणूचे अवघे व्यक्तिमत्त्वच नासवून टाकतात. शोभणेंची ही कथा मानवी जीवनातील कामप्रेरणेचे अटळ स्थान अधोरेखित करते. शोभणेंची ‘ओली.. धिप्पाड भिंत’ ही कथा मानवी स्खलनशीलतेचे प्रभावी चित्र रेखाटते. वासना, नैतिकता यांच्या घालमेलीतून उद्भवलेले अगतिक, छिन्नविच्छिन्न भावजीवन लेखकाने भास्करबुवा या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून साकारले आहे. शोभणेंच्या या सगळ्याच कथांमध्ये एक झपाटलेले, अदृश्य शक्तीने भारलेले वातावरण आढळते. अतक्र्य, वास्तवातील आशयाच्या प्रकटीकरणासाठी शोभणेंनी मृदंगाचे वेडावणारे नाद, एकशिंगी घोडा, केसाळ श्वापद, नाग-नागिणीचा प्रणय अशा अनेक गूढरम्य प्रतीक-प्रतिमांची प्रभावी योजना केली आहे. शोभणेंची कथा सभोवतीच्या लौकिकाचा, लौकिकातील अतक्र्याचा आणि अप्रकट मनोविश्वाचा सूक्ष्म वेध घेणारी आहे. हा कथाकार मानवी स्खलनशीलतेला, मनाच्या जटिल गुंतागुंतीला पुरता ओळखून आहे. मानवी मनाचे तळघर या कथाकाराला परिचित आहे. माणसाचे मुळात फार सरळ नसणे, त्याचे बरेचसे निसरडेपण, त्याचे प्रतिकूलतेची, नियतीशी झुंजणे, कोसळणे आणि अगतिक होणे इ. मानवी जीविताचे हे सगळेच पैलू कथाकार शोभणे आपल्या कथांतून समर्थपणे व्यक्त करतात.
रवींद्र शोभणे या लेखकाला कथेप्रमाणेच कादंबरीचेही क्षेत्र फार आधीपासून खुणावत आले आहे. ‘प्रवाह’, ‘रक्तध्रुव’, ‘कोंडी’, ‘चिरेबंद’, ‘सव्वीस दिवस’, ‘उत्तरायण’ आणि ‘पडघम’ असा शोभणेंच्या कादंबरी लेखनाचा प्रवास आहे. ‘प्रवाह’ या पहिल्या कादंबरीत एका प्रवाहपतित स्त्रीजीवनाची शोकांतिका वर्णन केली आहे. स्त्रीमनाच्या गुंतागुंतीचा आणि कामभावनेचा वेध घेण्याचा प्रयत्न या कादंबरीत आढळतो. ‘प्रवाह’नंतरच्या ‘रक्तध्रुव’ या दुसऱ्या कादंबरीत लेखकाच्या प्रगल्भतेचा व प्रभावी कथाशैलीचा प्रत्यय येतो. ग्रामीण-मुस्लिम पाश्र्वभूमीवरील या कादंबरीत सईदा व सलमा या गरीब मायलेकींच्या शोकात्म जीवनाची चित्तरकथा आढळते. एकूणच अभावग्रस्ततेमुळे आपले तारुण्य व भावविश्व अकालीच कुस्करले गेलेली सलमा आणि आपल्या कौुटंबिक वाताहतीला सलमा ही आपली मुलगीच कारणीभूत मानणारी सईदा यांच्यातील प्रभावी आंतरविरोधामुळे ही कादंबरी विशेष लक्षणीय ठरली आहे. शोभणेंच्या ‘कोंडी’ (१९९२) या कादंबरीने त्यांना साहित्यक्षेत्रात एक भक्कम स्थान मिळवून दिले आहे. ग्रामीण कृषक पाश्र्वभूमीतील वसंता गणपत सातपुते या नायकाचा जीवनसंघर्ष लेखकाने ‘कोंडी’तून समरसून रेखाटला आहे. कादंबरीच्या शेवटी शोभणेंचा हा वीरनायक स्वत:त कोंडीत अडकतो. या नायकाचा करुण शोकांत अत्यंत उत्कट आणि भावस्पर्शी ठरला आहे. भारतीय कुटुंबसंस्थेची नव्याने चिकित्सा करणारी शोभणेंची ‘चिरेबंद’ ही कादंबरी १९९५ साली प्रकाशित झाली. विवाहमुक्त संबंधाचा निग्रही पुरस्कार करणारी, बंडखोर मनाची प्रज्ञा ही शोभणेंची नायिका शेवटी चिरेबंदी कुटुंबसंस्थेचाच भाग होऊन जाते. कादंबरीतील गंभीर, वैचारिक अधिष्ठानामुळे ही कादंबरी महत्त्वाची मानली जाते. ‘सव्वीस दिवस’ या अनुभव कथनाच्या दिशेने प्रकटलेल्या कादंबरीत शोभणेंनी या नवोदित लेखकाच्या मनाची घुसमट प्रत्ययपूर्ण शैलीतून साकारली आहे. अत्यंत वेगवान कथाप्रवाह आणि टोकदार आशयकेंद्र या वैशिष्टय़ांमुळे ही कादंबरी विलक्षण वाचनीय ठरली आहे.
‘उत्तरायण’ (२००१) ही कादंबरी शोभणेंच्या आजवरच्या लेखनप्रवासातील एक महत्तम साहित्यकृती मानली जाते. महाभारतीय वास्तवाचा एक नवाच अन्वयार्थ मोडणारी ही बृहद् कादंबरी आहे. महाभारतीय बीजसूत्रांच्या आधारावर स्वतंत्र साहित्यकृती निर्माण करण्याची मोठी परंपरा मराठीत आहे. महाभारतातील गूढरम्य, उदात्त व्यक्तिरेखांचा आधुनिक अन्वयार्थ मांडणारे बरेच लेखन मराठीत झाले आहे. ‘उत्तरायण’ ही कादंबरी महाभारतातील भीष्म या व्यक्तिरेखेला केंद्र मानणारी असली तरी तिचा परिघ केवळ भीष्मापुरता मर्यादित राहत नाही, शोभणेंनी या कादंबरीतून एकूणच महाभारतीय जीवनवास्तवाची पुनर्माडणी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. शोभणेंनी या कादंबरीत महाभारतीय मिथकांचे अर्वाचीनीकरण तर केलेले आहेच, शिवाय महाभारतातील अनेक जटिल, चमत्कारिक घटितांची बुद्धिनिष्ठ, तर्कसंगत मीमांसाही सशक्तपणे सिद्ध केली आहे.
संजयाची दिव्यदृष्टी, धृतराष्ट्राचे शंभर पुत्र, द्रौपदीचे वस्त्रहरण, भगवत् गीतनिर्मिती, पांडवांच्या जन्मकथा या सगळ्याच अद्भुत घटितांचे वास्तवासमांतर, तर्कनिष्ठ पुनर्रचना ‘उत्तरायण’मध्ये आढळते. महाभारतीय आशयसूत्रांचा वेध घेणाऱ्या इतर लेखकांपेक्षा रवींद्र शोभणेंची लेखनप्रेरणा खूप वेगळी अन् मौलिक ठरते हे महत्त्वाचे. युद्ध आणि मानवी जीवित यांच्या अनुबंधाविषयीचे तात्त्विक चिंतन हा ‘उत्तरायण’चा एक महनीय पैलू होय. विनाशाशिवाय यश शक्य आहे काय, निर्थकता हेच जीवनाचे साफल्य आहे काय, सूडभावनेला विराम शक्य आहे काय, युद्धाचा धर्माशी व नीतीशी काय संबंध आहे अशा अनेक प्रश्नोपप्रश्नांची मूल्यगर्भ चिकित्सा या कादंबरीत आढळते. मानवी कर्तृत्व, यश-अपयश, सत्ताकांक्षा हे सगळेच एका महाकाव्य निर्थकतेचा भाग आहेत, जीवनाला निर्थकतेपेक्षा वेगळा चेहरा नाही, या वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या निष्कर्षांकडे हा कादंबरीकार कौल देताना आढळतो. व्यापक, सघन चिंतनदृष्टीशिवाय असे तत्त्वचिंतन कुणा लेखकाला व्यक्त करता येत नाही. शोभणेंना ही अपवादभूत चिंतनदृष्टी लाभली हे विशेष महत्त्वाचे. शोभणेंचे हे चिंतन केवळ महाभारतीय काळापुरते मर्यादित न राहता आजच्या समकालीन वास्तवालाही स्पर्श करताना आढळते. ‘धर्मसत्ताक राज्याचा खरा अर्थ आता मातीतच मिळालाय,’ हे भीष्माचे उद्गार आपल्या आजच्या काळावरही मार्मिक भाष्य करताना आढळते.
‘पडघम’ (२००७) ही रवींद्र शोभणेंची अलीकडील काळातली एक बहुचर्चित राजकीय कादंबरी होय. आणीबाणीच्या घोषणेपासून ते इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंतचा राजकीय कालावकाश आणि या कालावकाशाचा जनसामान्यांच्या जीवनावर पडलेला प्रभाव हे या कादंबरीचे मुख्य सूत्र होय. हा कालखंड तसा इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, संजय गांधी, जॉर्ज फर्नाडिस, सुब्रमण्यम स्वामी या धुरंधर व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावाचा कालखंड होय. यापैकी कोणतेही व्यक्तिमत्त्व ‘पडघम’च्या केंद्रस्थानी नाही हे विशेष. ही सगळीच व्यक्तिमत्त्वे ‘पडघम’मध्ये पाश्र्वभूमीसारखी वावरतात. आणीबाणी या घटिताने प्रभावित झालेले जनसामान्यांचे जीवन या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. आणीबाणीच्या काळातली जनसामान्यांची भेदरलेली, भयभोर झालेली जीवनसंवेदना उत्कटपणे व्यक्त करणे हे कादंबरीचे जन्मप्रयोजन आहे. या कादंबरीत आणीबाणीच्या समर्थनाची किंवा विरोधाची अशी कोणतीही भूमिका शोभणे स्वीकारीत नाहीत. आणीबाणी हे एक ऐतिहासिक, अटळ घटित आणि या घटिताचे अटळ परिणाम अधोरेखित करणे एवढीच लेखकाची व्रतस्थ भूमिका आहे. आणीबाणीसारख्या विलक्षण गुंतागुंतीच्या प्रश्नाची एवढय़ा अलिप्तपणे मीमांसा करणारी मराठीतील एक अपवादभूत कादंबरी म्हणून ‘पडघम’ या कादंबरीचा गौरव करावा लागेल.
‘पडघम’ ही कादंबरी केवळ आणीबाणी या राजकीय घटिताला केंद्र करणारी कादंबरी नाही, तर आणीबाणीच्या काळातील समग्र जनजीवनाला व्यापून टाकेल असा विशाल परीघ या कादंबरीत एकवटला आहे. आणीबाणीतील स्वातंत्र्य संकोचासोबतच जनसामान्यांचे लढणे, रडणे, कोसळणे, प्रेमात पडणे, तुडवले जाणे, पुन्हा चिघळणे, त्यांचे अंतर्यामी फुटून निघणे अशा मानवी जीवनव्यवहाराच्या सगळ्या तऱ्हा ‘पडघम’मध्ये आविष्कृत झाल्या आहेत. या कादंबरीतली माणसे एकसूत्री, एकसाची नाहीत; ती बहुरंगी, बहुढंगी आणि जीवनरसाने ओथंबलेली आहेत. ‘पडघम’मधील माणसांचे अनेक संदर्भ आपल्या सभोवतीच्या वास्तव जीवनात आढळतात; परंतु समकालीन अनेक व्यक्तिमत्त्वांच्या सरमिसळीतून उद्भवलेले ‘कोलाज’ असे काहीसे शोभणेंच्या व्यक्तिरेखांसंबंधी म्हणता येईल. ‘पडघम’मधील भानुदास धवणे हा समकालीन अनेक वृत्ती-प्रवृत्तींचा वैशिष्टय़पूर्ण कोलाज आहे हे सहज पटण्यासारखे आहे. म्हणूनच ‘पडघम’कडे केवळ ‘राजकीय कादंबरी’ म्हणून पाहणे हे या कादंबरीवर अन्याय करण्यासारखे ठरते.
रवींद्र शोभणे या प्रगमशील लेखकाच्या अभिव्यक्तीची कथा आणि कादंबरी ही दोन सहजसुंदर माध्यमे होत. हा लेखक सभोवतीच्या जीवनाला, समग्र समष्टीला भिडणारा लेखक आहे. समाजजीवनाचा आणि मानवी अंतर्मनाचा तळगाळ ढवळून काढणारी तीव्र संवेदना शोभणेंना लाभली आहे. हळूवार संवेदनेची पापणी सतत जागी ठेवून जीवनाचे लसलसते, काळे-पिवळे-करडे रुपवैचित्र्य सतपशील शब्दबद्ध करणे हा शोभणेंचा प्रतिभाधर्म आहे. मानवी जीवन बहुआयामी अन् व्यामिश्र आहे, जीवनाची स्पष्टीकरणे सांगणाऱ्या सर्वच दृष्टिकोनांपेक्षा मानवी जीवन अधिक विशाल, उन्नत आहे म्हणूनच ते समग्रतेने स्वीकारले आणि मांडले पाहिजे या तत्त्वावर शोभणेंची अतीव निष्ठा आहे, हे विशेष महत्त्वाचे. जीवनातल्या आणि साहित्यातल्या अभिनवतेचे, सशक्ततेचे स्वागत करताना शोभणेंनी कुठल्या प्रवाहाचं निशाण कधी खांद्यावर घेतलं नाही. प्रवाहांच्या मांदियाळीत जीव रमवण्यापेक्षा व्यामिश्र जनवास्तवाला अधिक धिटाईने आणि आत्मबळाने भिडणे हे शोभणेंनी नेहमीच महत्त्वाचे मानले आहे. वाङ्मयीन मठबाजीपेक्षा आपल्या अंत:स्थ सृजनसामर्थ्यांला त्यांनी अधिक महत्त्व दिले आहे.
‘उत्तरायण’, ‘पडघम’सारख्या मौलिक साहित्यकृतींच्या निर्मितीनंतरही रवींद्र शोभणे यांचे लेखकीय ध्यासपर्व संपले नाही. सभोवतीच्या समाजवास्तवाचे अनेक अथांग डोह शोभणेंच्या प्रतिभेला अजूनही खुणावत आहेत. जीवनातील सृजनवैविध्याने आणि रुपवैविध्याने मोहोरलेला हा लेखक कुठल्याही मान-सन्मानाच्या वळणावर थांबणारा नाही हे खरे आहेच.
प्रा. अनिल नितनवरे


प्रश्नमंजूषा क्रमांक १०
(राजहंस प्रकाशनाच्या सहकार्याने)
महाप्रश्नमंजूषा (५ भाग : १०० गुण)

उत्तरे
भाग १ (प्रत्येकी १ गुण)
१. ‘एथ चातुर्य शहाणे झाले। प्रमेय रुचीस आले ।।’ ही पंक्ती कोणत्या ग्रंथातील आहे?
उत्तर : अ. ज्ञानेश्वरी. संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातील खरा चमत्कार असे ज्याचे वर्णन करता येईल अशा ‘ज्ञानेश्वरी’च्या पहिल्या अध्यायात माऊलीने महाभारताचे वर्णन या शब्दात केले आहे. अगदी चपखल वाटल्याने आपल्या या प्रश्नमंजूषेलाही हे नाव दिले.
२. ‘कानडाऊ विठ्ठलू करनाटकू’ हा अभंग कोणाचा आहे?
उत्तर : ड. ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊलीचा हा मधुर अभंग. विठ्ठलाचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी तो कानडा म्हणजे कोडय़ासारखा आहे आणि नाटके करून कोडय़ात टाकणारा (करनाटकू) आहे असे शब्द वापरले आहेत. (बरेच जण इथे कन्नड, कर्नाटक वगैरे भलतेच अर्थ लावतात!)
३. खालीलपैकी कोणता अभंग संत तुकारामांचा नाही?
उत्तर : ड. कांदा मुळा भाजी.. हा रसाळ अभंग सावता माळ्याचा आहे. आपल्या दिनचर्येतच ईश्वर आहे असा संदेश इथे दिला आहे.
४. ‘केकावली’ हा प्रसिद्ध ग्रंथ कुणी लिहिला?
उत्तर : अ. मोरोपंत. आर्या वृत्तात विपुल रचना करणाऱ्या शब्दप्रभू ‘पंत’ कवी मोरोपंतांचे हे काव्य.
५. प्राणी आणि पक्ष्यांच्या गोष्टीतून नीतिबोध करणारा ‘पंचतंत्र’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर : ब. विष्णू शर्मा. अर्थपूर्ण जगावे कसे याबद्दल गोष्टीरूप बोध करणाऱ्या या ग्रंथाचे लेखक विष्णू शर्मा. मित्रप्राप्ती, मित्रभेद, काकोलुकीय, लब्धप्रणाष आणि परिक्षितकारक अशी ही पाच तंत्रे आहेत.
६. नचिकेत आणि यम यांच्यातील संवाद कोणत्या उपनिषदात आहे?
उत्तर : ब. कठोपनिषद. वाजश्रवा ऋषींचा पुत्र नचिकेत हा वडिलांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारतो तेव्हा ते त्याला यमाला दान करतात आणि हा तेजस्वी पुत्र खरेच यमाकडे जातो. तेव्हा नचिकेत आणि यमातला जीवनाचा आणि परमतत्त्वाचा अर्थ उलगडणारा हा विख्यात संवाद होतो. जगण्यातले श्रेयस आणि प्रेयस याविषयीची मोलाची चर्चा यात आहे.

भाग २ (प्रत्येकी २ गुण)
खालील विख्यात प्रकाशकांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव ओळखा. कंसात त्या प्रकाशकाच्या प्रकाशन संस्थेने नाव दिले आहे, पण ते पुस्तक त्या प्रकाशन संस्थेचेच असेल असे मात्र नाही.
७. श्री. पु. भागवत (मौज प्रकाशन)
उत्तर : क. साहित्याची भूमी. मराठी साहित्यात एक विचक्षण आणि साक्षेपी संपादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीपुंचा साहित्यविषयक चिंतनांचा आणि भाषणांचा हा संग्रह. यातले मर्ढेकर आणि गाडगीळ यांच्यावरचे लेख विशेष मोलाचे आहेत.
८. रामदास भटकळ (पॉप्युलर प्रकाशन)
उत्तर : ब. जिगसॉ. जीए, गाडगीळ, नेमाडे, श्याम मनोहर अशा थोर लेखकांची पुस्तके प्रकाशित करणाऱ्या पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ यांचा हा ग्रंथ. भटकळांचे ‘मोहनमाया’ हे गांधीजींच्या सुहृदांवरचे पुस्तक नुकतेच मौजेने काढले आहे.
९. अरुण जाखडे (पद्मगंधा प्रकाशन)
उत्तर : अ. पाचरूट. अस्सल ग्रामीण जीवनाचे आणि शेतकऱ्याच्या खऱ्या व्यथेचे दर्शन घडवणारी ही कादंबरी. नभोवाणीवरून हिचे वाचन सादर केले होते ते खूप गाजले. समीक्षा, भाषाशास्त्र, दैवतांबाबतचे संशोधन वगैरे आडवाटेची श्रेष्ठ पुस्तके काढणाऱ्या पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे लोकसत्तेच्या वाचकांना त्यांच्या ‘इरजिक’ या सदराने चांगलेच परिचित आहेत.
१०. आनंद अंतरकर (हंस- विश्वमोहिनी प्रकाशन)
उत्तर : ड. रत्नकीळ. हंस, मोहिनी, नवल अशा दर्जेदार मासिकांची निर्मिती करणाऱ्या ‘हंस’ प्रकाशनाचे आनंद अंतरकर त्यांच्या शैलीदार ललित लेखनासाठी आणि आत्मीयतेने रेखाटलेल्या व्यक्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. विश्वमोहिनी प्रकाशनाने सादर केलेली ‘नवे कथाकार’ मालेतली कथासंग्रहाची पुस्तके विशेष गाजली होती.
११. राजन खान (अक्षरमानव प्रकाशन)
उत्तर : क. ‘सत ना गत’. अत्यंत कसदार आणि विपुल कथालेखन करणारे राजन खान अक्षरमानव ही प्रकाशन आणि सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणारी संस्था चालवतात. ‘सत ना गत’ मध्ये ते एका फौजदाराने दलित स्त्रीवर केलेल्या बलात्काराच्या घटनेच्या निमित्ताने समाजाचे वास्तव रूप अत्यंत भेदक आणि वेधक स्वरूपात दाखवतात. सध्या ‘साधना’मध्ये ते ‘कथेमागची कथा’ हे अत्यंत महत्त्वाचे आणि आगळे सदर चालवतात. त्यात ते आपल्या काही गाजलेल्या कथांमागची कथा सांगतात.
