Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

आला, पाऊस आला!

परभणी जिल्ह्य़ात हलका पाऊस
परभणी, २८ जून/वार्ताहर

जिल्ह्य़ात आज सकाळी सर्वत्र संततधार हलका पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. या वर्षीचा हा पहिलाच मोसमी पाऊस झाला. तथापि तो पेरणीसाठी पुरेसा नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

नांदेड जिल्ह्य़ात दमदार पाऊस
नांदेड, २८ जून/वार्ताहर

मृग नक्षत्र पूर्ण कोरडे गेल्यानंतर जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात आज पावसाने दमदार हजेरी लावली. मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा पाऊस बळीराजासह सर्वसामान्यांना दिलासा देणारा ठरला. दरम्यान, भिंत कोसळून माहुर तालुक्यात एक तरुण ठार झाला.

निरोपाने हले रोप
नाही नाही म्हणता बरंच काही सांगून झालं. वाटलं होतं आता जायचंय दूरवर. एकटय़ाचा प्रवास. प्रत्येक टप्प्यावर सांगायचं काही तरी. खोलवर रुतलेलं. रुजलेलं. कुणाशी तरी संवाद साधून मोकळं करावं आतवर साचलेल्या अंधाराचं कोंदण. त्यात टिमटिमणाऱ्या प्रकाशटिंबांना ओंजळीत घ्यावं. स्पर्शानं फुलून येतात काही गोष्टी. जराशी झुळूक अंगाखांद्यावरून तरंगत गेली की, अख्खं झाड मोहरून येतं. फुलांच्या वाटांमधून वाऱ्याचे प्रवाह सरकू लागले की, गंधाचे अवघे विश्व तरंगत जाते सर्वदूर.

चार-चौघांचा ‘अविस्मरणीय’ विमानप्रवास!
औरंगाबाद, २८ जून/प्रतिनिधी

आतापर्यंत विमानाने प्रवासच केला नाही, अशी खंत असलेल्या चार मित्रांनी अचानक औरंगाबाद-मुंबई असा विमानप्रवास केला. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर मिळेल त्या बसने चौघेही घरी परतले. इकडे मानसी देशपांडे हिचा खून करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले होते. खून करून कोणी लगेच विमानाने तर पसार झाला नाही, असा एक तर्क लढवण्यात आला.

संस्कृतचे गाढे अभ्यासक प्रश्नचार्य वसंत पाटील यांचे निधन
औरंगाबाद, २८ जून/खास प्रतिनिधी
कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयाचे निवृत्त प्रश्नचार्य व संस्कृतचे गाढे अभ्यासक प्रश्नचार्य वसंत संतू पाटील यांचे आज दुपारी येथे निधन झाले. ते ८० वर्षाचे होते. त्यांच्या मागे ‘दिलासा’च्या अध्यक्ष प्रश्न. अनघा पाटील, आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. अर्चना पाटील आणि अमेरिकास्थित शास्त्रीय संगीत गायिका आसावरी पाटील या तीन मुली आहेत. प्रश्नचार्य वसंत यांच्यावर रात्री पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्य़ात चांगला पाऊस; पेरण्या सुरू
हिंगोली, २८ जून/वार्ताहर

जिल्ह्य़ात काल व आज दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. सर्वत्र काल रात्री समाधानकारक पाऊस झाला. आज सकाळपासून पावसाची रिमझिम दिवसभर चालू असल्यामुळे सूर्यदर्शन घडले नाही. कयाधू नदीला प्रथमच चांगले पाणी राहिल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाऊस आला; पेर्ते व्हा!
लोहा, २८ जून/वार्ताहर
मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आद्र्रामध्ये पावसाची दमदार सुरुवात झाली. तालुक्यात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती. आज दिवसभर थांबून थांबून पाऊस पडत होता. खरीप हंगामाच्या पेरते व्हा म्हणत शेतकऱ्यांनी चाडय़ावर मुठी ठेवण्यास सुरुवात केली आहे. रात्रीपासून पाऊस चालू झाला. आडगाव, सुभाषनगर, सोनमांजरी, कारेगाव या भागात जोरदार पाऊस झाला. गुरुवारी रात्रीही या गावांत पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची लागवड सुरू केली आहे. काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह सामान्य माणूस सुखावला आहे. पाण्याच्या पातळीत काही अंशी वाढ झाली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावात मोजकेच पाणी शिल्लक असल्यामुळे तीव्र पाणी समस्या भेडसावणार आहे. परंतु आज झालेल्या पावसामुळे प्रश्न काहीअंशी सुटण्यास मदत होईल.

आभाळ आले, पण..
औरंगाबाद, २८ जून/प्रतिनिधी

पंधरवडा उलटूनही जिल्ह्य़ात व विभागात पेरणीयुक्त पावसाने हजेरी न लावल्याने बळीराजा हताश झालेला असतानाच गेल्या ४८ तासांत सक्रिय होणाऱ्या मान्सूनचे मराठवाडय़ातही दिलासादायक आगमन झाले. जिल्ह्य़ात काही ठिकाणी काल रात्री तुरळक पाऊस झाला. आकाशातले ढग पाहून आता सर्वाना अपेक्षा आहे जोरदार पावसाची. काल कोकण, मुंबई, पुण्यात चांगला पाऊस झाल्यानंतर तो उर्वरित महाराष्ट्रात काही तासांत सक्रिय होईल, असे अपेक्षित होते व तसे झालेसुद्धा. शनिवारी रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास शहर व जिल्ह्य़ातील काही ठिकाणी हलका ते मुसळधार पाऊस झाला. मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ात शनिवार- रविवार या दोन दिवसांत मान्सून सरकला. औरंगाबादकरांना आज सूर्यदर्शन घडले नाही. आकाशात जमलेली ढगांची गर्दी कधी बरसणार, असा सवाल रात्रीपर्यंत तसाच राहिला. सकाळपासून शहर व परिसरात कोठे साधा शिंतोडाही पडला नाही. उशिराने का होईना सर्वत्र चांगला पाऊस होण्याची चिन्हे दोन दिवसांत निर्माण झाली आहे. पाऊस न झाल्याने विभागातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून बाजारपेठेतही त्याचा परिणाम दिसून येत आहे.

औरंगाबादमध्ये पर्स लंपास करण्याचे सत्र
औरंगाबाद, २८ जून/प्रतिनिधी

शहरात भरदिवसा घरफोडय़ांसह रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या महिलांच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र हिसकविण्याबरोबर आता पर्स लंपास करण्याचे सत्र चोरांनी सुरू केले आहे. सकाळी साडेआठ वाजता सावरकर चौकातून पायी जाणाऱ्या मंजुषा अण्णासाहेब जामगे (रा. नूतन कॉलनी) यांची पर्स भामटय़ाने हिसकावून तात्काळ तेथून पळ काढला. पर्समध्ये मोबाईल, २७ हजार रोख, इतर सामान होते. मंजुषा यांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत चोरांनी पोबारा केला होता.

दोन शाळकरी मुलांचा नदीत बुडून मृत्यू
बीड, २८ जून/वार्ताहर

शहरातील करपरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा या दोघांचे मृतदेह शिवाजीनगर पोलिसांनी पाण्यातून वर काढले. शहरातील रायगड कॉलनी येथील सारंग विजय जोशी (वय १२) व शुभम प्रमोद जोशी (वय ११)सख्खे चुलत भाऊ काल पोहण्यासाठी गेले. रात्री उशिरापर्यंत मुले दोघेही परत न आल्याने घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला. एका नागरिकाने करपरा नदीच्या काठी कपडे आणि चप्पल असल्याचे जोशी कुटुंबातील सदस्यांना सांगितल्यावर त्यांच्या घरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाण्यातील मृतदेह बाहेर काढण्यात आले.

बीडच्या उपानगराध्यक्षपदी फारूक पटेल यांची पुन्हा निवड
बीड, २८ जून/वार्ताहर

नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा फारूक पटेल यांची एकमताने निवड झाली. यावेळी नूतन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व पालिकेचे सदस्य उपस्थित होते. बीड नगरपालिकेच्या अध्यक्षपदी पुढील अडीच वर्षासाठी सर्वसाधारण प्रवर्गातून नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची एकमताने निवड झाली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वा. उपनगराध्यक्षपदासाठी फारूक पटेल यांचा एकमेव अर्ज आला होता आणि सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली. सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष-उपाध्यक्षपदी होणारे क्षीरसागर व पटेल हे एकमेव आहेत. यावेळी मुख्य अधिकारी धनंजय जावळीकर, रवींद्र क्षीरसागर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दुसऱ्या विवाहाबद्दल पतीविरुध्द गुन्हा दाखल
निलंगा, २८ जून/वार्ताहर

मूल होत नाही म्हणून त्रास देऊन दुसरा विवाह करणाऱ्या पतीविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वर्षा नामदेव गाडेकर (वय २५, रा. मुबारकपूर) हिचा मूल होत नाही या कारणावरून सासरच्या मंडळीकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. तिचा पती नामदेव याने धानोरा (ता. निलंगा) येथील सुप्रिया काळे या युवतीशी दुसरा विवाह केला. वर्षा गाडेकर यांनी त्याविरुद्ध फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून पती नामदेव श्रीमंत गाडेकर, सासू गंगुबाई, सुप्रिया काळे, अशोक हजारे, उषा हजारे, बाबू हजारे, विलास काळे, अनुसया काळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीची आत्महत्या
मानवत, २८ जून/वार्ताहर

अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सत्यभामा दिगंबर तिथे (वय १३) असे तिचे नाव आहे. शेजाऱ्यांनी आपल्या मुलीस आत्महत्या करणे भाग पाडल्याची तक्रार तिचे वडील दिगंबर तिथे यांनी मानवत पोलिसात दिली आहे. दिगंबर तिथे आणि त्यांचे शेजारी शेख सिराज शेख अन्सर, शेख इसाद, शेख सुलतान व शेख सब्बीर शेख शब्बीर यांची २४ मे रोजी मारामारी झाली. यामुळे या चौघांना अटक झाली. सत्यभामा २४ जूनला घरी एकटी असताना आरोपींच्या नातेवाईकांनी तिला शिवीगाळ केली. रागाच्या भरात तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेख मरीनबी, शेख मुन्नाबी, शेख रजियाबी, शेख रबियाबी व अहेदाबी यांनी तिला जिवे मारण्याची धमकी देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

कालव्यात पडून मृत्यू
हिंगोली, २८ जून/वार्ताहर

औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव कॅम्प येथील उत्तम दत्तराव येळगे (वय ४५) काल पहाटे प्रश्नत:र्विधी आटोपून परतताना गोळेगाव बसस्थानकाजवळ असलेल्या पुलावरून कालव्यात पडले. पुलावरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला होता. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. औंढा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

निलंग्याच्या आमदारांच्या वाहनचालकास धमकी
निलंगा, २८ जून/वार्ताहर

भाजपचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या गाडीचा वाहनचालक संतोष उत्तमराव पांचाळ यास अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याच्या धमकी भ्रमणध्वनीवर येत आहे. त्याला जिवे मारण्याची धमकी अज्ञात व्यक्ती धमकावत आहे. म्हणून संतोष पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक केशव लटपटे अधिक तपास करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या
नांदेड, २८ जून/वार्ताहर

मुखेडच्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी दत्ता बाबुराव नागापल्ले (वय २५) याने विषारी औषध प्रश्नशन करून काल रात्री आत्महत्या केली. दत्ताचे मूत्रपिंड गेल्या काही दिवसांपासून निकामी झाले होते. या आजाराने नैराश्य आल्याने त्याने काल रात्री नऊ वाजता पशुवैद्यकीय रुग्णालयासमोर विषारी औषध प्रश्नशन करून आत्महत्त्या केली. दत्ताचे गेल्या ९ जून रोजीच लग्न झाले होते.

कुत्र्यांच्या हल्ल्यात पाडस मृत्युमुखी
भोकरदन, २८ जून/वार्ताहर

जंगलातील मोकाट कुत्र्यांनी पाठलाग करून जखमी केलेल्या हरणाच्या पाडसास वैद्यकीय उपचार करून पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी आणले. पण वन विभागाचे कर्मचारी येण्याअगोदरच ते मृत्युमुखी पडले. जालना रस्त्यावरील नांजा पाटीवर रामकिसन भगवंता सहाणे यांचा ‘गजानन ढाबा’ आहे. या ढाब्यासमोर आज दुपारी हरणाचे जखमी पाडस धडपडत आले. त्याच्या मागे कुत्री धावत आली, हे बघताच रामकिसन सहाणे, शरद थिटे, वैजिनाथ थिटे यांनी कुत्र्यांना हुसकावून या पाडसास पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

एक लाखांची पिशवी पळविली
औरंगाबाद, २८ जून /प्रतिनिधी

बाबा पेट्रोल पंप येथून रिक्षातून जात असताना सुरेश लक्ष्मण गायकवाड (वय ५२, रा. चितेगाव) यांची पिशवी कोणीतरी पळवून नेली. या पिशवीत १ लाख ८ हजार रुपये होते. रिक्षातून उतरण्याच्या वेळी त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. अन्य एका घटनेत आयडिया कंपनीचे क्षेत्रिय व्यवस्थापक श्रीराम मदनलाल वर्मा यांची होंडा सिटी मोटार त्यांच्याच सहकाऱ्याने पळवून नेली. त्यांनी मोटारीची किल्ली भरत प्रताप मुळे याच्याकडे दिली होती. त्याचा फायदा घेऊन तो मोटार घेऊन पसार झाला.

महासंचालक चक्रवर्ती यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
औरंगाबाद, २८ जून/खास प्रतिनिधी

राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक सुप्रकाश चक्रवर्ती हे ३० जूनला सेवानिवृत्त होत आहे. औरंगाबाद विभागातर्फे त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
सुप्रकाश चक्रवर्ती यांनी औरंगाबाद विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून काम केले होते. त्यांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत कुशलतेने हाताळला गेला होता. १९९३ मध्ये लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ात झालेल्या भूकंपाच्या वेळी विविध प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी उद्भवलेली परिस्थिती अत्यंत कुशलतेने हाताळली होती. सुप्रकाश चक्रवर्ती यांचा सत्कार पोलीस अधीक्षक विनायक देशमुख आणि नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. एस. पी. राठोड यांनी केला. या वेळी पोलीस उपअधीक्षक अशोक बेलवटे, बाबाराव मुसळे, शंकर शिटीकर, कल्याण सुपेकर, श्री. जारवाल, श्री. भांडवले, श्री. पगारे, पोलीस निरीक्षक योगेश गावडे, रामनाथ चोपडे आदी उपस्थित होते.

आषाढी यात्रेसाठी जादा बसगाडय़ांची सोय
उस्मानाबाद, २८ जून/वार्ताहर
आषाढी यात्रेसाठी उस्मानाबाद राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा साठ बसगाडय़ांची व्यवस्था केली आहे. ३ जुलै ते ७ जुलै या कालावधीत पौर्णिमेपर्यंत जिल्ह्य़ातील सर्व बस स्थानकावरून या जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५० प्रवाशांचा समूह एकाच गावातून यात्रेला जाणार असल्यास त्या गावापासून पंढरपूरपर्यंत विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या सर्व बस उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर, भूम, परंडा, कळंब या यात्रा केंद्राशिवाय येडशी, येरमाळा, वाशी, मुरूम, नळदुर्ग या उपकेंद्रावरूनही सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पंढरपूरहून येताना चंद्रभागा नगरातील यात्रा शेड क्र. ११ मधून उस्मानाबाद विभागातील परतीच्या गाडय़ा उभ्या करण्यात येणार आहेत. यात्रा केंद्रावर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी खास कर्मचारीवर्गही नियुक्त करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी यात्रा विभागाचे प्रमुख बबन जाधव यांच्याशी ९४२०३११५६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.