Leading International Marathi News Daily
रविवार, २८ जून २००९

२१ जून हा भारतीय बॅडमिंटनसाठी परमोच्च आनंदाचा दिवस. प्रकाश पदुकोण आणि पी. गोपीचंद यांनी जिंकलेल्या ऑल इंग्लंड विजेतेपदाइतकेच सायनाचे जेतेपद मोलाचे आहे. या विजयाने सायनाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आक्रमक बॅडमिंटन सायना खेळते. आलेली संधी ती दवडत नाही. प्रतिस्पध्र्याचे गुण, दोष हेरण्यात ती पटाईत आहे. ती सातत्याने अव्वल खेळाडूंना चकित करीत आहे. दिवसेंदिवस तिचा दर्जा उंचावत आहे.
भारतीय खेळांमध्ये क्रिकेटवगळता सध्या अन्य खेळातील खेळाडू चमकदार कामगिरी नोंदवत आहेत. भारताचा टेनिसपटू लिएंडर पेसने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकाविले होते. भारतीय मुष्टियोद्धय़ांनी आशियाई स्पर्धा गाजविल्यानंतर बॅडमिंटनपटू सायना नेहवालने इंडोनेशियन सुपर सिरीज बॅडिमटन स्पर्धा जिंकून इतिहास
 

रचला आहे. ही सुपर स्पर्धा जिंकणारी सायना पहिलीच भारतीय बॅडिमटनपटू. सायनाचा हा विजय संपूर्ण भारतीय क्रीडारसिकांना अभिमान वाटणारा आहे. २१ जून हा दिवस भारतीय बॅडमिंटनसाठी सोनेरी दिवस. हा दिवस ऐतिहासिक ठरला. सायना नेहवालने इंडोनेशियन स्पर्धा जिंकताना जागतिक क्रमवारीतील तिसरी मानांकित लीन वेंग हिला १२-२१, २१-१८, २१-१९ असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत सायना आठव्या स्थानावर आहे.
सायना नेहवाल हिचा जन्म हरियाणातील हिस्सारचा असला तरी ती हैदराबादची खेळाडू म्हणून सर्वाना परिचित आहे. महंमद अझहर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (क्रिकेट), के. मल्लेश्वरी (वेटलिफ्टिंग), सानिया मिर्झा (टेनिस), पी. गोपीचंद (बॅडमिंटन) हेही खेळाडू हैदराबादचेच. महंमद अझहर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या मनगटातील कलेने सर्व क्रिकेटरसिक जसे भारावले तसेच सायना नेहवालच्या कलात्मक बॅडिमटननेही क्रीडारसिकांची मने जिंकली. इंडोनेशियन खुली स्पर्धा जिंकण्यापूर्वी तिच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती ती सिंगापूर सुपर सिरीज स्पर्धा जिंकण्याची. हैदराबादमधूनच बॅडिमटनपटू पुढे येत आहेत, याचं रहस्य काय, असे विचारले असता सायना म्हणते, ‘सुविधांच्या बाबतीत अन्य राज्यांच्या तुलनेत हैदराबाद अव्वल आहे. भारताचा माजी बॅडिमटनपटू आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेता पी. गोपीचंद अकादमीचा फायदाही हैदराबादला होत आहे. गोपीचंद हे उत्कृष्ट प्रशिक्षक आहेत. ते माजी विजेते खेळाडू असल्यामुळे त्यांना विजेता खेळाडू बनण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात, याची त्यांना जाणीव आहे. हैदराबादच्या अकादमीमध्ये मी मुलांबरोबर सराव करते, त्याचाही मला खूप फायदा होतो. भारतात सरावासाठी चांगल्या खेळाडूंची वानवा आहे, जेणेकरून आपले कमकुवत असलेले फटके शक्तिमान करण्यासाठी उपयोगी पडेल. सध्यातरी गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली मी आनंदी आहे. भविष्यात परदेशी प्रशिक्षक किंवा परदेशात जावून सराव करण्याचा विचारही नाही,’ असे सायना म्हणते.
बचाव आणि वेगावर प्रभुत्व गाजविण्यासाठी सायना मेहनत घेत आहे. जागतिक पातळीवर टिकायचे असेल तर बचाव अभेद्य असणे गरजेचे आहे. भारतीय बॅडिमटनपटूंचे प्रमुख अस्त्र म्हणजे नेटजवळील खेळ. सायनाने या खेळाबरोबरच फ्लिक्सचा चांगला उपयोग केला. जोरदार आणि वेगवान स्मॅशेस हे सायनाच्या खेळाचे वैशिष्टय़ आहे. अजूनही सायनाला बॅकहॅण्डचे फटके सुधारायचे आहे. वेगाची क्षमताही वाढवायची आहे. हे सर्व केले तरच जागतिक पातळीवर अव्वल खेळाडूंना नमविले जावू शकते, याची तिला जाणीव आहे. जगातील पहिल्या दहा खेळाडूंत सायनाचा समावेश झालेला आहे. आज जागतिक क्रमवारीत तिचे स्थान आठवे आहे. ‘हा माझा सन्मान आहे. मी अजून तरुण आहे. त्यामुळे याचा आनंद अधिक. आत्मविश्वास बळावण्यासाठी ही चांगली बाब आहे. जागतिक बॅडमिंटन वर्तुळात माझ्या नावाचा दबदबा वाढविणारी ही घटना आहे’ असे सायना म्हणते. इंडोनेशियन स्पर्धाजिंकणे तशी अवघड बाब होती. २४ तासांत बलाढय़ चीनच्या दोन खेळाडूंना नमविण्याचा पराक्रम सायनाने केला आहे. जेतेपद केव्हाही महत्त्वाचे. पण त्यापेक्षा अधिक महत्त्वाची बाब म्हणजे अंतिम फेरीसह चीनच्या खेळाडूंना नमविणे. हा विजय अविस्मरणीय आहे. या यशाची अपेक्षा मी कधीही बाळगली नव्हती, असे सायना म्हणते.
जागतिक क्रमवारीवर नव्हे तर खेळावर माझे लक्ष केंद्रित करायचे आहे. अंतिम फेरीत पहिल्या गेममध्ये पराभूत झाल्यानंतर मी काहीशी निराश झाली होती. पहिल्या गेमनंतर लीन वेंग हिला ४९ मिनिटांत नमविणे सोपविणे नव्हते. तिला तिचे आवडते फटके लगावण्याची मी संधीच दिली नाही, असे सायनाने सांगितले. सायना ही युवा आणि लोकप्रिय गुणवान बॅडिमटन खेळाडू आहे. ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठणारी सायना ही भारताची पहिलीच बॅडमिंटनपटू. जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी ही पहिलीच भारतीय. द्रोणाचार्य पुरस्काराची मानकरी. एस. एम. आरिफ यांनी सायनाला बॅडमिंटनचे धडे दिले. तिचे वडील डॉ. हरवीरसिंग आणि आई उषा हे दोघेही हरियाणाचे माजी बॅडमिंटनपटू. त्यांनी त्यांच्या राज्यातील स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे. त्यामुळे सायनाचा कलही बॅडमिंटनकडेच. डिसेंबर १९८८ मध्ये सायनाचे वडील डॉ. हरवीरसिंग हे आपल्या चिमुकल्या सायनाला लालबहादूर स्टेडियममध्ये प्रशिक्षक नानीप्रसाद यांच्याकडे घेवून गेले. त्यावेळी सायनाचे वय होते अवघे आठ वर्ष. सकाळी ६ वाजता उठून २० किलोमीटर अंतरावरील स्टेडियम गाठून सराव करायचा आणि स्टेडियममधूनच शाळेला जायचा हा तिचा दिनक्रम. तिचे वडील वैज्ञानिक. कडधान्य, तेल संशोधन संचालनालयात नोकरीला जाताना सायनाला सरावाला आणि शाळेला घेवून जाण्याची जबाबदारी त्यांच्यावर. नंतरचे तीन महिने आईने ही जबाबदारी स्वीकारली. रोजचा ५० किलोमीटरचा प्रवास. सरावाच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे म्हणून डॉ. सिंगने स्टेडियमजवळच घर घेतले. सायंकाळी सायनाला सरावासाठी जायला लागायचे. शटल, रॅकेट, शूज, गटिंग आणि जाण्या-येण्याचा प्रवास हा सारा खर्च महिन्याला १२ हजार रुपयांचा. डॉ. सिंग यांनी आपल्या बचत आणि भविष्य निर्वाह निधीतून हा खर्च भागविला. २००२ पर्यंत या खर्चाचा बोजा नेहवाल कुटुंबीयांनी सहन केला. २००२ मध्ये यॉनेक्सने सायनाला क्रीडासाहित्य पुरस्कृत केले. तिचे रँकिंग सुधारत गेल्याने पुरस्कर्तेही पुढे येवू लागले. बीपीसीएलने सायनाबरोबर करार केला. त्यामुळे तिला दरमहा वेतन मिळू लागले. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच सायनाला जागतिक पातळीवरील उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होण्याचा मान पटकाविता आला. आड सायनाने दोन-तीन संस्थांची करार केले आहे. या करारातून तिला दहा ते पंधरा लाख प्रत्येकी मिळाले आहे. ती हर्बल लाइफ इंडियाची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे. ग्लोबो स्पोर्टस्ने जागतिक पातळीवरील सामन्यासाठी तिला पुरस्कृत केले आहे.
१९ वर्षांखालील एकेरीचे अजिंक्यपद सायनाकडेच आहे. आशियाई सॅटेलाइट बॅडमिंटन स्पर्धा दोन वेळा जिंकून तिने इतिहास घडविला आहे. असा पराक्रम करणारी ही पहिलीच भारतीय. २००६ मध्ये जागतिक पातळीवर सायना चमकली. तिने चार तारांकित दर्जा प्राप्त फिलिपाइन्स ओपन स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत तिला ८६वे मानांकन मिळाले होते. बिगर मानांकित खेळाडू असूनही सायनाने अनेक मानांकित खेळाडूंना चकित केले होते. जुलिया झियान पेई वाँग हिचा पराभव करून सर्वानाच चकित केले होते. बीडब्ल्यूएफ जागतिक ज्युनियर स्पर्धेत सायनाने उपविजेतेपद पटकाविले. चीनची प्रथम मानांकित वँग यीहान हिला कडवा प्रतिकार करून ती पराभूत झाली. जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचा बहुमान तिने मिळविला. नववी मानांकित सायाका सातो (जपान) हिचा २१-९, २१-१८ असा पराभव करून ही स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.
बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सायनाकडून पदकाची अपेक्षा होती. तिने ही स्पर्धा गाजविली. जागतिक क्रमवारीत पाचवे मानांकन मिळालेल्या वँग चेम हिला पराभूत केले. मात्र उपांत्यपूर्व फेरीत १६व्या स्थानावर असलेल्या मारिया क्रिस्टील युली अँटी (इंडोनेशिया) हिच्याकडून कडवी झुंज पराभूत व्हावे लागले.
सप्टेंबर २००८ मध्ये मलेशियाच्या ली या लीडिया हिचा २१-८, २१-१९ असा पराभव करून यॉनेक्स चायनीज तैपई खुली स्पर्धा सायनाने जिंकली. जगातील पहिल्या दहा क्रमांकावर सायनाने झेप घेतली. २००८ या वर्षांतील सर्वात होतकरू व गुणवान खेळाडू म्हणून जागतिक बॅडमिंटन महासंघाने सायनाची निवड केली. डिसेंबर २००८ मध्ये जागतिक सुपर मानांकित स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तिने मजल मारली होती. राष्ट्रीय स्पर्धा गाजवू लागल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही आपण प्रभुत्व गाजवू शकतो, ही क्षमता माझ्यात आहे याची जाणीव झाली. त्यानंतरच कडव्या मेहनतीला प्रारंभ झाला. ही मेहनतच अखेर फळाला आली आहे, असे सायनाने सांगितले. या वर्षां अखेरीला जगातील पहिल्या पाच खेळाडूंमध्ये येण्याचे सायनाचे ध्येय आहे.
सायनाचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी तिच्या खेळाचे कौतुक केले आहे. २१ जून हा भारतीय बॅडमिंटनसाठी परमोच्च आनंदाचा दिवस. प्रकाश पदुकोण आणि पी. गोपीचंद यांनी जिंकलेल्या ऑल इंग्लंड विजेतेपदाइतकेच सायनाचे जेतेपद मोलाचे आहे. या विजयाने सायनाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आक्रमक बॅडमिंटन सायना खेळते. आलेली संधी ती दवडत नाही. प्रतिस्पध्र्याचे गुण, दोष हेरण्यात ती पटाईत आहे. ती सातत्याने अव्वल खेळाडूंना चकित करीत आहे. दिवसेंदिवस तिचा दर्जा उंचावत आहे. विशेष म्हणजे ती शांतचित्ताने खेळते हे फार महत्त्वाचे आहे, असे पी. गोपीचंदने हैदराबादहून ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. सायना कोर्टवर उतरल्यावर ती आपले सर्वस्त ओतते. आपल्याकडून शंभर टक्के योगदान देते, असेही गोपीचंदने सांगितले.
सायनाने सामाजिक बांधिलकी मानताना एक चांगली बाब तिने केली आहे. मुंबईत २६/११ चा हल्ला झाला त्यावेळी ती हाँगकाँगच्या स्पर्धेत खेळत होती. या घटनेने सायना अत्यंत दु:खी झाली. कायम दहशताखाली वावरणे ही चांगली बाब नव्हे, म्हणून तिने या हल्ल्यात बळी गेलेल्यांना एक लाख रुपयांची मदत केली आहे. सानिया आणि सायना या दोघीही हैदराबादच्या. त्यामुळे काही टीकाकार या दोघींच्या खेळांची तुलना करतात. खेळ वेगळा असला तरी तुलना होते. सानिया मिर्झाला ग्लॅमर आहे. सायनाने बॅडमिंटनमध्ये एक मोठी उंची गाठली आहे. आज जगातील पहिल्या दहा खेळाडूंत तिचा समावेश आहे. त्यामुळे ही तुलना होऊ नये, अशी अपेक्षा गोपीचंदने व्यक्त केली. मला सानिया म्हणू नका, मी सायनाच आहे, असे ती आवर्जून सांगते.
सायनासमोर आव्हान असणार आहे ते ऑगस्ट महिन्यात हैदराबाद येथे आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर कामगिरी नोंदविण्याचा. केवळ बॅडमिंटनसाठीच नव्हे तर भारतीय खेळांसाठी सायनाचे जेतेपद ही प्रोत्साहन देणारी बाब आहे. भारतातील तरुण बॅडमिंटन खेळाडूंना प्रोत्साहित करणारी ही घटना आहे. युवा बॅडमिंटन खेळाडूंसाठी सायना रॉल मॉडेल ठरणार आहे.
प्रमोद माने

क्रिकेटच्या अत्याधुनिक अवताराचे ‘ट्वेन्टी-२०’ क्रिकेटचे विश्वविजेतेपद पुन्हा एकदा आशिया खंडाकडेच आले. भारतानंतर आता पाकिस्तानने विजेतेपद पटकाविले. पाकिस्तानचे क्रिकेट गेल्या २-३ वर्षांत संकटातून जात आहे. पाहुण्या संघांनी पाक दौऱ्यांकडे पाठ फिरविलीच आहे. पण स्थानिक क्रिकेटचाही तेथील राजकीय अस्थिरतेमुळे पुरता फज्जा उडाला आहे. आयपीएल स्पर्धेत खेळण्यावर सरकारने बंदी घातल्यानंतर तर पाकिस्तानी क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील सरावाची एक मोठी संधीच हिरावली गेली. तरीही पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी प्रतिष्ठेची अशी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली.
या विजेतेपदामुळे दोन गोष्टी स्पष्ट होतात. पाकिस्तानी क्रिकेटपटूंची प्रबळ इच्छाशक्ती, जिंकण्याची जिद्द, प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता मैदानात उतरण्याची क्षमता व जिंकण्याची आस. देश अस्थिरतेतून जात असतानाही त्यांची खेळावर लक्ष केंद्रित करण्याची कला दाद देण्यालायक आहे. इंग्लंडमध्ये सर्वाधिक गर्दी पाकिस्तानच्या सामन्यांनाच झाली होती. पाकिस्तानी खेळाडूंना पाकिस्तानाबाहेर राहणाऱ्या देशबांधवांचा किती प्रचंड पाठिंबा होता ते त्यामुळे सिद्ध होते. केवळ त्या प्रेक्षकांनी दाखविलेल्या विश्वासाला जागून हा संघ स्पर्धेत खेळला. इंग्लंडमध्ये क्रिकेट सामन्यांच्या तिकिटांचा काळाबाजार फक्त पाकिस्तानच्या सामन्यांच्यावेळीच झाला होता. भारताविरुद्ध सरावाचा सामनादेखील त्याला अपवाद ठरला नव्हता. यावरून पाकिस्तानी क्रिकेटपटूंना त्यांच्या देशवासियांनी दिलेले प्रचंड पाठबळ, विश्वास, प्रेम दिसून येते. त्या प्रेमाला पाकिस्तानचा क्रिकेट संघ पात्र ठरला. या संघाने भारताविरुद्ध प्रतिष्ठेची सरावाची लढत गमावली. पण प्रेक्षक तरीही त्यांच्या पाठिशी राहिले. त्या पराभवातून या संघाने आपल्या उणिवा शोधल्या. प्रत्येक फेरीपुढची वाटचाल कठीण होती. अडखळतच हा संघ पुढे सरकत होता. यशाची खात्री कधीच देता येत नव्हती.
पण तेच तर त्यांचे शक्तीस्थान होते. ‘अनप्रेडिक्टेबल’ अशी बिरुदावली मिरविणारा हा संघ प्रत्येक वेळ अनपेक्षिततेचे धक्के देत होता. अंतिम फेरीतही या संघाने बलाढय़ अशी श्रीलंका संघाला धूळ चारली, त्यावेळीही सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला होता. ‘देश जेव्हा संकटात असेल तेव्हा पाकिस्तानी क्रिकेटपटू एकत्र असतात. कोणत्या तरी शक्तीने त्यांची एकजूट अधिक कणखर बनते. १९९२ च्या विश्वचषक स्पर्धेत मध्यावर तळाला फेकल्यानंतर तोच अनुभव आला होता. इम्रान खानच्या नेतृत्वाखाली त्यावेळी पाक संघाने विजेतेपदाचा चमत्कार केला होता. यावेळी युनूस खानच्या संघाने त्याच चमत्काराची प्रचिती आणून दिली.
सारं काही आलबेल असलं की हा संघ विभक्त असतो आणि संकटात मात्र एकत्र असतो. त्या सत्याची सर्वाधिक जाणीव असणाऱ्या युनूस खानने विजेतेपद मिळविल्यानंतर नेतृत्वाचे सिंहासन सोडण्याची सर्वप्रथम घोषणा केली. युनूस खानला त्या काटेरी सिंहासनाचे काटे टोचलेले आहेत. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्याने काटेरी मुकूट आपल्या डोक्यावरून स्वहस्तेच उतरवून ठेवला.
या विश्वविजेतेपदामुळे पाकिस्तानचे क्रिकेट तारण्यास काही अंशी मदत होईल. पण मुळातच क्रिकेटच्या वर्चस्वाचा आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या विजेतेपदाचा फारसा संबंध नसल्यानेया विश्वविजेतेपदाचा त्यांच्या क्रिकेटला फारसा लाभ होईल याची शक्यता कमी दिसते. पूर्णपणे अनिश्चिततेच्या पायावर उभे राहिलेले हे क्रिकेट संघांची खरी क्षमता दाखवून देत नाही. त्या दिवशी, त्या क्षणी सर्वोत्तम खेळणारा संघ जिंकतो. एखाद्या ‘लॉटरी’सारखा हा प्रकार आहे. पाकिस्तानला यंदा ही लॉटरी लागली.
त्यामुळे या विश्वविजेतेपदामुळे पाकिस्तानचा दर्जा उंचावला असे मानण्याचे कारण नाही किंवा पहिल्याच फेरीत गारद झालेल्या ऑस्ट्रेलियाचा दर्जा खालावला असेही नाही. खरं तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, विडिंज, इंग्लंड अशा पॉवर गेमखेळणाऱ्या संघाचा हा खेळ. ट्वेन्टी-२० क्रिकेट तर इंग्लंडमध्ये गेली कित्येक दशकांपासून सुरू आहे. पण आशिया खंडातील संघांनी या क्रिकेटची नाडी अचूक ओळखली. कामचलाऊ ४-४ षटकांचे क्रिकेटपटू मोठे झाले. त्यामुळे या संघांचे काही खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये अद्यापि आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. मात्र क्रिकेटचे मार्केटिंग या छोटय़ा आवृत्तीमुळे वेगात झाले. भारताच्या विश्वविजेतेपदाचा लाभ क्रिकेटच्या विकासापेक्षा क्रिकेटच्या व्यापारीकरणासाठी अधिक घेतली गेली हेही सत्य आहे. गेल्या दोन वर्षांतील आयपीएल स्पर्धा आणि वर्षांतून दोनदा या स्पर्धेचे आयोजन करण्याची त्यांची मनिषा हेच स्पष्ट करते. शेवटी खेळाच्या विकासासाठीच पैसा हवाय. पण खेळाचा आधार घेऊन पैसा कमावण्याची वृत्ती या ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे वाढत चालली आहे. कमी वेळेत अधिक पैसा मिळवून देण्याची हमी देणारा हा खेळ म्हणूनच सर्वत्र लोकप्रिय होत आहे. मात्र तरुण पिढीने डोक्यावर घेतलेला हा प्रकारदेखील कालांतराने कंटाळवाणा होण्याची शक्यता आहे. त्यावेळी जर पारंपरिक क्रिकेट टिकून राहिले नसेल तर खेळाचे अधिक नुकसान होईल. कारण क्रिकेटच्या जन्मदात्या ब्रिटनमध्येच या खेळाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली आहे.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा कोणताही सामना ‘हाऊसफुल्ल’ नव्हता, यावरून या गोष्टीची प्रचिती येते. आशिया खंडाने या खेळाची लोकप्रियता अधिक प्रमाणावर टिकवून घेतली आहे. ते प्रेम आटण्यापर्यंत या खेळाचा अतिरेक होता कामा नये. आयपीएलची वाढती व्याप्ती त्याचे एक कारण ठरू शकेल.
आयसीसीच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकणारी ती एक सुरुवात आहे. कारण आयपीएलसारख्या स्पर्धानी खेळाडूंना आपल्या मायाजालात कधीच ओढले आहे. आपले खिसे भरणाऱ्या अशा स्पर्धामध्ये खेळण्याचा मोह खेळाडूंना टाळताच येणार नाही. मात्र देशासाठी खेळण्याच्या सक्तीमुळे खेळाडू जायबंदी होण्याचे प्रमाण वाढत जाणार आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत त्या दुष्परिणामाचा प्रभाव पाहावयास मिळाला ही तर सुरुवात आहे.
विनायक दळवी

दोन वर्षांपूर्वी ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची मुंबईतली भव्य मिरवणूक तुम्हाला आठवत असेल! भर पावसातही मुंबईकरांनी त्या विश्वविजेत्या संघाचे अभिनंदन करण्यासाठी अभूतपूर्व अशी गर्दी केली होती. त्याच वर्षी भारतीय संघ ‘वन-डे’ विश्वचषक स्पर्धेत प्राथमिक फेरीतच बाद झाल्यामुळे चाहते नाराज होते तरीही ट्वेन्टी-२०तील विजेत्या युवा संघाला सलाम करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. याच विश्वविजेत्या संघाला यावर्षी मात्र उपान्त्य फेरीही महाग ठरली. हेच चाहते आताही रस्त्यावर उतरले पण मनात राग धरून. संताप व्यक्त करण्यासाठी. कुणी खेळाडूंची प्रतिमा जाळली तर कुणी पोस्टर्सना काळे फासले. भारतात अशा घटना नव्या नाहीत. पूर्वीपासून हे चालत आलेले आहे. क्रिकेटवरील प्रेमातूनच अशी टोकाची प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त होते, असा अर्थ कुणी या घटनांमधून काढतो. चाहत्यांच्या या वर्तनाची सचिन तेंडुलकरने दखल घेतली आणि चाहत्यांनी परिपक्वतेचे, संयमाचे दर्शन घडवावे, असे आर्जव केले.
विजय मिळाला की, ज्या संघाला डोक्यावर घ्यायचे त्याच संघाला पराभवानंतर खाली आपटायचे अशी एक प्रथाच भारतीय क्रिकेटचाहत्यांनी स्वत:साठी सुरू केली आहे. संघ पराभूत झाल्यानंतर निराश होणे स्वाभाविकही आहे, पण त्याला किती मर्यादा असाव्यात हे या चाहत्यांनी लक्षात घ्यायला हवे. प्रतिमा जाळून, काळे फासून आपण खेळावरील किंवा खेळाडूंवरील प्रेम नव्हे तर स्वत:च्या अपरिपक्तवेचे दर्शन घडवित आहोत, हे चाहत्यांना आता कळायला हवे. खरे तर अशी आततायी प्रतिक्रिया व्यक्त करणारे चाहते संख्येने फार कमी असतात, पण तीच सर्वसामान्य चाहत्यांचीही प्रतिक्रिया आहे, अशा पद्धतीने ती समोर आणली जाते. सर्वसामान्य परिपक्व चाहता नाराज होतो, निराश होतो पण तो रस्त्यावर उतरत नाही. आपापल्या परीने तो पराभवाचे विश्लेषण करतो आणि पुढील वेळेस हा संघ नक्कीच खेळेल अशी आशाही व्यक्त करतो. काही चाहते मात्र अगदी टोकाचा निर्णय घेतात. त्यात बऱ्याचवेळा प्रसिद्धीचाच हेतू असतो. त्यात सध्या वाढत्या टीव्ही चॅनल्समुळे अशा चाहत्यांचे फावते. खेळाडूंच्या प्रतिमा जाळण्याचा किंवा त्यांचा अपमान करण्याच्या थरापर्यंत ते जातात. काही खेळाडूंच्या घरावर आक्रमण करतात. अशी प्रतिक्रिया एखाद्या शहरातील कानाकोपऱ्यात घडली तरी ती पूर्ण देशाचीच प्रतिक्रिया आहे, असे चित्र प्रसारमाध्यमांमार्फत भासविले जाते. यात हे तथाकथित चाहते जेवढे दोषी असतात तेवढीच ही प्रसारमाध्यमेही. म्हणूनच अशा प्रतिक्रिया जेव्हा कधी उमटतात तेव्हा त्यांचा पाठपुरावा करणेच सोडले पाहिजे.
जय-पराजय हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यातून कुणीही सुटलेले नाही. प्रत्येकाला आपल्या जीवनात पराजयाचा सामना करावाच लागतो. मग क्रिकेट संघ एखादवेळी पराभूत झालाच तर त्याबद्दल एवढा संताप व्यक्त करण्याचे कारण काय? ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेसारखे संघ पराभूत होतात तेव्हा त्यांच्या देशातील चाहते अशा टोकाच्या प्रतिक्रिया कधी व्यक्त करीत नाहीत. प्रसारमाध्यमे टीका करतात, पण त्या पलीकडे क्षोभ निर्माण होत नाही. भारतातील चाहत्यांनीही भावनेच्या भरात प्रतिक्रियेची परिसीमा गाठू नये? अर्थात, गोंधळ घालणाऱ्या चाहत्यांना सौम्य भाषा कळतच नाही. तेव्हा त्यावर उपाय एकच, तो म्हणजे त्यांना कोणतीही प्रसिद्धी न देणे. संघ एखाद्या दौऱ्यावर निघाला की अनेक ठिकाणी पूजाअर्चा केल्या जातात. होमहवन होते. आपलाच संघ जिंकावा यासाठी प्रार्थना करणे इतपत ठीक आहे, पण त्याचे जाहीर प्रदर्शन कशाला? अशा प्रदर्शनातून खेळाबद्दलची श्रद्धा नव्हे तर स्वत:चा अपरिपक्वपणाच सिद्ध होतो. बरे, हे तथाकथित प्रेम किंवा संताप इतर खेळांच्या बाबतीत दिसत नाही. हॉकीत आपण जिंकलो, विश्वनाथन आनंदने बुद्धिबळाचे विश्वविजेतेपद पटकाविले, सायनाने बॅडमिंटनचा आंतरराष्ट्रीय किताब जिंकला तर हे प्रेम दिसत नाही. तेव्हा अशी भावना व्यक्त होत नाही. अर्थात, याला क्रिकेटची लोकप्रियता कारणीभूत आहे. क्रिकेट संघाच्या यशापशयातच या भावनेचा कडेलोट होतो. क्रिकेटचाहत्यांचा हा संताप क्षणिकही असतो. नवी स्पर्धा सुरू झाल्यावर पुन्हा तेच चाहते क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या मागे धावू लागतात. तरीही असे वाटत राहते की, चाहत्यांनी भावनेचा अतिरेक न करता, परिपक्वपणे वागायला हवे. शेवटी खेळात हरणे-जिंकणे हे ठरलेलेच असते. खेळाडूंना त्यासाठी दोषी ठरवून त्यांना शिक्षा देण्याची भाषा कुणी करू लागले तर त्यात खिलाडुवृत्तीचा अभाव दिसेल. खेळाडूंच्या मनातही आपल्या चाहत्यांच्या बाबतीत एकप्रकारची भीती निर्माण होईल. किंबहुना म्हणूनच संघ दौऱ्यावरून अपयश घेऊन परतल्यानंतर चाहत्यांना सामोरा जाण्याऐवजी विमानतळावरूनच पळ काढतो. चाहत्यांकडून त्यांना जर चांगली वागणूक मिळाली तर खेळाडू व चाहत्यांमधील नात्यात अंतर वाढणार नाही.
महेश विचारे