Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गोंधळानंतर प्रवेश प्रक्रिया ‘ऑनलाइन’
मुंबई, २९ जून / प्रतिनिधी

 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गेल्या दोन दिवसांपासून सूरू असलेला गोंधळ दूर करण्यात अखेर ‘एमकेसीएल’च्या तत्रज्ञांना यश आले आहे. अनेक अडचणी निर्माण करणारे हे संकेतस्थळ आज मात्र सुरळीत सुरू होते. मुंबईतील विविध भागांतून ऑनलाइन प्रक्रियेबाबत आज मात्र कोणत्याही गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत.
ऑनलाइन प्रक्रियेत तब्बल १७ प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या असून आपण केलेल्या सूचनांनंतर ‘एमकेसीएल’च्या तंत्रज्ञांनी त्या दूर केल्या असल्याचे शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ऑनलाइन प्रक्रियेबाबत अधिकारी तसेच विविध संघटनांकडून तक्रारी आल्यानंतर आपण त्याची गंभीर दखल घेतली आणि सर्व त्रुटी तात्काळ दूर करण्याच्या सूचना आपण ‘एमकेसीएल’ला दिल्या होत्या. त्यानुसार काल दुपारी ऑनलाइन प्रक्रियेचे काम थांबवून ‘एमकेसीएल’च्या तत्रज्ञांनी त्रुटींचा अभ्यास केला. मध्यरात्री उशिरापर्यंत तंत्रज्ञांनी संकेतस्थळ सुरळीत करण्यात यश मिळविल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.
आतापर्यंत १ लाख ५० हजार १६५ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे अर्ज भरले आहेत. त्यापैकी आज अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उरलेल्या दिवसांमध्ये अर्ज सादरीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल, असा विश्वास विखे-पाटील यांनी व्यक्त केला. सव्‍‌र्हरवर भार येऊन नये म्हणून सर्व सव्‍‌र्हर ७० टक्क्यांवर ब्लॉक करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. आतापर्यंत आम्ही १२ सव्‍‌र्हर व आठ प्रोसेसर या कामी लावल्याचे ‘एमकेसीएल’चे महाव्यवस्थापक डॉ. अतुल वाडेगावकर यांनी सांगितले.
आज रविवार असल्यामुळे शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे प्रवेश अर्ज सादर करताना अडचणी येत नसाव्यात, अशी शंकाही मनविसे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. सोमवारनंतर असा प्रकार घडू नये याची काळजी शिक्षण विभागाने घ्यावी, असेही त्यांनी सूचविले आहे.
संकेतस्थळावर घुसखोरी झाल्याची शंका
गेल्या दोन दिवसांत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये आलेल्या विविध अडचणींमागे विघ्नसंतोषी व्यक्तींनी संकेतस्थळ हॅक केल्याचा अंदाज शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. हॅकच्या प्रकाराबद्दल तंत्रज्ञांनी आपल्याला माहिती दिली होती. परंतु, संकेतस्थळ हॅक होऊ शकते, याबद्दल ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तंत्रज्ञांनी पूर्वतयारी करून हॅकर्सना वेळीच आवर घालण्याच यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले.