Leading International Marathi News Daily
रविवार, २८ जून २००९

आई-बाबांपाशी मी खूप भुणभुण केली. ‘तुम्ही एकदा तरी विमानात बसलायत, मला पण एकदा न्या ना! न्या ना!’ आईबाबांनी अपघाताने की काय म्हणतात, तसाच विमानप्रवास केलेला. बाबांना खूप दमा लागायचा, म्हणून बाबांनी खूप औषधं घेतली होती, पण तरी त्यांचा दमा बरा झाला नाही. कुणी तरी सांगितलं की, हैदराबादला कोणी एक वैदूबाबा आहे. तो मासा गिळायला देतो आणि म्हणे दमा कायमचा जातो. तसं तीन र्वष जायचं होतं. बरेच उपाय करून थकल्यावर हा पर्याय बाबांनी निवडला होता वाटतं. (तरी अजूनही दमा आहेच!) आई-बाबांची ट्रेन चुकली. मग दोघं महागडं तिकीट काढून विमानानं गेले. परतल्यानंतर आम्हाला त्यांनी ज्या मज्जा सांगितल्या, ते ऐकून मला वाटलं की, मला कधी ही मज्जा करायला मिळेल? विमानातल्या बाया म्हणे खूप लाली लावतात. कॉफी-कॅडबरी खायला देतात. विमान वर वर जातं, तसं पोटात गडबड होते. उतरताना थोडंसं छातीतही धडधडतं. विमान धावपट्टीवर उतरतं तेव्हा तेसुद्धा धडधडतं.
माझ्या भुणभुणीला कंटाळून आई-बाबांनी मला नागपूरला न्यायचं ठरवलं, कारण तसं ते जवळ होतं आणि आईची आत्या नागपूरला राहत होती. आईने जाताना तिच्यासाठी मेतकूट, भाजणी, आमसुलं आणि फणस घेतला होता. बाबा तिला ओरडत होते की, फणस कशाला विमानानं न्यायचा म्हणून, पण तिला पटत नव्हतं. आईला तिच्या आत्याला घरच्या फणसाची भाजी करून घालायची होती. तिने ऐकलं नाही. फणसाची पिशवी शेवटपर्यंत तिनंच सांभाळली. विमानात बसण्यापूर्वी मी खूप प्रश्न विचारत होते. त्यामुळे आई-बाबा कंटाळून गेले होते. हे मला थोडं कळत होतं, पण मला विमानाचे वेध लागले होते. मी तसं त्यांना सांगितलं , तर आई-बाबांना हसू येत होतं. दरवाजाजवळच्या पोलिसाला तिकीट दाखवून आम्ही आत गेलो. सगळं सामान एका ढकलगाडीतून नेऊन तपासायला दिलं. मला कळेना, आमचं सामान का तपासतात, तेव्हा आईनं मला सांगितलं की, याला ‘सुरक्षा तपासणी’ म्हणतात. आपण बॅगमध्ये काय सामान घेतलंय, ते पोलिसांच्या संगणकावर दिसतं. मी लगेच आईच्या पिशवीतला फणस कसा दिसतो, ते पोलीस
 

अधिकाऱ्याच्या शेजारी जाऊन पाहू लागले. त्याने डोळे मिचकावीत माझं नाव विचारलं. ‘पिंटी’ असं नाव त्याला सांगितल्यावर त्यानं माझं खरं नाव विचारलं. मी ते सांगितलं. मग त्याने इंग्रजीमध्ये माझं कौतुक केलं. त्याला टाटा करून मी पुढे गेले. पाहते तो काय, आमचं सामान सरकत्या पट्टीवरून कुठे तरी चाललेलं. मी ओरडले, ‘आपलं सामान कुठे नेतायंत? आपल्याला परत मिळेल ना?’ त्यावर आईने समजावलं, ‘पिंटे, आता आपलं सामान विमानात ठेवतील. उतरल्यावर आपल्याला पुन्हा ते मिळेल.’ मला हायसं वाटलं. कारण बॅगेत आईच्या आत्यासाठी मी तयार केलेलं भेटकार्ड होतं. मला माहीत होतं की, मी जेव्हा तिला ते कार्ड देईन, तेव्हा ती मला मांडीवर बसवून लाडू भरवेल. ‘मोठी गुणाची गं बाय माझी’ म्हणेल आणि सामान हरवलं असतं तर यातलं काहीच झालं नसतं. आपलं सामान आपल्याजवळ का नाही ठेवायचं? याचा मला राग आला.
इतक्यात विमानतळावर आत मला तिथे टीव्ही दिसला. चकाचक दुकानंही दिसली. त्यात काय आहे, हे पाहताना माझा राग कुठल्याकुठे पळून गेला. तिथे फूटमसाज करायचं एक पारदर्शी दुकान होतं. कॉफी, लाह्य़ांची काही दुकानं होती. मला पायाला मालिश करायचं होतं, पण बाबा म्हणाले की, खूप पैसे पडतात त्याला. आता त्यावर मी काय बोलणार? माझ्या हट्टापायी ते मला विमानातून नेणार होते, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मी तिथल्या चकाचक बाथरूममध्ये गेले, तेव्हा लादीवर चमकी पडली होती. शाळेच्या गॅदरिंगला बाई गालाच्या लालीवर चकमकी लावायच्या, त्याची आठवण आली. आम्ही बाईंना ‘अजून लावा.. अजून लावा’ सांगायचो, पण ती छोटी बाटली बाई अख्ख्या शाळेतल्या मुलींना पुरवायच्या. बाईंना मी जाऊन कधी सांगेनसं ंझालं की, ‘विमानतळावर जा जरा. बघा, किती चमकी असते, तीसुद्धा खाली पडलेली!’ तिथे आईनं सांगितलं की, नळाखाली हात धर, तेव्हा आपोआप पाणी आलं. तिथे हात सुकवायचंही एक मशीन होतं. त्या समोर ओले हात धरले की, आपोआप सुकत होते. आई साडी नीट करत होती, तेवढय़ात मी पाच वेळा हात धुऊन दहा वेळा कोरडे केले. बाहेर आल्यावर मी बाबांना आत घडलेली मज्जा सांगितली. काय तरी खायला आणा.. म्हणून कुरकुर करू लागले. ‘खूप महाग असतं इथे, पिंटे!’ असं म्हटल्यावर माझं तोंड पुन्हा गप्प झालं. बाबांना माझी दया की काय, ती आली. त्यांनी सर्वात स्वस्त अशी एक काळ्या रंगाची कॉफी आणली. त्यात मी साखरेची पुडी ओतली नि आंबट तोंड करून तिघांनी ती प्यायली. आमच्या घरी गाई- म्हशी असल्याने दुधाशिवाय प्यायलेली ती पहिलीच कॉफी होती नि बाबा म्हणाले तशी शेवटचीच. आपण बाटलीतून दूध भरून आणायला हवे होते, असं मला वाटलं. गाडी आली. आम्ही विमानात चढलो. मला खिडकीजवळ बसवलं, कारण मला ढग पाहायचे होते. मी ‘खिडकी उघडा’, म्हटल्यावर आमच्या मागे बसलेली माणसं हसली. सूर्य डोळ्यावर आला की, खिडकी बंद करता येते, हे आईनं मला दाखवलं. मी १२ वेळा तरी खिडकी उघडली - बंद केली. आईने डोळे मोठे केले. ‘हे काय आहे गं?’ असं विचारल्यावर आई म्हणाली, ‘छोटं डायनिंग टेबल. ते असं उघडतात आणि त्यावर चहा- कॉफीचा कप ठेवायचा. खाणं ठेवायचं.’ आम्हाला खाणं कोणी आणलं नाही, कारण बाबांनी बिनखाणंवाल्या, स्वस्त विमान कंपनीचं तिकीट काढलं होतं. मग मी ते छोटं टेबल १३ वेळा तरी उघडून बंद केलं. विमान वर गेल्यावर खालचं सगळं मुंगीएवढे दिसत होतं नि मला कळलं की, ‘मी वर बघत इतक्या विमानांना हात दाखवायचे, ते कुणीच पाहिले नसणार.’ मग गोऱ्या गोऱ्या तायांनी काही कवायत केली. आई म्हणाली, ‘त्यांनी सूचना सांगितल्या.’ थोडय़ा वेळानं मला कंटाळा आला. एका जागी किती वेळ बसायचं? ढग पाहून झाले. त्यांना हातात धरता मात्र आलं नाही. मी पट्टा सोडून खुर्चीवर उभी राहिले, तेव्हा बाबांनी खसकन हात ओढून खाली बसवलं. मग माझ्या कानामागून कळा येऊ लागल्या. आईने ओकारीची पिशवी काढून दिली. ती पिशवी कागदाची आणि निळ्या रंगाची होती. मी एक- दोन वेळा त्यात तोंड घालून पाहिले, पण उलटी काही आली नाही. मग मी ती ठेवून दिली. आईच्या मांडीवर डोकं ठेवलं, तेव्हा जरा बरं वाटलं.. तोवर विमान खाली उतरलं. आमचं सामान मिळालं. आतेआजीने जवळ घेतलं. तिला मी केलेलं भेटकार्ड फार फार आवडलं. पीठ आपटून आपटून मडक्यावर थापलेल्या लांब रोटय़ा तिनं आम्हांला खाऊ घातल्या. संत्र्याची बर्फी दिली. खूप-खूप फिरवले. नागपूर दाखवलं.
विमानानं खूप उंच उंच गेलं होतं. ‘देवाचे घर बाई उंचावरी’ या आमच्या कवितेतलं देवाचं घर वर कुठेच दिसलं नाही. खाली माणसांची छोटी छोटी घरं मात्र दिसत होती. देवाचं घर कसं असतं, ते पाहायचं होतं, पण ते मात्र दिसलंच नाही.
निधी पटवर्धन

