Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

लोकमानस

पावसाच्या पाण्याचा संचय सर्वानीच करायला हवा
प्रत्येक उन्हाळ्यातील शेवटचे दोन महिने संपूर्ण देशवासी पाण्यासाठी भटकतात. पाण्यासाठी मारामाऱ्या, संघर्ष, वाद व प्रसंगी खूनही झालेले आहेत. अशा या पाण्याच्या महत्त्वाला प्रत्येक भारतीयाने जाणून घेण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. उपलब्ध पाण्याचा कसाही वापर करणे, पाणी वापराचे नियोजन नसणे, पाण्याची गळती सतत चालू राहणे, अशी कितीतरी कारणे या तीव्र पाणीटंचाईची सांगता येतील.

 


पावसाळ्यात पडणारे पावसाचे पाणी साठविण्यासाठी, ते जिरविण्यासाठीच्या पद्धतींची माहिती आता विविध खात्यांकडे, काही तज्ज्ञ मंडळींकडे उपलब्ध आहे.
आज बरीच घरे सिमेंट, गच्चीची व पत्र्यांची आहेत. या घरांच्या छतावरील पाणी घराच्या बाजूला टाक्या बांधून साठवता येते. नवीन घर बांधताना घराभोवती अशा टाक्या े तयार करवून घ्याव्यात. अंगणात बोअरवेल घ्यावी. यात हे पावसाचे पाणी पाइपद्वारे साठवावे. हे साठवलेले पाणी कित्येक दिवस जसेच्या तसे राहते, खराब होत नाही. ग्रामीण भागातही हे प्रयोग आरंभ करण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात घराच्या जवळ विहीर असेल तर गावकऱ्यांनी सामूहिक प्रयत्नांतून अशा विहिरी किंवा गावातील हापसे या पावसाच्या पाण्याने भरून घ्यावे. पावसाळ्यातील चार महिने व तद्नंतर अधूनमधून पडणारे पावसाचे पाणी अशा प्रयोगातून साठवायला हवे.
ज्या ठिकाणी भूगर्भात टाक्या नाहीत अशा ठिकाणी उपलब्ध टाक्यांत पाणी भरण्याची व्यवस्था व्हावी. महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका व ग्रामपंचायतींनी याबाबत पुढाकार घेऊन गावात, शहरात पडणारे हे पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांच्या मदतीने साठवायला हवे. ग्रामीण भागात छोटे ओढे, नद्या यांचे पाणी विहीर पुनर्भरणासाठी विहिरींकडे वळवायला हवे. यासाठी तज्ज्ञ व्यक्ती, नाला बंडिंग किंवा कृषी व वन खात्याच्या अधिकाऱ्यांची मदत घ्यावी. गायरान किंवा पडीक जमीन, तसेच दऱ्याखोऱ्यांतही गावकऱ्यांनी श्रमदान करून या चार महिन्यांतील पावसाचे पाणी अडविण्यासाठी बांध, बंधारे उभारावेत. शोष खड्डय़ाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत जिरवायलाच हवे. मोठमोठय़ा शहरात व ग्रामीण भागातही बोअरवेल्स असून त्या कोरडय़ा ठाक आहेत. गावकरी व स्थानिक प्रशासन संस्थेने या पावसाळ्यात छतावरच्या पाण्याने यांचे पुनर्भरण करावे. विहिरींचेही पुनर्भरण करावे. सर्वानीच कामाला लागायला हवे. हे आपले काम आहे, शासनाचे नाही.
ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत
वैजापूर, जि. औरंगाबाद

..तर दर्शनाचा विलंब टळेल
वारकरी मंडळी अनंत हालअपेष्टा, शारीरिक कष्ट झेलत पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरला जात असतात. वर्षांनुवर्षे पायी वारी करणारी ही मंडळी इंद्रायणी नदी प्रदूषित होऊ नये म्हणून डाऊ केमिकल्सच्या विरोधात उभी ठाकली. डाऊ केमिकल्सच्या संशोधन विभागासाठीची त्यांची जागेची मागणी अखेर वारकऱ्यांच्या एकजुटीमुळे मागे घेतली गेली.
पंढरपूर येथील श्री पांडुरंगाच्या गाभाऱ्याचे दरवाजे दिवसातून अनेक वेळा अनेक कारणांनी बंद ठेवले जातात. त्या काळात पांडुरंगाच्या दर्शनार्थीची मोठी रांग दरवाजा केव्हा उघडतो आणि कधी दर्शनाचा लाभ होतो याची आतुरतेने वाट पाहात असतात. सामान्यत: एकादशी सोडली तर इतर दिवशी रांगेत प्रवेश केल्यापासून तीन ते चार तासांनंतर दर्शनाचा योग येतो. व्यवस्थापनाने पहाटेची पूजाअर्चा झाल्यावर गाभाऱ्याचा दरवाजा उघडला की तो थेट रात्रीच्या पूजाअर्चेनंतरच बंद करावा. विठ्ठलाची आरती, पूजा दरवाजा उघडा ठेवून केल्यास बाहेरील दर्शनार्थीनाही त्याचा लाभ होईल आणि किमान वेळेत त्यांना विठ्ठलाचे दर्शन होईल. वारकरी बंधूंनी या प्रश्नाबाबतही आग्रही भूमिका घ्यावी.
विजय देवधर, वीर सावरकरनगर, पुणे

निकोप पत्रकारिता
‘सेझचा झाला नॅनो’ हा अग्रलेख आणि त्यावरील ‘लोकसत्ता की धनसत्ता’ हे उल्का महाजन यांचे पत्र वाचनात आले. विरोधी मतसुद्धा मनमोकळेपणाने छापले याबद्दल अभिनंदन. एकाच वृत्तपत्राचे लाखो वाचक असतात. त्या सर्वाची मते एकसारखी कधीच नसतात. म्हणून आपल्या विरोधी मत छापायचेच नाही ही बाब लोकशाहीविरोधी असते. मात्र आपले अग्रलेख जितके निर्भीड, तसेच कुणा पक्षाशी अथवा व्यक्तीशी बांधील नसतात. तेच आपल्या दैनिकाचे बलस्थान आहे.
दामोदर वैद्य, सोलापूर

