Leading International Marathi News Daily

रविवार, २८ जून २००९

ऑनलाइनचा खोळंबा सुरूच!
आता बस करा ऑनलाइनचा तमाशा - उद्धव ठाकरे
मुंबई, २७ जून / प्रतिनिधी
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा काल बोजवारा उडाल्यानंतर ‘एमकेसीएल’ने त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही ठिकाणी ऑनलाइन अर्ज सादर करण्यात आजही अनेक अडथळे आल्याने विद्यार्थी-पालक संतप्त झाले होते. ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात संतप्त झालेल्या पालक, विद्यार्थी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्यात पाच-सहा संगणकांचे नुकसान झाले. दरम्यान, ‘आता बस करा ऑनलाइनचा तमाशा. ऑनलाइन प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थी-पालकांची सुरू असलेली ससेहोलपट तात्काळ थांबवा अन्यथा प्रखर आंदोलन केले जाईल’ असा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज्य शासनाला दिला आहे.

प्रलंबित खटले निकाली काढून न्यायसंस्थेवरचा विश्वास वाढवा -राष्ट्रपती
ठाणे, २७ जून / प्रतिनिधी

न्याय प्रक्रिया सध्या फार खर्चिक झाली आहे. त्यामुळे समाजातील दुबळ्या गटांमध्ये न्यायाच्या खरेपणाविषयी शंका निर्माण झाली आहे. जुने कालबाह्य झालेले कायदे देखील आता बदलण्याची गरज आहे. काळानुसार त्यात बदल करताना न्याय प्रक्रिया सुधारण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे उपयुक्त ठरेल, असे मत राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी भाईंदर येथे व्यक्त केले. मिरा-भाईंदर पालिका हद्दीतील उत्तनपाशी बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र ज्युडिशियल अ‍ॅकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती बोलत होत्या.

मायकेलच्या मृत्यूमागे घातपात नाही
वॉशिंग्टन, २७ जून/पीटीआय

पॉप गायक मायकेल जॅक्सन याच्या मृत्यूमध्ये कुठलाच घातपात नाही, किंवा कुठल्याही बाह्य़ कारणांमुळे त्याचा मृत्यू झालेला नाही असा निर्वाळा लॉस एंजेलिसच्या कोरोनर कार्यालयाने दिला आहे. मायकेल जॅक्सनच्या पार्थिवाचे विच्छेदन करून तपासणी केल्यानंतर हे सांगण्यात आले.. शवविच्छेदन पूर्ण झाले आहे पण मृत्यूचे कारण अजून समजलेले नाही असे कोरोनरचे प्रवक्ते क्रेग हार्वी यांनी वार्ताहरांना सांगितले. मृत्यूचे कारण घोषित करणे लांबणीवर टाकण्यात आले आहे कारण वैद्यकीय तपासनिसाने विषविज्ञानातील काही परीक्षणे करण्याचा आदेश दिला आहे.

राजकीय जुगलबंदीत रंगला मराठवाडा भूषण पुरस्कार सोहळा
मुंबई, २७ जून / प्रतिनिधी

‘दिल्लीत कोणी रहावे अथवा कोणी राज्यात परतावे’ या मुद्दय़ांवरून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख आणि भाजपचे खासदार व ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये आज माटुंग्याच्या यशवंत नाटय़ मंदिरात जोरदार राजकीय जुगलबंदी रंगली. उभयतांनी एकमेकांना मारलेल्या कोपरखळ्या आणि कानपिचक्यांनी उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले. मराठवाडा लोकविकास मंचतर्फे आयोजित या कार्यक्रमात विलासराव देशमुख यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘कल्याण-विशाखापट्टणम रेल्वेमार्ग पाच वर्षांत गतिमान’
कल्याण, २७ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्रासह इतर चार राज्यांच्या विकासाला नवा आयाम देणारा कल्याण-नगर ते विशाखापट्टणम हा प्रस्तावित रेल्वेमार्ग येत्या पाच वर्षांत मार्गी लावण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्व खासदार आपले पक्षीय जोडे बाजुला काढून प्रयत्न करतील, असा विश्वास खासदार गोपीनाथ मुंडे यांनी रविवारी येथे व्यक्त केला. कल्याण जिल्हा भाजपतर्फे कल्याण-नगर ते विशाखापट्टणम हा रेल्वे मार्ग मार्गी लावण्याच्यादृष्टीने रेल्वे परिषदेचे आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजन केले होते.

किंग्स्टन, २७ जून / पीटीआय
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ‘सुपर एट’मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड करताना भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर २० धावांनी मात केली व चार एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. युवराजसिंगच्या १३१ धावांच्या वादळी खेळामुळे भारताने यजमान विंडीजपुढे ३३९ धावांचे लक्ष्य ठेवले आणि नंतर त्यांना ३१९ धावांवर रोखले. तीनशे धावांचा टप्पा पार केल्यामुळे विंडीजला सहज नमविता येईल, हा भारतीयांचा अंदाज मात्र चुकला. विंडीजने चंदरपॉल (६३), सरवान (४५), मॉर्टन (४२) व रामदिनच्या जिगरबाज २९ धावा या जोरावर भारताला चोख प्रत्युत्तर दिले. ३६व्या षटकांत चंदरपॉल बाद झाल्यावर विंडीजचा उरलेला संघ झटपट गुंडाळता येईल, असा होरा होता. पण तळाच्या फलंदाजांनी चिवट खेळ करून भारतीय खेळाडूंना त्रस्त केले. एवढेच नव्हे तर ४९व्या षटकांपर्यंत त्यांनी लढा दिला.
वेस्ट इंडिजचे प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर आम्ही गाफील झालो. या पुढच्या सामन्यात अशी चूक आम्ही करणार नाही.. - महेंद्रसिंग धोनी
आज भारत-विंडीज दुसरी लढत (किंग्स्टन) टेन स्पोर्ट्स, रात्री ८ वाजता.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी