Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

वसंतदादा कारखाना कामगारांच्या प्रश्नावर लवादाची नियुक्ती
आंदोलन मागे
कामगार आजपासून कामावर
कारखाना बचाव समिती स्थापण्याचा जदचा निर्णय
सांगली, २८ जून / प्रतिनिधी
वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रोहयोमंत्री मदन पाटील यांनी लवादाच्या नेमणुकीस हिरवा कंदील दाखविल्यामुळे महिनाभर सुरू असणारे कामगारांचे आंदोलन आज मागे घेण्यात आले. तसेच उद्यापासून कामगार आपले काम सुरू करतील, असे सांगण्यात आले. कामगार व संचालक यांच्यात सुरू असलेला संघर्ष तात्पुरता थांबला आहे.

नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जनसुराज्य ‘शक्ती’ दाखविणार-कोरे
सोलापूर, २८ जून/प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने राज्यात ५० जागा लढविण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांच्या विरोधातही नांदेडमध्ये उमेदवार उभा करण्यात येणार असल्याचे त्या पक्षाचे नेते असलेले अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांनी सांगितले.

सोलापुरात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेतृत्वात बदलाच्या हालचाली
जयप्रकाश अभंगे, सोलापूर, २८ जून

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूर शहराच्या नेतृत्वात बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे दोन्ही पक्षांत नेतृत्वासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तसेच जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दलही नाराजी वाढल्यामुळे तेथेही बदल अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

हातभट्टीच्या अड्डय़ांवर छापे
इचलकरंजी, २८ जून / वार्ताहर

हातकणंगले तालुक्यातील माणगाव वाडीसह तीन गावांत आज पोलिसांनी गावठी दारू विरोधात धडक मोहीम राबवली. यामध्ये विविध गावठी दारू अड्डय़ांवर धाड टाकून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र या प्रकरणात एकही संशयित पोलिसांच्या हाती लागू शकला नाही.
पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त गावठी दारूची निर्मिती माणगाववाडी व परिसरात होते. पोलिसांच्या सातत्याने होणाऱ्या कारवाईनंतरही या धंद्याला चाप बसला नाही. काही दिवसांपूर्वी तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या ठिकाणी धाडसी कारवाई केली होती. त्यामुळे काही काळ या परिसरातील गावठी दारूच्या भट्टय़ा बंद होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा दारूच्या भट्टय़ा सुरू होऊन दारूची खुलेआम विक्री सुरू होती. त्या पाश्र्वभूमीवर आज पुन्हा त्या परिसरात धडक मोहीम राबविण्यात आली. माणगाववाडीसह मुडशिंगी, साजणी या गावच्या हद्दीतील गावठी दारू अड्डय़ांवर धाडसत्र राबविण्यात आले.

राज्य मैदानी स्पर्धेत सांगलीचे दोघे चमकले
सांगली, २८ जून / प्रतिनिधी
पुणे येथे झालेल्या ज्युनिअर राज्य मैदानी स्पर्धेत सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या दोन खेळाडूंनी उज्ज्वल यश संपादन केले. पुणे येथील बाबूराव सणस क्रीडांगणावर दि. २२ व २३ जून रोजी आयोजित विविध स्पर्धेत सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या चार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यात सूरज भोसले याने १०० मीटर धावणे या खेळप्रकारात राज्यात दुसरा, तर लांब उडीत विशेष कामगिरी केली. नचिकेत पवार याने लांब उडीत तिसरा, तर पेटॅशलॉन (पाच खेळप्रकार)मध्ये चौथा, सायली यमगर हिने लांब उडीत चौथा, तर अस्मिता गावडे हिने पेटॅशलॉन या खेळप्रकारात चौथा क्रमांक मिळविला. या सर्व खेळाडूंना स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक शहा, उपाध्यक्ष संजय परमणे व सहसचिव अविनाश सावंत यांचे प्रश्नेत्साहन, तर प्रशिक्षक एस. एल. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयास मान्यता
पंढरपूर, २८ जून / वार्ताहर
पंढरपूरपासून चौदा कि.मी. अंतरावर असलेल्या पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयास चालू शैक्षणिक वर्षापासून मान्यता मिळून पहिल्या वर्षातील अभियांत्रिकी शाखेचे वर्ग चालू झाले आहेत, अशी माहिती अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी बोलताना सांगितले.

सांगलीत सुविधांसाठी चार कोटींचा निधी
सांगली, २८ जून / प्रतिनिधी

सांगली महापालिकेतील मुलभूत सोयीसुविधांसाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, गृहमंत्री जयंत पाटील यांनी नुकताच या निधीचा धनादेश महापौर मैनुद्दीन बागवान यांच्याकडे सुपुर्द केला. महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी गेल्या आठ महिन्यात कोटय़वधी रूपयांचा निधी राज्य शासनाकडून देण्यात आला आहे. प्रभागातील प्रश्नथमिक सुविधांसाठी तीन कोटी रूपयांचा निधी गत महिन्यात महापालिकेला प्रश्नप्त झाला होता. आता रस्ते, गटारी व सुशोभिकरण आदी कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी आणखी निधी मिळण्याची शक्यताही महापौर श्री. बागवान यांनी व्यक्त केली आहे.