‘सुमनसुगंध’मधील ‘पारिजात’, ‘रिमझिम’ आणि ‘झिमझिम’..
कविवर्य मधुकर जोशी यांचे पत्र (लोकमानस, २७ जून) वाचून सखेद आश्चर्य वाटले. ‘सुमनसुगंध’ या माझ्या पुस्तकातील त्यांच्या गीतांसंबंधीचे उल्लेख चुकीचे व त्यांना न विचारता नमूद केले आहेत, असे त्यांनी लिहिले आहे. त्यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगून व स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून त्यांच्या पत्राला उत्तर देत आहे. लेखनकाळात मी कविवर्याशी समक्ष नाही तरी फोन करून तथ्यांची खातरजमा करून घेतली आहे, कारण लेखिका या नात्याने ते माझे कर्तव्यच आहे.
प्रथम ‘सप्तपदी’ या चित्रपटातील गीताबद्दल (पृष्ठ १७८) खुलासा - जोशींनी पत्रात लिहिलेले ‘प्रीतिचा पारिजात फुलला, सुगंध त्याचा तुझ्या नि माझ्या हृदयी दरवळला’ हे त्यांचे भावगीत कुंदा बोकील या ज्येष्ठ गायिकेने गायिले आहे, सुमनताईंनी नव्हे. संगीतकार आहेत अनिल मोहिले. ‘सप्तपदी’मधले ‘प्रीतिचा पारिजात फुलला, अंतरी सुगंध दरवळला’ हे वेगळे गीत मला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मधुसूदन कालेलकर यांच्या नावावर आहे व संगीतकारद्वयी आहेत गजानन शिर्के-द्वारकानाथ भोसले.
पुस्तकातील सूची ही सुमनताईंच्या उपलब्ध डायऱ्या, इंटरनेट व इतर संदर्भ आणि उपलब्ध मराठी चित्रगीतसूची यांच्या आधारावर सिद्ध केली आहे व ती जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सप्तपदी’मधील मधुकर जोशी विरचित अप्रतिम भूपाळी म्हणजे ‘ऊठ मुकुंदा, सरली रात’, जिचा उल्लेख गीतसूचीत आहे. सूचना स्वीकारार्ह आहेतच.
आता पृष्ठ १०५ वरील ‘झिमझिम’ या शब्दाबद्दल. सुमारे चार-पाच वर्षांपूर्वी टिळकनगर गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली या संस्थेतर्फे ‘स्वरभावयात्रा’ हा मराठी भावगीताची वाटचाल मांडणारा महाकार्यक्रम सादर झाला होता. त्याला कविवर्य मधुकर जोशी व संगीतकार कै. दशरथ पुजारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर ‘रिमझिम’ की ‘झिमझिम’ या माझ्या प्रश्नावर दस्तुरखुद्द कविवर्य म्हणाले, ‘‘मी ‘रिमझिम’ झरती श्रावणधारा’ असे लिहिले आहे खरे. कारण गीतरचनेच्या दृष्टीने ‘रिमझिम’ हा शब्द कानाला गोड लागतो. पण दिवसभर सतत पडणाऱ्या थोडय़ा थोडय़ा पावसासाठी मला ‘झिमझिम’ हा शब्द अधिक सयुक्तिक वाटला होता. गीताचे ध्वनिमुद्रण होताना ‘झिमझिम’ हा शब्द गायिला गेला व तोही कानाला गोड लागला. त्यामुळे मी त्यावर आक्षेप घेतला नाही.’’ हाच खुलासा कै. दशरथ पुजारीही आपल्या रचनांच्या कार्यक्रमात आवर्जून करीत. १९५७ साली जोशींनी लिहिलेले हे अप्रतिम विरहगीत ध्वनिमुद्रित झाले, तेव्हाच कविवर्यानी ‘झिमझिम’ शब्दाला आक्षेप घ्यायला हवा होता. या गीताबद्दल पुस्तकात लिहिताना कवी-संगीतकार-गायिका या तिन्ही मंडळींशी बोलूनच मी लिहिले आहे. शिवाय कविवर्याशी झालेल्या प्रत्यक्ष संभाषणाचाही त्याला आधार आहे. दुर्दैवाने त्याचे साक्षीदार संगीतकार दशरथ पुजारी आज हयात नाहीत. एका ज्येष्ठ गायिकेच्या सांगीतिक जीवनाचा प्रामाणिक आढावा घेण्याचा प्रयत्न करणे ही अनिष्ट कृती ठरते काय? ‘झिमझिम’ हा शब्द कविवर्याना अभिप्रत होता’ हे वाक्य त्यांच्या व माझ्या वरील संभाषणावर आधारित आहे.
पुस्तक प्रकाशन समारंभाचे निमंत्रण कविवर्याना देण्याचे अनवधानाने राहून गेले, त्यावद्दल क्षमस्व.
जाता जाता रसिक या नात्याने एक व्यक्तिगत मत - दिवसभर पडणाऱ्या पावसाची रिपरिप हळव्या कविमनात ‘रिमझिम’ होते. तिला विरह भावनेची झालर लगडते. ‘रिमझिम पडणारा पाऊस अधून मधून थांबतो. झिमझिम’ सतत सुरू असते. म्हणून तर कविश्रेष्ठ गदिमा म्हणतात - ‘पावसाची रिमझिम थांबली रे, तुझा माझी जोडी जमली रे..!’
मंगला खाडिलकर
mangala.khadilkar@gmail.com