Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

विदर्भ-मराठवाडय़ातील पावसामुळे दिलासा
राज्यात अजूनही अपुराच पाऊस; देशातही ८० टक्के भाग कोरडा
पुणे, २८ जून / खास प्रतिनिधी

मान्सूनने महाराष्ट्रासह देशाचा निम्माहून अधिक भाग व्यापला असला तरी देशातील ३६ उपविभागांपैकी २८ उपविभागांत अतिशय अपुऱ्या पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सर्वच भागात सरासरीच्या तुलनेत केवळ अर्धा ते एकचतुर्थाश इतकाच पाऊस पडला आहे. मात्र, काल सायंकाळपासून विदर्भ व मराठवाडय़ाच्या बऱ्याचशा भागात सुरू झालेल्या दमदार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर येत्या दोन दिवसांतही राज्यभर पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता पुणे वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.

गोंधळानंतर प्रवेश प्रक्रिया ‘ऑनलाइन’
मुंबई, २९ जून / प्रतिनिधी

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गेल्या दोन दिवसांपासून सूरू असलेला गोंधळ दूर करण्यात अखेर ‘एमकेसीएल’च्या तत्रज्ञांना यश आले आहे. अनेक अडचणी निर्माण करणारे हे संकेतस्थळ आज मात्र सुरळीत सुरू होते. मुंबईतील विविध भागांतून ऑनलाइन प्रक्रियेबाबत आज मात्र कोणत्याही गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत. ऑनलाइन प्रक्रियेत तब्बल १७ प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या असून आपण केलेल्या सूचनांनंतर ‘एमकेसीएल’च्या तंत्रज्ञांनी त्या दूर केल्या असल्याचे शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

सोनिया गांधी यांनी दिला अन्नसुरक्षेचा नवा मंत्र
अमिताव रंजन
नवी दिल्ली, २८ जून

यूपीए सरकारने गेल्या खेपेला रोजगार हमी योजना राष्ट्रीय स्तरावर राबवून एक नवा आदर्श घालून दिला, त्यात प्रत्येकाला शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली होती. आता आम आदमीला आणखी सक्षम करण्यासाठी नव्याने सत्तेवर आलेल्या यूपीए सरकारने अन्न सुरक्षेची हमी देणारी योजना आखावी अशी सूचना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. अन्न सुरक्षेची हमी देण्याचे आश्वासन काँग्रेसने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. ( अग्रलेख - वंचितांची चिंता!)

‘शिष्यवृत्ती’च्या निकालात अडसर तांत्रिक समस्येचा!
पुणे, २८ जून/खास प्रतिनिधी

दहावी-बारावी, सीईटी.. विद्यार्थिवर्गाकडून अधीरतेने वाट पाहिली जाणारे हे निकाल जाहीर झाल्यानंतर आता चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या शिक्षणविश्वाला प्रतीक्षा आहे ती चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालांची. शाळा सुरू होण्याचे राज्यभरातील भिन्न वेळापत्रक, भारनियमन आणि ‘डेटा एन्ट्री’तील काही तांत्रिक समस्यांवर मात करीत लवकरच हे निकाल जाहीर केले जाणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबरोबरच गेल्या शैक्षणिक वर्षांत दाखविलेल्या ‘कर्तबगारी’चा निकाल जाहीर केला जात असल्याने जून महिन्यात शिक्षणविश्वात एकच लगबग असते. शाळा-महाविद्यालयांमधील शिक्षक-शिक्षकेतरवर्ग निकाल जाहीर करण्याच्या कार्यवाहीच्या गडबडीत व्यग्र असतो.

महाराष्ट्र हे देशात पथदर्शक राज्य ठरावे - राष्ट्रपती
मुंबई, २८ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी आहे, तशीच ती शूरांचीही भूमी आहे. पराक्रम हा महाराष्ट्राच्या मनगटाचा सहजभाव आहे. महाराष्ट्राचा इतिहास उज्ज्वल आहे आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण महान शिल्पकारांच्या हातून झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मनातील भावी प्रगतीची सोनेरी स्वप्ने निश्चित पूर्ण होऊन देशात महाराष्ट्र हे आदर्श आणि पथदर्शक राज्य ठरावे, अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज येथे व्यक्त केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या सुवर्णारंभाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आज सायंकाळी एनसीपीएच्या जमशेद भाभा सभागृहात प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले.

