Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विदर्भ-मराठवाडय़ातील पावसामुळे दिलासा
राज्यात अजूनही अपुराच पाऊस; देशातही ८० टक्के भाग कोरडा
पुणे, २८ जून / खास प्रतिनिधी

 

मान्सूनने महाराष्ट्रासह देशाचा निम्माहून अधिक भाग व्यापला असला तरी देशातील ३६ उपविभागांपैकी २८ उपविभागांत अतिशय अपुऱ्या पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सर्वच भागात सरासरीच्या तुलनेत केवळ अर्धा ते एकचतुर्थाश इतकाच पाऊस पडला आहे. मात्र, काल सायंकाळपासून विदर्भ व मराठवाडय़ाच्या बऱ्याचशा भागात सुरू झालेल्या दमदार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर येत्या दोन दिवसांतही राज्यभर पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता पुणे वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनला महाराष्ट्र व्यापण्यासाठी झालेला उशीर आणि त्यानंतर मान्सूनचे आगमन होऊनही पाऊस न पडण्यामुळे राज्यामध्ये काळजीची स्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्राच्या चारही उपविभागांमध्ये अपुराच पाऊस आहे. कोकणात सरासरीच्या तुलनेत ६५ टक्के कमी, मध्य महाराष्ट्रात ४३ टक्के कमी, मराठवाडय़ात ६७ टक्के कमी, तर विदर्भात तब्बल ७९ टक्के कमी पाऊस पडला. त्याचा परिणाम म्हणून अनेक भागातील पेरण्यांवर परिणाम झाला व पिण्याच्या पाण्याची टंचाईसुद्धा निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर काल रात्रीपासून विदर्भात दमदार पाऊस सुरू झाला. आजपर्यंतच्या चोवीस तासांत अकोला (४९.८ मिलिमीटर), ब्रह्मपुरी (१०), नागपूर (२३.२), वर्धा (२१.४), यवतमाळ (१८.४) येथे चांगला पाऊस पडला. याचवेळी कोकणात मुंबई, अलिबाग, हर्णे, रत्नागिरी, डहाणू असा सर्वत्र पाऊस झाला. याशिवाय मध्य महाराष्ट्रातही सातारा, कोल्हापूर येथे त्याने हजेरी लावली. त्यानंतरही आज दिवसभरात मध्य महाराष्ट्राचा पट्टा वगळता विदर्भ, मराठवाडा व कोकणात बुहतांश ठिकाणी चांगला पाऊस झाला. अरबी समुद्रात किनारपट्टीलगत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकणात, तर झारखंडवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ व मराठवाडय़ात पाऊस सक्रिय बनला आहे. या स्थितीचा परिणाम म्हणून येत्या दोन दिवसांतही राज्यात पावसाच्या चांगल्या सरी पडतील, कोकणात त्या जोरदार स्वरूपाच्या असतील. विशेषत: झारखंडवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेला सरकले तर महाराष्ट्राला त्याचा अधिक फायदा होईल, असे हवामान विभागाचे उपमहानिरीक्षक डॉ. ए. बी. मजुमदार यांनी सांगितले.