Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘शिष्यवृत्ती’च्या निकालात अडसर तांत्रिक समस्येचा!
पुणे, २८ जून/खास प्रतिनिधी

 

दहावी-बारावी, सीईटी.. विद्यार्थिवर्गाकडून अधीरतेने वाट पाहिली जाणारे हे निकाल जाहीर झाल्यानंतर आता चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या शिक्षणविश्वाला प्रतीक्षा आहे ती चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालांची. शाळा सुरू होण्याचे राज्यभरातील भिन्न वेळापत्रक, भारनियमन आणि ‘डेटा एन्ट्री’तील काही तांत्रिक समस्यांवर मात करीत लवकरच हे निकाल जाहीर केले जाणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबरोबरच गेल्या शैक्षणिक वर्षांत दाखविलेल्या ‘कर्तबगारी’चा निकाल जाहीर केला जात असल्याने जून महिन्यात शिक्षणविश्वात एकच लगबग असते. शाळा-महाविद्यालयांमधील शिक्षक-शिक्षकेतरवर्ग निकाल जाहीर करण्याच्या कार्यवाहीच्या गडबडीत व्यग्र असतो. बारावीच्या निकालापाठोपाठ शाळा सुरू झाल्यानंतर चौथी-सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येतो. यंदा मात्र जून महिना संपत आला, तरी शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळेच राज्यभरातून या निकालाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर करण्यात पहिला अडथळा आला, तो शाळा सुरू होण्याच्या भिन्न तारखांचा. माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या आदेशानुसार राज्यातील शाळा एकाच दिवशी सुरू करण्याचा आदेश गेल्या काही वर्षांपासून जारी करण्यात आला आहे. त्यानुसार विदर्भवगळता राज्यातील सर्व शाळा १५ जूनला सुरू करण्याचे यंदा निश्चित करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र हा आदेश धाब्यावर बसवून आठ जूनपासून वेगवेगळय़ा वेळापत्रकानुसार शाळा सुरू करण्यात आल्या. विदर्भातील शाळा आता गेल्या आठवडय़ामध्ये सुरू झाल्या आहेत. या भिन्न वेळापत्रकामुळे शिष्यवृत्ती निकालास प्राधान्यक्रम देण्यात आला नाही. शाळा सुरू झाल्यानंतर पहिले काही दिवस शैक्षणिक घडी बसविण्यात जातात. त्यामुळे लगेचच निकाल लावू नये, अशी विनंती करण्यात आली. त्यामुळेच विदर्भातील शाळा सुरू झाल्यानंतर किमान आठ दिवस तरी निकाल जाहीर करणे शक्य झाले नाही.
उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांची कमतरता होती, असा आरोप करण्यात आला होता. राज्य परीक्षा परिषदेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मात्र तो खोडून काढला. सर्व उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. परंतु, गुणपत्रिका तयार करण्याच्या कामामध्ये ‘डेटा एन्ट्री’ करताना काही तांत्रिक समस्या उद्भवल्या आहेत. त्याचप्रमाणे भारनियमनाचा सामनाही करावा लागत आहे. या पाश्र्वभूमीवर निकाल जाहीर करण्यास विलंब झाला, असे संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केले. परंतु, लवकरच निकालाची तारीख जाहीर केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.