तुमची ये रे, ये रे पावसा.. ही साद त्याला ऐकू गेलीय बरं का! झाली की नाही रिमझिम सुरू? गच्च आभाळ भरून येतं नि पावसाचे टपोरे थेंब पडायला सुरुवात होते, तेव्हा त्या पावसात मस्त बागडावसं वाटतं की नाही? खरं-खुरं सांगा बरं, शाळेभोवती तळं साचून सुटी मिळेल का, असाही प्रश्न पडतो की नाही? तुम्ही सारी मित्रमंडळी मिळून या पावसात चिंब भिजत हैदोस घालता की नाही?
पावसात भिजण्याच्या प्रत्येकाच्या काही ना काही गमतीजमती असतात. तुमच्याही असतील. त्या गमतीजमती नि पाऊस तुम्हांला का आवडतो, हे आम्हांला जरूर लिहून पाठवा. हो, पण शाळेतल्या निबंधाच्या स्टाइलमध्ये नको हं, छानपैकी अगदी तुमच्या मनातलं आमच्याशी शेअर करा. तुम्हांला हे मनोगत दीडशे शब्दांमध्ये पाठवायचंय आणि तुमची पत्रं आम्हांला शनिवार, ४ जुलैपर्यंत पाठवा. आमचा पत्ता - बालरंग, लोकसत्ता संपादकीय विभाग, पहिला मजला, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंबई - २१

साहित्य - खाकी कागदी पिशवी, रंगीत कागद, क्रेप कागद, स्केचपेन, कात्री, गोंद, पेन्सिल
कृती - कागदी पिशवीची खालची बाजू वर करा आणि साधारण पाच/सहा इंचावर दुमडून घ्या.
या दुमडीचे कोपरे खालच्या बाजूस दुमडा. आता साधारण प्राण्याच्या चेहऱ्याचा आकार तयार होईल.
हे दुमडलेले कोपरे चिकटवून घ्या.
दुसऱ्या विरूद्ध किंवा गडद रंगाच्या कागदावर नाक, डोळे, कान आणि हात काढा व कात्रीने कापा.
पिशवीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला कान आणि हात चिकटवा. चेहऱ्यावर डोळे व कान चिकटवा व स्केचपेनने रंगवा.
क्रेपपेपरचा छोटासा बो बनवा आणि या पपेटच्या गळ्यात चिकटवा.
कसा वाटला आपल्या टाकाऊ पिशवीचा गमतीशीर पपेट?
अर्चना जोशी
vinaarch68@gmail.com

१. आठ सें.मी.चा एक चौकोन कापा आणि वरची बाजू खालच्या बाजूवर दुमडा.
२. डावी बाजू उजव्या बाजूवर दुमडा.
३. वरच्या बाजूने व डाव्या बाजूने एक सें.मी. मोजा आणि रेषा आखा. चारही थर कापा आणि रंगवलेला भाग काढून टाका.
४. कागद उलगडा.. तुम्हांला एक क्रॉस दिसेल.
५. तुमच्या डाव्या हाताच्या मागच्या बाजूला हा क्रॉस अशा प्रकारे ठेवा की, त्या क्रॉसचा एक भाग तुमच्या पहिल्या बोटावर येईल. तुमचा डावा अंगठा बाजूला करून क्रॉसला हलका धक्का द्या.. तो बूमरँगप्रमाणे एख गिरकी घेऊन पुन्हा मूळ ठिकाणी येईल.


प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट रचना असते. मनुष्याचे शरीर, घर, पूल, जनावरं, झाडं अशा सर्वाची एक विशिष्ट रचना असते. आणि त्यामुळे त्या गोष्टीचे वजन त्या रचनेमुळे पेलले जाते. आता आपण जो प्रयोग करणार आहोत, त्या प्रयोगात जुनी पोस्टकार्डे वापरून त्याचे काही नमुने बनवूयात. आणि त्याचे गुणधर्मही पाहूयात.
सर्वच पोस्टकार्डे १४ सें.मी. लांब आणि नऊ सें.मी. रुंद असतात. एक पोस्टकार्ड घेऊन त्याची गुंडाळी करा आणि ती चिकटवून नऊ सें.मी. उंचीचा एक खांब तयार करा (आकृती क्र. एक). तुमच्या अंदाजाप्रमाणे हा खांब किती वजन पेलू शकेल? आता खांबावर एकेक करून पुस्तक ठेवा. पुस्तके नीट जुळवून एकावर एक अशी ठेवा, नाही तर ती खाली पडतील. नऊ सें.मी. उंचीचा हा खांब अंदाजे चार कि.ग्रॅ. वजनाचा भार (आकृती क्र. तीन). या विविध आकारांच्या खांबांवर पुस्तके ठेवून कोमता खांब किती भार सहन करतो ते पाहा. जास्त भार कोणता खांब घेतो? का? प्रत्यक्ष व्यवहारात कोणत्या आकाराचे खांब नेहमी पाहायला मिळतात?
आणखी काही पोस्टकार्डे घेऊन विविध आकारांचे पण १४ सें.मी. उंचीचे खांब बनवा. कोणत्या आकाराचा खांब भक्कम आहे? (आकृती क्र. चार) दोन वेगवेगळ्या उंचीचे पण सारख्या आकाराचे खांब बनवून त्यातील कोणता खांब जास्त भार पेलतो, ते पाहा.
डॉ. अरविंद गुप्ता, आयुका.