पाणी प्रश्न पुन्हा पेटणार
बाभळी धरणाचे काम थांबवा; आंध्रची महाराष्ट्राला नोटीस
हैदराबाद, २८ जून/पीटीआय
सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त पाटबंधारे प्रकल्पांबाबत अंतरिम आदेश दिला असतानाही गोदावरी नदीवरील बाभळी धरणाचे काम सुरू असून हा न्यायालयाच्या आदेशाचा भंग आहे, अशी नोटीस आंध्र प्रदेश सरकारने महाराष्ट्र सरकारला दिली आहे. राज्याचे पाटबंधारेमंत्री पोन्नला लक्ष्मीय्या यांनी म्हटले आहे की, बाभळी बंधाऱ्याच्या कामात सहभागी असलेल्या कंपन्यांनाही नोटीस दिली आहे. बाभळी प्रकल्पाचे बांधकाम सुरू ठेवून महाराष्ट्र सरकारने न्यायालयाची बेअदबी केली आहे,

धोनी आला धावून
किंग्स्टन, २८ जून / वृत्तसंस्था

आघाडीचे सर्व फलंदाज धावांच्या अर्धशतकालाच पॅव्हेलियनमध्ये पोहोचलेले असताना महेंद्रसिंग धोनीने आपल्या पदाला साजेशी खेळी करून भारतीय संघाला अक्षरश: नामुष्कीच्या संकटातून बाहेर काढले. १२९ चेंडूंत ९५ धावांची चिवट, जिगरबाज खेळी करताना त्याने ८ बाद ८२ अशा अवस्थेत सापडलेल्या भारतीय संघाला ४८.१ षटकांत १८८ धावांपर्यंत नेले आणि चाहत्यांना अनपेक्षित धक्का दिला. रुद्रप्रताप सिंगने १०व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊनही ७५ चेंडूंत २३ धावांची तेवढीच महत्त्वाची खेळी करून धोनीला साथ दिली व दोघांनी नवव्या विकेटसाठी विक्रमी शतकी भागीदारीही केली. दिनेश कार्तिक (४), गौतम गंभीर (०), रोहित शर्मा (०), युसूफ पठाण (०), रवींद्र जडेजा (७) असे सगळे फलंदाज कर्णधाराच्या विश्वासाला जागले नाहीत. फलंदाजांची ही फळी गारद झाल्यामुळे भारतीय संघ सर्वात कमी धावसंख्येवर गुंडाळला जाणार की काय असा अंदाज व्यक्त होत होता. अपवाद फक्त युवराजचा. त्याने ३५ धावांची खेळी केली. पण त्याचा अडसर टेलरने दूर केल्यावर पुन्हा एकदा भारतीय संघाला घरघर लागली. पण धोनीने खेळपट्टीवर अक्षरश: नांगर टाकला व आर. पी. सिंगला सोबतीला घेऊन भारताला द्विशतकाच्या समीप नेले. धोनीचे शतक मात्र पूर्ण होऊ शकले नाही.

राज ठाकरे आज कल्याण न्यायालयात
मुंबई, २८ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या कल्याणच्या रेल्वे न्यायालयात हजर राहणार आहेत. कल्याण रेल्वे पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यांत तेथील सत्र न्यायालयाने राज ठाकरे यांना मंजूर केलेला अंतरिम अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला होता आणि त्यांना २९ जून रोजी सकाळी कल्याण रेल्वे दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. कल्याणच्या सत्र न्यायालयाने ठाकरे यांना २४ ऑक्टोबपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करणारा आदेश दिला तेव्हा ते आधीच कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात होते. त्यामुळे अटकेत असलेल्या आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा त्या न्यायालयाचा आदेश पूर्णपणे बेकायदा ठरतो, असे नमूद करून उच्च न्यायालयाने तो रद्द केला. मात्र उद्या राज ठाकरे हे न्यायालयापुढे हजर होतील तेव्हा त्यांची लगेच जामिनावर सुटका होणे ही औपचारिकता असेल.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी