Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्र हे देशात पथदर्शक राज्य ठरावे - राष्ट्रपती
मुंबई, २८ जून / प्रतिनिधी

 

महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी आहे, तशीच ती शूरांचीही भूमी आहे. पराक्रम हा महाराष्ट्राच्या मनगटाचा सहजभाव आहे. महाराष्ट्राचा इतिहास उज्ज्वल आहे आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण महान शिल्पकारांच्या हातून झाली आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या मनातील भावी प्रगतीची सोनेरी स्वप्ने निश्चित पूर्ण होऊन देशात महाराष्ट्र हे आदर्श आणि पथदर्शक राज्य ठरावे, अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज येथे व्यक्त केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या सुवर्णारंभाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आज सायंकाळी एनसीपीएच्या जमशेद भाभा सभागृहात प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यपाल एस. सी. जमीर हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. तर मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ देवीसिंह शेखावत, हर्षवर्धन पाटील, सुरेश वरपुडकर, नवाब मलिक, शिवाजीराव देशमुख आदी विशेष अतिथी म्हणून हजर होते.गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राला ‘मंगल देशा पवित्र देशा’ म्हटले आहे असा हा महाराष्ट्र केवळ ५० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेला नाही. भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक असलेल्या महाराष्ट्राची अस्मिता शेकडो वर्षांपासून प्रतिष्ठित झाली आहे. चक्रधर स्वामींचा उल्लेख करून राष्ट्रपती म्हणाल्या की, महाराष्ट्र कधी स्वत: अत्याचार करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही, ही अस्मिता अशी शतानुशतके महाराष्ट्रात विकसित होत आली आहे. ज्ञानदेवांनी ज्याचा पाया रचला, नामदेवांनी ज्याचा विस्तार केला, एकनाथांनी ज्याला चिरस्थायी बनविले आणि तुकाराम ज्याचा कळस म्हणून शोभले ते भागवतधर्म अथवा वारकरी सांप्रदायाचे महामंदिर महाराष्ट्रात अनेक शतके संकटांचे वादळवारे झेलत भक्कमपणे उभे आहे, असेही पाटील म्हणाल्या.प्रारंभी प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाच्या प्रतिकृतीला पुष्पांजली अर्पण करण्यात आली आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते रिमोटने लामणदिवा प्रज्वलित करून सुवर्णारंभाचे उद्घाटन करण्यात आले. राज्य सरकारने तयार केलेली राज्याच्या प्रगतीची एक चित्रफीतही या वेळी दाखविण्यात आली. त्याचप्रमाणे जवळपास तीनशे कलावंतांनी महाराष्ट्रातील लोककलाही सादर केल्या. त्याला उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली.