Leading International Marathi News Daily

रविवार, २८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सुबोध, सोप्या मराठी भाषेतून विज्ञान आणि त्यावर आधारित तंत्रज्ञान या विषयाची माहिती सर्वसामान्य वाचकांना करून द्यावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘सृष्टिज्ञान’ मासिकाचा १ जानेवारी १९२८ रोजी पहिला अंक प्रकाशित झाला आणि याच सृष्टिज्ञानने नुकतेच सहस्रचंद्रदर्शनही पूर्ण केले आहे. त्यानिमित्त..

 

केवळ ‘विज्ञान’ या एकाच विषयाला वाहिलेले आणि त्यामुळे अत्यंत मर्यादित ग्राहक वर्ग असणारे सृष्टिज्ञानासारखे मासिक आजवर एकाही अंकाचा खंड न पडता सातत्याने प्रसिद्ध होत आहे. या अभूतपूर्व विक्रमामागे सृष्टिज्ञानच्या संस्थापकांची, त्यांना मनापासून साथ देणाऱ्या व्यवस्थापकीय मंडळींची, संपादक मंडळात अनेक वर्षे हौसेने काम करणाऱ्या, तसेच मानधनाची अपेक्षा न बाळगता विज्ञानाच्या विविध विषयावर हौसेने लेखन करणाऱ्या अभ्यासू लेखकांची तळमळ आणि जिद्द आहे. गेली ऐंशी वर्षे विज्ञानाच्या सर्व अंगोपांगांचा, त्यातील ताज्या, अद्ययावत संशोधनाचा परिचय सोप्या, सर्वाना सहज समजेल अशा मराठी भाषेतून करून देण्याचे अवघड काम सृष्टिज्ञान करीत आले आहे आणि यापुढेही याच जोमाने करीत राहील, यात शंका नाही.
पाश्चिमात्त्य देशात पंधराव्या शतकानंतर प्रबोधन युगाची सुरुवात झाली आणि विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक नवनवे शोध लागण्यास प्रारंभ झाला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विज्ञानाच्या प्रगतीला वेग आला. तारायंत्र, टेलिफोन, फोनोग्राफ, विजेचे दिवे, स्वयंचलित मोटार गाडी, क्ष-किरण, किरणोत्सार, हवेत मुक्त संचार करणारे यांत्रिक विमान, रक्तगटाचा शोध, कृत्रिम रंग, इन्शुलीन, प्रतिजैविक औषधे, रोगप्रतिबंधक लशी अशा अनेकविध शोधांमुळे सर्वसामान्य माणसांचे रोजचे जीवन बदलून गेले. या साऱ्या शोधांमुळे पाश्चिमात्य देशांचा विकास आणि प्रगती यालाही वेग आला. भारतात मात्र या काळात या साऱ्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल गाढ अज्ञान आणि अनास्था होती. भारताचे मागासलेपण झटकून टाकून पाश्चिमात्त्य राष्ट्रांच्या बरोबर विकास साधायचा असेल तर सर्वसामान्यांपर्यंत या वैज्ञानिक शोधांची माहिती पोहोचवली पाहिजे. सर्वसामान्यांना त्यात रस वाटायला हवा, असे भारतातील अनेक तरुण विज्ञान अभ्यासकांना वाटू लागले होते.
मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमसमोर असलेल्या रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स म्हणजे आताची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेत नव्यानेच अध्यापक म्हणून रुजू झालेल्या प्रा. गो. रा. परांजपे यांनाही भारतीय आणि पाश्चिमात्त्य विज्ञान क्षेत्रातील दरीबद्दल तीव्र चिंता वाटत होती. प्रा. गो. रा. परांजपे विज्ञानाच्या उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेले होते. पण पहिल्या महायुद्धामुळे त्यांना तेथील शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागले होते. पण त्यांनी जर्मनीतील विज्ञानक्षेत्रासंबंधीची परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवली होती. या दिशेने काही कार्यास सुरुवात करावी या उद्देशाने प्रा. गो. रा. परांजपे यांच्या पुढाकाराने इन्स्टिटय़ूटमधील काही उत्साही अध्यापकांनी ‘फिलॉसॉफिकल असोसिएशन’ नावाचे एक मंडळ स्थापन केले. या मंडळामार्फत दर शनिवारी सायंकाळी संस्थेच्या सभागृहात सर्वसामान्य श्रोत्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत इंग्रजीतून, तसेच मराठीतून विविध शास्त्रीय विषयांवर सप्रयोग व्याख्याने देण्याचा उपक्रम सुरू केला. ही व्याख्याने सर्वाना खुली होती. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत होता. अनेक श्रोत्यांनी मराठीतून होणाऱ्या व्याख्यानांची विशेष उपयुक्तता आवर्जून बोलून दाखविली. व्याख्यानांतील ही माहिती कायमस्वरूपी लेखरूपात वाचावयास मिळाली तर ती अधिक उपयुक्त होईल, व्याख्यानाला येऊ न शकलेल्या इतरांनाही त्याचा लाभ घेता येईल, असा अनेकांचा अभिप्राय पडला. या प्रतिसादातून हुरूप येऊन प्रा. गो. रा. परांजपे आणि त्यांचे सहकारी यांनी ‘सोसायटी फॉर दि प्रमोशन ऑफ सायंटिफिक नॉलेज’ या नावाने एक संस्था स्थापन केली. या संस्थेचे पहिले कार्य म्हणून केवळ विज्ञान विषयाचा सुबोध मराठीतून प्रसार करणारे एक मासिक ‘सृष्टिज्ञान’ या नावाने सुरू करण्याची योजना आखण्यात आली.
१ जानेवारी १९२८ रोजी सृष्टिज्ञानचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. क्राऊन साईजच्या ३२ पानांच्या या अंकात मुखपृष्ठावर पौर्णिमेच्या चांदण्यात खळखळत वाहणाऱ्या अवखळ निर्झराचे रम्य निसर्गदृश्य आहे. आतमध्ये पहिल्याच पानावर सागरअश्व (सीहॉर्स) या मत्स्याचे तीन रंगी चित्र आहे. या अंकात प्रा. गो. रा. परांजपे यांचे संपादकीय, डॉ. दि. धों. कर्वे यांचा ‘कृत्रिम रंग’, डॉ. भा. ग. वाड यांचा ‘लुई पाश्चर’ हे लेख आणि त्या शिवाय ‘नेपच्युनचा शोध’, रासायनिक गप्पा-टप्पा इत्यादी स्फुट लेख आहेत. आजच्या कोणत्याही नियतकालिकात हे लेख जसेच्या तसे छापले तरी ते रंजक आणि माहितीपूर्ण वाटतील इतके ते सोप्या, सुबोध भाषेत लिहिलेले आहेत.
पहिल्या अंकातील ‘संपादकीय’ मध्ये सृष्टिज्ञानच्या ध्येय-धोरणा विषयीच्या रूपरेषेचे स्पष्ट विवेचन आहे. त्यातील काही भाग असा : ‘हरघडीस होत असलेल्या पाश्चात्त्यांची शास्त्रीय ज्ञानातील प्रगती, आपले त्या विषयांचे गाढ अज्ञान आणि पराङ्मुखता पाहून केवळ दु:ख करीत बसण्याचे अगर कोठेतरी चुकत आहे म्हणून केवळ स्वस्थ राहण्याचे दिवस आता गेले असून ताबडतोब अल्प का होईना, पण कृतीस प्रारंभ करावा अशा उत्कट प्रेरणेनेच आम्ही आज ‘सृष्टिज्ञान’ची मुहूर्तमेढ रोवीत आहोत. आम्ही एवढे आश्वासन देतो की, लहान-थोर, स्त्री-पुरुषांना शक्य तितक्या सुलभ व मनोरंजक पद्धतीने शास्त्रीय विषयांची ओळख करून द्यावयाची व अशा रीतीने त्यांच्या विचारशक्तीचा ओघ तिकडे वळवायचा हे ‘सृष्टिज्ञान’चे ध्येय आहे.’
‘सृष्टिज्ञान’ चा पहिला अंक श्री. शं. ब. सहस्रबुद्धे यांनी पुण्याच्या आपल्या बालोद्यान मुद्रणालयात छापून प्रसिद्ध केला. पहिले वर्षभर ‘सृष्टिज्ञान’ चे मुद्रण तिथेच झाले. पण प्रत्येक वेळी मुंबईत सर्व लेखांची जुळवाजुळव करून ते लेख पुण्याला पाठवायचे, त्यांची मुद्रिते मुंबईला मागवून घेऊन किंवा स्वत: पुण्यात जाऊन ती दुरुस्ती करावयाची, हे सारे काम जिकिरीचे, खर्चाचे आणि वेळखाऊ होऊ लागल्यामुळे दुसऱ्या वर्षांपासून ‘सृष्टिज्ञान’च्या मुद्रणाचे काम मुंबईलाच कै. मोरमकर यांच्या ‘लक्ष्मीनारायण मुद्रणालयात’ होऊ लागले. त्यानंतर पुण्याच्या ‘गणेश महादेव आणि कंपनी’ ने मुद्रणाचे काम अधिक स्वस्तात करून देऊ असे सांगितल्यामुळे पुन्हा हे मुद्रणाचे काम पुण्याला आले. १९३२ पर्यंत सृष्टिज्ञानच्या मुद्रणाचे काम गणेश महादेव कंपनीने केले. या सर्व काळात सृष्टिज्ञानची आर्थिक परिस्थिती खूपच ओढग्रस्तीची होती. बऱ्याच वेळा संस्थापक मंडळींना पदरची रक्कम खर्च करून ‘सृष्टिज्ञान’चे मुद्रण आणि वितरण करावे लागत होते. ही परिस्थिती पाहून प्रा. गो. रा. परांजपे यांचे ज्येष्ठ बंधू, शिक्षणतज्ञ प्रा. महादेवराव परांजपे यांनी ‘सव्‍‌र्हट्स ऑफ इंडिया सोसायटी’च्या (भारत सेवक समाज) ‘आर्यभूषण मुद्रणालया’ने ‘सृष्टिज्ञान’चे व्यवस्थापन स्वीकारावे अशी खटपट चालवली. आर्यभूषणचे त्या वेळचे व्यवस्थापक श्री. वामनराव पटवर्धन यांनीही ‘सृष्टिज्ञान’चे प्रकाशन हा सारा व्यवहार आतबट्टय़ाचा आहे, असे असले तरी ही एक आवश्यक प्रकारची समाजसेवाच आहे, हे जाणून दरवर्षी तोटा सोसण्याची तयारी ठेवली आणि ‘सृष्टिज्ञान’ला एक प्रकारे दत्तकच घेतले. जानेवारी १९३३ पासून ते डिसेंबर १९७४ पर्यंतच्या बेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ काळात ‘आर्यभूषण मुद्रणालया’ने ‘सृष्टिज्ञान’चे मुद्रण, प्रकाशन, वितरण या बरोबरच मासिकाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी स्वीकारली आणि ही जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. मोहोरदार कागदावरचे बहुरंगी मुख्यपृष्ठ आणि आत भरपूर चित्रे, आकृती असणारे प्रत्येकी ६४ ते ८० पानांचे खास विशेषांक या कालावधीत काढण्यात आले. ग्राहकांच्या वर्गणीतून या अंकाचे खर्च भागणे शक्यच नव्हते. पण ‘आर्यभूषण’ च्या संचालकांनी कधीही कुरकूर न करता हा सारा प्रचंड तोटा वर्षांनुवर्षे आनंदाने सोसून संपादक मंडळाची हौस पुरवली.
‘आर्यभूषण मुद्रणालया’च्या विसर्जनानंतर ‘सृष्टिज्ञान’चे भवितव्य काय राहणार ही मोठी चिंता संस्थापक प्रा. गो. रा. परांजपे, ‘सृष्टिज्ञान’चे सल्लागार, संपादक मंडळ आणि असंख्य हितचिंतक यांना पडली होती. सुदैवाने ‘महात्मा फुले वस्तु संग्रहालया’च्या संचालकांनी आणि विश्वस्त मंडळाने ‘सृष्टिज्ञान’च्या व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी उचलण्याची तयारी दाखवली आणि जानेवारी १९७५ पासून ‘सृष्टिज्ञान’ मासिक म. फुले वस्तुसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाखाली प्रकाशनात खंड न पडता सुरू राहिले.
१९६० या वर्षांअखेरीपर्यंत ‘सृष्टिज्ञान’चा आकार लहान म्हणजे क्राऊन (५ इंच x ७ इंच) होता. त्यानंतर हा आकार बदलून क्राऊन अष्टपत्री (७। इंच x ९।। इंच) असा मोठा करण्यात आला. मुखपृष्ठावर कधी एक रंगी, कधी दुरंगी तर कधी बहुरंगी अशी चित्रे असत. गेल्या ८१ वर्षांच्या काळात ‘सृष्टिज्ञान’ने वाचकांना सुमारे ३७ हजार पृष्ठांचा विज्ञानविषयक उपयुक्त माहितीपूर्ण वाचनीय मजकूर पुरवला आहे. विज्ञानाच्या बहुविध शाखा-उपशाखांतील माहिती सुबोध, सोप्या मराठी भाषेतून देण्याचे कार्य ‘सृष्टिज्ञान’ने केले आहे. भारतातील उद्योगधंदे, नवे शोध, मनोरंजक शास्त्रीय प्रयोग, शास्त्रज्ञांची चरित्रे, वैज्ञानिक छंद, दैनंदिन व्यवहारातले विज्ञान, बुद्धीला खाद्य पुरविणारे कूट प्रश्न, जिज्ञासा, हे कसे घडते, टपाल तिकिटातून विज्ञान, गणिताच्या गंमती अशा अनेक रंजक प्रकारातून विज्ञानविषयक माहिती नियमितपणे देण्याचे कार्य ‘सृष्टिज्ञान’करीत आहे.
१९६० नंतरच्या गेल्या चाळीस वर्षांत ‘सृष्टिज्ञान’ने प्रयत्नपूर्वक अनेक विषयांवर खास विशेषांक काढले आहेत. त्यातील विशेष उल्लेखनीय अंक म्हणजे पाणी, दूध, कुक्कुटपालन, अग्निबाण, घरगुती सुविधा, पुण्याचे शास्त्रीय दर्शन, गेल्या शतकातील वैज्ञानिक प्रगती, महासागर, विज्ञान, सूर्यकूल, स्वातंत्र्योत्तर भारताची वैज्ञानिक प्रगती इत्यादी. ‘सृष्टिज्ञान’चे संस्थापक प्रा. गो. रा. परांजपे यांच्या वयाला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रसंगी काढलेला ‘गो. रा. परांजपे खास अंक’ ही वैशिष्टय़पूर्ण होता. तसेच ऑगस्ट-सप्टेंबर १९६९ मध्ये काढलेला ‘सृष्टिज्ञान’चा ५०० वा जोड अंक १७८ पृष्ठांचा असून त्यात विज्ञानातील विविध शाखांचा सविस्तर परामर्श घेणारे खास लेख त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांकडून मुद्दाम मागवून घेण्यात आले होते. विज्ञानक्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या ‘विज्ञान रंजन कथा’ (सायन्स फिक्शन) या साहित्य प्रकाराला उत्तेजन देण्यासाठी १९७७ पासून गेली २३ वर्षे दर वर्षी दिवाळी अंक हा खास ‘विज्ञान रंजन कथा विशेषांक’ म्हणून काढला जात आहे.
‘सृष्टिज्ञान’च्या व्यवस्थापनाची जबाबदारी ‘म. फुले वस्तुसंग्रहालय’ या संस्थेने उचललेली असली तरीही अद्याप ‘सृष्टिज्ञान’चा आर्थिक पाया सुस्थिर, भरभक्कम झालेला नाही. आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण होण्यासाठी सृष्टिज्ञानच्या हितचिंतकांकडून देणग्या मिळवून ‘सृष्टिज्ञान निधी’सुरू करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’नेही अनुदान देऊन ‘सृष्टिज्ञान’साठी एक स्थायी निधी स्थापन केला आहे. नवी दिल्ली येथील ‘शास्त्रीय औद्योगिक अनुसंधान मंडळां’कडून ‘सृष्टिज्ञान’ला अनुदान मिळते. तरीही सध्याच्या मुद्रण-प्रकाशनाच्या सतत वाढत्या प्रचंड खर्चाच्या तुलनेत ही सारी तरतूद अत्यंत तुटपुंजी ठरते. गेली ७३ वर्षे सातत्याने मराठीतून विज्ञान प्रसार करण्याचे बहुमोलाचे कार्य करणाऱ्या ‘सृष्टिज्ञान’ची पुढची वाटचाल सुस्थिर आर्थिक पायावरच अवलंबून राहणार आहे. यासाठी अखिल मराठी भाषिक जनतेने पुढे येऊन ‘सृष्टिज्ञान’ला शक्य ते सर्व साहाय्य करण्याची आवश्यकता आहे. स्वत: ‘सृष्टिज्ञान’चे वर्गणीदार होणे, आपले स्नेही, परिचित यांना वर्गणीदार होण्यास प्रवृत्त करणे आणि ‘सृष्टिज्ञान निधी’ला भरघोस मदत करणे या मार्गाने जनतेकडून प्रतिसाद मिळाला तर येत्या काळात ‘सृष्टिज्ञान’कडून मोठे भरीव कार्य होऊ शकेल.
‘सृष्टिज्ञान’च्या आजपर्यंतच्या वाटचालीत संपादक मंडळात सदस्य म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रा. गो. रा. परांजपे, डॉ. वि. ना. भाजेकर, प्रा. श्री. ल. आजरेकर, डॉ. दि. धों. कर्वे, डॉ. स. बा. हुदलीकर, प्रा. प्र. रा. आवटी, डॉ. कृ. श्री. म्हसकर, डॉ. वि. ना. गोखले, श्री. शं. ब. सहस्रबुद्धे, श्री. ग. म. वीरकर, प्रा. क. वा. केळकर, प्रा. मो. ल. चंद्रात्रे, डॉ. मो. वा. चिपळूणकर, डॉ. त्र्यं. शं. महाबळे, डॉ. गो. रा. केळकर, प्रा. ना. ह. फडके, डॉ. श्री. द. लिमये, श्री. आ. मा. लेले, प्रा. भा. वा. केळकर, प्रा. प्र. वि. सोवनी, श्री. मो. ना. गोखले, डॉ. अ. ब. सप्रे, प्रा. य. बा. राजे, श्री. निरंजन घाटे, श्री. गो. बा. सरदेसाई, डॉ. कृ. वि. दिवेकर, डॉ. वा. द. वर्तक, डॉ. र. द. भिडे, श्री. अ. स. जोशी, डॉ. क. कृ. क्षीरसागर, डॉ. अनिल महाबळ, श्री. श्री. वि. केळकर, श्री. अ. ल. देशमुख यांचा समावेश आहे.
गेल्या सहा वर्षांत सृष्टिज्ञानच्या संपादक मंडळात काही बदल झाले. डॉ. वा. द. वर्तक, श्री. वि. केळकर आणि डॉ. म. वि. पानसे हे संपादक सदस्य कालवश झाले. या तीनही संपादकांनी सृष्टिज्ञानसाठी फार मोलाची कामगिरी केली होती. त्यांच्या जाण्याने सृष्टिज्ञानची हानीच झाली. सृष्टिज्ञान मासिकासाठी काही काम करावे, लिखाण करावे या उद्देशाने काही व्यक्ती आपणहून पुढे आल्या, त्यांना संपादक सदस्य मंडळात सहभागी करून घेण्यात आले. खडकवासला येथील केंद्रीय जल संशोधन केंद्रातून निवृत्त झालेले, विज्ञान, इतिहास, इ. विषयावर लेखन करणारे श्री. ना. भा. आदमणे, केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या स्थापत्य विभागातील अतिरिक्त प्रमुख इंजिनिअर, विज्ञानभारतीचे कार्यकर्ते व विज्ञानलेखक श्री. स. वि. पाडळीकर, के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये जीव-रसायनशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापिका व विज्ञान लेखिका डॉ. सरोज तासकर आणि विज्ञान लेखिका आणि ग्रंथपाल कविता भालेराव, श्री. प्रदीप तळवलकर आणि श्री. राजीव विळेकर. या सर्वाच्या मदतीने सृष्टिज्ञानची वाटचाल खंबीरपणे चालू आहे.
प्रभाकर सोवनी, कविता भालेराव.
पत्रव्यवहाराचा पत्ता : संपादक, सृष्टिज्ञान मासिक, महात्मा फुले संग्रहालय, घोले रस्ता,
पुणे ४११००४ दूरध्वनी क्रमांक-२५५३२७५०