१२. बाबा भांड (साकेत प्रकाशन)
उत्तर : अ. तंटय़ा. ‘टीकास्वयंवर’सारखा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या ‘साकेत प्रकाशनाचे’ बाबा भांड यांची ही गाजलेली साहित्यकृती. ‘तंटय़ा भिल्ल’ या विषयावर ब्रिटिश दस्तावेज, तत्कालीन कोर्टाची कागदपत्रे वगैरेचे मौलिक संशोधन करून बाबा भांड यांनी या विषयावर सहा पुस्तके लिहिली.

भाग ३ (प्रत्येकी ४ गुण)
जोडय़ा लावा :
१३. स्मृतिचित्रे या आत्मचरित्राची लेखिका
फ. लक्ष्मीबाई टिळक
अत्यंत मार्मिक आणि नर्मविनोदी शैलीतले हे आत्मचरित्र म्हणजे स्त्रीच्या जगण्याचा एक उत्कट आविष्कार आहे. सोसणे आणि हसणे हातात हात घालून जाते तेव्हा जगणे सोनेरी होते याचे हे मूर्तिमंत चित्रण.
१४. ‘ब्र’ या कादंबरीच्या लेखिकेचा कवितासंग्रह
अ. तत्पुरुष
‘ब्र’ आणि ‘भिन्न’ या आगळ्या विषयांवरील कादंबऱ्यांच्या लेखिका कविता महाजन यांचे तत्पुरुष, धुळीचा आवाज आणि मृगजळीचा मासा हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
१५. नातिचरामि या कादंबरीच्या लेखिकेचा कथासंग्रह
इ. हंस अकेला
‘आंधळ्याच्या गायी’ आणि ‘हंस अकेला’ हे मेघना पेठे यांचे गाजलेले कथासंग्रह राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले. मर्मभेदी, धाडसी आणि विदग्ध अभिव्यक्ती आणि बंडखोर पण मौलिक आशय हे मेघना पेठे यांच्या लेखनाचे विशेष.
१६. साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली लेखिका
ब. इरावती कर्वे
मानववंशशास्त्र, समाजशास्त्र यांच्या ज्येष्ठ संशोधक विदुषी इरावती कर्वे यांचे महाभारतातील व्यक्तिरेखांबाबतचे अभ्यासपूर्ण परंतु ललित अंगाने लिहिलेले चिंतनपर लेख ‘युगांत’ या पुस्तकात आहेत. १९६८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार या ग्रंथाला मिळाला. परिपूर्ती हे त्यांचे ललित लेखांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
१७. विभावरी शिरूरकर या नावाने लिहिणारी लेखिका
क. मालती बेडेकर
प्रौढ कुमारिकांच्या प्रश्नावर प्रथम लिहून मालतीबाई बेडेकरांनी तत्कालीन रूढीप्रिय आणि बुरसटलेल्या समाजात खळबळ माजवली. विख्यात लेखक विश्राम बेडेकर यांच्या त्या पत्नी, कळ्यांचे नि:श्वास, हिंदोळ्यावर ही त्यांची विशेष गाजलेली पुस्तके.
१८. ‘त्या वर्षी’ या कादंबरीच्या लेखिकेची एक कादंबरी
ड. रिटा वेलिणकर
प्रौढ अविवाहित स्त्रीच्या जगण्यातले ताणतणाव अत्यंत कलात्मकतेने रेखाटणारी ही शांताबाईंची गाजलेली कादंबरी. त्यानंतर प्रदीर्घ विरामानंतर आलेली ‘त्या वर्षी’ ही कादंबरी संगीत, चित्रकला अशा कलांच्या क्षेत्रातल्या सर्जनाची कहाणी आणि त्यातले ताण मांडते.

भाग ४ (प्रत्येकी ८ गुण)
खाली चार पुस्तकांची नावे दिली आहेत. त्यांपैकी तीन पुस्तके त्याच लेखकाची आणि एकाच साहित्यप्रकाराची (उदा. : कथा, कविता, कादंबरी) आहेत तर एक पुस्तक त्या लेखकाचे नाही किंवा त्या साहित्यप्रकाराचे नाही. ते चौथे पुस्तक ओळखा :
१९. अ. अगोचर ब. अजगर
क. त्रिशंकू ड. जोगवा
उत्तर : ड. जोगवा. पहिल्या तीनही खानोलकरांच्या कादंबऱ्या आहेत तर जोगवा हा त्यांचाच (आरती प्रभू या नावाने) कवितासंग्रह.
२० अ. सलाम ब. जिप्सी
क. मुक्तायन ड. उत्सव
उत्तर : क. मुक्तायन. बाकी तीनही मंगेश पाडगावकरांचे कवितासंग्रह आहेत तर ‘मुक्तायन’ हा कुसुमाग्रजांचा मुक्तछंदातल्या कवितांचा संग्रह. (इथे एक बारीकशी गोष्ट सांगतो. बऱ्याचदा ‘काव्यसंग्रह’ हा शब्द वापरला जातो तो चूक आहे. काव्य हा साहित्यप्रकार आहे तेव्हा काव्यग्रंथ असू शकतो. संग्रह कवितांचा असतो. कवितासंग्रह असे म्हणावे.)
२१. अ. किनारा ब. वादळवेल क. मारवा ड. वैजयंती
उत्तर : ड. वैजयंती. चारही पुस्तके वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रजांची आहेत पण वैजयंती हे नाटक आहे तर बाकी तीन कवितासंग्रह आहेत.
२२. अ. हूल ब. जरीला क. मेलडी ड. झूल
उत्तर : क. मेलडी. मेलडी हा भालचंद्र नेमाडे यांच्या कवितांचा संग्रह. तर हूल, जरीला आणि झूल या त्यांच्या कादंबरी चतुष्टकातल्या कादंबऱ्या. बीढार ही त्यातली चौथी कादंबरी.
२३. अ. मेरसोलचा सूर्य ब. तूही यत्ता कंची क. खेळ ड. गोलपीठा
उत्तर : अ. मेरसोलचा सूर्य. हा विख्यात समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांचा कवितासंग्रह आहे तर बाकी तीन नामदेव ढसाळ यांचे आहेत. मेरसोलचा सूर्य ही गाजलेली कविता कामूच्या ‘आऊटसायडर’मधल्या विचारांवरचे चिंतन आहे.
२४. अ. पारवा ब. हिरवे रावे क. पोपटी चौकट ड. रक्तचंदन
उत्तर : क. पोपटी चौकट. विद्याधर पुंडलिक या गुणवान आणि कसदार कथा लिहिणाऱ्या कथाकाराचा हा संग्रह तर बाकी तीन जी. ए. कुलकर्णी यांचे कथासंग्रह आहेत.

भाग ५ (उत्तरास १० गुण)
२५. आणीबाणीनंतर भारतात सत्तांतर झाले. त्यानंतर पुणे येथे १९७७ साली पु. भा. भाव्यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या साहित्य संमेलनात दुर्गाबाई भागवत यांनी मावळत्या अध्यक्षा या नात्याने केलेल्या भाषणात ‘नागवे नातवंड’ या कवितेवर खरमरीत टीका केली होती. त्या कवितेची सुरुवात अशी-
कालचे बंडखोर आज सत्ताधीश झाले आहेत.
कालचे सत्ताधीश आज बंदिवान झाले आहेत.
कालचीच शेषसुरा माणसं आज प्यायली आहेत..
या कवितेचे कवि कोण?
उत्तर : ब. माडगूळकर. १९७७ साली ‘हंस’च्या दिवाळी अंकात माडगूळकरांची ‘नागवे नातवंड’ ही कविता प्रसिद्ध झाली. आणीबाणीनंतर जनता पक्षाची राजवट आली त्याला उद्देशून असलेल्या या कवितेत ‘जयप्रकाश नारायण’ यांच्या बदनामीचा सूर आहे, असे प्रतिपादन करून दुर्गाबाईंनी निषेध केला. निदर्शने, निषेध यांनीच हे साहित्य संमेलन गाजले.
संजय भास्कर जोशी
prashnamudra@gmail.com