५० रस्त्यांची आठ कोटींची कामे मंजूर - मदन भोसले
सातारा, २८ जून / प्रतिनिधी
राज्य शासनाने वाई-खंडाळा तालुक्यातील सव्वाआठ कोटी खर्चाच्या पन्नास रस्त्यांची कामे चालू अर्थसंकल्पात मंजूर केली असल्याची माहिती आमदार मदन भोसले यांनी दिली. आमदार फंडातून कामे करताना येणाऱ्या आíथक मर्यादेमुळे जास्त लांबीचे व अधिक खर्चाचे रस्ते दुर्लक्षित राहिले होते. हे रस्ते तातडीने पूर्ण व्हावेत, यासाठी अशा रस्त्यांचा समावेश सन २००९-१० च्या अर्थसंकल्पामध्ये होण्याबाबतचा प्रस्ताव अर्थ व नियोजन मंत्रालयाकडे सादर केला होता. तो मंजूर करण्यात आल्याने सव्वाआठ कोटींची कामे लवकरच सुरू होऊन मतदारसंघातील दळणवळणाचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लावण्यास सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री अशोक चव्हाण व अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे आमदार मदन भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे आभार मानले आहेत.

पाणी संघर्ष रॅलीचे आयोजन
फलटण, २८ जून/वार्ताहर

नीरा देवघर धरणाचे खासगीकरण रोखावे, जिल्ह्य़ातील धरणांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पाणी संघर्ष रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे फलटण येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. रॅलीच्या वतीने तहसीलदार सतीश बागल यांना पाणीप्रश्नी निवेदन देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख, उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण तालुकाध्यक्ष स्वागत काशीद, शहराध्यक्ष अनुप शहा, सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव दिगंबर आगवणे, फलटण तालुका उपाध्यक्ष शरद जाधव, अमीर शेख, अमित रणवरे, राजेंद्र निंबाळकर आदी उपस्थित होते.

मूलनिवासी संघाचा मोर्चा
सांगली, २८ जून / प्रतिनिधी

राष्ट्रीय मूलनिवासी संघाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व टी. वाय. काकडे यांनी केले. मूलनिवासी लोकांच्या विरोधात शासन राबवत असणाऱ्या विविध धोरणांच्या विरोधासाठी हा मोर्चा काढण्यात आला. प्रश्नथमिक, माध्यमिक, उच्च व व्यावसायिक शिक्षणाचा बाजार मांडून मूलनिवासींना शिक्षणापासून दूर लोटले जात आहे. तसेच सहावा वेतन आयोग हा पूर्वग्रहदूषित आहे. विमा क्षेत्राचे खासगीकरण, आरक्षणाच्या नावावर जाती-जातीत लावली जाणारी भांडणे हे थांबले पाहिजे, अशा मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या. मोर्चाची सुरुवात शास्त्री चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ापासून झाली. या मोर्चात काशिनाथ खाडे, अमित नाकाडे, विनोद गायकवाड, गौतमी शिंदे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नावनोंदणी अभियान
माळशिरस, २८ जून / वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावनोंदणीच्या तालुका अभियानाचा प्रश्नरंभ पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सदस्यत्वाचा अर्ज भरून केला. पक्षाच्या सदस्यत्व नोंदणीचे अभियान सुरू झाले असून सोलापूर जिल्ह्य़ातील तालुका अभियानाचा प्रश्नरंभ सकाळी मोहिते-पाटील यांच्या अकलूजच्या शिवरत्न या निवासस्थानी झाला. या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, जिल्हा सरचिटणीस मोहन लोंढे, तालुका अध्यक्ष दत्तात्रय भिलारे उपस्थित होते.

डॉ. शाह यांचा गौरव
सांगली, २८ जून/प्रतिनिधी

सांगली येथील समाजसेवक पद्मश्री डॉ. विजयकुमार शाह यांचा राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते दिल्ली येथे गौरव करण्यात आला. डॉ. शाह यांनी देशात व शेजारच्या राष्ट्रांत २३ लाख नागरिकांसाठी दंत आरोग्य, सर्वसामान्य आरोग्य, पर्यावरण क्षेत्रातील मोलाचे कार्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांनी समाजविकास पत्रिकेचे प्रकाशनही केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती व पंतप्रधानांनी त्यांचा गौरव केला. डॉ. शाह यांच्या व्यसनमुक्ती कार्याचे कौतुक केले, तसेच त्यांनी नशाबंदी कार्यामध्ये अधिक सक्रिय व्हावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.